तुम्हाला माहित आहे का, सयाजीराव महाराजांच्या पत्नी जागतिक किर्तीच्या लेखिका होत्या

हिंदुस्तानास जर उर्जितकाळ यावयाचा असेल तर तो एकी आणि विद्या या वाचून कधीही यावयाचा नाही…

असं जेव्हा महाराजा सयाजीराव म्हणतात तेव्हा शिक्षणाचं वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यातलं मोल लक्षात येतं. त्यांच्या या वाक्याबरहुकूम आपल्या अधिकारांचा वापर करून बडोदा संस्थानात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवत स्त्रीवादाचा जागतिक दृष्टीनं अभ्यास करणाऱ्या व भारतीय स्त्रियांची स्थिती जगासमोर मांडणाऱ्या पहिल्या महिला म्हणजे,

हर हायनेस महाराणी चिमणाबाई….!

महाराणी चिमणाबाई यांचा जन्म १८७२ मध्ये इंदोर जवळील देवास बु।। या गावी सरदार श्रीमंत बाजीराव अमृतराव घाडगे ह्यांच्या घरी झाला. त्यांचे जन्माचे नाव श्रीमंत गजराबाई देवी होते. त्यांची जन्मतारीख १३ नोव्हेंबर १८७१ अशीही सांगितली जाते.

महाराणी चिमणाबाई या पुरोगामी विचाराच्या महिला होत्या जगात विविध ठिकाणी चालू असलेल्या घडामोडींची त्यांना खडानखडा माहिती होती. विदेशातून येणाऱ्या विविध अधिकारी, नेते तसेच अभ्यासकांचे त्या स्वतः स्वागत करत व त्यांच्याशी चर्चा करत असत.

त्यांना भेटणाऱ्या एका इंग्रज अधिकाऱ्याने आपल्या डायरीत लिहून ठेवलं आहे की,

“चिमणाबाई ह्यांना भेटल्यानंतर त्या राज्याच्या प्रमुख असाव्यात आणि सगळ्या संस्थानांवर त्यांचे नियंत्रण असावे असे वाटते.”

बडोद्याच्या सयाजी महाराजांसोबत देशा-विदेशात विविध ठिकाणी फिरण्याची संधी त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांच्या ज्ञानात तसेच अनुभवामध्ये मोलाची भर पडत गेली. त्यांनी लहान मुलींच्या शिक्षणासाठी व त्यांची शाळेतील संख्या वाढावी म्हणून काम सुरू केले.

त्यासोबतच तत्कालीन हिंदू समाजामध्ये असणारी पडदा पद्धती हटवण्यासाठीही त्यांचे योगदान मोलाचे होते. त्याकाळी बालविवाह सर्वमान्य होता व लहान मुलींचे लग्न तुलनेने मोठ्या वयाच्या माणसाची केले जायचे. या पद्धतीविरुद्धही त्यांनी आवाज उठवला आणि आपल्या राज्यांमध्ये ही पद्धत बंद व्हावी यासाठी मोलाचे प्रयत्न केले.

1927 आली पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय महिला परिषदेचे पहिले अध्यक्ष पद भूषवण्याचा मानही त्यांना मिळाला.

ज्याप्रमाणे ‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो’ असे म्हटले जाते त्याचप्रमाणे समाजसुधारणेसाठी आणि भारताची सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती व्हावी व बहुजनांना त्यात मोलाचे स्थान लाभावे यासाठी कार्यरत असणाऱ्या सयाजीराव गायकवाड महाराजांच्या पाठीमागेही महाराणी चिमणाबाई यांच्यासारख्या विभूतीचा मोलाचा वाटा होता.

त्यांच्याकडेही आपल्या पतीप्रमाणेच दूरदृष्टी आणि सामाजिक कामासाठी वाहून घेण्याची धमक होती.

बडोद्याच्या सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांना थोर पणाने वागवले जात असे आपल्या पतीसोबत काम करतानाच त्यांनी तरुणपणीच राज्याच्या कारभारामध्ये लक्ष देण्यास सुरुवात केली आणि आपल्या राज्याची खडान्-खडा माहिती मिळवली त्यांच्यावरती महाराजां प्रमाणेच पुरोगामी विचारांचा मोठा पगडा होता म्हणूनच एस.एम. मित्रा या भारताच्या समस्यांवरती मोठे लेखन करणाऱ्या संशोधक व्यक्तीसोबत त्यांना स्त्रियांच्या दृष्टिकोनात व भारतातील स्त्रियांच्या समस्येकडे एका अत्याधुनिक दृष्टिकोनातून पाहता आले.

त्यांनी भारतीय स्त्रियांच्या अडचणी समजून घेणाऱ्या एका ग्रंथाची निर्मितीही केली.

३ ऑगस्ट १८९२ साली महाराणी चिमणाबाई यांना “इंपीरियल ऑर्डर ऑफ द क्राऊन ऑफ इंडिया” या क्वीन एक्सप्रेस यांनी प्रदान केलेल्या किताबाने सन्मानित करण्यात आले होते. स्त्रियांची सर्वोतपरी उन्नती व त्यांचे कल्याण हा त्यांच्या कळकळीचा विषय होता.

