खराब शूज म्हणून बदनामी झालेले क्रॉक्स आज घडीला ३०० मिलियन जोड्या विकून बसलंय…

एखाद्या गोष्टीची वाईट पब्लिसिटी होते पण नेमकं त्याच पब्लिसिटीमुळे तो जगातला एक मोठा ब्रॅण्ड बनू शकतो याचं उदाहरण म्हणजे क्रॉक्स शूज. क्रॉक्सचे शूज आपल्याला जळी स्थळी काष्ठी पाषाणी कुठेही पाहायला मिळतात. ट्रिपच्या शुजपासून ते सकाळी परसाला जाण्याच्या शूज पर्यंत क्रॉक्स ब्रॅण्ड पाहायला मिळतात. म्हणजे अगदी खेडोपाड्यात सुद्धा क्रॉक्सची क्रेझ पाहायला मिळते.

पावसाळ्यात भिजण्यासाठी स्पेशल हे क्रॉक्स शूज लोकं घालून फिरताना दिसतात. एखादा सर्व्हे जर आपला आपण केला तर तुम्हालाच लक्षात येईल की दर दहा माणसांमागे तीन जणांकडे क्रॉक्सचे शूज आहेत. पण एवढा मोठा हा क्रॉक्सचा ब्रॅण्ड झाला खरा पण जेव्हा हा शूज लॉन्च झाला तेव्हा त्याची निगेटिव्ह पब्लिसिटी झाली होती. 

डेली मेलने या शुजला ( बुटाला ) आजवरचे सगळयात घाणेरडे शूज म्हणलेल तर टाईम मॅगझिनने या शूजची जगातला सगळ्यात भंगार शोध म्हणून लाज काढली होती.

पण हेच घाणेरडे म्हणून हिणवले गेलेले शूज आज बऱ्याच लोकांच्या पायात दिसून येतात. भंगारात जमा झालेले हे शूज फॅशनच्या नावाखाली सेलिब्रिटी लोकांनी उचलून धरले आणि त्याचा ब्रॅण्ड झाला.

प्रत्येक गोष्ट ज्यावेळी तयार होत असते त्यामागे त्याचा एक हेतू असतो त्याचप्रमाणे ज्यावेळी क्रॉक्स बनले गेले तर ते कोणासाठी होते तर डॉक्टर, नर्स, शेफ, बोट हॅण्डल करणारे आणि असे व्यावसायिक की ज्यांना तासन् तास उभं राहावं लागायचं. जर तुमचं घरगुती काम असेल किंवा बैठं काम असेल तर क्रॉक्सची एक जोडी एक दोन वर्ष किंवा मरेपर्यंत आरामात टिकू शकते. 

2002 साली क्रॉक्स शूज लॉन्च करण्यात आले 2007 पर्यंत 847 मिलियनची उलाढाल या ब्रॅण्डने केली होती. 2008 साली मात्र मंदीची लाट आली आणि क्रॉक्स ब्रॅण्डला क्रॅक करुन गेली.

2009 मध्ये क्रॉक्स कंपनीने 150 दुकानं बंद करुन टाकले आणि जवळपास 2 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं होतं. शेअर बाजारात $70 वरून घसरण होऊन $3 झाली होती.

मार्केटमधील प्रेस्टिज कमी झाल्याने क्रॉक्स परत आपल्या प्रॉडक्ट वर मेहनत घेऊ लागले. पूर्ण तयारीनिशी आपले शूज पुन्हा मार्केटमध्ये आणायचे आणि आपले दुकानं पुन्हा सुरू करायचे असं त्यांनी ठरवलं.

अशा प्रकारे हळुहळू दिवस जात होते. 2014 साल उजाडलं पण क्रॉक्सचं नशीब काय चमकलं नाही. ब्लॅकरॉक कंपनीने $400 मिलियनची गुंतवणूक केली खरी पण त्यांचा मालक गायब झाला. 2017 मध्ये कोलॅब हा शब्द क्रॉक्सच्या ऑफिसमध्ये आला.

पोस्ट मॅलॉन आणि जस्टिन बीबर या मोठया सेलिब्रिटी लोकांनी क्रॉक्सचं प्रमोशन केलं. स्कॉटीश फॅशन डिझायनर क्रिस्टोफर केन याने एका फॅशन शो मध्ये क्रॉक्स सेलिब्रिटी लोकांना वॉकिंगसाठी दिली. 2017 पर्यंत या ब्रॅण्डने मजबूत धुमाकूळ घातला. सेलिब्रिटी लोकांनी फॅशन म्हणून वापरायला सुरवात केली आणि ब्रॅण्ड म्हणूनच क्रॉक्स पुन्हा मार्केटमध्ये आले. 

एके काळी घाणेरडे शूज म्हणून बदनामी झालेले क्रॉक्स आज घडीला 300 मिलियन जोड्या विकून बसलय. अजुनही क्रॉक्सची क्रेझ काय कमी झालेली नाही.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.