आचरेकर सरांचा सचिनपेक्षाही एक लाडका खेळाडू होता, पण एका चुकीमुळे तो संपला.

सचिन घडवणारे गुरू रमाकांत आचरेकर यांच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झाले. गुरू रमाकांत आचरेकर आणि शिष्य सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी हे तर आपणाला माहितच आहे पण आचरेकर गुरूजी ज्याला व्हिव रिचर्डस म्हणायचे, ज्याच्यावर कणभर अधिक विश्वास होता असा खेळाडू वेगळा होता. आचरेकर गुरूजी सचिन आणि विनोद कांबळीला देखील त्याची बॅटिंग बघायला सांगायचे.

इतकच काय तर सचिनने आपलं फर्स्ट क्लास क्रिकेटमधलं पहिलं शतक देखील त्याने दिलेल्या बॅटनेच ठोकलं होतं.

तो आचरेकर सरांचा सर्वात आवडता विद्यार्थी म्हणून ओळखला जायचा.

आचरेकर गुरुजींना पूर्ण विश्वास होता की हा पोरगा एक दिवस भारताकडून आंतरराष्ट्रीय  क्रिकेट खेळणार म्हणून. तसं त्यांनी त्याच्या आईला सांगितलं देखील होतं. पण त्यानंतर मात्र त्याच्या आयुष्यात एखाद्या चित्रपटात घडावा असा एक किस्सा घडला आणि तो कायमचा क्रिकेट पासून दुरावला गेला, 

आज तो मुंबईतील नालासोपारा भागात अतिशय गरिबीत आपलं आयुष्य व्यतीत करतोय.

अनिल गुरव असं त्याचं  नाव.

सचिनच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याचा भाऊ अजित तेंडूलकर याचं फार मोलाचं योगदान राहिलेलं आहे. तितकंच मोलाचं योगदान अनिल गुरव यांच्या ‘न होऊ शकलेल्या’ क्रिकेट कारकिर्दीत त्यांचा भाऊ अजित गुरव याचं देखील राहिलेलं आहे.

अजित गुरव हा एक शार्प शुटर होता. त्यामुळे त्याच्यामागे कायमच पोलिसांचा ससेमिरा लागलेला असायचा.

Screen Shot 2019 01 02 at 8.59.00 PM

अजितच्या गुन्हेगारी जगतातील कारवाया वाढू लागल्याने एका दिवशी पोलिसांनी अनिल आणि त्यांची आई या दोघांना ताब्यात घेतलं आणि त्यांना खूप  मारहाण करण्यात आली.

या घटनेमुळे अनिल प्रचंड धास्तावले आणि मनात एक प्रकारची दहशत निर्माण झाली. पुन्हा पोलीस स्टेशनला हजरी लावण्याचा फेरा त्यांच्या मागे लागला. या सगळ्यांमध्ये त्यांनी क्रिकेटच्या मैदानावर जाणं, क्रिकेटचा सराव करणं बंद केलं.

१९९३ साली परत एकदा त्यांनी क्रिकेटची बॅट हातात घेतली पण त्यावेळी त्यांनी पैशासाठी ‘नाईट क्रिकेट’ खेळायला सुरुवात केली.

आचरेकर गुरुजींनी अनेकदा त्यांना ‘नाईट क्रिकेट’ सोडून देण्याविषयी सांगितलं पण अनिल यांनी आचरेकर गुरुजींच्या सुचनेकडे दुर्लक्ष केलं. या गोष्टीचा आपल्याला आज देखील पश्चात्ताप होतो, असं अनिल यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.

अनिल गुरव नशीबाने प्रवाहाच्या बाहेर फेकला गेला पण सचिनच नाही तर अनिलच्या मागे देखील आचरेकर गुरूजी नेहमीच भक्कमपणे उभा राहिले होते.  

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.