मुशर्रफ असोत की बिल क्लिंटन राजकारणासाठी वाजपेयी या “कूक” ला वापरून घ्यायचे…

साल होतं २००१ चं.

त्या वर्षी पाकीस्तानचे राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ भारताच्या दौऱ्यावर होते. भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच चांगल स्वागत केलेलं. दोन्ही देशातील संबंध चांगले होण्यासाठी ही डिप्लोमसी आवश्यक होती. त्यामुळे सरकारी यंत्रणेवर एक वेगळाच ताण होता. 

मुशर्रफ यांच्या स्वागतासाठी दिल्लीतल्या ताज येथे जेवणाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या जेवणावळीसाठी देशभरातून वेगवेगळे सेलिब्रिटी देखील हजर राहिले होते. 

अटल बिहारी वाजपेयी आणि मुर्शरफ एकाच टेबलवर जेवणासाठी बसले.

वाजपेयी यांनी आपल्या समोर असणारं शाकाहारी जेवण खाण्यास सुरवात केली. दूसरीकडे मुशर्रफ यांच्यासाठी सिंकदरी रान, बिर्याणी आणि तंदूरीची खास बडदास्त करण्यात आली होती. पण झालं अस की मुर्शरफ यांनी एकाही नॉनव्हेज पदार्थाला हात लावला नाही. एकामागून एक ते व्हेज पदार्थच खावू लागले. 

आत्ता तुम्ही म्हणाल पाकीस्तानचा राष्ट्राध्यक्ष आहे, खायचंय ते खावू दे की तुम्ही कशाला असली स्टोरी सांगायलाय. तर भावानों डिनर डिप्लोमसी पण एक प्रकार असतोय. चांगल जेवण खायला घालून पुढच्याला खूष करायचं असतय. इथं किती झालं तरी भारतासोबत दोन चार युद्ध करणाऱ्या पाकीस्तानचे ते राष्ट्राध्यक्ष होते. साहजिक वाजपेयींच्या ते लक्षात आलं. 

वाजपेयींनी त्यांना मांसाहार न करण्याचं कारण विचारलं तेव्हा ते म्हणाले, 

हे हलाल आहे का? 

झालं, वाजपेयींनी आपल्या खास कुक ला बोलावलं. त्यांनी हलाल असल्याचं सांगितल्यानंतर मुशर्रफ एकामागून एका गोष्टीवर तुटून पडले. खाता खाता ते वाजपेयींना म्हणाले इतकं भारी नॉनव्हेज मी पाकीस्तानमध्ये खाल्ल नाही.. 

चव आहे तुमच्या कुक च्या हाताला… 

ही असते डिनर डिप्लोमसी. तर यासाठी वाजपेयींनी खास मुंबईवरून दिल्लीत कुक बोलवलेला. त्यांच नाव हेमंत ओबेरॉय. हेमंत ओबेरॉय तेव्हा मुंबईच्या ताज होटेलचे प्रमुख शेफ होते. पण या भेटीत त्यांना खास वाजपेयींकडून बोलावणं आलं होतं. 

अटल बिहारी वाजपेयींचे खास शेफ म्हणूनच ओळख

हेमंत ओबेरॉय तसे ताज सोबत बांधले गेलेले होते. पंतप्रधान पदावर असणाऱ्या वाजपेयींचे शेफ वेगळे होते. पण परदेश दौरा असेल तर मात्र सर्व शासकीय शेफना सुट्टी दिली जायची आणि वाजपेयी यांच्यसोबत हेमंत ओबेरॉय असायचे. कारण त्यांच्या हाताला चव पण होती आणि विश्वास पण. 

झालेलं अस की एकदा आपल्या दौऱ्यासाठी वाजपेयी मुंबईत आले होते. पंतप्रधान असल्याने साहजिक त्यांच्यासाठी मुंबईच्या ताज हॉटेलवर सोय करण्यात आली होती. या भेटीतच त्यांना ओबेरॉय यांच्या हातच खायला मिळालं. बस्स त्यावेळी पासून ओबेरॉय आणि वाजपेयी हे समीकरण कायमच फिक्स झालं. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंन्टन भारताच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा देखील त्यांच्या जेवणाची बडदास्त ठेवण्यासाठी वाजपेयी यांनी खास ओबेरॉय यांना बोलावून घेतलं. ओबेरॉय आपल्या एका मुलाखतीत सांगतात, 

वाजपेयी जिंदादिल व्यक्ती होते. खाण्यावर ते प्रेम करायचे. त्यांची आवडती डिश होती फिश फ्राई. सोबत रसगुल्ला, पिन्नी पतीसा देखील ते खायचे. 

ओबेरॉय पुढे ताज मधून रिटायर झाले. त्यांनी सिंगापूर मध्ये स्वत:च रेस्टॉरंट सुरू केलं. प्रत्येक घरातील बाई म्हणते सुखी संसाराची चावी नवऱ्याच्या पोटातून जाते. आत्ता ती जाते का नाही हे आम्हाला माहिती नाही, पण अस्सल राजकारण करायचं असेल तर त्याची चावी पोटातून मात्र जात असावी म्हणून वाजपेयी ओबेरॉय यांच्यासारख्या अस्सल माणसाकडून ती चावी फिरवायचे. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.