शीख धर्मात जातीव्यवस्था आली त्यामुळेच डेऱ्यांची स्थापन होऊ लागली आणि पुढे…
नानक तिन के संग साथ, वदियां सियोन काय रीस
जिते नीच सन्मालियन, तिथे नादर तेरी बख्शीश
(मी खालच्या जातींमध्ये सर्वात खालचा आहे; खालचा , अगदी खालचा ; मी सर्वात खालच्या लोकांच्या संगतीत आहे, तथाकथित उच्च लोकांच्या बरोबर नाही. देवाचा आशीर्वाद तिथं आहे जिथं खालच्या लोकांची काळजी घेतली जाते)
श्री गुरु ग्रंथ साहिब या शिखांच्या सर्वात पवित्र ग्रंथामधील हा श्लोक आहे. शीख धर्माची स्थापनाच गुरु नानक यांनी जातीभेद, जातिव्यवस्था आणि इतर कोणत्याही प्रकारच्या भेदभावांना विरोध करण्यासाठी केली असल्याचं दिसून येतं.
शीख धर्म हा ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध उठाव म्हणून देखील पहिला गेला.
शीख धर्माचा संपूर्ण आधार अशा भेदभावाविरुद्ध लढणं आहे.
गुरु नानक यांनी फक्त उपदेशच नाही केला तर तो सत्यात देखील उतरवला. गुरू नानक यांनी लंगर किंवा मोफत सामुदायिक स्वयंपाकघर सुरू केले. त्यामागील एक कारण म्हणजे जातीच्या सामाजिक दुष्कृत्याला आव्हान देणे हे होते. लंगरमध्ये कोणताही उच्च-नीच असा जातीभेद नं करता समाजातील सर्व लोक एकत्र अगदी एका रांगेत बसून जेवतात.
गुरु मानकांचा समानतेचा उद्देश बाकीच्या गुरूंनीही तसाच जपला. पुढे गुरु गोविंद सिंग १६९९ मध्ये खालसा पंथाची स्थापना केली त्यामध्येही जातिभेदाला कोणताही थारा देण्यात आला नव्हता.
गुरु गोविंदसिंगांनी जे पहिले ५ पंचप्यारे निवडले होते त्यातील तिघी जण खालच्या जातीचे होते असं सांगितलं जातं.
पुढे गुरु गोविंदसिंगांच्यानंतर त्यांच्या आज्ञेनंतर कोणताही जीवित व्यक्ती गुरु नं करता पवित्र ग्रंथ श्री गुरु ग्रंथ साहिबला गुरु मानले जाऊ लागले. या ग्रंथातूनही वेळी वेळी जात व्यवस्थेवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. त्याचबरोबर या ग्रंथांमध्ये विणकर समजातून येणाऱ्या कबीर, मुस्लिम सुफी संत बाबा फरीद, चांभार समजातून येणारे गुरु रविदास यांच्याही वचनांचा समावेश आहे.
शीख धर्मातील या समानतेच्या शिकवणीमुळेच बाबासाहेब आंबेडकर देखील शीख समाजात धर्मांतर करण्याच्या दृष्टीने गंभीरपणे विचार करत होते.
मात्र समानतेच्या बाजूने शीख धर्मात जात हा घटक पूर्णपणे संपला नव्हता. The Scheduled Castes in the Sikh Community– A Historical Perspective या रिसर्च पेपरमध्ये हरीश के पुरी यांनी याबद्दलच काही महत्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत.
पुरी सांगतात शिखांचे सर्व दहा गुरु हे सगळे खत्री जातीमधूनच होते.
त्यामुळे खत्री जातीच्या अनुयायांचा सुरवातीला शीख धर्मात पगडा राहिला. तसेच सर्व गुरूंनी त्यांच्या मुलाबाळांची लग्न त्यांच्या जातीतच केली. इतर सर्व गोष्टींमध्ये बरोबरी असली तरी जाती जातींमध्ये अजून नातेसंबंध प्रस्थापित होत नव्हते.
तसेच शीख धर्मात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला त्याची जात सोडण्याची कोणतीही अट नव्हती.
तसेच ६व्या गुरूंच्या नंतर शीख धर्मात जातंय देखील मोठ्या प्रमाणात प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांचेदेखील प्रस्थ वाढले. रणजित सिंग (१७९९-१८३९) यांच्या राजवटीत शीख जाट शासक म्हणून उदयास आले. त्यामुळे रणजित सिंग यांच्या कारकिर्दीत मोठ्या प्रमाणात जहागिरी मिळवल्याने जाट शिखांचा रुतबा आणखीनच वाढला.
तसेच या काळात जे खालच्या जातीतले होते त्यांची जात शीख धर्मात प्रवेश केल्यानंतर गेल्याचे कोणतेही पुरावे मिळत नाहीत.
