तुम्हीच वाचून सांगा, तो अडकला की त्याला अडकवला…?

जानेवारी महिन्यात कार्लोस घोसन या माणूस पत्रकार परिषदेला हजर होता. तो जपानमधून पळाल्यानंतर पहिल्यांना मिडीयासमोर आला. ही पत्रकार परिषद लेबनॉनमध्ये झाली. लेबनॉन हा घोसनचा देश. तो इथेच लहानाचा मोठ्ठा झाला. त्याचे मित्र इथलेच.

त्यामुळेच जगात कोणावर विश्वास ठेवायचा तर तो लेबनॉनवर हा विचार करून जपानमधून एका प्रायव्हेट जेटमधल्या एका लगेज बॉक्समध्ये बसून तो लेबनॉनला गेला.

प्रश्न पडला असेल हा कार्लोस घोसन कोण…?

कार्लोस घोसन हा ऑटो इंडस्ट्रीतला डॉन माणूस. कोणताही अनुभव नसताना, उद्योगविश्वास घराणेशाहीचा हात नसताना इतका मोठ्ठा झाला की तो अडकला की अडकवला गेला हा प्रश्न पडतो.

अचानक मधल्या काळात आपल्याकडे रेनॉल्ट आणि निस्सानच्या गाड्या रस्त्यांवर दिसू लागल्या. आज ज्याप्रमाणे किया, MG हेक्टर सारख्या नव्या कंपन्यांच्या गाड्या दिसत आहेत त्याचप्रमाणे या गाड्या आल्या होत्या. गाड्या चांगल्या होत्या पण अचानक मार्केटमधून गायब झाल्या.

आत्ता २०१९ मध्ये तर निस्सान आणि रेनॉल्टच्या नव्या गाड्या रस्त्यांवर दिसायच्याच बंद झाल्या यापाठीमागे देखील हाच माणूस होता. रेनॉल्ट आणि निस्सानला टॉम क्रुझ बनवणारा आणि त्यांच वाट्टोळ लावणारा,

कार्लोस घोसन. 

कार्सोलचा जन्म ब्राझीलचा पण त्याचं शिक्षण झालं ते लेबनॉनमध्ये तिथून तो पॅरिसला गेला. याची खासियत म्हणजे हा माणूस लहानपणी इंजिनवरून गाड्यांचे मॉडेल ओळखायचा. प्रचंड हूशार असणारा घोसन मिशीलीन कंपनीत कामाला लागला. असं काम केलं की काही वर्षात तो प्लॅन्ट मेनेंजर झाला.

त्याच्या कामावर खूष होवून कंपनीने त्याला  R&D च प्रमुखपद दिलं. ब्राझीलमध्ये कपंनीची विक्री धोक्यात आल्याच समजल्यानंतर मिशीलीन कंपनीचे प्रमुख फ्रॉंकोईस मिशीलीन यांनी त्याला ब्राझीलला पाठवलं. या माणसाने तीन वर्षाचं टार्गेट एका वर्षात पुर्ण केलं.

कंपनीने बक्षीस म्हणून कार्लोस घोसनला उत्तर अमेरिकेचं CEO पद दिलं. कार्लोस घोसन आत्ता मिशीलीन अमेरिकेचा CEO झाला.

त्यानंतर थेट अठरा वर्षानंतर घोसन रेनॉल्ट कंपनीमध्ये गेला. ३ वर्षातच त्याला रेनॉल्टचे उपाध्यक्षपद देण्यात आले. रेनॉल्ट गाड्या बनवणारी फ्रान्सची कंपनी. या कंपनीत फ्रान्स सरकारचे देखील शेअर्स आहेत. साहजिक रेनॉल्ट जे व्यवहार करायचे त्यांची प्रतिक्रिया सरकारकडून देखील यायची.

झालं अस की तीन वर्षानंतर घोसनच्या आग्रहाने एक आत्मघातकी निर्णय घेण्यात आला,

निर्णय असा होती की,

निस्सान कंपनी टेकओव्हर करायची. 

