हा महाराष्ट्रातले निम्मे पै-पाहुणे एकमेकांशी जोडून देण्याऱ्या गायछापचा इतिहास आहे

मित्राला मित्रांशी, पाहुण्यांना एकमेकांशी जोडून देणाऱ्या अस्सल गायछापचा हा अस्सल इतिहास आहे, मळ डब्बल

तलप ही एक अशी गोष्ट आहे की ती एकदा का लागली, मग ती सहजासहजी सुटत नाही. मग ती कोणत्याही प्रकारची तलप असो. व्यसनाची तलप तर या सगळ्यांमध्ये आघाडीची भूमिका बजावत असते.

तंबाखू वरून आठवलं, गावकडे रोगाच्या आधी जर दोन गायछाप मेंबर एकत्र आले तर एका इड्यात दोघे भागवायचे, पण आता..

“ मेंबर, गायछापीचा एखादा इडा द्याना राव मळून. व्ह्य ? ”

असं म्हणल्यावर जिवाभावाचा मेंबर कुठं जातो त्याचा लवकर तपास लागत नाही. लॉकडाऊन मुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे. पण म्हणतात ना की “ जित्याची खोड मेल्याशिवाय मरत नाही ” अगदी तसं गायछाप प्रेमी कुठून ही त्याची प्रेयसी उपलब्ध करेल याचा काहीच भरवसा नाही.

पण गायछाप प्रेमी वाल्यांना किंवा इतरांना गायछाप चा इतिहास माहिती आहे का ?

गायछाप तंबाखू व्यवसायाला देशभरात पोहचून यशाचं शिखर गाठणाऱ्या मालपाणी उदयोग समूहाने ९ जुलै १८९४ मध्ये पहिल्यांदा गायछाप जर्दा भारतीय बाजारपेठेत आणला. दामोदर जग्गनाथ मालपाणी हे उदयोग समूहाचे पाहिले गायछाप जर्दा उत्पादक होते. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात झाला होता.

तेव्हाच्या काळात सारा भारत हा इंग्रजांच्या गुलामगिरीत अडकत चालला होता. इग्रजांच्या हाताखाली एकतर चाकरी करा नाहीतर उपाशी मरा अशी परिस्थिती त्याकाळी उपस्थित झाली होती. दामोदर मालपाणी यांचा व्यापार करण्यावर खूप भर होता. औद्यगिक दूरदृष्टी त्यांना जगण्याच्या अनुभवात आली होती.

संगमनेरच्या आठवडी बाजारपेठ मधील छोटया मोठ्या खरेदी विक्रीचा व्यवसाय बघुन ते खूप प्रभावित झाले.

कुणाच्या हाताखाली चाकरी करण्यापेक्षा आपण आपलाच व्यापार सुरु करू असा त्यांनी निश्चय केला. समाजात व्यसनाच्या वाढत्या तलपी पाहून त्यांना तंबाखू उत्पादन व्यवसायाची कल्पना सुचली. गायछाप जर्दा तंबाखूच्या फक्त दोन पोत्यावर आसपासच्या गावात व्यापार सुरु केला. पाहता पाहता त्यांनी उत्पादन केलेला गायछाप जर्दा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचला.

घरात खायला अन्न नसलेल्या माणसाच्या खिश्यात मात्र गायछाप पुडी असायची.

मालपाणी उद्योग समूहाच्या आधुनिकीकरण व्यवसायाचं सगळं श्रेय जातं मुलगा ओंकार दामोदर मालपाणी यांना.

ओंकार दामोदर मालपाणी यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९३४ ला झाला. वडिलांच्या आग्रहाने त्यांनी वैद्यकीय शिक्षण सोडून मालपाणी उदयोग समूहाला वाढविण्याची जवाबदारी हाती घेतली.

पुढे चालून तंबाखू, चहा, बांधकाम व्यवसाय, हॉटेल्स अश्या विविध व्यवसायात त्यांनी मालपाणी उदयोग समूहाला व्यापारी दृष्टीने विकसित केलं. सौरउर्जा आणि पवनउर्जा यांची एकत्र मिळून ५८० मेगावॉट वीजनिर्मिती करून समूहाने देशात बाराव्या स्थानी यशस्वी झेप घेतलेली आहे. गायछाप तंबाखूच्या जर्द्या सोबत त्यांनी ‘ माउली आणि बादशाह ’ या तंबाखू जर्द्याच्या उत्पादनाची भारतीय बाजरपेठेत नव्याने भर टाकली.

