भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल स्वत:च धोतर स्वत: धुवायचा ! 

सी. राजगोपालाचारी अथवा चक्रवर्ती राजगोपालाचारी अथवा राजाजी अशा वेगवेगळ्या नावाने इतिहासाच्या पानात हरवलेले व्यक्ती म्हणजे भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल. स्वतंत्र भारताचे दूसरे आणि भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल. ते दक्षिण भारतातले प्रमुख नेते होते.

शिवाय महात्मा गांधीजींच्या देवदास या मुलासोबत त्यांच्या मुलीचा विवाह झाला होता. अस असूनही कॉंग्रेसमध्येच त्यांना विरोधाचा सामना करावा लागला व पुढे त्यांनी स्वतंत्र पार्टी नावाचा पक्ष काढला. 

स्वातंत्रसैनिक असणारे सी. राजगोपालाचारी १९४६ च्या अंतरिम सरकारमध्ये उद्योगमंत्री होते. १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांना बंगालचे राज्यपाल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडे गव्हर्नर जनरलची धूरा सोपवण्यात आली.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मृत्यूनंतर त्यांना भारताचे केंद्रिय गृहमंत्रीपद देण्यात आले. १९५२ च्या निवडणूकांनंतर त्यांना मद्रास राज्याचे मुख्यमंत्री करण्यात आले. कॉंग्रेस आणि नेहरूंसोबत झालेल्या वादानंतर त्यांनी कॉंग्रेस पक्षाचा त्याग केला आणि स्वतंत्र पार्टीची स्थापना केली. 

अशा या सी. राजगोपालाचारी यांच्याबद्दल तस कमीच वाचायला मिळतं. त्यांच्याबाबत कमी लिहलं असलं तरी अस्सल लिहलेला लेख म्हणजे साने गुरूजी यांनी लिहलेला. तोच लेख आम्ही प्रकाशित करत आहोत. 

साने गुरूजी लिहतात, 

८ डिसेंबरला राजाजींचा वाढदिवस होता. आज हिंदुस्थानचे ते गव्हर्नर जनरल आहेत. महात्माजींनी हिंदूस्थानच्या राजकारणात नवयुग आणले. जसे पंडित मोतीलाल, दे. दास त्यांनी मिळाले, त्याचप्रमाणे राजाजी; परंतु देशबंधु व मोतीलाल यांनी पुढे स्वराज्य पक्ष काढला तसे राजाजांनी केले नाही. गांधीजी त्यावेळेस तुरूंगात होते. राजाजी विधायक कार्यावर भर देत राहिले. गांधीजींचा शब्द त्यांना प्रमाण वाटे. खादीच्या कार्यात त्यांनी चैतन्य ओतले. त्यांनी आश्रम काढला. संघटनेचे जाळे विणले. १९३४ नंतर कायदेमंडळाचे युग येऊ लागले.

३४ च्या मुंबईच्या कॉंग्रेसमध्ये महात्माजी अधिकृतपणे कॉंग्रेसपासून दूर झाले. त्यावेळी राजाजी म्हणाले, 

“महात्माजींचा कॉंग्रेसमधील प्रवेश जेवढा भव्य, तितकेच त्यांचे आज दूर होणेही भव्य आहे” 

प्रथम मंत्रिमंडळे आली. राजाजी मुख्यमंत्री झाले ते लेचेपेचे नव्हते. एकदा कॉंग्रेसच्या आमदारांना जमवून म्हणाले, मी असे कर्जबिल आणणार आहे. तुम्हाला संमत नसेल तर हा माझा राजिनामा घ्या. असे निर्भयपणे आमदारांना सांगणारे ते होते. 

मद्रासभर त्यांनी हिंदी प्रचारास कायद्याने जोर दिला. शाळांतून हिंदी ठेवण्यात आली. त्यांना विरोध झाला. त्यांनी जुमानला नाही. दारूबंदीसही केवढी चालना त्यांनी दिली. स्वत: प्रचारार्थ जात. गावोगावच्या मायबहिणी त्यांना ओवाळीत. कारण दारूबंदी झाली तर मायबहिणींचे संसार सुखाचे होणार होते. राजाजी सुंदर सोपे बोलतात. ते वादविवादपटु आहेत. प्रतिपक्षाची उपहासगर्भ टिंगल करतात.

त्रिपुरा कॉंग्रेसच्या वेळेस प्रदर्शन मंडपातील भाषणात ते म्हणाले, 

गांधींजींचे नेतृत्व तुम्हाला तारील. ही नौका सुरक्षित नेईल. भोके पडलेल्या दुसऱ्या नौकांत नका बसू. फसाल. 

मद्रासकडील निवडणुकीच्या दौऱ्यात ते नेहमी हनुमानाचा आदर्श ठेवा म्हणायचे. निवडणुकीच्या फलकावर हनुमानाचे चित्र असायचे. हनुमान म्हणजे निर्धार नि निष्ठा. रामाला हनुमान तसे तुम्ही महात्माजींना व्हा, कॉंग्रेसला व्हा असे ते सांगत. 