हा निर्णय म्हणजे घर विकून कोळश्याचा व्यापार करण्याचा प्रकार होता. कारण निस्सान ही जापानी कंपनी हा बुडायच्या मार्गावर आलेली. त्यांच्या एकूण ४६ प्रकारच्या गाड्या मार्केटमध्ये होत्या. त्यापैकी कष्टाने ३ प्रकारच्या गाड्यांची विक्री व्हायची. हा व्यवहार ४.५ बिलियन डॉलरला झाला होता आणि हे सगळ कार्लोस घोसनमुळे घडलं होतं.

कार्लोसने त्यानंतर निस्सानचा कारभार हाती घेतला. निस्सान जापनीझ कंपनी असल्याने सगळा कारभार जपानीझ कल्चरनुसार व्हायचा. कार्लोसने काय केलं तर पहिला कॉस्ट कटिंग चालू केलं. 

पहिला त्याने कंपनीचे ५ प्लॅंट बंद करून टाकले. एकूण १४ टक्के कामगारांना घरी पाठवलं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जपानच्या बाहेरच्या लोकांना कंपनीत आणण्यास सुरवात केली.

तो कंपनी ताब्यात घेताना म्हणाला होता की,

तीन वर्षात निस्सानला फायद्यात आणणार. घोसनने तर पहिल्याच वर्षी कंपनीचा २.७ बिलीयन डॉलरचा फायदा करून दाखवला. गतवर्षी कंपनी ६.५ कोटी डॉलरला तोट्यात होती. ऑपरेटिंग मार्जिन ९ टक्के झालं. कंपनीचा उद्योग दूप्पट गतीने वाढला आणि शेअर्स कंपनीत शेअर्स तिप्पट गतीने वाढले.

हि करामत एकट्या कार्लोस घोसनमुळे झाली. ऑटो इंडस्ट्रीत त्याच महत्व वाढू लागलं. बुडणारी निस्सान फक्त बाहेरच काढली नाही तर तिला आकाशात घेवून जायची कामगिरी या माणसाने करुन दाखवली. साहजिक दरारा वाढला, नाव झालं आणि नवे शत्रू तयार झाले.

निस्सान आत्ता जपानची दोन नंबरची कंपनी झाली. होंडाला मागे सारून टोयोटा नंतरची दूसऱ्या क्रमांकावरची जापनीझ कंपनी म्हणून निस्सान कंपनीने नाव कोरलं.

याच फळ म्हणून त्याला २००४ साली ब्लू रिबेन पुरस्कार देण्यात आला. जपान सरकारने पहिल्यांदा हा पुरस्कार एका गैर-जापनिझ व्यक्तिला दिला. होता. २००५ साली घोसनला रेनॉल्ट-निस्सान आघाडीचं प्रमुखपद देण्यात आलं.

२००४ साली जेव्हा जपानचा पंतप्रधान म्हणून कोणती व्यक्ती असावी असं जनमत घेण्यात आलं तेव्हा बराक ओबामा ९ व्या क्रमांकावर होते तर घोसन ७ व्या क्रमांकावर होता. यावरूनच कळतं की घोसनची जपानमध्ये किती लोकप्रियता वाढत होती.

२०१६ साली निस्सान आणि रेनॉल्टने मिळून जपानची दूसरी कंपनी मित्सुबिशीत ३४ टक्यांची मालकी घेतली. आत्ता या तिन कंपन्या एकत्र आल्यामुळे हा समूह जगातला चौथ्या क्रमांका ऑटोसमूह झाला. आणि या सर्वांचा कर्ताधर्ता म्हणून कार्लोस घोसनकडे पाहिलं जावू लागलं.

आत्ता त्यांच्यापेक्षा पुढे जगात फक्त तीनच कंपन्या होत्या. टोयोटा, वॉक्सवॅगन आणि जनरल मोटर्स. 

घोसनला २०१६ सालच्या ब्राझील ऑलंम्पिकमध्ये मशाल घेवून जाण्याचा मान देण्यात आला. त्याच्या मुळच्या देशानं लेबनॉनने त्याच्यावर पोस्टाचं तिकीट काढलं. तो लेबनॉनचा पंतप्रधान होईल असे अंदाज बांधले जावू लागले.

इकडे रेनॉल्टची विक्री ७४ बिलीयन डॉलर झाली आणि नफा ४.८ बिलीयनचा झाला. 