युरोपात राहिल्यांनंतर हातात मध्ययुगातील तलवार घेऊन लढण्याचे दिवस मागे पडल्याची त्यांना जाणीव झाली. शिक्षण आणि ज्ञानाची सत्ता स्थापन करून त्यावर वर्चस्व मिळवण्यातच देशातल्या स्त्रियांच्या स्वातंत्र्याची पहाट उजाडेल हे त्यांनी जाणले.

“पूर्वी ज्याप्रमाणे लढाईच्या कामात यश आपल्या लोकांनी यश मिळवले त्याचप्रमाणे हल्लीच्या काळातील विद्या, हुन्नर, धंदे व उद्योग यात प्राविण्य संपादन करून यश मिळवले पाहिजे”

ह्या महाराजांच्या वाक्यातच त्यांच्या कामाची दिशा आणि धोरण समजून येते.

“द पोझिशन ऑफ वुमन इन इंडियन लाइफ” या ग्रंथामध्ये त्यांनी लिहिलेल्या बहुतांश गोष्टी या अनुभव आणि आपल्या प्रजेतील सामान्य नागरिकांच्या निरीक्षणांमधून आलेल्या आहेत. देशोदेशीच्या संस्थानाच्या राण्या जेव्हा फक्त मानमर्तब आणि छानछोकीमध्ये व्यस्त होत्या तेव्हा महाराणी चिमनाबाई भारतीय स्त्रियांना आधुनिक युगात घेऊन येण्यासाठी झटत होत्या.

हे पुस्तक त्यांनी ‘भारतामधील सामान्य स्त्रियांना’ अर्पण केले आहे ह्यातच त्यांच्या कार्याची महती लक्षात येते. हॉटेल्स पासून कारखान्यापर्यंत स्त्रिया जेव्हा स्वतंत्रपणे काम करू लागतील तेव्हा समाजात समता स्थापित होईल हा विचार ते आपल्या लेखनातून मांडतात तेव्हा त्यांनी समाजाचा किती बारकाईने अभ्यास केला होता आणि त्यांचे विचार काळाच्या किती पुढे होते ह्याचा आपल्याला अंदाज येतो.

आपल्या सोबतच्या जपान, जर्मनी आणि इंग्लंडच्या स्त्रिया काय करतात? त्यांना व्यावसायिक स्वातंत्र्य कसे मिळाले? ह्या मार्गात त्यांना कोणत्या अडचणी आल्या? ह्या सगळ्या प्रश्नांचा उहापोह त्यांनी केला. तेथील स्त्रियांच्या तुलनेत भारतातल्या स्त्रियांची स्थिती किती वाईट आहे, असा अभ्यास करणारा हा एकमेव शोधग्रंथ ठरावा.

सामान्य जनतेला समजून घेण्याची ही दृष्टी आणि विचारांमधील खुलेपणामुळेच त्यांना भारताच्या पहिल्या ऑल इंडिया वूमन्स कॉन्फरन्सचे (AIWC) अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली.

आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांनी भारतीय स्त्रियांचे प्रतिनिधित्व केले. त्या काळामध्ये जेव्हा पुराणमतवादी आणि कर्मठ विचारांचा पगडा समाजावर होता, तेव्हा त्यांनी आपल्या राज्यातील मुलींसाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले आणि त्यांना शिक्षण घेता यावे म्हणून जागोजागी शाळांची निर्मिती केली.

सरोजिनी नायडू, कमलादेवी चट्टोपाध्याय, मुथुलक्ष्मी यासारख्या या काळातील मोठ्या महिला नेत्यांचेही लक्ष त्यांनी वेधून घेतले कारण बालविवाह पद्धती विरुद्ध एका मोठ्या व्यासपीठावरून आवाज उठवणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.

त्यांनी ही पद्धत कशी बंद केली ह्याचा एक किस्सा सांगितला जातो.

सुरुवातीला महाराणी चिमणाबाई स्वतः पडद्यामध्ये वावरत असत, मात्र आपल्या युरोपच्या दौऱ्यामध्ये त्या पडद्याशिवाय महाराजांसोबत विविध ठिकाणी जात. तसेच युरोपियन स्त्रियांना मिळणारे स्वातंत्र्य आणि त्यांचे राहणीमान त्या स्वतः पाहत होत्या.

पडदा पद्धती ही फक्त पोशाखाची पद्धती नसून त्यामुळे स्त्रियांना एका विशिष्ट बंधनात गुंतवले जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. 1914 पर्यंत महाराणी चिमणाबाई स्वतः पडदा पद्धती पाळत असत, मात्र आपल्या निरीक्षणातून आणि सुधारणावादी विचारांना अनुसरून त्यांनी ह्या पद्धतीविरुद्ध आवाज उठवला व तत्कालीन कर्त्या समाजसुधारकांप्रमाणे त्यांनी पहिल्यांदा स्वतः या पद्धतीचा त्याग केला.

