रशियाची बुद्धिबळातील मक्तेदारी संपवायला एक बुद्धिबळसम्राट अमेरिकेत जन्माला आला

बुद्धिबळ हा एक भारतीय खेळ आहे. बुद्धिबळाचा जन्मच भारतात झालेला आहे. आणि मग तो खेळ भारतातून हळूहळू जगभर पसरत गेला. बुद्धिबळाला पूर्वकाळात ‘चतुरंग’ असे म्हणत. राजा, हत्ती, घोडे व पायदळ ही चार अंगे म्हणून चतुरंग.

बुद्धिबळाच्या शोधाबद्दल भरपूर अख्यायिका आहेत. असे म्हणतात की लंकेचा राजा रावण व त्याची बायको मंदोदरी यांनी मिळून बुद्धिबळाचा शोध लावला. तर वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा बुद्धीबळाचा (अष्टापदकरा – म्हणजेच आठ घरे असलेला पट अर्थातच बुद्धिबळ) उल्लेख मिळतो.

शतरंग हे नाव चतुरंगाचे अरबी अपभ्रंश आहे. संत एकनाथांनी सुद्धा भागवतामध्ये बुद्धिबळाचा उल्लेख केला आहे. यावरून स्पष्ट होते की पूर्वकाळी बुद्धिबळ हा भारतातला लोकप्रिय खेळ होता.

आधुनिक कालखंडात सुरुवातीला म्हणजे १९ व्या शतकात रशिया म्हणजे बुद्धिबळ आणि बुद्धिबळ म्हणजे रशिया असे समीकरण तयार झाले होते. बॉतविनीक, सिमस्लॉव्ह, ब्रॉनस्टेन, ताल, पेट्रोशियन , स्पॅस्सकी आणि कारपॉव्ह, कॅस्पारॉव्ह इतक्या महान खेळाडूंची अभेद साखळीच रशियाजवळ होती.

ही पोलादी साखळी उध्वस्त करून रशियाची बुद्धिबळातील मक्तेदारी व एकाधिकारशाही संपवायला एक बुद्धिबळसम्राट अमेरिकेत जन्माला आला.

रॉबर्ट जेम्स (बॉबी) फिशर.

बॉबी फिशर म्हणजे बुद्धिबळातील एक अभेद सम्राट. १९७२ मध्ये तो बुद्धिबळाचा जगज्जेता झाला. रशियाच्या स्पासकीला पराभूत करून त्याने रशियाकडून जगज्जेतेपद हिरावून घेतले. बॉबी फिशर वर आजपर्यंत जितके लिहिले गेले आहे तितके अन्य कोणत्याही बुद्धिबळपटू विषयी लिहिले गेलेले नाही.

१९४३ च्या ९ मार्च रोजी बॉबीचा जन्म अमेरिकेत झाला. केवळ दोन वर्षाचा असतानाच बॉबीच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. बॉबीला त्याच्या आईने आणि मोठ्या बहिणीने वाढविले. वडिलांचे छत्र नसल्यामुळे मुलं वाईट प्रवृत्तीच्या मार्गाला लागतात पण तसे बॉबीच्या बाबतीत झाले नाही. शाळेमध्ये त्याचे मन कधीच रमले नाही.

बॉबीच्या घरची अवस्था एकदम बिकट होती. पैसे मिळवण्यासाठी त्याच्या आईला खूप कष्ट करावे लागत होते. तरीही त्यांना चांगली नोकरी मिळत नव्हती. पुढे त्यांना शिक्षकाची नोकरी मिळाली आणि त्यांच्या घरात सुखाचे दिवस चालू झाले.

१९४१ साली न्यूयॉर्क येथील ब्रुकलीन येथे फिशर परिवार राहायला आले आणि इथेच बॉबीच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. न्यूयॉर्कमध्ये बॉबीच्या बहिणीला बुद्धिबळाचा एक संच भेट म्हणून मिळाला. तिने तो सहा वर्षाच्या बॉबीला खेळायला दिला. हीच घटना ऐतिहासिक झाली. याच घटनेने पुढे बॉबीला बुद्धिबळ जगताचा सम्राट बनवले.

वयाच्या सहाव्या वर्षापासून बॉबीने बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. बॉबीमध्ये एक वेगळीच गुणवत्ता निर्माण झाली होती. त्याच्या आई व बहिणीने सुद्धा हे हेरले होते. वयाच्या बाराव्या वर्षी न्यूयॉर्क खुल्या अजिंक्यपद स्पर्धेत त्याने पाचवा क्रमांक मिळवला. १९५६ साली बॉबीच्या आयुष्याला वेगळे वळण लागले. त्याने एकदम उंच भरारी घेतली.

