स्टींग ऑपरेशन, जावेद मियाँदादचा सिक्स चेतन शर्माची ओळख एवढीच नाहीये…

चेतन शर्मा हे नाव आज चर्चेत आलंय. कारण असं की, इंडियन क्रिकेट टीमचा मेन सिलेक्टर असलेला  या चेतन शर्माचं स्टींग ऑपरेशन करण्यात आलंय. हा स्टींग ऑपरेशनचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये तो इंडियन टीममधल्या अनेक प्लेयर्सबद्दल बोलताना दिसतोय.

अगदी मी सिलेक्टर असल्यामुळे रोहीत शर्मा कसा मला फोन करून माझ्याशी अर्धा-अर्धा तास बोलतो इथपासून ते हार्दिक पांड्या माझ्या सोफ्यावर झोपतो इथपर्यंत सगळं तो या व्हिडीओमध्ये बोलताना दिसतोय. आता हा व्हिडीओ व्हायरल होतोय, क्रिकेटप्रेमी संतापलेत, बीसीसीआय त्याच्यावर कारवाई करेल वगैरे हा वेगळा मुद्दा, पण आज या स्टींग ऑपरेशनमुळं चेतन शर्मा आठवला.

याआधी चेतन शर्मा कशामुळं लक्षात राहिला होता? तर जावेद मियाँदादनं मारलेल्या सिक्समुळे. या छकड्याची जखम भारतीय चाहत्यांच्या मनात कायमची कोरली गेली. पण दुर्दैव हे की, जावेद मियाँदादचं नाव घेतल्यावरच आपल्याला चेतन शर्माची आठवण येते. 

१९८६ सालच्या आशिया चषकाच्या फायनलमध्ये शेवटच्या बॉलवर पाकिस्तानला जिंकण्यासाठी ५ रन्स हवे होते. बॉल चेतन शर्माच्या हातात होता. चेतन शर्माने टाकलेल्या शेवटच्या बॉलवर जावेद मियादादने खणखणीत सिक्सर ठोकला आणि भारताच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला गेला होता.

या गोष्टीला आता ३५ वर्ष होत आली, मात्र चेतन शर्मा म्हणलं की कित्येकांच्या आठवणी त्या सिक्सवरच सुरू होतात आणि तिथंच संपतात.

त्या सिक्सनंतर वर्षभरानंच चेतन शर्माने जागतिक क्रिकेटमध्ये घेतलेल्या पहिल्या-वहिल्या वर्ल्डकप हॅट्रिकला मात्र आपण विसरलेलो असतो.

१९८७ चा क्रिकेट वर्ल्डकप.

८ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर १९८७ या महिनाभराच्या कालावधीत ८ संघांनी सहभाग नोंदवलेला हा वर्ल्डकप प्रथमच इंग्लंडच्या बाहेर खेळवण्यात आला होता. या आधीच्या तिन्ही वर्ल्डकप स्पर्धा इंग्लंडमध्ये झाल्या होत्या.  १९८७ मध्ये मात्र भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयुक्तपणे वर्ल्डकपचं आयोजन केलं. ५० ओव्हर्सच्या फॉरमॅटमध्ये खेळविण्यात आलेला हा पहिलाच वर्ल्डकप होता.

३१ ऑक्टोबर १९८७, नागपूरचं व्हीसीए स्टेडीयम.

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना. ग्रुप स्टेजमधला हा शेवटचा सामना होता. भारतानं यापूर्वीच्या आपल्या ५ पैकी ४ सामन्यात विजय मिळवत आधीच सेमीफायनलमध्ये आपलं स्थान पक्कं केलं होतं. साखळी फेरीतला आपला एकमेव पराभव वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून झाला होता. तो ही फक्त १ रनने.

अर्थात या पराभवाची सव्याज परतफेड देखील भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्यांचा ५६ धावांनी पराभव करत केली होती. दुसरीकडे न्यूझीलंडचं स्पर्धेतील आव्हान मात्र संपलं होतं.

न्यूझीलंडच्या संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता.

४१ ओव्हरनंतर न्यूझीलंडच्या स्कोअर बोर्डवर १८२ रन्स लागले होते आणि त्यांच्या ५ विकेट्स पडल्या होत्या. ४२ वी ओव्हर टाकण्यासाठी कर्णधार कपिल देवने बॉल चेतन शर्माच्या हातात सोपवला.

चेतन शर्माने पहिले ३ बॉल डॉट टाकले होते. स्ट्राईकवर होता के.आर. रुदरफोर्ड. चेतन शर्माने आपल्या ओव्हरचा चौथा बॉल टाकला आणि थेट रुदरफोर्डचा मिडल स्ट्म्प उडवला.

त्यानंतर क्रीझवर आला तो आयडीएस स्मिथ. स्मिथचेही तेच हाल झाले जे रुदरफोर्डचे झाले होते. यावेळी फक्त स्ट्म्प बदलला होता. स्मिथचा ऑफ स्ट्म्प उडाला होता.

आता ओव्हरचा शेवटचा बॉल आणि चेतन शर्मा हॅट्रिकवर होता.

स्मिथचा ऑफ स्टंप आणि रुदरफोर्डचा मिडल स्टम्प आधीच उडाला होता आणि आता स्वतःचा लेगस्टम्प सांभाळण्याची जबाबदारी इ. जे. चॅटफिल्डवर होती. चेतन शर्माने शेवटचा बॉल टाकला आणि व्हीसीएवरील भारतीय क्रिकेटरसिकांनी एकच जल्लोष केला.

चॅटफिल्डचा लेग स्टम्प उडवत चेतन शर्माने वर्ल्डकपच्या इतिहासातील पहिली हॅट्रिक नोंदवली.

ज्या हॅट्रिकमध्ये बॅट्समनचे वेगवेगळे तिन्ही स्टम्प्स उडाले अशी ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली बहुतेक एकमेव हॅट्रिक असावी.

पुढे न्यूझीलंडच्या संघाने निर्धारित ५० ओव्हर्समध्ये ९ विकेट्स गमावून २१५ रन्स केले. न्युझीलंडचं २१६ रन्सचं लक्ष्य भारतीय संघाने सुनील गावस्करच्या एकदिवसीय क्रिकेटमधल्या पहिल्या आणि एकमेव शतकाच्या जोरावर ३२ ओव्हर्समध्येच पार करत सहज विजय मिळवला.

या विजयामुळे भारतीय संघाने नेट-रनरेटच्या आधारे ग्रुपमध्ये पहिलं स्थान देखील मिळवलं. सुनील गावसकर आणि चेतन शर्मा यांना ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. 

त्यानंतरही चेतन शर्मानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्ये अनेक मॅचेस गाजवल्या, भारतीय टीमचा निवड समिती प्रमुख म्हणूनही मैदान गाजवलं. त्यानं खाल्लेला सिक्स हा फक्त एक चुकीचा बॉल होता,

त्याला त्यावरुन लक्षात ठेवण्यापेक्षा… सलग तीन बॉलवर तीन वेगळे स्टम्प्स उडवणारा बॉलर म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.