नोटेवर सही करणारा पहिला मराठी माणूस. पाकिस्तानातही यांच्याच नोटा चालायच्या…

चिंतामणराव देशमुख भारताचे माजी अर्थमंत्री. आपल्याला ते संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात राजीनामा दिल्याने जास्त माहित असतात. पहिले स्वाभिमानी नेते. आता त्यांच्याविषयी लिहीण्यामागचं कारण म्हणजे मुंबईतलं वेस्टर्न रेल्वे लाईनवरचं चर्चगेट स्टेशन.

झालंय असं की, चर्चगेट या स्टेशनचं नाव बदलून स्टेशनला सीडी देशमुख यांचं नाव देण्यात यावं असा ठराव नुकताच शिंदेंच्या शिवसेनेनं राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मान्य केलाय. हा ठराव मान्य केलाय खरा, पण निर्णय अंमलात आणण्याआधीच या नामांतरणाला विरोध सुरू झालाय.

चर्चगेट या नावाला इतिहास आहे तो इतिहास पुसू नये अशी मागणी वॉचडॉग फाऊंडेशन आणि मुंबई ईस्ट इंडियन असोसिएशनने केलीये.

त्यामुळं पुन्हा एकदा सीडी देशमुख हे नाव चर्चेत आलंय. पण सीडी देशमुख या नावाला असलेला इतिहास फार मोठा आहे तो इतिहास बघुया…

मराठी माणसाला स्वाभिमानाचं उदाहरण देण्यासाठी चिंतामणराव उर्फ सीडी देशमुख हे महत्वाचं नाव आहे.

अर्थात पंडीत नेहरूंशी वाद घा लणे, त्यांच्या मंत्रीमंडळाचा राजीनामा देणे ही साधी गोष्ट नव्हतीच. बरं चिंतामणराव म्हणजे साधी सुधी आसामी नव्हती. त्यांच्या प्रचारासाठी पंडीत नेहरू स्वतः आले होते. पण अर्थमंत्री झालेले चिंतामणराव काही राजकारणी नव्हते. 

चिंतामणराव उर्फ सीडी देशमुख कोकणातल्या रोह्याचे. रोहा गावातच त्यांचं बालपण गेलं. पुढे ते काही काळ लंडनला स्थायिक झाले. त्या काळात त्यांनी लंडनला घर घेतलं होतं. आणी घराचं नाव ठेवलं होतं रोहा.

लंडनला पण आपल्या गावाचं मराठमोळ रोहा नाव ठेवणारे सीडी देशमुख शंभर टक्के मराठी माणूस होते.

पांडुरंगशास्त्री आठवले आणी ते एकाच गावचे. योगायोग म्हणजे दोघांना मॅगसेसे हा मानाचा पुरस्कार मिळाला. या पुरस्काराचे एकाच गावातले दोघे मानकरी जगात कुठे नसतील.

तर हे सीडी देशमुख मुंबई विद्यापीठात मॅट्रिकच्या परीक्षेत पहिले आले होते. आणि विद्यापीठ आजच्याएवढ नव्हतं. अगदी कर्नाटकपर्यंतचा भाग मुंबई विद्यापीठात यायचा. त्यावेळची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ते पहिले आल्यावर चक्क राम गणेश गडकरी यांनी त्यांच्यावर कौतुक करणारी कविता लिहिली होती. इंटर परीक्षेतही ते पहिले आले.

पुढे सीडी रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर झाले. नोटेवर सही करणारा पहिला भारतीय गव्हर्नर मराठी होता. त्यांची आणखी एक गंमत म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यावर काही काळ कराराप्रमाणे ते भारत आणी पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सामाईक असलेल्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते.

आणी पाकिस्तान स्वतंत्र झाल्यावर वर्षभर तरी सीडी देशमुखांच्या सह्या असलेल्या नोटा पाकिस्तानात वापरात होत्या. 

पंडीत नेहरू आणि सरदार पटेलांची इच्छा होती की सीडी देशमुखांनी अर्थमंत्रीपद स्वीकारावं. इंग्रजांनी आधीच विनंती केली होती. पण त्यावेळी राजकारणात पडायचे नाही म्हणून सीडी देशमुखांनी नकार दिला होता.

पुढे नेहरूंच्या आग्रहाने ते अर्थमंत्री झाले. पण खासदार नसल्यामुळे त्यांना निवडून यावे लागणार होते. सहा महिन्यात. मग त्यांना राज्यसभेवर घ्यायची तयारी सुरु झाली. चाचपणी सुरु झाली. महाराष्ट्रातून त्यांना राज्यसभेसाठी जागा देता येणार नाही असे कळविण्यात आले.