पडदा पद्धती ही मूर्खपणाची आणि प्रतिगामी असल्याचे सयाजीराव गायकवाड यांचेही मत होते व त्यामुळे त्यांनीही पडदा पद्धती बंद करण्याच्या या मागणीला जोरदार पाठिंबा दर्शवला. त्यांच्या प्रयत्नामुळेच 1914 साली बडोदा संस्थांनामधून पडदा पद्धतीची ही प्रथा बंद झाली.

नया मंदिर येथून राज्यकारभार करत असताना महाराजा सयाजीराव गायकवाड या सोफ्यावर बसून जनतेशी संवाद साधत असत. त्याच सोप्यावर पडदा न घेता महाराणी चिमणाबाई याही बसल्या आणि त्यांनी जनतेशी विचारपूस केली या दृष्टीनेच जनसामान्यांमध्ये पडदा पद्धती संपली असल्याचे आपोआपच घोषित झाले आणि या पद्धतीवरच शेवटचा पडदा पडला.

राज्यातील स्त्री शिक्षणामध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या आपल्या उद्देशाला अनुसरून महाराणी चिमणाबाई यांनी विविध संस्थांना उदारपणे आर्थिक मदत केली.

त्यांनी आपल्या राज्यामार्फत स्त्रियांच्या शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्ती आणि मदत देऊ केली. याखेरीज स्त्रियांच्या उद्धारासाठी काम करणाऱ्या विविध संस्था त्यांनी उभारल्या व त्यामध्ये स्वतः काम करून आपल्या स्वतःच्या उदाहरणातून त्यांनी महिलांना राज्यकारभार तसेच इतर क्षेत्रांमधील सहभागाचे धडे देण्यास सुरुवात केली.

महाराणी चिमणाबाई पाठशाळा, महाराणी चिमणाबाई उद्योगालय, महाराणी चिमणाबाई हायस्कूल, महाराणी चिमणाबाई मेटरनिटी अंड चाइल्ड वेल्फेअर लीग, महाराणी चिमणाबाई लेडीज क्लब या संस्थांची निर्मिती करत त्यांनी स्त्रिया जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीला येतील यासाठी प्रयत्न केले.

पुरुषांना मिळणाऱ्या सर्व सोयीसुविधा आणि संधी बडोदा संस्थाना मधील स्त्रियांच्या आणि मुलींच्या वाट्याला याव्यात यासाठी त्या आयुष्यभर झटत राहिल्या.

त्यांची मुलगी इंदिरा देवी हीदेखील कूच बिहार राज्याचे महाराज यांना दिलेली होती व तिला चिमणाबाई दुसऱ्या या नावाने ओळखले जात असे. दुसऱ्या चिमणाबाई यांनी स्थापन केलेली चिमणाबाई वूमन इंडस्ट्रियल होम ही संस्था 1914 मध्ये सुरू झाली व या संस्थेचे उद्दिष्ट होते ते म्हणजे मध्यमवर्गातील विविध महिलांना प्रशिक्षण देऊन तांत्रिक तसेच औद्योगिक कामांमध्ये महिलांच्या सहभागाचे प्रमाण वाढवणे आणि त्याचबरोबर महिलांमध्ये विविध कौशल्य नवनवीन तंत्रे आणि कलाकुसर यांचा विकास घडवून आणणे.

याद्वारे महिला सक्षम होतील तसेच स्वतः कमाई करत असल्यामुळे त्या आत्मनिर्भर होऊन आपल्या स्वतःच्या तसेच कुटुंबासोबत समाजाच्या प्रगतीसही हातभार लावतील अशी त्यांची दृष्टी होती.

या संस्थेतून मिळणाऱ्या नफ्याच्या एक लाख रुपयांचा विनियोग त्यांनी विविध मुलींना शिक्षण देण्यासाठी व शिष्यवृत्त्या घेऊन बाहेरच्या संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी पाठवायला केला बडोदा संस्थानामधून मुंबईला शिक्षणासाठी जाणाऱ्या स्त्रियांचा ओघ या निमित्ताने सुरू झाला.

स्त्रियांच्या प्रेरणास्त्रोत असणाऱ्या महाराणी चिमनाबाई गायकवाड २३ ऑगस्ट १९६३ रोजी निवर्तल्या.

त्यांनी केलेल्या कार्याची दखल आजही तेथील संशोधक घेतात मात्र त्यांच्याच देशात ज्या प्रजेसाठी त्यांनी कार्य केले तेथे या कार्याचे सोयीस्कर विस्मरण करण्यात आले आणि आज कोणत्याच मंचावर त्यांच्या नावाचा उल्लेखही होत नाही ही खेदाची बाब आहे.

त्यांच्या नावाने उभारलेल्या हर हायनेस महाराणी चिमनाबाई टॉवरची इमारतही बडोदा महानगरपालिकेने काही दुकानांसाठी भाड्याने दिली होती आणि त्यामुळे ह्या वास्तूचेही काही प्रमाणात नुकसान झाले.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.