परंतु महात्माजींचे एकनिष्ठ अनुयायी असले तरी आंधळे भक्त नव्हते. चले जावचा लढा त्यांना पसंत नव्हता, ते त्या लढ्यात सामील झाले नाहीत. जिनांजवळ तडजोड व्हावी म्हणून खटपट करीतच होते. काहीतरी करुन शांतपणे देशाचा प्रश्न सुटावा असे त्यांना वाटे. त्यांची टिंगल झाली. मुंबईत त्यांच्यावर डांबर उडवण्यात आले. सिमल्याला जोडे फेकण्यात आले, परंतु अशाने भिणारे ते नव्हते. सर्वांचा विरोध सहन करुन ते स्वत:ची मते प्रतिपादत राहिले. त्यावेळेस महात्माजींचा येरवड्यास हरिजनांसाठी उपवास सुरू होता. मसुदा तयार होईना. राजाजी एकदा सरदारांना म्हणाले, 

तुम्ही तरी गांधीजींना उपवास सोडायला सांगा. सरदार म्हणाले, त्यांच्याहून अधिक पवित्र नि विशुद्ध आत्मा मी पाहिला नाही. मी त्यांना काय सांगणार? 

राजाजी अति साधे आहेत. मद्रासचे गव्हर्नर होते तरी स्वत: हाताने धोतर धुवायचे. आजही धुतात. तोच वेष तीच राहणी. तुरूंगात एका बादलीभर पाण्यात सारे आटपायचे. ते पहाटे ५ ला उठत. 

उठतात, प्रार्थना म्हणतात. गीता, उपनिषदे यांचे भक्त. तुरूंगात गीतेवर प्रवचने द्यायचे. त्यांनी तामीळ भाषेत गोष्टी लिहल्या आहेत. हिंदीत त्यांचा अनुवाद झाला आहे. साधे सुंदर लिहणे. जेलमध्ये स्वत:चे फाटके कपडे शिवायचे. इतर राजबंदीही त्यांच्याजवळ स्वत:चे फाटलेले कपडे आणायचे आणि राजाजी शांतपणे शिवायचे. 

त्यांना अभिमान नाही. सेवाग्रामला गेले तेव्हा म्हणाले, मी गव्हर्नर जनरल आहे, याचा अर्थ काय? याचा अर्थ इतकाच की कोणाही हिंदी माणसाला आता ग. जनरल करु शकाल. माझ्यासमोर ही मुले आहेत. यांच्यातीलही कोणी उद्या होईल. गव्हर्नर जनरल असोत किंला कोठे आश्रमात असोत. त्यांचे जीवन एकरुपचं आहे. 

मागे मद्रासला गेले तेव्हा म्हणाले,

आपल्या प्रांतातला हिंदुस्थानातील सर्वश्रेष्ठ अधिकारी बनला या दृष्टिने माझ्याकडे नका बघू. एका मद्राशाला मान मिळाला ही दृष्टी नको. 

ते आज परिपक्व झाले आहे. गोष्टी सांगेन युक्तीच्या चार हे आता त्यांचे काम. त्यांच्याजवळ द्वेषमत्सर जणू उरले नाहीत असे वाटते. गोड मुरांबा व्हावा तसे ते झाले आहेत, जपून चला असे सर्वांना सांगतात. देशाला मोठे करा सांगतात. स्वातंत्र्य आले आहे त्याची जाणीवही तुम्हाला नाही. तुम्ही मुक्त आहात. स्वातंत्र्याचे फळ मिळाले आहे. वाया नका दवडू. संयमी बनाल तर स्वर्ग निर्माण कराल. असे मागे थोर कवी सुब्रह्मण्यम भारती यांच्या स्मारकाच्या उद्धाटन प्रसंगी ते म्हणाले. सेवाग्रामला म्हणाले, 

मृताची इच्छा राहिली तर त्याच्या आत्म्यास शांती नसते. गांधींजींना व्यक्तिगत इच्छा नव्हती. या देशावर त्यांचे फार प्रेम. येथील प्रत्येक व्यक्ती उद्योगी नि सच्छिल महात्माजींच्या आत्म्याला कोठली शांती. 

मागे एकदा म्हणाले, महात्माजी ही देवाने भारताला दिलेली थोर देणगी आहे. तुम्हा आम्हाला मोठ्या भाग्याने मिळाली. परंतु त्या देणगीला आपण पात्र आहोत की नाही हरि जाणे. 

राजाजींची मुलगी गांधींजींच्या देवदासांना दिलेली. ते गांधीजींचे आप्त झाले, परंतु ह्रदयाने आधीच एकरुप झाले होेत. भारतीय तरुणांनी अशा या थोर सेवकापासून अपार काम करण्याची, आपल्या बुद्धीस पटेल त्याला निर्भयपणे चिटकून राहण्याची, साधेपणाने जगण्याची स्फूर्ती घ्यावी.

  साने गुरूजी 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.