पुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू शकतो

महाराष्ट्रात जन्मला येऊन आपल्या राज्याविषयी किंवा भारताविषयी इत्यंभूत कितीक सांगता येईल? किती सविस्तर?

इथल्या एकूण सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक गोष्टींवर बोलताना भविष्याचा अंदाज घेत बोलण्यात भल्याभल्यांची बोबडी वळते. पण एक माणूस सातासमुद्रापलीकडे राहून भारतावर प्रेम करतो, इथं येऊन अभ्यास करतो आणि इथं घडलेल्या गोष्टी नेमक्या काय आहेत ते आपल्याला नीट समजावून देतो…

महाराष्ट्रात ब्राह्मण मुख्यमंत्री झाल्यावर महार आणि मराठ्यांमध्ये काय घडतं?

किंवा

सावरकरांच्या हिंदू राष्ट्र दलात आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काय मतभेद होते?

अशा गोष्टींवर हा फ्रान्समधला माणूस आपल्याला तासनतास खिळवून ठेवेल एवढं तोंडी सांगू शकतोय.

त्यांचं नाव आहे ख्रिस्तोफ जाफ्रेलॉट..!

१२ फेब्रुवारी १९६४ साली जन्मलेले जाफ्रेलॉट सर जन्मानं फ्रेंच आहेत. गेल्या २५ वर्षांपासून भारताशी त्यांचं जीवाभावाचं नातं आहे. पोईसी ह्या पॅरिसच्या एका उपनगरात राहणारा शाळकरी मुलगा भारताच्या प्रेमात पडतो आणि भारताचं इत्यंभूत आकलन करून भारतीयांना स्वतःकडे बघण्याची नवी दृष्टी देतो हे सगळंच आश्चर्यकारक आहे.

हायस्कुलमध्ये असताना वयाच्या १८ व्या वर्षी त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या शिक्षिका एलिझाबेथ आंद्रे ह्यांच्याकडून भारताविषयी पहिल्यांदा ऐकलं. त्यांची या शिक्षिकेशी चांगली गट्टी जुळली आणि ते भारताच्या प्रेमात पडत गेले.

वयाच्या विसाव्या वर्षीच ते स्वतः एकटेच भारतात आले आणि ह्या देशाविषयी, इथल्या लोकांविषयी त्यांना उत्सुकता निर्माण झाली. सुरुवातीला १९ व्या शतकातील हिंदू लोकांचा ख्रिश्चन मिश्नऱ्यांसोबतचा अनुभव ह्या विषयावर त्यांनी संशोधन करायला सुरुवात केली.

पुढे आपल्या शिक्षणात त्यांनी भारताविषयी आणि  इतिहासाबाबत विस्तृत अभ्यास केला. अजूनही ते भारताशी घट्ट वीण जोडून आहेत. त्यांच्या पत्नीचं नाव तारा आणि मुलाचं नाव मिलन आहे ह्यावरूनच त्याच्या भारतप्रेमाचा अंदाज यावा.

१९९० साली त्यांनी पॅरिसमध्येच प्रोफेसर ऑलिव्हये हरेनश्मीत्झ ह्यांनी जाफ्रेलॉट यांचा बाबासाहेबांच्या लेखनाशी परिचय करून दिला होता. बाबासाहेबांच्या जातीनिर्मुलनाच्या चळवळीचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारे ते पहिले अभ्यासक ठरले.

त्यांनी लिहिलेलं बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र हा त्यांच्या लेखनाचा अप्रतिम अविष्कार आहे. त्यांनी लिहिलेलं हे चरित्र किती मौल्यवान आहे ह्याचं मोल भारतीयांना २० वर्षांनी कळालं आणि तेव्हा कुठे त्याचं हिंदी आणि तामिळ भाषेत भाषांतर करण्यात आले.

१९९३ पासून भारतात सुरु झालेल्या हिंदुत्ववादी राजकारणावर लिहिणारे ते पहिल्या फळीतील लेखक होते.

भारतातील लोकांनी दुर्लक्षिलेले विषय त्यांनी अभ्यासासाठी घेतले आणि विशेषतः येथील बहुजन जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर लेखन केलं. ह्या पुस्तकासाठी ते उत्तर भारत आणि विशेषतः मध्य प्रदेशात पुष्कळ काळ शहरे आणि गावे फिरले होते. वाहने जायची नाहीत अशा अरुंद गल्ल्याबोळांमधून फिरत त्यांनी जाती आणि राजकारणाचा अभ्यास केला.

केवळ हस्तिदंती मनोऱ्यात राहून अभ्यास करणाऱ्यांपेक्षा जाफ्रेलॉट यांचा पिंड वेगळा आहे. तुम्ही परिचित असलेल्या गोष्टींचे ह्यापूर्वी कधीही न ऐकलेले विश्लेषण ते लीलया करतात कारण त्यामागे त्यांच्या जनतेशी साधलेल्या संवादाची आणि कित्येक वर्षांच्या मेहनतीची छाप असते.

२००३ साली त्यांनी लिहिलेलं भारतातील मूक क्रांती हे पुस्तक दलित आणि ओबीसी राजकारणाकडे नव्याने पाहण्याचा दृष्टिकोन देऊन जातं.

मंडल कमिशनमुळे भारताच्या तळागाळातील जातींनी स्वतःची मोट बांधून केलेल्या राजकारणाची तुलना त्यांनी क्रांतीशी केली आणि जनमानसात झालेले बदल त्यांनी आकड्यांनिशी रेखाटले.