त्याने मॅनहॅटन अजिंक्यपद, अमेरिकन जूनियर चॅम्पियनशिप असे किताब आपल्या नावावर केले. त्याच साली झालेल्या ‘रोझेन वॉल्ड कप’ स्पर्धेत भाग घेतला. अमेरिकेतील बलाढ्य अशा बुद्धिबळपट्टुंशी त्याची प्रथमच तिथे गाठ पडली. पहिल्या फेरीतच तो बिसगायरा विरुद्ध हरला. हा पराभव बॉबीला इतका बोचला की पुढे वारंवार झालेल्या स्पर्धेत त्याने बिसगायरा १३ – ० असे हरविले.

बॉबीविषयी अमेरिकेतील वृत्तपत्रातून भरभरून लिहून येऊ लागले.

पुढे जाऊन बॉबीने बुद्धिबळ जगतावर राज्य केलं. जे जग त्याला सुरुवातीला हसले होते त्याच बुद्धीबळ जगताचा वयाच्या पंधराव्या वर्षी तो सम्राट बनला. अमेरिकन बुद्धिबळ स्पर्धेत सलग आठ वेळा अजिंक्यपद (हा विक्रम आहे), वयाच्या पंधराव्या वर्षी ग्रँड मास्टर या सन्माने पुरस्कारीत, स्पर्धेत ११ पैकी ११ डावात विजय, ग्रँड मास्टर स्पर्धेत ओळीने २० विजय, कॅंडिडेट्स टूर्नामेंटमध्ये सलग १३ विजय, ग्रँडमास्टर रेटिंगमध्ये सर्वोच्च गुण, इत्यादी अनेक विक्रम बॉबी नावाच्या विक्रमादित्याने आपल्या नावावर केले.

बॉबीला पराभूत करण्यासाठी रशियाने आपले सर्व सामर्थ्य पणाला लावले होते. पण एकट्या बॉबीने रशियाला उलथेपालथे करून १९७२ साली जगज्जेतेपद मिळवले.

‘माय सेवन चेस मिरॅकल्स’ या पुस्तकात कॉलिन्स लिहितो,

“बिथोव्हॅन, लिओनार्दो द व्हीन्सी, शेक्सपियर आणि बॉबी फिशर यांसारखे अलौकिक बुद्धिवान येशूच्या डोक्यातून निर्माण झालेले असतात”.

ॲव्हरबॅक या प्रसिद्ध रशियन खेळाडूने लिहिले आहे की,

“लहान मुलासारखा दिसणारा बोबी खेळतो मात्र एखाद्या परिपक्व खेळाडू सारखा या मुलाजवळ बुद्धिबळाची अलौकीक गुणवत्ता आहे यात संशय नाही.”

रशियन सुप्रसिद्ध खेळाडू ताल यांनी लिहिले आहे की,

“सोळा वर्षाच्या फिशर बरोबर खेळणे सुख नाही तो कधीच जमत नाही आणि थकत ही नाही प्रत्येक डाव जिंकण्याची त्याची उमेद आश्चर्य करण्यासारखी आहे.”

बॉबी फिशरने प्रसिद्धीच्या सर्व सीमा ओलांडल्या होत्या. सर्व जगाने बॉबीला डोक्यावर घेतले होते. युरोपमधील एका श्रीमंत व्यापाऱ्याला बॉबीच्या खेळाबद्दल विशेष आकर्षण वाटत होते. तो एकदा बॉबीला भेटायला आला. तो बॉबीला स्वतःसोबत घेऊन जाण्यास तयार होता. बॉबीचा सर्व खर्च उचलण्यास तयार होता.

फक्त त्यानी एक अट घातली होती की,

“बॉबी ज्यावेळी तु वृत्तपत्रांना मुलाखत देशील त्यावेळी माझ्या मुळे तुला हे यश मिळाले एवढंच सांगायचं.”

बॉबी या सगळ्या गोष्टीवर हसला आणि म्हणाला,

“मी मुळीच असे करणार नाही. मी ज्यावेळी एखादी स्पर्धा जिंकतो त्यावेळी ती माझ्या हिमतीवर आणि माझ्या बुद्धिमत्तेवर जिंकतो.”

बॉबी फिशर हे नाव आता जगभरात प्रसिद्ध झाले होते. १९६५ मध्ये हॅवाना येथे कापाब्लॅका स्मृती बुद्धिबळ स्पर्धा होणार होत्या. त्यात भाग घेण्यासाठी क्युबाचा प्रमुख फिडेल कॅस्ट्रो यांनी बॉबीला निमंत्रण दिले होते. पण गंमत अशी होती की अमेरिका आणि क्युबा यांचे संबंध चांगले नव्हते. त्यामुळे बॉबीने क्युबा येथे जाण्याचे टाळले. पण त्याने एक युक्ती काढली, ती बुद्धिबळ स्पर्धा तो टेलीफोनवरून खेळला या स्पर्धेत बॉबीने दुसरा क्रमांक मिळवला होता.

असा होता जगप्रसिद्ध बुद्धिबळसम्राट बॉबी फिशर.

  • कपिल जाधव

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.