महाराष्ट्रातील ६ जिल्हे, देशातील ४ राज्यांच्या भाग एकत्र करून भिल्लप्रदेशाची मागणी होतेय

गुजरातच्या निवडणुका देखील जवळ आल्यात. हार्दिक पटेलने काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलाय, केजरीवालांची आम आदमी पार्टी पूर्ण जोर लावून निवडणुकीत उतरणार आहे याच्या चर्चा आहेत. मात्र अजून एक पार्टी गुजरातमधील त्यांच्या एक मागणीने चर्चेत आली आहे.

ती पार्टी आहे भारतीय ट्रायबल पार्टी.

भारतीय ट्रायबल पार्टीने स्वतंत्र भिल्ल राज्याची मागणी केली आहे. या पक्षाचे सध्या गुजरात आणि  राजस्थानमध्ये  प्रत्येकी दोन आमदार आहेत. आदिवासी पट्यात या पक्षाचा चांगला प्रभाव आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या पार्टीने आम आदमी पक्षाशी युती केली आहे. त्यामुळं या पक्षाच्या मागणीसाठी भविष्यात एकाधी चळवळ देखील उभी राहू शकते असं सांगण्यात येत आहे.

भिल्ल समाजाची देशातील एकूण लोकसंख्या १.७ कोटींहून अधिक आहे. 

हा समाज प्रामुख्याने  राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि त्रिपुरासह भारतातील राज्यांमध्ये पसरलेला आहे. महाराष्ट्रातही आदिवासी समजत भिल्ल समाजाची संख्या सर्वाधिक आहे.

भिल्ल हा शब्द “वील” वरून आला आहे ज्याचा अर्थ द्रविड भाषेत “धनुष्य” असा होतो. धनुषाचे उत्कृष्ट ज्ञान असल्यामुळे या समुदायाला “भारताचे धनुष पुरुष” म्हणूनही ओळखले जाते.

भिल्ल समाज उजळिया किंवा क्षत्रिय भिल्ल आणि लंगोट भिल्ल या दोन जातींमध्ये विभागला गेला आहे.  क्षत्रिय भिल्ल मुघलांच्या आक्रमणानंतर जंगलात स्थलांतरित झाले असं सांगितलं जातं. तर लंगोट भिल्ल पहिल्यापासूनच लोक जंगलात राहतात आणि त्यांच्या जुन्या चालीरीतींचे पालन करतात.

इतक्या दिवस जंगल, डोंगर, दऱ्याखोऱ्यात राहणार भिल्ल समाज आता मात्र वेगळ्या राज्याची मागणी करू लागला आहे. 

यामागील कारणं कोणती आहेत ती एकदा बघू.

पाहिलं कारण म्हणजे स्वातंत्र्याच्या ७५ वर्ष झाली तरी भिल्ल समाजाची मोठी लोकसंख्या आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास राहिली आहे. विकासाची धारा अजून त्याच्यापर्यंत पोहचलेली नाहीये.  विकासाशी संबंधित अनेक योजनांचा त्यांना फायदा झाला नाही कारण समाजातील लोक इतर अनेक प्रदेशात विखुरले आहेत.

त्यामुळं समाजाला  त्यांच्या मूळ स्थानावर एकत्र करणे आणि नैसर्गिक संसाधनांवर त्यांचा हक्क सांगणे हे देखील एक प्रमुख उद्दीष्ट भिल्लप्रदेशाच्या मागणी मागे असल्याचं सांगितलं जातं.

भारतीय ट्रायबल पार्टी राजस्थानचे अध्यक्ष डॉ. वेलराम घोगरा यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना  सांगितले की, “पूर्वी, राजस्थानमधील डुंगरपूर, बांसवाडा, उदयपूर प्रदेश आणि गुजरात, एमपी इ. एकाच आदिवासी प्रदेशाचा भाग होता. परंतु स्वातंत्र्यानंतर, आदिवासी बहुसंख्य प्रदेशांची राजकीय पक्षांनी विभागणी केली, जेणेकरून आदिवासी संघटित होऊ नयेत आणि एकत्र येऊ शकत नाहीत.”

त्यामुळं आता भिल्ल प्रदेशाची मागणी जोर धरू लागली आहे.

भिल्ल प्रदेशात नेमका कोणता प्रदेशांचा समावेश असेल ?

भिल्ल अनुसूचित जमातीच्या विशेषाधिकारांतर्गत त्यांच्यासाठी स्वतंत्र राज्य किंवा प्रदेशाची मागणी करत आहेत. १९१३ मध्ये, गोविंद गुरू जे एक  भिल्ल समाजसुधारक आणि अध्यात्मिक नेते होते यांनी मानगडच्या हत्याकांडानंतर प्रथम वेगळ्या राज्याची मागणी केली होती.

१७ नोव्हेंबर १९१३ रोजी राजस्थान आणि गुजरातच्या सीमेवरील मानगडच्या डोंगरावर मानगडचा नरसंहार झाला होता. 

ब्रिटीश सैन्याने शेकडो भिल्लांची निर्घृण हत्या केली होती. या घटनेला “आदिवासी जालियनवाला” असेही संबोधले जाते.

भारतीय ट्रायबल पार्टीने गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या चार राज्यातून ३९ जिल्हे वेगळे काढून वेगळ्या भिल्ल प्रदेशाची मागणी केली आहे. आणि यात महारष्ट्रातीलही ६ जिल्ह्यांचा समावेश करावा अशी मागणी केली जात आहे.

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांचा भिल्ल प्रदेशात समावेश करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

यामध्ये मुख्यत्वेकरून उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी बहुल जिल्ह्यांच्या समावेश या नवीन भिल्ल प्रदेशात करावा अशी मागणी आहे. यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक,पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील भागांचा समावेश आहे. या सहा ही जिल्ह्यात आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि भौगोलिकदृष्ट्या एकमेकांना जोडले देखील आहेत. मात्र या सर्व जिल्ह्यात आदिवासींची पर्यायाने भिल्ल समाजाचा प्रमाण एकसंध नाहीये.

नंदुरबार आणि पालघर जिल्ह्यात भिल्ल समाजाचं प्रमाण सर्वाधिक आहे.

वेगळ्या राज्याची मागणी भारतीय ट्रायबल पार्टीने  २०१७ पासून लावून धरली आहे. पक्ष काढण्यामागचं एक उद्दीष्टच वेगळ्या भिल्ल राज्याची मागणी करणं हे होतं. त्यामुळं आता या मागणीचं पुढे काय होतं? विशेषतः ४ राज्यातील प्रदेश या नवीन राज्यांत आणण्याची मागणी करणं हे वास्तवाला धरून आहे का? अशा अनेक प्रश्नाची उत्तरं जस जशी मागणी अजून पुढे येत राहील तशी मिळतीलच. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.