मुंबईच्या ४१ रणजी विजेतेपदांपैकी एक ट्रॉफी वेस्ट इंडिजच्या खुंखार फास्ट बॉलरमुळं आलीये

भारतीय क्रिकेटची शान म्हणजे रणजी ट्रॉफी स्पर्धा. आयपीएल आत्ता आत्ता आलं असलं, तरी कित्येक वर्ष रणजी क्रिकेटनंच भारतीय क्रिकेटच्या नव्या पिढ्या घडवण्याचं काम सातत्यानं केलंय. यावर्षीची रणजी ट्रॉफी स्पर्धा दोन टप्प्यांमध्ये झाली. आयपीएलच्या आधी पहिला टप्पा पार पडला, तर आयपीएलनंतर रणजीच्या क्वार्टर फायनल्सला सुरुवात झाली.

या क्वार्टर फायनल्समध्ये लक्ष वेधून घेणारी मॅच होती, मुंबई विरुद्ध उत्तराखंड. ही मॅच काय काटे की टक्कर वैगरे झाली नाही. कारण मुंबईनं उत्तराखंडला ७२५ रन्सनं हरवलं, फर्स्ट क्लास क्रिकेटमधला हा सगळ्यात मोठा विजयी फरक ठरलाय.  

मुंबईकडून या मॅचमध्ये सुवेद पारकरनं पदार्पणातच डबल सेंच्युरी मारली, तर फॉर्मात असलेल्या सर्फराज खाननं पुन्हा शतक मारलं. दुसऱ्या इनिंगमध्ये यशस्वी जैस्वालनं शतक मारुन घेतलं. पण ही मॅच गाजवली ती मुंबईच्या बॉलर्सनं. पहिल्या इनिंगमध्ये उत्तराखंडला फक्त ११४ रन्समध्ये गुंडाळण्यात आलं. तर दुसऱ्या इनिंगमध्ये आधीच मोठ्या दडपणाखाली असणाऱ्या उत्तराखंडच्या बॅट्समन्सचा मुंबईनं ६९ रन्समध्ये खुर्दा उडवला.

टेस्ट मॅच जिंकायची असेल, तुमच्याकडे २० विकेट्स घेणारे बॉलर्स पाहिजे. मुंबईनं या मॅचमध्ये बॅट्समनच्या जीवावर आघाडी घेतली, पण मॅच जिंकवण्यात मोठा वाटा बॉलर्सच्या अचूक माऱ्याचाच आहे.

मुंबई यावर्षी ४२ व्या रणजी ट्रॉफी विजेतेपदासाठी आतुर आहे. आजवरच्या ४१ विजेतेपदांमध्ये सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, अमोल मुझुमदार, विनोद कांबळी, झहीर खान, अजित वाडेकर, रवी शास्त्री, वसीम जाफर अशा कित्येक दिग्गजांची महत्त्वाची भूमिका आहे. 

पण या ४१ मधलं एक विजेतेपद मुंबईला मिळालं, ते वेस्ट इंडिजच्या एका फास्ट बॉलरमुळं.

विशेष म्हणजे हा बॉलर, मुंबईच्या टीमचा कोच नव्हता, तर प्लेअर होता. तो मुंबईकडून खेळला आणि खोऱ्यानं विकेट्सही घेतल्या.

स्वेन कॉनराड चार्ली स्टेयर्स असं त्याचं नाव. 

चार्ली मुळचा गयानाचा. टिपिकल विंडीज शरीरयष्टी, ताडमाड उंची आणि रूंद खांदे. उंचीचा फायदा असल्यानं चार्लीचा रिलीझ पॉईंटही हाय होता. चांगला वेग, अचूक बाऊन्सर्समुळं तो अधिक भेदक बनलेला.

खरंतर तो फक्त १७ फर्स्ट क्लास क्रिकेट मॅचेस खेळला, ज्यात ४ टेस्ट मॅचेसचा समावेश होता. अगदी कायम लक्षात राहील असं काही त्याच्या कारकिर्दीत घडलं नाही. पण तरीही चार्ली भारतीयांसाठी भारी ठरला, याचं कारण म्हणजे त्यानं मुंबईकडून खेळताना केलेली भन्नाट कामगिरी.

१९६१-६२ मध्ये भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेला होता. त्यांच्या फास्ट बॉलिंगसमोर आपली फेफे उडाली आणि ५-० असा दणकट व्हाईट वॉश भारताला मिळाला. बीसीसीआयनं हे टाळण्यासाठी एक योजना आखली. 

