दाभोलकरांचा पुतण्या जागतिक संस्थेचा संचालक आहे…महाराष्ट्राला अशा घराणेशाहीची गरज आहे..

देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात घराणेशाहीची चर्चा कायमच चालू असते. कुणाचा नातू तर कुणाचा पुतण्या. कुणाची मुलगी तर कुणाचा मुलगा. प्रत्येकजण आपआपल्या वंशाच्या दिव्याला सेटल करण्याच्या मागावर लागलाय. अशा वेळी महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या, महाराष्ट्राच्या मातीसोबत इमान राखत कामांचा प्रचंड मोठ्ठा डोंगर रचणाऱ्या आणि त्याच सोबत अटकेपार झेंडे रोवणाऱ्या एका घराण्याबद्दल सांगू वाटत ते म्हणजे,

दाभोलकर घराणं….

अच्युत दाभोलकर १९२० च्या सुमारास कोकणातून साताऱ्यात आलेले. अच्युत दाभोलकर हे त्याकाळचे LLB झालेले. फौजदारी वकिल म्हणून सातारा शहरात प्रसिद्ध. त्याचे लग्न झालं होतं ते ताराबाई यांच्याशी. ताराबाईंच शिक्षण चौथी पास. त्या काळच महिलांच हे शिक्षण म्हणजे अतीच. अच्युत दाभोळकर हे प्रचंड देवभोळे. दत्तगुरूंवर श्रद्धा असणारे. तर ताराबाई या विज्ञानाला मानणाऱ्या. ताराबाईंबद्दल सांगायच तर ताराबाईंनी त्या काळात सांगितलं होतं की, मी गेले की तासाभरात माझं शरीर दान करा. उगीच रडारड नको. मेल्यानंतर शरीर मेडिकलच्या विद्यार्थांच्या कामी येईल. चौथी शिक्षण झालं असलं तरी त्या चौथीच्या परिक्षेत राज्यात पहिल्या आल्या होत्या. 

या दाभोलकर दांपत्याला एकूण दहा मुलं. सर्वात थोरल्या मलाच नाव देवदत्त दाभोलकर. देवदत्त दाभोलकर हे पुणे विद्यापीठाचे माजी कुलगूरू. फर्ग्युसन कॉलेज आणि किर्ती कॉलेजचे माजी प्राचार्य. शिक्षणतज्ञ आणि समाजवादी विचारवंत. तर सर्वात धाकटे, नरेंद्र दाभोळकर. नरेंद्र दाभोळकरांना महाराष्ट्रातच नाही तर संपुर्ण भारतात अंधश्रद्धेविरोधी प्रसार प्रचार केला. लोकांना शहाणं केलं. वाईट याच गोष्टीच वाटतं की विखारी प्रचाराला ते बळी पडले. त्यांची मुलं हमीद आणि मुक्ता दाभोलकर त्यांच हे काम पुढे घेवून जात आहेत. 

या दोन थोरल्या आणि धाकट्या भावांच्या मध्ये एकूण आठजण. तिन बहिणी आणि पाच भावंडे. प्रत्येकजण आपआपल्या क्षेत्रात काहीतरी करणारा. दत्तप्रसाद दाभोलकर हे मोठ्ठे शास्त्रज्ञ. भारताने आखलेल्या अंटार्टिका मोहिमेत ते सहभागी होते त्याचसोबत ते विचारवंत, लेखक, अभ्यासक देखील म्हणून परिचित आहेत. डॉ. नरसिंह दाभोळकर हे विख्यात डॉक्टर. सायन मेडिकल कॉलेजचे ते डिन होते. तर श्रीपाद दाभोलकर हे द्राक्षमाऊली नावाने ओळखले जाणारे प्रगतशील कृषीशास्त्रज्ञ. प्रयोग परिवाराच्या मार्फत सामाजिक कार्यात सक्रिय होते.

दाभोलकर घराण्यातील प्रत्येकजण असच काहीतरी वेगळं करणारा. 

महाराष्ट्रातल्या या घराणेशाहीतल्या अशाच एका व्यक्तिबद्दल आपणास सांगणार आहोत.

नरेंद्र दाभोलकर, देवदत्त दाभोलकर, दत्तप्रसाद दाभोलकर, डॉ नरसिंह दाभोलकर यांचा हा पुतण्या, तर श्रीपाद दाभोलकर यांचा हा मुलगा.

