२८ वर्षाच्या पोरानं दोन टेबलांच्या भांडवलावर सुरू केलेली बॅंक म्हणजे सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया

२८ वर्षांच्या एका पोराने १९११ साली स्वदेशी बॅंक सुरू केली होती. तुम्ही म्हणालं असेल कुठलीतरी छोटीशी बॅंक. बॅंकींगच्या आजच्या दुनियेत ही बॅंक गायब देखील झाली असेल. उत्साहात कारभार सुरू केला असेल आणि त्याच वेळात तो आपटला देखील असेल. 

तर भिडूंनो या बॅंकेच नाव होतं,

सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया. 

सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचं नाव ऐकल्यावर बत्या गुल झाल्या ना. व्हायलाच पाहीजेत. ही बॅंक स्थापन करणाऱ्या माणसाचं नाव होतं सोराबजी पोचखानवाला.

पोचखानवाला कोणी उद्योगपती नव्हते, ते कोणी त्या काळातलं बड प्रस्थ देखील नव्हतं तरिही त्यांनी बॅंक सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि तो तडीस नेला. त्यांच्या या निर्णयामागे फक्त एकाच गोष्टीचं भांडवलं होतं ते म्हणजे ते हूशार होते. 

लंडनच्या इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकर्स या संस्थेची परिक्षा पास होणारे ते पहिले भारतीय होते.

परिक्षा पास झाल्यानंतर अनेक बॅंकामध्ये प्रबंधक होण्यासाठी त्यांनी अर्ज केले होते. पण प्रत्येक ठिकाणी भारतीयांना एवढी अक्कल नसते हेच उत्तर त्यांना ऐकावं लागत होतं. 

पुढे ते बॅंक ऑफ इंडियामध्ये नोकरीला लागले. आपण स्वदेशी बॅंक स्थापन करावी या उद्देशाने बॅंक ऑफ इंडियातले ब्रिटीश अधिकारी स्ट्रांडाफेलो यांना भेटण्यासाठी ते गेले. तेव्हा ब्रिटीश अधिकारी म्हणाला, 

कुठलाही भारतीय बॅंक उभारून ती चालवण्याची क्षमता ठेवू शकत नाही… 

बस्स, इथेच ठिगणी पेटली.

ही गोष्ट घडली तेव्हा पोचखानवाला यांच वय होतं अवघं २८ वर्ष. त्यांनी मुंबईतले तत्कालिन कापसाचे व्यापारी कल्याणजी जेस्त्सी यांच्याकडून आर्थिक मदत घेतली. भाड्याने इमारत घेण्यात आली. दोन टेबल आणि एक खुर्ची टाकून बॅंकेचा श्रीगणेशा करण्यात आला.

भिकाजी नावाचे एक ग्रहस्थ बॅंकेत कॅशियरचं काम पाहू लागले. कारभार सुरू झाला. पोचखानवाला यांनी आपल्या ओळखीतून लोकांना बॅंकेकडे वळवण्यास सुरवात केली. योग्य ते भांडवल उभारण्यात आलं. 

२१ डिसेंबर १९११ रोजी बॅंकेने तत्कालीन ब्रिटीश व्यवस्थेचे सर्व निकष पूर्ण केले आणि बॅंकेस मान्यता मिळाली.

बॅंकेचे अध्यक्ष स्वत: होण्याऐवजी त्यांनी फिरोजशहा मेहतांना बॅंकेचे अध्यक्ष होण्यासंबधी गळ घातली. फिरोजशहा मेहता हे मुंबईचे महापौर होते. ते कामाच्या बाबतीत प्रचंड शिस्तप्रिय होते. त्यांना बॅंकेचे काही नियम पटले नाहीत. तेव्हा नियमांमध्ये बदल करुनच आपण अध्यक्ष होवू शकतो अशी अट त्यांनी घातली. पोचखानवाला यांनी खुल्या मनाने नियमात बदल केले व फिरोजशहा मेहता बॅंकेचे अध्यक्ष झाले. 

बॅंकेचे घौडदौड पाहून विरोधकांना बॅंक बुडणार असल्याच्या अफवा पसरवल्या तेव्हा फिरोजशहांनी स्वत: ७२ तास सलग बसून लोकांचे पेमेंट वाटले होते. पुढे युनियन बॅक डबघाईला आली तेव्हा सेंट्रल बॅंकेने युनियन बॅंकेस तारले. एक बॅंक दूसऱ्या बॅंकेच्या मदतीला जाते हे भारतातील पहिले उदाहरण होते. 

बॅंकेचा विस्तार होवू लागला. पोचखानवाला जातीने बॅंकेच्या विस्तारात लक्ष घालू लागले. कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणापासून ते पुस्तकालायपर्यन्त वेगवेगळ्या कल्पना ते राबवत होते. शेतकऱ्यांना कापणीच्या वेळी बॅंक उपलब्ध करुन देणे व पुन्हा काही काळ बॅंक सुरू ठेवणे अशी कल्पना त्यांनी अंमलात आणली. 

१९३७ साली पोचखानवालांचे निधन झाले मात्र त्यांच्या निधनानंतर देखील त्यांच्या आदर्शांवर बॅंक काम करत राहिली. पंडीत नेहरू, राजेंद्र प्रसाद, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, मदर तेरेसा अशा लोकांची खाती या बॅंकेत होती.

पुढे १९६९ मध्ये इंदिरा गांधीच्या काळात बॅंकेचे राष्ट्रीयकरण घडवून आणण्यात आलं आणि मालकीच्या दृष्टीने देखील ही बॅंक भारताची बॅंक झाली. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.