इराणच्या हुसैन अली यांनी सुरू केलेलं गुडलक कॅफे आज पक्क पुणेकर झाल आहे..
पुण्यात शिकायला आल्यावर इथं शिकायला पहिली गोष्ट कळाली ती म्हणजे कुठलंही पुस्तक हवं असेल तर ते घेण्यासाठी अप्पा बळवंत चौकात जावं लागत आणि सुट्टीच्या दिवशी मग मैत्रीण असो वा नसो फर्ग्युसन आणि जंगली महाराज रस्ता फिरायला जायचं.
तिथं गेल्यावर गुडलकचा चहा, बन मसका फिक्स असं गणित सिनियर पहिल्या काही दिवसांतच सांगितल होत.
त्यामुळे सिनियरने सांगितलेलं म्हणजे गुडलक काही भारी असणार हे फिक्स होत. नंतर तिथे पोहचल्यावर पाहिलं तर जुन्या भिंती त्याच्यापलीकडे जुन्या पद्धतीचे टेबल त्यावर काच आणि त्याखाली ठेवलेलं मेन्यू कार्ड. एका बाजूला कॉर्परेट ऑफिस, पुढे सांस्कृतिक कट्टा, मागे दुकान आणि घरे असं सगळं वातावरण गुडलकच्या कॅफे आजूबाजूला पाहायला मिळतं.
कॉउंटरच्या वर दोन फोटो लावले आहेत. एक फोटो आहे हाजी हुसैन अली याक्षी आणि दुसरा कासीम याक्षी यांचा.
यातील हुसैन अली यांनी कॅफे गुडलक सुरु केलं. ते मूळचे इराणचे.
१९ व्या शतक आणि त्यापूर्वी पासून इराणी नागरिक भारतात येऊन स्थानिक होऊ लागले होते. त्यापैकी हुसैन हे एक होते. ते इराण मधील यझद प्रातांतील ताफ्टचे.
वाळवंटी प्रदेश, दुष्काळ आणि राजकीय अस्थिरतेमुळे याक्षी कुटुंब इराणला कंटाळले होते. यापूर्वीच मोठ्या प्रमाणात पारशी नागरिक इराण सोडून मुंबई आणि गुजरात मध्ये स्थायिक झाले होते. सुट्यांमध्ये एक पारशी फॅमिली इराण मध्ये गेली होती. ते हुसैन यांच्या चांगल्या ओळखीचे होते.
तेव्हा हुसैन यांनी भारतात स्थानिक होण्याची इच्छा बोलून दाखवली. अशा प्रकारे १९२० मध्ये हुसैन मुंबईत आले. तिथे आपल्या पारशी मित्राच्या हॉटेल मध्ये वेटर म्हणून काम करू लागले. थोड्याच दिवसात हुसैन यांना कॅशियर म्हणून बढती मिळाली. सगळं चांगलं सुरु असतांना मुंबईतल्या वातावरणामुळे आस्थाम्याच त्रास सुरु झाला
एकदिवस त्यांना अस्थमाच्या खूप त्रास झाल्याने मुंबई सोडून पुण्यात स्थानिक होण्याचा निर्णय घेतला. साधारण ८ वर्ष ते मुंबईत होते. हुसैन यांनी मध्ये १९३२ मध्ये डेक्कन भागात नारायण सेठ या व्यक्तीची लहानशी जागा विकत घेतली. आणि १९३५ मध्ये एक फूड पॉईंट सुरु केले होते.
त्या फूड पॉईंट समोर गुड लक कॅफे नावाची पाटी लावली.
इराणी हॉटेल्सची वैशिट्य असलेले चहा, बन पाव बरोबरच सिगारेट, सेफ्टी पिन आणि बॅटरी सारख्या विक्रीसाठी वस्तू ठेवल्या होत्या. कॅफे गुडलकवर सगळ्यात पहिले ट्रस्ट दाखवाल तो फर्ग्युसन कॉलजेच्या विद्यार्थांनी. तेव्हा इराणी पद्धतीने बनविलेला चहा त्यांना वेगळा वाटायचा.
यानंतर हळूहळू गर्दी वाढू लागली होती. यामुळे हुसैन यांनी १९६० पर्यंत आसपासचे कोळसा विक्रीचे दुकान, सलूनचे हे दुकान खरेदी केली. आणि गुड लकची जागा वाढविली. आता कॅफे गुडलक ३ हजार स्क्वेअर फुटात आहे.