त्यांचं नाव डॉ. अतीश दाभोलकर. 

डॉ. अतीश दाभोलकरांबद्दल सांगण्याच निमित्त म्हणजे अतीश दाभोलकर २०१८ मध्ये इटलीतील जगविख्यात अशा आयसीटीपी अर्थात इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरॉटिक फिजिक्स या संस्थेचे संचालक झालेत. युनेस्कोचे सहायक महासंचालक या श्रेणीने ते या पदाची धुरा संभाळत आहेत. 

डॉ. अतीश दाभोळकरांच शिक्षण कानपूरच्या आयआयटी मधून झालं. नंतर ते प्रिस्टन विद्यापीठात सैद्धान्तिक भौतिकीत डॉक्टरेट झाले. हॉवर्ड आणि कॅलटेक येथे संशोधन कार्य करण्यासाठी ते होते. याच दरम्यान म्हणजे १९९५ साली डॉ. अतीश दाभोळकर यांनी स्ट्रींग थियरीवर शोधपत्रिका प्रकाशित केली होती. 

शोधपत्रिका प्रकाशित झाल्यानंतर या संदर्भात माहिती विचारण्यासाठी त्यांच्या ऑफिसवर त्यांची भेट घेण्यासाठी थेट स्टिफिन हॉकिंग आले होते.

कॅलिफोर्नियातील त्यांच्या कार्यालयात व्हिलचेअर वरुन येवून हॉकिंग यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर अतीश दाभोलकर आणि डॉ. स्टीफन हॉकिंग यांचे संबध वाढतच गेले. डॉ. अतीश दाभोलकर यांच्या प्रयत्नातूनच २००१ साली स्टीफन हॉकिंग मुंबईत आले होते. त्यांनी मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात व्याख्यान देखील दिलं होतं. 

हॉवर्ड विद्यापीठातलं संशोधन कार्य झाल्यानंतर १९९६ च्या सुमारास ते भारतात आले. २०१० पर्यन्त मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च येथे फिजिक्सचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ते फ्रान्समध्यल्या सोरबोन विद्यापीठात आणि CNSR ( नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च) येथे कार्यरत होते.

इटलीतील आयसीटीपी अर्थात इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरॉटिक फिजिक्स संस्थेचे ते नुकतेच संचालक झाले आहेत.

या संस्थेच महत्व अस की, नोबेल पुरस्कार विजेते अब्दुस सलाम यांनी १९६४ मध्ये या संस्थेची स्थापनेत पुढाकार घेतला होता. इटली सरकार, युनेस्को आणि परमाणू उर्जा संस्था अशा तिघांनी मिळून या संस्थेची स्थापना केली आहे.  दरवर्षी जगभरातून ६ हजाराहून अधिक वैज्ञानिक वेगवेगळ्या पातळीवरील संशोधनासाठी या संस्थेत जात असतात. या संस्थेचा फायदा घेणारे जगभरात १८० देश आहेत आणि भारत देखील त्यातलाच एक देश आहे. युनेस्को सारख्या संघटनेने देखील या संस्थेला प्रथम श्रेणीचा दर्जा दिलेला आहे. 

त्यांच्या पुरस्कारांबद्दल सांगायच तर एंट्रोपी वरील मूलगामी अभ्यासासाठी २००६ साली त्यांना भारतातला विज्ञानातला सर्वात प्रतिष्ठित असा भटनागर पुरस्कार देण्यात आला होता. २००७ साली यंग लिडर इन सायन्स हा IIM नॅशनल लीडरशीप पुरस्कार त्यांना मिळाला होता, तर फ्रान्सचा लीडरशीप अवार्ड चेअर ऑफ एक्सलेन्स हा पुरस्कार देखील त्यांना देण्यात आला. असा पुरस्कार मिळालेले ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ आहेत. 

अतीश दाभोलकर अशा घराण्यातलेच. इथे वेगवेगळ्या पातळ्यांवर घराणेशाही सिद्ध करण्याची स्पर्धा चालू असताना डॉ. अतीश दाभोलकर इतक्या मोठ्या संस्थेचे संचालक होतात हि खरंच अभिमानाची गोष्ट आहे. 

हे हि वाच भिडू. 

2 Comments
  1. राजेंद्रसिंह says

    Solid…

Leave A Reply

Your email address will not be published.