आज बुडाखाली सुपरबाईक आली असली, तरी गाड्या पळवण्यातलं खरं सुख ‘रोडरॅश’मध्ये होतं

बघता बघता सुट्ट्यांचा मोसम येईल, शाळा कॉलेजमधली पोरं कुठं मैदानात खेळताना, तर कुठं चौकात कट्टा करुन बसलेली दिसतील. आपल्या जमान्यात पोरं एकतर सूर्य मावळत नाही तोवर मैदानात असायची आणि कॉम्प्युटर आल्यावर दोन तास तरी त्याच्यासमोर, भले सायबर कॅफेत उधारी करावी लागली तरी.

आताच्या जिंदगीत तेरा-तेरा तास आपलं बुढ कॉम्प्युटरसमोरुन हलत नसलं, तरी एका जमान्यात मात्र कॉम्प्युटरसमोर बसणं ही सुद्धा लक्झरी होती. आता एक्सेलच्या रकान्यात आणि ‘Am I Audible?’ च्या रगड्यात आपला बल्ल्या झाला असला, तरी एक काळ होता जेव्हा कॉम्प्युटरसमोर बसणं म्हणजे गेमा खेळण्याचं आणि कधीकधी बघण्याचं सुख होतं.

 बघण्याच्या गेमा म्हणजे कोणतरी खेळायचं आणि आपण बघायचो. तर आज अशाच एका गेमबद्दल बोलू, जी खेळण्यातही जन्नत होती आणि बघण्यातही.

याच गेममुळं आपल्याला टू व्हीलरचं आणि त्यातही सुपरबाईक्सचं येड लागलं, गेमचं नाव अर्थात रोडरॅश! 

विषय एन्ड.

आपण गेमच्या माहोल मध्येनंतर जाऊ आधी जरा गेमची कुंडली बघुयात…

तर ही गेम आपल्यापुढं आणली ‘EA Sports’ नं. आपली चिठ्ठी नटीपर्यंत आणि नटीची आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या नटीच्या मैत्रिणीनंतर आपल्यावर सगळ्यात जास्त उपकार या EA Sports वाल्यांचे आहेत.

त्यांच्याच कृपेनं आपण ‘Cricket 07, FIFA 07, NFS’ अशा कित्येक गेम्स खेळलो. रोडरॅशचं भूतही त्यांनीच आपल्या डोक्यावर आणून बसवलं. ज्याची आपल्याला बाधा झाली… पण हवीहवीशी वाटणारी.

रोडरॅशचं प्रॉडक्शन केलेलं बझ पपेट, सरीयल सॉफ्टवेअर यांनी. प्रोगॅमरच्या लिस्टमध्ये ”Satish ‘Ender’ Bhatti” हे नाव हमखास लक्ष वेधून घ्यायचं. गडी नावावरुन तर भारतीय वाटतो, पण त्याच्याबद्दल फार माहिती घावली नाही. सरीयल सोडल्यावर गड्यानं केम्ब्रिजला स्टार्टअप सुरू केला एवढं समजलं. सतीशबरोबर अजूनही बरीच नावं होती.

आपण जी रोडरॅश तासनतास खेळलो, ते व्हर्जन १९९५ मध्ये आलेलं. त्याआधी पहिल्या रेसचा डाव रंगला तो १९९१ मध्ये. कॅलिफोर्नियाची थीम घेऊन ही गेम मार्केटमध्ये आली, तेव्हा त्याचे ग्राफिक्स एकदम किरकोळ होते. रस्ता पण दोन लेन असलेला होता.

याला नाव देण्यात आलेलं रोडरॅश सेगा. 

ग्राफिक्स किरकोळ असले, तरी याची स्टोरीलाईन मात्र एकदम कडक होती. हीच स्टोरीलाईन पुढंही कायम राहिली. तुम्ही गाडी पळवायची, तुमच्या पुढं १५ कार्यकर्ते, कितीही बुंगाट पळालात तरी रस्त्यात कुठंतरी मामा घावणार आणि पाठलाग करणार. समजा एखादा कार्यकर्ता गाडी घासायला लागला, तर तुम्ही त्याला फिक्स कानपट्टा देऊ शकताय किंवा खाऊही शकताय.

९२ आणि ९५ मध्ये याचे आणखी दोन व्हर्जन्स आले, पण खरा डाव रंगला तो ९५ च्याच रोडरॅश पीसी या व्हर्जनमध्ये.

गेम सुरू झाली की नावांची यादी दिसायची, त्यानंतर गेम मोड उघडायचे. या स्क्रीनवर एक सुंदर ललना दिसायची, त्यामुळं घरचे यायच्या आत आपण मोड सिलेक्ट करुन मोकळे व्हायचो. ‘Thrash Mode, Big Game Mode, Mano-A-Mano’ असे तीन मोड होते. यातल्या Thrash Mode मध्ये पटकन एखादी रेस मारुन व्हायची. 

