रिचर्ड्स, बॉथमच्या जमान्यात डिकी बर्ड अंपायर असूनही सुपरस्टार होता…

पंचांशी वाद, संघ बाद, हे टिपिकल वाक्य कुठल्याही टेनिस बॉल टुर्नामेंटच्या नियमांमध्ये ठळक अक्षरात लिहिलेलं दिसत असतं. इंटरॅशनल क्रिकेटमध्ये असं लिहायची गरज नसली, तरी तिथंही अंपायर म्हणतील तीच पूर्वदिशा असते. नाय म्हणायला अनेक प्लेअर्स अंपायरसोबत राडे करतात. त्यांचा संघ बाद होत नसला, तरी दंड भरावा लागतो आणि नावाला बट्टा लागतो तो कायमचाच.

काय काय अंपायरही बाद असतात, उदारहरणार्थ स्टीव्ह बकनर. दुसऱ्या बाजूला काही अंपायर प्रचंड लोकप्रिय असतात, उदाहरणार्थ बिली बाऊडन.

बकनर चुकीच्या आणि बाऊडन अगदी योग्य कारणांमुळं आपल्या लक्षात आहे. सध्याच्या अंपायर्सनाही सुपरस्टार बनवण्याच्या काळात, सगळ्यात पहिल्या सुपरस्टार अंपायरला विसरुन चालत नाही.

हॅरोल्ड डेनिस बर्ड उर्फ डिकी बर्ड

एका खाणकामगाराच्या पोटी जन्मलेल्या डिकी बर्डनं १५ व्या वर्षी शाळा सोडून खाणीत काम करायला सुरुवात केली होती. तिथं कष्ट असले, तरी पोटपाणी भागायचं. पण कसं असतंय, प्रेम माणसाला स्वस्थ बसू देत नाही. या प्रेमापोटी त्यानं खाणीतलं काम सोडण्याचा निर्णय घेतला.

त्याचं पहिलं प्रेम होतं खेळ आणि त्यातही फुटबॉल आणि क्रिकेट. गुडघ्याच्या दुखापतीमुळं त्याला फुटबॉलमध्ये करिअर करणं अशक्य होतं, त्यानं वाट धरली क्रिकेटची. क्लब क्रिकेटपासून सुरुवात करत त्यानं कौंटी क्रिकेटपर्यंत मजल मारली. त्याच्या बॅटिंगचं मोठ्या प्रमाणावर कौतुक व्हायचं, पण त्यातून फारशा धावा निघायच्याच असं नाही. सातत्याचा अभाव आणि गुडघ्याचं बळावलेलं दुखणं यामुळं डिकी बर्डनं वयाच्या ३१ व्या वर्षीच क्रिकेट खेळणं थांबवण्याचा निर्णय घेतला.

क्रिकेट खेळणं थांबवलं असलं, तरी प्रेम कुठं स्वस्थ बसू देतं.

त्यानं काही काळ क्रिकेट कोचिंग करुन पाहिलं, पण त्यात फारशी मजा नव्हती. त्यानं त्यानंतर निर्णय घेतला अम्पायरिंग करण्याचा. १९७० मध्ये तो पहिल्यांदा एका कौंटी मॅचमध्ये अंपायर म्हणून उभा राहिला आणि त्यानंतर ३ वर्षांनी त्याची इंटरनॅशनल अंपायर म्हणून निवड झाली.

वेळ पाळण्याच्या बाबतीत डिकी बर्ड हा वेगळाच प्राणी होता. एकदा उशिरा पोहोचायच्या भीतीमुळं त्यानं सकाळी ६ वाजताच ओव्हलचं ग्राऊंड गाठलं. एका कार्यक्रमात त्याला इंग्लंडच्या राणीला भेटायचं होतं. तिथंही आपल्याला उशीर झाला तर, या भीतीमुळं हा गडी ५ तास आधीच जाऊन बसला होता.

डिकी बर्ड अंपायर झाल्यावर ड्रामा व्हायला सुरुवात झाली ती दुसऱ्याच मॅचपासून. त्याच्या सोबतच्या अंपायरनं विंडीजच्या प्लेअर्सचा विरोध करत अंपायरिंग करण्यास नकार दिला. त्यामुळं डिकी बर्डनं दोन्ही एन्डला मुख्य अंपायर म्हणून काम पाहिलं.

डिकी बर्ड माणूस म्हणून तसा निवांत होता, त्याचे सगळ्या खेळाडूंशी मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यात तो काळ असा होता, जेव्हा काही ठराविक प्लेअर्सचा जागतिक क्रिकेटवर वरचष्मा होता. समजा वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड मॅच असली, तर इयान बॉथमला बघायला जितकी गर्दी होईल तितकीच विव्ह रिचर्ड्सला व्हायची. काही मोजकेच सुपरस्टार क्रिकेट गाजवत होते. अशावेळी व्हिव्ह रिचर्ड्सला साधं आऊट देणं म्हणजे प्रेक्षकांचा रोष ओढवून घेणं असायचं. मात्र डिकी बर्ड ते ठामपणे करायचा.

