पहिल्या चार डावात थरथरत खेळणारा चंदू बोर्डे शेवटच्या डावात विक्रम रचता रचता राहिला

१९५८-५९ साली वेस्ट इंडिजचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला होता. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत पाच टेस्ट सामने खेळले जाणार होते. वेस्टइंडीजची धुरा गॅरी अलेक्झांडरकडे होती तर भारताला या मालिकेत चार कर्णधार बदलावे लागले. पहिल्या टेस्ट सामन्यात पॉली उम्रीगार, दुसऱ्या व तिसऱ्या टेस्ट सामन्यात गुलाम अहमद, चौथ्या टेस्ट सामन्यात विनू मंकड, तर पाचव्या टेस्ट सामन्यात हेमू अधिकारी असे चार कर्णधार खेळले होते.

त्या मालिकेत वेस्टइंडीज चा वेगवान गोलंदाज वेस्ली हॉल हा टेस्टमध्ये पदार्पण करत होता. त्याच्या जोडीला रॉय गिलक्रिस्ट हा देखील गोलंदाज होता. काळाभिन्न चेहरा, बलदंड शरीर, भारदस्त उंची, गळ्यात घातलेली जाड सोन्याची साखळी व ते पांढरेशुभ्र कपडे. त्यांना पाहिलं की असं वाटायचं महाभयंकर राक्षसच जणु गोलंदाजी करत आहेत.

या राक्षसी सेनेविरुध्द त्याच सामन्यात भारताचा चंदू बोर्डे देखील टेस्ट मॅचमध्ये आपलं पदार्पण करत होता. वेस्ली हॉलचे चेंडू खेळताना हातातली बॅट थरथर कापते असा चंदू सांगायचा. त्याने वेस्टइंडीज गोलंदाजांची चांगलीच धसकी घेतली होती.

पहिल्या टेस्टच्या पहिल्या डावात चंदू बोर्डे ७ धावा करून रनआऊट झाला. दुसऱ्या डावात चंदूला खेळायलाच मिळाले नाही. तो सामना ड्रॉ म्हणून घोषित करण्यात आला. पदार्पणातील पहिल्याच मॅचमध्ये चंदूला चांगली कामगिरी करता आली नाही. दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या डावात तर वेस्ली हॉलने चंदू ला ० रनावरच परत पाठवले. दुसऱ्या डावात चंदूला १३ धावांपर्यंत मजल मारता आली. तो सामना वेस्ट इंडीज संघाने जिंकला.

तिसऱ्या टेस्ट मध्ये चंदूची निवड झालीच नाही. व तो सामना देखील वेस्ट इंडीज संघाने जिंकला.

चौथ्या टेस्टमध्ये चंदूचे पुनरागमन झाले. पण पहिल्याच डावात त्याच्या पदरी भला मोठा ० आला.

७, ०, १३, ०…! चार डावांत फक्त २० रन.

चंदूवर विविध स्थरातून टीका झाली. त्याच्या खेळावर प्रश्न उभे राहिले. त्याच्या करिअरबद्दल बोलले जाऊ लागले. चंदूसाठी परिस्थिती खूप निराशाजनक झाली होती. चंदू ऐवजी इतर दुसरा कोणता खेळाडू असता तर तो खचून गेला असता. पण चंदू एका वेगळ्याच आत्मविश्वासाने दुसऱ्या डावात मैदानावर खेळायला उतरला.

हॉलसारख्या गोलंदाजांना घाबरायचं नाही, त्यांच्या चेंडू पुढे डगमगायच नाही, क्रिझ सोडायची नाही, आज स्वतःला सिद्ध करून राहायचंच. अशा या निर्धाराने चंदू खेळू लागला.

खेळणार्‍या प्रत्येक बॉलनंतर चंदूच्या मनात आत्मविश्वास निर्माण होऊ लागला होता. थरथरणारी बॅट आता स्थिर झाली होती. नजर येणाऱ्या चेंडूवर केंद्रीत झाली होती. पाय जमीनीत घट्ट रोवले गेले होते. बघता बघता बॅटच्या मधोमध बॉल बसू लागले, क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल सीमारेषेकडे धावू लागला. ह्या डावात जर चंदूने रन केले नसते तर ही टेस्ट कदाचित चंदूची शेवटची टेस्ट ठरली असती.

पण याच टेस्टने चंदूला एक नवीन जीवनदान दिले. या डावात तो ५६ धावा काढून बाद झाला. तसं बघायला गेलं तर ५६ धावा काही जास्त नव्हत्या.

पण त्या डावात भारतीय संघच १५१ धावांमध्ये ऑलआऊट झाला होता. त्या डावात चंदू हायेस्ट स्कोअरर ठरला होता. चंदू च्या पाठोपाठ पॉली उम्रीगारच्या २९ धावा तर पंकज रॉयच्या १६ धावा होत्या. बाकी संघाला तर १० धावांच्या वर धावा करता आल्या नाहीत. हा सामना सुद्धा वेस्ट इंडिजने जिंकला. केलेल्या ५६ धावांमुळे चंदूला पुढची टेस्ट मॅच मिळाली.

पाचवी व शेवटची टेस्ट मॅच दिल्लीच्या फिरोजशहा कोटला या मैदानावर खेळली जाणार होती. हा सामना चंदूसाठी करो या मरो सारखा होता. ह्या सामन्यावर चंदूचे भवितव्य ठरणार होते. आणि याच सामन्यात चंदू बोर्डे हा भारताचा एक सुपरस्टार क्रिकेटर म्हणून पुढे आला. पाहिल्या डावात १०९ व दुसऱ्या डावात ९६ अश्या धमाकेदार पाऱ्या त्याने खेळल्या.

१०९ धावा काढताना चंदूने हॉलसारख्या वेगवान गोलंदाजांची पार हवा बंद करून टाकली. सोबर्स सकट सगळ्या मंदगतीच्या गोलंदाजांना चांगलेच तडाखे लगावले. फिरोजशाह कोटलावर त्यावेळी चंदू बोर्डेची आकर्षक फटकेबाजी सगळ्यांना पाहायला मिळाली. दुसऱ्या डावातही त्याने सगळ्या गोलंदाजांना फोडून काढले. पण शंभरीच्या उंबरठ्यावर असताना तो बाद झाला. बॅटने मारलेला चेंडू तिकडे दूरवर गेला पण इकडे त्याची बॅट स्टंपला लागली आणि चंदू बोर्डे हिटविकेट आऊट झाला.

आयुष्यातल्या पहिल्याच टेस्ट मालिकेत दोन डावात दोन शतक ठोकण्याचा विक्रम त्याचा हुकला. विजय हजारे यांनी १९४७ साली केलेल्या विक्रमाची बरोबरी त्यांचाच चेला बरोबर दहा वर्षांनी करणार होता. पण हा विक्रम थोड्यासाठी हुकला.

पहिल्या चार डावात थरथरत खेळणारा चंदू बोर्डे शेवटच्या डावात विक्रम रचता रचता राहिला. तो सामना ड्रॉ राहिला. आणि वेस्ट इंडिजने टेस्ट मालिका ३-० अशी जिंकली.

  •  कपिल जाधव

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.