दुसऱ्या बिग गेमला प्रॉपर चॅम्पियनशिप असायची. यात प्रत्येक मॅपची रेस पूर्ण करायची. पाचही मॅप तुम्ही जिंकलात तरच तुम्ही किंग.

पहिला मॅप होता सिटीचा, इथं फुल दुपारच्या वेळेत पुण्यात गाडी पळवायचा फील यायचा. गर्दीतून गाड्यांना कट मारत आपण पुढं पुढं जात राहायचो आणि तेवढ्यात एखादे आजोबा किंवा आजी पुढ्यात येऊन उभे राहायचे. 

त्यांना चुकवायच्या नादात आपली गाडी धडकायची आणि गाडी अलका टॉकीजला आणि आपण नवी पेठेत क्लासपाशी पडलोय (जरा जास्त झालं, सांभाळून घ्या) असला फील यायचा. आपण गाडीपर्यंत जाईस्तोवर बाकीच्या तीन गाड्या आपल्याला ओलांडून पुढं जायच्या.

दुसरा मॅप होता, सिएरा नेवाडा. डोंगरदऱ्यातून जायचं, दोन्ही बाजूला डोंगर मधून रस्ता, बॅकग्राउंडला कोकणची माणसं साधीभोळी लावलं, तरी विषय डन. तिसरा मॅप ‘द पेनिनसुला’, याच्यात आधी मोकळीढाकळी सिटी असायची आणि त्यानंतर नुसतं वावर. म्हणजे पुण्यातून निघून साताऱ्याला जात असचीला अगदी तसा माहोल. 

चौथा मॅप ‘नापा व्हॅली’चा, हा पण निवांत. मधूनच एखादा सिटीचा पट्टा यायचा, पण बाकी गाडी बुंगवायला एकदम परफेक्ट. पाचवा होता, ‘पॅसिफिक हायवे,’ बाजूला लांबलचक समुद्र, मधूनच बोगदा आणि लय गाड्या. पॅसिफिक हायवे आणि सिटी हे मॅप एकदाही न पडता पार करू शकत असाल, तर तुम्ही पोरांना हक्कानं सांगू शकताय, रोडरॅशवर माझा हात बसलाय.

जशी लेव्हल हार्ड व्हायची, तसं अंतर वाढायचं. पोलिसांनी पकडलंय म्हणून किंवा गेम हरलात म्हणून तोंड आंबट होणं लई जणांच्या नशिबात आलं, पण ज्यांनी रोडरॅशमध्ये पॅराशूट बघितलं त्यांनी फिक्स सणाच्या दिवशी मटण खाल्लेलं असणार, 

त्याच पापाचं हे फळ!

१९९५ च्या पीसी व्हर्जन नंतर १९९८ मध्ये 3D व्हर्जन आलं. खरं याचं ग्राफिक्स भारी होतं, पण फील काय नव्हता. प्लेअर्सचे कपडे बदलले, पण आवडीचं रूप हरवून गेलं. ९९ मध्ये रोडरॅश निटेंडो आणि २००० मध्ये जेलब्रेक अशी दोन व्हर्जन्स आली, पण जर तुम्ही सच्चे शौकीन असाल, तर ही फिक्स बाद वाटणार. कारण पीसी व्हर्जनच्या साधेपणाचा फील यांच्या अंतरंगी ग्राफिक्सला एक टक्काही नव्हता.

२०१७ मध्ये रोड रिडम्प्शन नावानं NFS च्या जवळपास जाईल असे ग्राफिक्स असलेली नवीकोरी रोडरॅश लॉंच झाली. यात नवे मॅप्स होते, फाईट मारायचे नवे प्रकार होते, गेम कलरफुल होती… 

पण नटीला साडीत बघितल्यावर जे वाटतं, ते वनपीसमध्ये बघून वाटत नाही… अशीच काहीशी गत.

बाकी रोडरॅशमध्ये बघून सायकल पळवताना शेजारच्या आपल्याच मित्राला लाथ मारण्यात फील होता, स्पेसबार आणि एंटरच्या बटणात खरं स्कील होतं आणि लईवेळ खुर्चीत बसून बुड ॲडजस्ट करताना आता त्रास होत असेल, पण रोडरॅशच्या वेळी व्हायचा नाही.

त्या स्पीडमध्ये थ्रिल होतं, आनंद होता आणि बालपणही. आता आयुष्यात थ्रिल आहे, आनंद कधीमध्ये असतो… पण बालपण तेवढं निघून गेलं…

…रोडरॅश मधल्या गाड्यांच्या स्पीडनंच!

हे ही वाच भिडू:

1 Comment
  1. sumit patil says

    ९० च्या मुलांना ह्या गेम ची मज्जा नक्की माहितीये. आता तो फील 3D गेम मध्ये पण नाहीये.

Leave A Reply

Your email address will not be published.