भारतातील प्रस्थापित विद्वानांना आणि शब्दच्छल करणाऱ्या लेखकांना हा मोठा धक्का होता. भारतातील मुस्लिमांचे भारताच्या नोकरशाही, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांतून घटत जाणारे प्रमाण त्यांनी पहिल्यांदा निदर्शनास आणून दिलं. जाफ्रेलॉट यांची कोणतीही गोष्ट संपादकीय लेखांसारखी अधांतरी नसते. सूक्ष्म माहितीच्या आधारे, आपल्या अनुभवातून आलेल्या दृष्टिकोनातून ते अनभिज्ञ गोष्टी सहजपणे बाहेर काढतात.

त्यांच्या लेखनाची भाषाही ओघवती आणि सोपी आहे, म्हणून ते नव्या पिढीला अधिक जवळचे वाटतात.

जाफ्रेलॉट यांनी भारतातील बहुजनवादाच्या विकासासंदर्भात वापरलेला ‘सायलेंट रिव्होल्युशन’ हा शब्द आता अकादमीक क्षेत्रात वाक्प्रचार बनला आहे. बहुजन समाजाच्या इतिहासलेखनात तो परवलीचा शब्द ठरला आहे.

त्याचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. ते आपल्या फिल्डवरील अनुभवांविषयी जास्त बोलत नाहीत मात्र त्यांनी आपल्या अभ्यासाची सुरुवात अक्षरशः शून्यातूनही केलेली आहे.

भोपाळ, आग्रा, लखनऊ, जयपूर अशा शहरांमध्ये क्वचित काही जागा असतील जिथं जाफ्रेलॉट गेलेले नाहीत. भारताच्या राजकीय आलेखाला नव्यानं साकारण्यासाठी त्यांनी प्रत्येक लहानमोठ्या पक्षांची कार्यालयं पालथी घालून, शहरखेड्यांतले धूळ खात पडलेले दस्तऐवज चाळून, जुनी माणसं गाठून आपल्या तोडक्यामोडक्या हिंदीत माहिती मिळवत हजारो नेत्यांची माहिती जमा केली आहे.

एरव्ही जो इतिहास कुणाच्याही लक्षात न येता विसरला गेला असता त्या इतिहासाची नोंद करत बहुजनांना भविष्याकडे शास्त्रीय दृष्टिकोनाने पाहायची सवय जाफ्रेलॉट यांनीच लावून दिली आहे. त्यामुळेच हल्ली जातिव्यवस्था किंवा मुस्लिम समाजावर लिहिलेल्या कोणत्याही पुस्तकात, लेखात त्यांच्या नावाचा उल्लेख किंवा संदर्भ हमखास आढळतो. कित्येक संस्थांमध्ये प्रवेशासाठी त्यांचं लेखन वाचणे ही अघोषित पूर्वपात्रता बनली आहे.

फक्त भारतावर त्यांनी आत्तापर्यंत २० पुस्तके लिहिली आहेत.

व्यवसायापर्यंत आणि मोदींपासून ते सावरकरांपर्यंत त्यांचे लेखन आहे. पाकिस्तानवर त्यांनी केलेलं लेखन हे क्रांतिकारी ठरलं असून अकादमीक वर्तुळांत त्यांचं नाव त्यांच्या पाकिस्तानवरील ७ पुस्तकांहून जास्त चर्चेत असतं.

सध्या ते अनेक संस्थांमध्ये शिक्षक आणि संशोधक म्हणून कार्यरत आहेत. इंदिरा गांधींच्या काळातील आणिबाणीवर ते एक ग्रंथ लिहीत आहेत. ‘मोदींचा भारत’ या पुस्तकाद्वारे भारतात घडत असलेल्या बदलांची पार्श्वभूमी आणि त्याचा नेमका उलगडा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

संघावर त्यांनी केलेले संशोधन आणि लेखन अभ्यासकांसाठी मैलाचा दगड ठरले आहे. त्यांनी केलेला संघ परिवाराचा अभ्यास एवढा दांडगा आहे की त्यांच्या लेखनावर अजूनही कुणी आक्षेप किंवा प्रश्न उमटवू शकलेलं नाही.

त्यांनी लिहिलेलं देवीदेवता आणि भगव्या झेंड्याच्या कव्हरचं ‘हिंदू राष्ट्रवाद’ पुस्तक दाखवून ‘मी एबीव्हीपीमध्ये आहे’ असं सांगत जेएनयुमधला राकेश कुमार आर्य हा विद्यार्थी गुंडांच्या तावडीतून सुटला होता. तो आता ह्याच पुस्तकावर आपला प्रबंध लिहीतोय ह्यावरूनच विद्यार्थ्यांचं जाफ्रेलॉट यांच्यावरचं प्रेम दिसून येतं.

hn

नव्वदच्या दशकापासून ते आजतागायत ते भारत आणि पाकिस्तानचा अभ्यास करत आहेत.

भारत ज्या वाटेवरून चालला आहे त्याकडे नव्या नजरेने आणि अनुभवी दृष्टिकोनातून पाहण्यासाठी आपल्याला जाफ्रेलॉट यांच्यासारख्या मार्गदर्शक सोबत्याची नितांत आवश्यकता पडणार आहे.

  • भिडू वैभव वाळुंज

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.