त्यांनी ठरवलं की, विंडीजच्या काही बॉलर्सला १९६२-६३ च्या सिझनसाठी भारतात रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी बोलवायचं. त्यामुळं भारतीय बॅट्समनला त्यांच्या पेसला खेळायचा सराव मिळेल.

यानुसार चार्ली स्टेयर्स मुंबईकडून खेळला, खतरनाक रॉय गिलख्रिस्ट हैद्राबादकडून, चेस्टर वॉटसन दिल्लीकडून तर लेस्टर किंग बंगालकडून खेळला.

मुंबईची टीम आधीच तगडी होती, फारुख इंजिनिअर, दिलीप सरदेसाई, अजित वाडेकर, वासू परांजपे, पॉली उम्रीगर, गुलाबराय रामचंद्र अशी तगडी बॅटिंग आणि रमाकांत देसाई, बापू नाडकर्णी, बाळू गुप्ते आणि आता जोडीला चार्ली स्टेयर्स ही अशी बॉलरसेना घेऊन मुंबई मैदानात उतरली.

सुरुवातीला स्टेयर्स काही प्रदर्शनीय मॅचेस खेळला. त्यानंतर रणजी ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये तो उतरला. बंगाल विरुद्धची मॅच मुंबईच्या बॅट्समन्सनी गाजवली. स्टेयर्सनंही हाणामारी करत ५२ रन्स चोपले. पहिल्या इनिंगमध्ये त्याला विकेट मिळाली नाही, पण दुसऱ्या इनिंगमध्ये त्यानं दोन विकेट्स काढल्या.

फायनलमध्ये आव्हान होतं, राजस्थानचं.

मुंबईची टीम सनाट फॉर्ममध्ये होती. त्यांच्या बॅटिंग लाईनअपनं धुव्वा उडवून दिला. बापू नाडकर्णींनी डबल सेंच्युरी केली, रमाकांत देसाई आणि गुलाबराय रामचंद यांनी सेंच्युरी मारली. त्यामुळं मुंबईनं बोर्डावर टोटल लावली,५५१ रन्स.

राजस्थानकडेही तगडे कार्यकर्ते होतेच, पण चार्ली स्टेयर्सनं अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यानं राजस्थानची सगळी टॉप ऑर्डर नेस्तनाबूत करुन टाकली. आपल्या १४ ओव्हर्सपैकी ४ ओव्हर्स मेडन टाकत, फक्त ३६ रन्स देत स्टेयर्सनं ६ विकेट्स काढल्या. राजस्थानचा डाव १९६ रन्सवर खलास झाला.

फॉलोऑन मिळाल्यावर झुंज देण्याचा पर्याय त्यांच्यासमोर होता, मात्र स्टेयर्सनं पुन्हा एकदा पहिलाच हादरा दिला. इथून पुढं राजस्थानची टीम गंडली. विजय मांजरेकरांचं शतक, हनुमंत सिंग आणि केएम रंगता यांनी दुसऱ्या इनिंगमध्येही केलेलं अर्धशतक त्यांना वाचवू शकलं नाही.

स्टेयर्सनं टॉप ऑर्डरमधल्या दोन आणि लोअर ऑर्डरमध्ये खेळत फिफ्टी करणाऱ्या जीआर सुंदरम यांची तिसरी अशा एकूण तीन विकेट्स घेतल्या आणि मुंबईनं मॅच मारली.

दुसऱ्या इनिंगमध्ये जास्तच आक्रमक फिल्डिंग सेटअप लावल्यानं स्टेयर्सनं रन्स जास्त दिले खरे, पण दोन्ही इनिंग्समध्ये मिळून ९ विकेट्स काढत या वेस्ट इंडिजच्या फास्ट बॉलरनं मुंबईला रणजी ट्रॉफी जिंकून दिली.

भारतातल्या सगळ्यात प्रतिष्ठित स्पर्धेच्या फायनलमध्ये हिरो ठरलेला चार्ली स्टेयर्स या फायनलनंतर फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलाच नाही. वेस्ट इंडिजला त्याच्या टॅलेंटचा फारसा लाभ घेता आला नाही.

पण जेव्हा जेव्हा मुंबईची रणजी टीम बॉलर्सच्या जीवावर मॅच मारेल, तेव्हा तेव्हा मात्र चार्ली स्टेयर्सची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.