प. महाराष्ट्र आणि मराठवाडा जोडण्याचं खरं काम तर आफ्रिकेतून आलेल्या माशानं केलय

मराठवाड्याचा अनुशेष भरून काढू, प. महाराष्ट्राने मराठवाड्यावर अन्याय केलाय. महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यापासून प्रत्येक राजकारणी अनशेष भरून काढायच्या गोष्टी करतो. पश्चिम महाराष्ट्राचा विकास होण्यामागे असणाऱ्या नैसर्गिक साधन-संपत्तेची कारणं देतो.

तर या राजकारणामुळं एक वाईट गोष्ट झाली ती म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अघोषितपणे एक वितुष्ट निर्माण झालं. प. महाराष्ट्रातली आणि मराठवाड्यातली पोरं जेव्हा पुण्यात शिक्षणासाठी येवू लागली तेव्हा एकमेकांपासून तशी लांबच राहू लागली.

पण काही अस्सल भिडू मात्र एका गोष्टीवर एकमतात आले.

कोल्हापूरकरांनी तांबडा पांढऱ्यात आपली भूमिका मागे घेतली आणि मराठवाड्यातील मंडळींनी आपल्या झणझणीत काळ्या मसाल्याबाबतची भूमिका मागे घेतली ती चिलापी माशामुळे.

चिलापी मासा हा अस्सल खवय्यांची जाण झाला.

प्रामुख्याने उजनीच्या धरणात आढळणारा हा मासा. उजनी धरणाशेजारी असणारं भिगवण हे चिलापी माशाचं मार्केट. हा धरणात ९५ टक्के फक्त चिलापी मासाच सापडतो. त्यामुळे उजनीच्या आजूबाजूला असणाऱ्या पुणे, इंदापूर, बारामती, सोलापूर इथपासून ते पार उस्मानाबाद, लातूर, बीड आणि सांगली, सातारा या भागात चिलापी आवडीने खाल्ला जातो. चिलापीची दहशत असणारा भाग म्हणून भिगवण पट्टा ओळखला जात असला तरी पुण्यासारख्या शहरांमध्ये देखील ठिकठिकाणी ‘स्पेशल चिलापी’ अगदी रितसर घुसलेला आहे.

मराठवाडा असो नाहीतर पश्चिम महाराष्ट्र दोन्ही ठिकाणावरून आलेल्या तरुणांच एकमत होण्यासाठी हा चिलापी मासा मुख्य भूमिका निभावतो हे मात्र नक्की.

आत्ता हा चिलापी मासा आला कुठणं ?

सांगितलं तर पटणार नाय पण हा मासा अस्सल महाराष्ट्रीयन पण नाही. महाराष्ट्रीयन जावुद्या या माशाच्या अंगातलं रक्त भारतीय पण नाही वो. हा मासा आहे आफ्रिकेतला. आफ्रिकेतल्या दक्षिण भागातला हा मुळचा मासा. त्याचं खरं नाव तिलापिया मोझांबिकस. हाच तिलापिया महाराष्ट्रात आल्यावर त्याचं बारसं करण्यात आलं व इथल्या माणसांनी त्याचं सोप्प नामकरण केलं ते चिलापी.

बोत्सवाना हा मुळचा देश असणारा मासा पुढे दक्षिण आफ्रिकेसह झिंबॉम्ब सह इतर देशात वाढला. त्यानंतर त्याच्या मुलभूत गुणवैशिष्ट्यांमुळे तो जगभर पसरण्यास तयार झाला. साधारण हा मासा जगभर पसरण्याचा कालावधी १९५० नंतरचा सांगितला जातो.

त्याचं कारण देखील तितकच भन्नाट आहे.

झालेलं अस की या काळात ब्रिटीश सत्ता ठिकठिकाणाहून माघार घेत होती. प्रत्येक वसाहतीत त्यांनी येड्यागत लुटमार केलेली. आत्ता भारताचच उदाहरण घेतलं तर ब्रिटीशांनी इथे सत्ता राबवताना भारत अन्नधान्यात स्वयंपुर्ण व्हावा, लोकांना पुरेसं अन्न मिळावं याचा कधी विचार केला नाही. त्यांनी फक्त आणि फक्त कापसासारख्या पिकांवर भर दिला. ब्रिटीश गेले आणि लोक उपाशी राहू लागले.

तेव्हा अन्नधान्याबरोबर पशुपक्ष्यांच्या पैदासीकडे लक्ष्य देण्याचं धोरण आखण्यात आलं. अशा वेळी उपयोगात आला तो भन्नाट टिकून राहण्याची क्षमता असणारा चिलापी मासा. हा मासा १९५२ मध्ये भारतात आला आणि पैदास होण्याकरता ठिकठिकाणच्या मत्सोउत्पादन केंद्रांकडे देण्यात आला.

हा मासा म्हणजे दुसरं बॉयलर चिकन होतं. तो येड्यागत वाढायचा हे त्याचं वैशिष्ट. दूसरं खास वैशिष्ट म्हणजे अगदी मुंबईची गटार झालेली मिठी नदी असो की सांगलीतला शेरीनाला असो पाणी कितीही घाण असो त्यात कितीही रसायनं असोत इथंही तो टिकून रहायचा. त्यामुळेच या माशा दूसरं टोपणनाव मिळालं ते डुक्करी मासा.

त्याच्या या वैशिष्ट्यामुळे तो मत्सउत्पादन केंद्रात असणारी जागा सोडून बाहेर वाढू लागला. समजा त्या काळी उजनीत चिलापी एक डझन मासं सोडले असते तर ते दिड महिन्यात दोन हजार आणि अडीच महिन्यात १५ हजार झाले असतील. डुक्करांपेक्षा जास्ती वेगाने याची पैदास होते म्हणूनच हा मासा डुक्करीमासा हे नाव सार्थ ठरवतो.

पण या माशाचा एक मोठ्ठा प्रोब्लेम आहे,

तो म्हणजे हा मास इतर माशांना जगू देत नाही. पूर्वीच्या काळी ज्या ठिकाणी मरळ, वाम, झिंगा, शेंगाळे, बरम, आंबळी, खवली, अरळी, कानस असे विविध मासे सापडायचे तिथे चिलापी मासा सोडल्यास काही महिन्यात तिथे फक्त चिलापी हाच मासा सापडतो. तो इतर माशांच्या प्रजननांत अडथळा निर्माण करतो. त्यामुळे नदी, नाले, ओढ्यांमधील जैवविविधता संपुष्टात  येते.

उजनीच्या एका धरणाचं उदाहरण द्यायचं झालं तर उन्हाळ्याच्या कालावधीत इथून दिवसाला साधारणं ५० टन चिलापी मासा पकडला जातो. विविध मासे पकडण्यासाठी जाळे लावले जातात पण ९५ टक्यांहून अधिक प्रमाण एकट्या चिलापी माशाचच असतं.

म्हणून चिलापी माशाला पर्यावरणवादी मोठ्या प्रमाणात विरोध करताना दिसून येतात. अस असलं तरी हजारो खवय्यांची भूक भागवणारा चिलापी माणसं जोडण्याचं काम करतो म्हणून त्याचं कौतुक देखील करू वाटतं.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.