१० मार्च २००८ रोजी ओंकार मालपाणी हे यशस्वी भारतीय उद्योजकाची प्राणज्योत मावळली.

१९५४ – ६४ च्या काळात संगमनेरच्या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, मर्चंट बँकेचे अध्यक्ष आणि मालपाणी उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष अश्या अनेक व्यापारी आणि राजकीय भूमिका ही त्यांनी जीवनभरात गाजवल्या.

ओंकार मालपाणी यांचा मोठा मुलगा राजेश मालपाणी सध्या समूहाचे विद्यमान चेयरमन म्हणून आज्ज्या – वडिलांचा व्यापारी वारसा लहान भावासोबत मिळून पुढे चालवत आहे. तर लहान मुलगा डॉक्टर संजय मालपाणी हे समूहाचे संचालक आहेत.

सोबत समूहाच्या शिक्षण संस्थांचे अध्यक्ष ही आहेत.

सध्याच्या काळात मालपाणी उदयोग समूहाची उलढाल ही कोट्यावधीच्या वर झालेली आहे. मालपाणी उदयोग समूह हा जरी तंबाखू उत्पादनासाठी भारतभर परिचित असला तरी अनेक सामजिक कार्य आणि सामाजिक हितासाठी काम करणाऱ्या संस्थांशी जोडला गेलेला आहे. राजेश मालपाणी आणि संजय मालपाणी हे दोघेही आज जगभरात यशस्वी उद्योजक म्हणून प्रेरणादायी व्याख्यान देत असतात.

‘ जरा गायछाप बघुदे बरं ’ असं म्हणून आज ग्रामीण भागात अनेकांची दिवसभराची कामे सुरु होत आहेत.

गायछाप टपरीवर विकुन अनेक जण पैसे कमवत आहे तर गायछाप कंपनीत काम करून अनेकांची घरं त्यावर चाललेली आहेत. म्हणजे एका गायछाप पुडी मुळे सगळे एकमेकांवर अवलंबून आहेत.

काही वर्षांपूर्वी गायछाप पुडी तीन रुपयाला होती. पुढे पाच, सात, नऊ आणि लॉकडाऊन आधी तेरा रुपयापर्यंत विक्री येऊन पोहचली होती. जेव्हा एखाद्या गोष्टीला प्रचंड मागणी असते आणि ती गोष्ट बाजारात कमी प्रमाणात उपलब्ध होते, तेव्हा तिचा काळाबाजार सुरु होतो; पण तंबाखूच्या बाबतही असा प्रकार घडेल असं कधीच तंबाखू धारकांना जन्मातही वाटलं नसेल.

लॉकडाऊन मध्ये गायछाप तंबाखू पुडीचा जास्त किंमतीत विकुन काळाबाजार करण्यात आला. ४०, ४५, ५० अश्या मनासारख्या रकमेवर पुडी विकली जाऊ लागली. आजही गायछाप काही ठिकाणी वाढलेल्याच रकमेत विकत भेटत आहे.

जेव्हा तंबाखू मुळे कर्करोग होतो असं सिद्ध करण्यात आलं तेव्हा पासून मालपाणी समूहाने गायछाप वर “ तंबाखू मुळे कर्करोग होतो ’ ! असं लिहून कर्करोगाने ग्रासलेल्या फुफ्फुसाचे फोटो लावून विकायला सुरुवात केली; तरीही ग्राहकांच्या गायछाप विकत घेणाऱ्यांवर आणि मालपाणी उदयोग समूहाच्या निर्मितीवर काहीही फरक पडलेला नाही.

दिवसेंदिवस त्याची निर्मिती आणि विक्री वाढत आहे. दरम्यानच्या काळात खोटी गायछाप सुद्धा अनेकजण विकु लागले.

त्यामुळे ग्राहकांची फसवणूक व्हायला लागली. हे जेव्हा मालपाणी उदयोग समूहाला कळलं तेव्हा त्यांनी टेक्नोलॉजीचा वापर करून अल्ट्रा व्हायलेट रेज वापरून तपासणी मशीन तयार केलं आहे. ते बाजारात आणून त्यांनी खोट्या पुडीच्या व्यापारावर आळा बसवलेला आहे.

गायछाप ! हा शब्द फक्त पुडी विकणाऱ्या आणि खाणारयाच्या तोंडून नाही तर इतर अनेक ठिकाणाहून येत असतो. इतका तो शब्द लोकप्रिय झाला आहे, असं म्हणायला हरकत नाही. लॉकडाऊन मध्ये जर पोलिसांनी एखाद्याला पकडून विचारलं की ‘ काय रं, कुडं निघाला ’ ? ते. साहेब, गायछाप संपली होती, हे कारण सांगून अनेकांनी पोलिसांचा मार खाल्ल्याचं, गावाच्या टाकीवर उभा राहून ‘ मला गायछाप दया नायतर जीवच देईन ’ सारख्या अनेक गोष्टी सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडीओतून निदर्शनास आलेल्या आहेत.