त्यामुळं जात कुठंतरी सुप्तपणे शीख धर्मात होतीच. त्याला बळ मिळालं इंग्रजांच्या काळात. इंग्रजांनी भारतीय समजाला जातीच्या चष्म्यानेच पाहायला सुरवात केली होती. शिखांमध्ये हिंदूंसारखी कट्टर जातव्यवस्था नाही हे पाहून सुरवातीला इंग्रज देखील आश्चर्यचकित झाले होते. मात्र त्यांनी नंतर शीख धर्मात जातव्यवस्था वाढवलीच. १८४९ पर्यंत ब्रिटिशांनी पूर्ण पंजाब आपल्या अंमलाखाली आणला होता.
त्यानंतर त्यांनी पंजाबमधल्या जातिव्यवस्थेला कागदावर आणून अजूनच भक्कम केलं.
ब्रिटिशांनी चालू केलेली जातीनिहाय जनगणना, जातींचं वॉरिअर कास्ट आणि नॉन वॉरिअर कास्ट असं वर्गीकरण यामुळे शीख समाजात जातीभेद वाढला तो कायमचाच. ब्रिटिशांनी यातही उच्वर्णीयांना झुकतं माप दिलं. झुकतं म्हणण्यापेक्षा पूर्ण मापच त्यांना दिलं म्हटलं तरी चालेल.
जेव्हा १८८५-१९४० दरम्यान जेव्हा पंजाबमध्ये कालव्यांच्या भोवती ९ वसाहती स्थापन करण्यात येणार होत्या तेव्हा जवळपास ४० लाख एकर नवीन जमिनींची मालकी ब्रिटिशांनी जाट शेतकऱ्यांनाच दिली.
पंजाब लँड एलिएनेशन ऍक्ट 1901 सारख्या कायद्यांमुळे फक्त जे पारंपरिकरित्या शेती करणाऱ्या जाती आहेत त्यांनाच शेती विकत घेण्याचा अधिकार देण्यात आला. यामुळे दलित आणि इतर खालच्या जातींची जमीन विकत घेण्याची पात्रता असूनदेखील त्यांना जमीन विकत घेता आली नाही.
त्यामुळं मग वावर आहे तर पॉवर आहे या तत्वाला धरून आर्थिक आणि सामाजिक रित्या जाट शीख अधिकच पॉवरफुल झाले आणि इतर जातींमध्ये आणि त्यांच्यात मोठी दरी निर्माण झाली. पुढे मजहबी शीख जे शीख जात उतरंडीत अगदी खाली होते त्यांनी ब्रिटिश आर्मीत जाऊन मोठा पराक्रम गाजवला, आर्थिक स्तिथी देखील सुधारली मात्र त्यामुळं त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मात्र मिळाली नाही.
हळू हळू जातीनुसार वेगवेगळे गुरुद्वारे तयार झाले.
मजहबी आणि इतर दलित शिखांना धार्मिक स्थळावर शान करावा लागणार भेदभाव वाढला. शिखांची सर्वोच्च बॉडी असणाऱ्या शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीलाही याबाबतीत काही जास्त करता आला नाही. दलित आणि इतर जातींच्या शिखांसाठी समितीवर काही जागा राखीव ठेवण्यात आल्या मात्र त्यातही तो केवळ वर वरचा मुलामाच ठरला.
हिंदू धर्मात जसं ब्राह्मण जात उतरंडीत सर्वोच्च स्थानावर जाऊन बसले होते तसेच जाट शीख आज शीख जातव्यवस्थेत सर्वोच्च स्थानावर आहेत.
मात्र या सगळ्यांमध्ये मजहबी, रविदासीय हे दलित शीख शांत बसणारे नव्हते आणि त्यांनी त्यांची वेगळी चूल मांडायला सुरवात केली आणि सुरवात झाली डेरा सिस्टिमला. शीख धर्मात धार्मिक आणि इतर अधिकार नाकारले जात होते ते अधिकार या जातींनी डेराच्या माध्यमातून मिळवण्यास सुरवात केली. काही डेरे तर
डेरा – म्हणजे शिबिरे किंवा मंडळे – हरियाणा आणि पंजाब राज्यांमध्ये हजारो लोक डेऱ्यांचे फॉलोअर्स आहेत .
त्यापैकी बरेच मुख्य प्रवाहातील शीख धर्माला काउंटर म्हणून देखील उभार राहिले आहेत.पंजाब हरियाणा आणि हिमाचल या राज्यात जवळपास ९००० हजार डेरे असल्याचं सांगण्यात येतं. यापैकी असेही काही डेरे आहेत ज्यांचे फॉलोवर्स लाखोंच्या घरात आहेत.
यामधील गुरु राम रहिमचा डेरा सच्चा सौदा आपल्याला माहीतच आहे. त्याचबरोबर राधा स्वामी डेरा. डेरा निरंकारी, डेरा सचखंड सचखंड बल्लान आणि नामधारी हे सगळ्यात मोठ्या डेऱ्यांपैकी आहेत. समाजातील उपेक्षित वर्ग ज्यांना मुख्य प्रवाहातील शीख धर्माने बाजूला सारले आहेत ते अशा डेऱ्यांचे फॉलोअर्स असतात.