हे सगळं करत असताना मात्र जपानी लोक त्याच्यावर चिडून होते. का तर पारंपारिक जापानी कल्चरच्या चौकटीबाहेर घोसन गेला होता. टायोटा कंपनीचे CEO पेक्षा त्याचा पगार पाच पट होता. तो महिन्याला कंपनीकडून १२० कोटी वेतन घ्यायचा. त्याचे एकूण पाच घरे होता. पॅरिस, रिओ दी जानिरो, टोकीयो अशा शहरात आलिशान महाल उभा केलेले. जापनच्या शैलीच्या बाहेरची ही मस्ती होती.

त्याने आपल्या डिझायनर मित्राला घेवून ओकिहोमाच्या मुख्यालयात फक्त डिझायनसाठी ५ हजार कोटी खर्च केले होते. त्याची एकूण ९०० कोटी संपत्ती झाली होती.

आणि अचानक त्याला जपानी पोलीसांनी अटक केली. 

कार्लोस घोसनसारख्या माणसाला अटक झाल्याने जगभरातचं लक्ष जपानकडे वेधलं गेलं. हे कशामुळं झालं तर त्याच्यावर वित्तिय घोटाळ्यांचा आरोप होता. तो अवाजवी पगार घेत होता आणि निस्सान कंपनीमध्ये त्याने अधिकचा आर्थिक मोबदला घेतला होता.

तुलना करायची झाल्यास जपानी कंपनी तकाटा यांच्या गाड्यांच्या एअरबॅग्समध्ये फॉल्ट होता. त्यामुळे एकूण १६ लोक मृत्यूमुखी पडले होते. तरिही त्यांना फक्त आर्थिक दंड करण्यात आला होता. तोशिबाने आर्थिक फायदा अधिकचा दाखवला तरी त्यांना अटक न करता फक्त माफी मागितल्यानंतर माफी देवून सोडण्यात आलं.

मात्र घोसनला हातकडी लावून जेलमध्ये टाकण्यात आलं. 

हे सगळं का? याच कारण स्पष्ट होतं नव्हतं. आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप त्याच्यावर होते. घोसनला निस्सानमधून राजीनामा द्यायला लावला. रेनॉल्ट मात्र त्याच्यावर विश्वास ठेवून काही दिवस राहिली. कालांतराने तो रेनॉल्टमधून देखील बाहेर पडला. लोकांच अस म्हणणं होतं की फ्रान्सिस कंपनी रेनॉल्टमार्फत निस्सान पुर्णपणे विकत घेण्याचा प्लॅन होता. त्यामुळेच त्याला अडकवण्यात आलं.

त्याला जामीन मिळत नव्हता. त्याच्यावर ११४.७ मिलीयन डॉलरच्या गैरव्यवहाराचा ठपका होता. सोबतच आपल्या बहिणीला गरज नसताना उच्चवेतनावर कंपनीत ठेवल्याचा आरोप ठेवण्यात आला. आपले वेतन त्याने कमी केलं असलं तरी त्यातून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे मार्ग काढले होते. 

या सर्व व्यवहारानुसार जपानमध्ये त्याला दहा वर्षांची कैद दिली जाईल अशी शक्यता होती. बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग नाही, त्यात जामिनही नाही. सामान्य गुन्हेगारांप्रमाणे त्याला मुद्दामहून अडकून ठेवण्यात आलं. अखेर घोसनने आपला वकिल म्हणून जूरीचोना हिरोनाका याच्यावर जबाबदारी सोपवली. त्याने ६३ कोटींवर त्याचा जामिन मंजूर करून घेतला.

जामिन मंजूर झाला पण त्याला घरीच नजरकैदेत ठेवण्यात आलं. फोन वापरण्यावर बंदी होती. तो वकिलांच्या ऑफिसमधून दिवसातून एक तास इंटरनेट वापरू शकत होता.

अशातच एकदिवस बातमी आली घोसन जपानमधून निसटला. त्याचं म्हणणं आहे जी कारवाई करायची असेल ती आतंराष्ट्रीय नियमाने करा. जपानवर त्याने आरोप केले. मुद्दाम अडवण्यात आल्याचे हे आरोप होते. दोन महिन्यांपुर्वी तो पत्रकारपरिषदेस उपस्थित राहिला.

तुम्हाला काय वाटतं, तो अडकला की त्याला सुडबुद्धीने अडकवण्यात आलं. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.