अनेक नाटकामधून, चित्रपटातुन कलाकाराला ‘ गायछाप ’ मळवून खायला लावून खऱ्या जगातल्या माणसांच्या तलपीचं रुपक मांडण्यात आलेलं आहे.

एवढ्चं नव्हे तर युट्युब वर गायछाप वर अनेक गाणी सुद्धा बनवलेली आहेत. मला गायछाप मळून दे, घे डबल, खिशात असून नोटा मला गायछाप भेटाना अश्या अनेक प्रकारची लाखोंच्या वर व्ह्यूज मिळालेले गाणे आहेत.

दोन पिढ्यांच्या तलपीचा वारसा पुढं चालवणाऱ्या मालपाणी उदयोग समूहाच्या ‘ गायछाप ’ या व्यसनाधीन पदार्थाच्या इतिहासाचा वरील लेखा- जोखा..

  • कृष्णा वाळके

हे ही वाच भिडू

4 Comments
  1. Rajesh Malpani says

    प्रस्तुत पोस्ट व विविध फेसबुक कॉमेंट वाचले. असे प्रश्न अनेकांच्या मनात येतात. आपण मांडलेत. धन्यवाद. अनेकदा मी याच जाहीर उत्तरही दिले आहे.
    १) गाय तंबाखूचा व्यवसाय फक्त आमचा एकट्याचा नाही. हा यात काम करणाऱ्या ३००० सहकारी कामगारांचा, ५०००० पानस्टॉल धारकांचा व्यवसाय आहे. याशिवाय तंबाखू शेतकरी व इतर अनेक लोकांचाही.
    २) आम्ही तो जरी बंद केला तरी समाजाची ती गरज कोणीतरी भागवेलच. पण किमान मोठा नियमित टॅक्स भरून व सर्व कायद्यांचे पालन करुन, व्यवसायाशी निगडित सर्वांचेच हित जपत, दर्जेदार सेवा देणा-या मालपाणी उद्योगांने तो चालू ठेवणे अधिक श्रेयस्कर कसे आहे यासाठी ही पोस्ट व लिंक्स शेवटपर्यंत जरूर वाचा.
    ३) तंबाखू म्हणजे चवनप्राश नाही. आमचा तसा दावाही नाही. पण ते सर्वात कमी हानिकारक व स्वस्त व्यसन आहे. तंबाखू बंद झाल्यास अवैध मार्गाने अधिक हानिकारक व्यसने त्याची जागा घेतील. पंजाब सारख्या राज्यास उडता पंजाब म्हणतात कारण तंबाखू नाही तर त्याहून घातक ड्रग्ज कडे लोक वळले. शेवटी काहीतरी व्यसन लोक शोधून काढतातच. सरकारने तंबाखूची लागवडच बंद करावी, दारू बंदी करावी असे अनेक प्रस्ताव येतात पण यात असणारा करोडो लोकांचा रोजगार, यातून मिळणारा खूप मोठा राजस्व व लोकांना हवी असणारी व्यसने यामुळे हे शक्य होत नाही. तंबाखूवर ९९% व अधिक करभार आहे. म्हणजे १० रुपयांची गाय पुडी घेणारा त्यातील जवळजवळ ५ रूपये देशसेवेत कर रूपाने भरतो. लॉकडाउन नंतर अगदी दारू घरपोचची व्यवस्था का झाली आपणास विदित आहेच. दारू पिणारे कसे अर्थव्यवस्था बळकट करतात यावर अनेक विनोदाच्या पोस्ट्स ही आल्या होत्या.
    तंबाखू उद्योगात 4-5 कोटी लोक अवलंबून आहेत याची एक बातमी.. https://m.economictimes.com/industry/cons-products/tobacco/rs-11-79-lakh-cr-indian-tobacco-sector-employs-4-5-cr-people/articleshow/69663548.cms
    ४) आमच्या कारखान्यात अनेक कामगार गेली ४-५ दशके काम करीत आहेत. तंबाखू मोफत असल्याने नियमित सेवनही आहे. पण आजपर्यंत एकाही कामगाराला तोंडाचा कर्करोग झालेला नाही. आम्ही दरवर्षी सर्व कामगाराचे मेडिकल चेकअप करतो. गावात ६-७ दशकापासून तंबाखू मळणारे अनेक म्हातारे भेटतात. एकदम फिट. फक्त तंबाखू मळणाऱ्यांमध्ये क्वचितच आपणास कॅन्सर सापडेल.. न खाणाऱ्यांमध्ये सापडतो तसाच. कारण तंबाखू जोवर जाळली जात नाही तोवर त्यात कॅन्सर करणारे टार व एपोक्सिडं तयार होत नाहीत. डॉ. मार्क्स आणि स्टर्न च्या ओरल मॅक्सिफिसल