दुसऱ्या देशातून, संस्कृतीनं हुसैन आल्याने कॅफे गुड लक मध्ये खाणाऱ्यांना विरोध होत होता. मात्र नवीन पिढीने याला जुमानले नाही. अगोदर फक्त व्हेज पदार्थच कॅफेत ठेवण्यात येत होते. नंतर मात्र हुसैन यांनी इतर इराणी कॅफे प्रमाणे इथं नॉनव्हेज पदार्थ ठेवण्याचा निर्णय घेतला. याचा उलट फटका हुसैन यांना बसला. कॅफेत येणाऱ्या ग्राहकांची संख्या घटली होती.
कधी काळी नॉनव्हेज विकल्याने गुडलकचे ग्राहक कमी झाले होते आता सर्वाधिक गर्दी ही नॉनव्हेज खायला होत असते.
१९६५ ला लॉ कॉलेज रस्त्यावर एफटीआयची स्थापना झाली. इथली सगळी पोर शिकवायला येणारी अभिनेते ही सगळी मंडळी गुडलक मध्ये जमू लागली. अभिनेते देव आनंद, राजेश खन्ना, डायरेक्टर डेव्हिड धवन सारखी मंडळी किती तरी वेळा कॅफेत बसलेली असायची. त्यामुळे लोकांमध्ये कॅफे गुडलकच आकर्षण वाढत गेलं.
आता जर तुम्ही कॅफे गुडलक मध्ये गेलात तर जुने टेबल, भिंती त्यावर मारलेला कलर, काउंटर यासगळ्या गोष्टीत शेवटचा बदल १९७० मध्ये करण्यात आला. तेव्हा पासूनच जेवणाचे पदार्थ ठेवण्यात येऊ लागले.
नारायण मूर्ती, राष्ट्रवादीचे काँग्रेस अध्यक्ष शरद पवार हे ९० च्या दशकात नियमित येत असल्याचे गुडलकचे मॅनेजर अब्बास यांनी सांगितले. भारताचा माजी क्रिकेटर केदार जाधव तर अजूनही कॅफेत येत असल्याचे अब्बास अली यांनी सांगितले. तसेच अब्बास लहान असतांना राकेश रोशन, जितेंद्र सारखे अभिनेते कॅफेत आलेले बघितले असल्याचे सांगितले.
पुढे १९८९ मध्ये हुसैन यांचा मृत्यू झाला.
तेव्हा ते इराण मधेच होते. त्यानंतर हुसैन यांचा भाऊ कासीम यांनी कॅफे गुडलक चालविले. कासीम यांच्यानंतर हुसैन यांचा मोठा मुलगा घशीम २००१ पासून कॅफे गुडलक सांभाळतात.
घशीम यांनी २००४ मध्ये मेन्यू मध्ये बदल केला. तरुणांना हवे असणारे तंदूरचे पदार्थ ठेवायला सुरुवात केली. गुडलक मध्ये अगोदर केवळ १५ ते २० पदार्थ मिळत होते त्याची संख्या जवळपास १०० ते १५० झाली आहे.
याबाबत घशीम यांनी बोल भिडूशी बोलतांना सांगितले की,
अनेकाकांची दुसरी तिसरी पिढी दररोज गुडलक मध्ये येते. सगळ्याच क्षेत्रातील व्यक्ती गुडलक मध्ये येत असतात. अजूनही सकाळी ७.३० कॅफे उघडण्याची अनेक जण वाट पाहत असतात. वडील इराण वरून आले होते. त्यांनी हा व्यवसाय वाढविला. आमचे नातेवाईक इराण मध्ये राहतात. दोन ते तीन वर्षातून एकदा मी जातो आणि नातेवाईकांना भेटून येतो असे सांगितले.
१९६५ पासून मॅनेजर असलेले अब्बास अली सांगतात की,
कॅफे सुरु होऊन ८० ते ८५ वर्ष झाली आहे. जवळपास २०० पदार्थ इथं मिळतात. मात्र इथं येणाऱ्या सगळ्यांना अजूनही चहा, बन मसका आणि खिमा पाव लोकांना आवडतो. दिवसाला साधारण दीड दोन हजार लोकं येत असतील. विकेंडला ही संख्या जास्त असते.
हे ही वाच भिडू
- पुणे, नाशिक, ठाणे, कोल्हापूर ; महाराष्ट्रातल्या या आहेत टॉप 10 प्रसिद्ध मिसळ…
- मटण-चिकन खायचं असेल तर पुण्यातली ही ’10’ हॉटेल्स बेस्ट पर्याय आहेत..
- दावा आत्ताचा नाही, ‘ताजमहल नव्हे तेजोमहल’ हे पिल्लू एका पुणेकर माणसाने सोडलं होतं…