फक्त प्रेक्षकच नाही, तर प्लेअर्सलाही माहीत असायचं, की डिकी बर्डनं आऊट दिलंय… म्हणजे आपण आऊटच आहोत. इतका तो अचूक होता.

डिकी बर्डचा एक भारी किस्सा घडला होता, तो भारताचा महान क्रिकेटपटू सुनील गावसकरसोबत.

एका मॅचमध्ये गावसकर आपल्या नेहमीच्या एकाग्रतेनं बॅटिंग करत होता. नेमके त्याचे वाढलेले केस त्याच्या डोळ्यात जात होते. मैदान सोडून ड्रेसिंग रुममध्ये गेला असता, तर एकाग्रता भंगली असती, त्यामुळं तो थेट अंपायर डिकी बर्डकडे गेला. बर्डनं आपल्या खिशातून कात्री काढली आणि मैदानावरच गावसकरचे केस कापून त्याचा प्रश्न सोडवला.

आपल्या अम्पायरिंगच्या जवळपास २६-२७ वर्षांच्या करिअरमध्ये डिकी बर्डनं फार कमी वेळा बॅट्समनला एलबीडब्ल्यू आऊट दिलं, असं बोललं जातं. त्याची नजर इतकी अचूक होती की, जर बॅट्समन शंभर टक्के एलबीडब्ल्यू असेल तरच त्याचं बोट हवेत जायचं.

पांढरा शर्ट काळा टाय, त्यावर पांढरा कोट, डोक्यावर देवानंद घालायचा तसली टोपी, गोऱ्या वर्णाला शोभून दिसणारे पांढरेशुभ्र दात आणि गोल फ्रेमचा चष्मा हे डिकी बर्डचं रुप अम्पायरिंगला उभं राहीलं की, अगदी आनंदी दिसायचं. त्याची आऊट देण्याची पद्धतही भारी होती, घड्याळ घातलेला हात कायम पाठीमागे असायचा आणि हाताची मूठ आपल्याकडे फिरवून तो आऊटचा निर्णय द्यायचा.

एक अंपायर म्हणून माणसानं कसं असावं याचं उदाहरण त्यानं आपल्या कामातून घालून दिलं. खरंतर अंपायरींग हा थॅंकलेस जॉब आहे, मात्र डिकी बर्डनं तो मन लावून केला.

त्याच्यासाठी आयुष्यात अनेक चढउताराचे क्षण आले असतील, पण त्याचा परिणाम त्याच्या कामावर झाला नाही. बर्डनं लग्न केलं नाही, त्याचं घरटं कायम क्रिकेटच राहिलं.

प्रत्येकाच्या आयुष्यात एक सर्वोच्च क्षण असतो, तसाच डिकी बर्डच्या आयुष्यातही आला. त्याची अंपायर म्हणून शेवटची इंटरनॅशनल मॅच, भारत विरुद्ध इंग्लंड, लॉर्ड्स १९९६.

जेव्हा तो मैदानात येत होता, तेव्हा दोन्ही संघांच्या खेळाडूंनी दुतर्फा थांबून त्याला गार्ड ऑफ ऑनर दिला. सगळं लॉर्ड्स त्याच्या स्वागतासाठी टाळ्यांच्या गजरात उभं राहिलं होतं आणि डिकी बर्ड लहान बाळासारखा रडत होता.रडत रडतच तो पिचजवळ गेला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये एलबीडब्ल्यूचा अचूक निर्णयही दिला.

आपल्या अखेरच्या मॅच आधीच्या इंटरव्ह्यूमध्ये तो म्हणाला,

Wherever I am, I just think about cricket all the time. Nothing else but cricket. Now that I am getting closer to retirement, I think to myself what I am going to do in years to come. If I’m sat in a chair when I do retire, I won’t last 12 months. I will be dead.

सुदैवानं अम्पायरिंग थांबवल्यावर कधी टीव्ही अँकर म्हणून, तर कधी चॅट शोचा होस्ट म्हणून डिकी बर्डनं क्रिकेटसोबतचं नातं काय तोडलेलं नाही. कदाचित तेच त्याला जिवंत ठेवत असावं. शेवटच्या मॅचमध्ये ६३ वर्षांच्या डिकी बर्डला भर मैदानात रडताना पाहून एवढंच सुचलं होतं की,

प्रेम स्वस्थ बसू देत नाही, हेच खरं!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.