पॅथॉलॉजि या सर्वच डेंटल कॉलेज मध्ये असणाऱ्या प्रसिद्ध पुस्तकात याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्याचा उतारा खाली जोडत आहे. जरूर अभ्यासावा. निकोटिन हे कॅफिन, टॅनिन या चहा कॉफी मधील घटकांसारखे सवय जडवणारे आहे. त्याची सवय लागली की त्याशिवाय जमत नाही पण निकोटिन कारसिनोजेनिक (कॅन्सर ला कारणीभूत) नाही. कॅन्सर होतो तो धुरामुळे. मग तो अगदी पूजेतील अगरबत्तीचा असला तरी. https://www.nhs.uk/news/cancer/is-incense-smoke-more-dangerous-than-tobacco-smoke/
    तंबाखू विषयीचे संशोधन वाचायचे असेल तर अमेरिकन डॉ. ब्राड रोडू यांचे पुस्तकही वाचावे ज्यात त्यांनी स्मोकिंग पेक्षा स्मोकलेस तंबाखू ९८% सुरक्षित असल्याने स्मोकर्स ना स्मोकलेस तंबाखू कडे वळण्याचा सल्ला शास्त्रीय विवेचनासहित दिला आहे. https://www.amazon.com/Smokers-Only-Smokeless-Tobacco-Save/dp/1939104300
    भारत तंबाखू उत्पादनात जगात दोन नंबर ला असला तरी तंबाखुमुळे होणाऱ्या कॅन्सर मध्ये टॉप टेन मधेही नाही याचे कारण येथे तुलनेत धूम्रपान कमी आहे. परदेशात आता Harm Reduction Theory नुसार स्मोकिंग करण्यापेक्षा स्मोकलेस तंबाखू वापरावर जोर देत आहेत.
    सिगारेट तंबाखूपेक्षा खूप हानिकारक असली तरी मायबाप भारत सरकारच्या कंपन्यांची त्यात मोठी गुंतवणूक म्हणजेच मालकी आहे हे वाचून आपणास कदाचित आश्चर्यही वाटेल.
    https://theprint.in/india/governance/govt-has-banned-vapes-but-owns-28-of-itc-indias-biggest-cigarette-maker/293547/
    ५) कोणतेच काम पूर्ण दोषमुक्त नाही. तंबाखू पुडीवर तरी वैधानिक इशारा असतो. अगदी साखर खाल्यानेही त्रास होतो. https://www.diabetesdaily.com/blog/sugar-or-cigarettes-which-is-worse-for-you-248317/
    https://www.chatelaine.com/health/sugar-gary-taubes/
    दुधात आणि तेलातही भेसळ व वापरावर वाद आहेतच. फळ आणि भाजीपाल्यात विषारी औषधांचे खूप फवारे मारले जातात. पंजाब मध्ये या फवारण्या मुळे कॅन्सर इतका पसरला आहे की तिथल्या ट्रेन चे नाव कॅन्सर ट्रेन पडले आहे https://www.ndtv.com/india-news/punjab-has-a-cancer-train-few-political-parties-talk-of-the-disease-1654354. वैद्यकीय आणि शिक्षणासारखे पवित्र क्षेत्रही आज भ्रष्टाचाराने बरबटलेत. मोबाईल मुळेही रेडिएशन चे धोके आहेत. प्लास्टिक चे मोठे संकट वाढतच आहेच. काय काय बंद करणार?
    ६) किमान एक पारंपरिक काम दोषयुक्त मानले तरि सोबत शंभर कामे चांगली करायला हवीत याचे भान मालपाणी उद्योग समूह कायम ठेवतो. मालपाणी उद्योग व त्यांचा सहयोगी संस्थांद्वारे सामाजिक बांधीलकीतून होणाऱ्या विविध उपक्रमांची व त्यातून लाभान्वितांची यादी एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. इतक्या मोठ्या स्तरावर काम करणारा तालुका पातळी वरील परिवार मिळणे अवघडच. नुकतीच कोविड साठी दिलेली सव्वा कोटींची देणगी याचे ताजे उदाहरण आहे.