डेरा सच्चा सौदाच्या फॉलोअर्समध्ये सर्वाधिक संख्या दलित शिखांची आहे. पंजाबमध्ये टक्केवारीत बघितलं तर भारतातली सर्वाधिक दलितांची संख्या आहे. राज्याचा एकूण लोकसंख्येच्या ३१.९ टक्के असणाऱ्या ८८ लाख दलित शिखांमध्ये डेऱ्यांची सर्वाधिक लोकप्रियता आहे.
या डेरांची विचारधारा काय आहे?
डेरांचा वैचारिक आधार इस्लाम, सूफीवाद, शीख धर्म, कबीर आणि ख्रिश्चन धर्माच्या प्रवचनांपासून प्रेरित आहे आणि मग याला नंतर प्रादेशिक चिन्हे आणि मिथकं यांचा आधार दिला जातो. या डेऱ्यांच्या केंद्रस्थानी एक बाबा असतो त्यालाच गुरु मानण्यात येतो. कोणतीही पुस्तकं किंवा ग्रंथ यांचा आधार नं घेता गुरूने सत्संगामध्ये सांगितलेले विचार हाच या डेऱ्यांच्या विचारसरणीचा पाया असतो.
मात्र शीख धर्मात मान्य नसलेली काही तत्व पाळल्याने या डेऱ्यांचे काही नेते कट्टर शिखांच्या टार्गेटवर देखील राहिले आहेत. यातूनच निरंकारी बाबा गुरुबच्चन सिंग यांची हत्या देखील झल्याचं सांगण्यात येतं.
मात्र तरीही डेऱ्यांची लोकप्रियता कमी झाली नाही उलट निरंकारी डेऱ्याचे फॉलोअर्स आज देशभर पसरले आहेत.
लव्ह चार्जेर गाण्याला मिलियन व्हयूज बरोबरच डेरा सच्चा सौद्याचा गुरु राम रहीम आजही ट्विटरवर ट्रेंडिंगला असतो याला देखील कारणं आहेत.
या डेरांचे अनुयायांना मुख्य प्रवाहातील धर्म तसेच पोलीस, न्यायव्यवस्था आणि स्थानिक प्रशासनासह राज्य संस्थांमधून मोठ्या प्रमाणत भेदभावाचा सामना करावा लागत असतो. अशा परिस्थितीत जातीवर आधारित कोणताही भेदभाव न करता डेरांची समतावादी, कल्याणकारी वचने ही समाजातील या घटकांसाठी चांगला अनुभव असतो.
त्याचबरोबर अनुदानित आरोग्य सेवा, अन्नाची तरतूद आणि जातिभेद, मद्यपान आणि ड्रग्स यासारख्या सामाजिक वाईट गोष्टींविरुद्ध भूमिका घेणे ही डेरांची काही उद्दिष्टे आहेत,ज्यामुळे वंचित घटक मोठ्या डेऱ्यांमध्ये एकत्र येतात.
मात्र या कल्ट पर्सनॅलिटीचा फायदा घेऊन डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरु राम रहीम याने केलेले धंदे आपल्याला माहीतच आहेत.
बलात्कारापासून ते पुरुषांना जबरदस्तीने नपुंसक करण्याचे आरोप राम रहिमवार झाले होते आणि तरीदेखील जेव्हा त्याला पकडायला पोलीस गेले तेव्हा हजारो लोकांनी हिंसाचार केला होता.
त्यांच्या या लाखोंच्या संख्येत असलेल्या फॉलोअर्समुळे या डेऱ्यांचा पंजाब, हरियाणा, हिमाचल आणि राजस्थान या राज्यात मोठा दबदबा आहे.
त्यात आर्थिक दृष्ट्या बघितलं तर हजारो करोडमध्ये या डेऱ्यांची संपत्ती असल्याचं बोललं जातं आणि वेळोवेळी हे डेरे राजकीय पक्षांची साथ देखील देत असतात.
२०१४ च्या हरियाणा विधसभा निवडणुकीत डेरा सच्चा सौदाची राजकीय विंग असलेल्या साध संगत रजनतीकने उघडपणे भाजपाला पाठिंबा दिला होता. २० वर्षांचा कारावास झाल्यामुळे जरी डेरा सच्चा सौदाचा आणि गुरु राम राहिमाच प्रभाव कमी झाला असला तरी बाकीचे डेरे ती पोकळी भरून काढत असतात.
गुरु राम राहीमचे राजकीय कनेक्शन मात्र अजूनही स्ट्रॉंग असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळंच तो अधून मधून पॅरोलवर बाहेर येत असतो.
हे ही वाच भिडू :
- अफगाणिस्तानात शीखांवर हल्ले होतायत पण तिथं शीख पोहोचले कसे हा इतिहास पण इंटरेस्टिंग आहे.
- सिंघू बॉर्डर प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या निहंग शीखवर एका ब्रिगेडियरचा खून केल्याचे आरोप आहेत
- शेतकरी आंदोलनाच्या ट्रॅक्टरनां संरक्षण देणारे निळे शीख योद्धे कोण आहेत?