शेवटी सीडी देशमुख यांना पंजाबमधून राज्यसभेवर पाठवण्यात आले. आणि आश्चर्य म्हणजे पंजाबने अजिबात विरोध केला नाही. नंतर सीडी देशमुख यांना कॉंग्रेसने निवडणूक लढवण्याची विंनती केली. पण त्यांना राजकारणाचा तिटकारा होता.

आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना निवडणूक लढवायला कॉंग्रेस पक्षात प्रवेश घ्यावा लागणार होता. असा प्रवेश घेण्यात त्यांना अडचण नव्हती.

त्यांना कॉंग्रेस आवडत नव्हती असा प्रकार नव्हता. त्यांची अडचण वेगळीच होती.

कॉंग्रेस पक्षाचे काही नियम होते. सभासदाने दारू प्यायची नाही आणि खादी वापरायची हे नियम सीडी देशमुखांना मान्य नव्हते. त्यांनी सभासद व्हायला नकार दिला. शेवटी विशेष बाब म्हणजे सहयोगी सदस्य असा काहीसा प्रकार करून त्यांना पक्षात घेण्यात आले.

सीडी देशमुख यांनी कुलाब्यातून निवडणूक लढवली.

त्यांची प्रतिमा चांगली होती. कोकण त्यांच्या घरचा मतदारसंघ. सीडी देशमुख निवडून आले. अर्थमंत्री म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलं. आजच्या काळात कौतुक वाटणारी गोष्ट म्हणजे त्यांचा खाजगी कंपन्यांनी राजकीय पक्षांना देणग्या देण्यास विरोध होता.

आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला धक्कातंत्र म्हणजे सरकारने केलेली नोटबंदीच आठवत असते. पण सीडी देशमुखांच्या काळात एक जोरदार धक्का व्यापारवर्गाला देण्यात आला होता. रातोरात त्यांनी विमाक्षेत्राचे राष्ट्रीयीकरण करून टाकले. तोपर्यंत खाजगी उद्योगाच्या ताब्यात हे क्षेत्र होतं.

पण एका दिवसात अतिशय योजनाबद्ध पद्धतीने त्यांनी विमाक्षेत्र सरकारच्या ताब्यात आणले. एकाच वेळी सगळे खाजगी उद्योग ताब्यात घेतले गेले. हा सामान्य जनतेच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारा निर्णय होता. गरिबांना आपल्या जीवाची पर्वा झाल्यासारख वाटलं. एलआयसीने आजपर्यंत ती प्रतिमा जपलेली आहे. 

अर्थमंत्री असताना त्यांची भाषणं गाजली. ते इंग्रजीत बोलायचे. एकदा एका खासदाराने विरोध केला. हिंदीत बोलण्याचा आग्रह धरला. सीडी देशमुख संस्कृत प्रचुर हिंदीत बोलू लागले. थोड्यावेळाने तो खासदार उभा राहिला आणि इंग्रजीतच बोला असा आग्रह करू लागला. कारण त्याला सीडी देशमुखांचं शुध्द हिंदी कळत नव्हतं.

त्यापेक्षा इंग्रजी बरी असं वाटलं त्या खासदाराला. सीडी देशमुख राजकारणी नसल्याने त्यांची आठवण देशानेच काय महाराष्ट्रानेसुद्धा त्यांच्या कार्याच्या प्रमाणात ठेवली नाही.

अगदी सीडी अनुदान आयोगाचे चेअरमन असताना त्यांनी मराठवाडा आणि शिवाजी विद्यापीठ स्थापन केलय हे सुद्धा फार लोकांना लक्षात नाही. सीडी देशमुख आयोगावर असताना एक रुपया पगार घ्यायचे. याबाबतीत ते गमतीने म्हणायचे की, एक रुपया घेत असलो तरी काम सोळा आणे होतय की नाही ते महत्वाचं! 

सीडी देशमुखांचा शेवटचा काळ मात्र फार बरा नव्हता.

ते हैद्राबादला रहायला गेले. मृत्युपत्रात संपत्ती सामाजिक संस्थेला दिली असल्याचे कळल्यावर विचारपूस करणारे गायब झाले. घरच जेवण पाठवणारे यायचं बंद झाले. आधीच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. ते दुखः होतच.

जाता जाता आज महत्वाची वाटणारी गोष्ट.

सीडी देशमुख टिळकांच्या विचारांचा प्रभाव असणारे नेते. दिल्लीतलं जेएनयु मोठं होण्यात मोठा वाटा असलेले नेते. सीडी देशमुखांना याच जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची डॉक्टरेट मिळाली. त्यांना पुरस्कार खूप मिळाले.

पण गावोगावच्या फुटकळ नेत्यांच्या पन्नास पन्नास वर्ष त्याच त्या गोष्टी सांगणारे आपण सीडी देशमुखांना मात्र विसरत चाललोय. महाराष्ट्राने आपला हा स्वाभिमानी नेता विसरता कामा नये. 

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.