    ७) मोठा रोजगार व राजस्व देणारा हा पारंपारिक व्यवसाय बंद करावा काय यावर विचार करता जन्माने प्राप्त झालेले कार्य दोषयुक्त असले तरी ते सोडू नये हा भगवतगीतेत श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेला उपदेश समोर येतो. म्हणून तर युद्धासारख्या हिंसक गोष्टीसाठी श्रीकृष्ण क्षत्रिय धर्माची आठवण देऊन अर्जुनाला प्रवृत्त करतात.
    गीता अध्याय १८ श्लोक क्र. ४८:
    सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् |
    सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृता: || 48||
    अर्थ:
    अग्नि जैसा धुमाने, तैसे कर्म हे दोषाने। व्यापिले जरी तरि न टाकणे, हेच उचित होईल।।
    स्वधर्म व परधर्म, दोषयुक्त सर्वच कर्म। स्वधर्मपालन हेच मर्म, म्हणून कर्माचरणाचे।।
    तरि स्वधर्म जो जन्मजात, दोष असू दे कितीही त्यात। तो आचरणे हेच उचित, ऐसे मनात जाणावे।।
    (आली ज्ञानमाऊली घरा, प्रा. विमल लेले)
    तंबाखू हा आमच्या चार पिढी आधीपासून चालत आलेला व्यवसाय. मोठी संधी व वितरण व्यवस्था असतांनाही आम्ही गुटखा/सिगारेट आदी तंबाखू पेक्षा अधिक घातक व्यवसाय चालू केले नाहीत. गुटखा व पानमसाला तील सुपारी व केमिकल्स मुळे OSMF हा तोंड उघडण्यास त्रास होणारा आजार पुढे कॅन्सर मध्ये परिवर्तीत होण्याचे प्रमाण मोठे आहेच. तंबाखू जाळल्यावर कॅन्सर घटक तयार होतात पण सुपारीमध्ये ते असतातच म्हणून सुपारी उत्पादने वापरणाऱ्यांमध्ये कॅन्सर चे प्रमाण जादा आहे. अगदी महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांसमवेत अनेकांना त्याचाच त्रास झाला आहे. त्यामुळे असे उद्योग टाळून मालपाणी परिवाराने हरित ऊर्जेसाठी सोलर, विंड मिल्स चे अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प, वॉटर व थीम पार्क सारखे पर्यटनास चालना देणारे उदयोग, बांधकाम क्षेत्र आदी उद्योग चालू केले व त्यातूनही मोठा रोजगार निर्माण झाला व मोठे परकीय चलन व प्रदूषण वाचले. आज मालपाणी उद्योगातील सर्व ऑफिसेस/प्रकल्प अगदी शाळेपासून ते थीम पार्क पर्यन्त सर्वकाही सोलर उर्जेवरच चालतातच व मुंबई एअरपोर्ट सारख्या प्रकल्पानाही आम्ही सोलर ऊर्जा पुरवितो. मालपाणी उदयोग समूहाचा तंबाखु हा पिढीजात व्यवसाय असला तरी आज मितीला विस्तारलेल्या उदयोगकक्षेत तो एकूण उद्योगातील फक्त एक छोटा भाग बनत चालला आहे. पण त्यातील रोजगार मात्र आजही सर्वाधिक आहे. या उद्योगातील कामगारांना इतर अशा उद्योगांपेक्षा व परिसरात सर्वाधिक रोज व सुविधा आहेत. मोठया प्रमाणावर ग्रामीण गरजू महिलांना चांगला रोजगार मिळत असल्याने ‘ज्याला नाही कोणी त्याला मालपाणी’ अशी मजेशीर म्हण परिसरात प्रचलित झाली आहे.
    ८) या उपरांत काही शंका असतील तर अवश्य विचाराव्या, व्यक्तिगत चर्चा करावी ही विनंती. सर्व गोष्टींचा सारासार विचार करून आपले मत बनवावे.
    मोठे लिखाण आपण नीट वाचल्याबद्दल सादर धन्यवाद.

  2. विकास says

    खूपच सुंदर

  3. Jamgaonkar vr says

    Very detail business development with Great social responsibility .wel done.we proud of you

  4. गणेश भगुरे says

    मालपाणी साहेब…खुपच छान स्पष्टीकरण दिले आपण. आणि आपल लिखाण सुध्दा अगदीच भारी वाटल.

Leave A Reply

Your email address will not be published.