हा इतिहास दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी पहिल्यांदा उजेडात आणला.

एक माणूस किती विषयांमध्ये तरबेज असू  शकतो? म्हणजे नुसतं बोलण्या-भाषण देण्यापलीकडं कुठवर? त्यातही अशा विषयांवर नुसतं लिहिणं सोप्पं पण त्याचा प्रत्यक्ष अभ्यास व संशोधन करून जग फिरून त्याचा धांडोळा घेणारे फार क्वचित लोकं असतात.

दामोदर कोसंबी हे त्यापैकी एक होते.

आपल्याकडं इतिहास म्हणजे फक्त राजे-सरदार आणि नेते-धर्म यांच्या किस्स्यांपुरता मर्यादित असतो. सलग घडलेल्या घटना मनोरंजन म्हणून चघळणं इतिहास नसून त्याची सामान्य माणसाच्या दृष्टीनं जोडणी करणं याला कोसंबींची महत्त्व दिलं.

म्हणजे मराठ्यांचा इतिहास लिहिताना त्यांनी त्या काळात सगळ्या राजांनी काय केलं हे सांगण्यापेक्षा लोकं त्या काळात कसे जगत होते, सामान्य जनतेत काय घडामोडी घडत याचा इतिहास त्यांनी लिहिला. गावाकडचे शेतकरी आणि आदिवासी यांचं वर्णन कुठल्याच इतिहासात सापडत नाही.

हा इतिहास दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी पहिल्यांदा उजेडात आणला.

त्यांचे वडील धर्मानंद दामोदर कोसंबी हे बौद्ध तत्त्वज्ञानाचे व पाली भाषेचे अभ्यासक होते. दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी ॲन इंट्राॅडक्शन टु द स्टडी ऑफ इंडियन हिस्ट्री हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्यांनी भारताच्या इतिहासाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मांडला.

विविध घटनांचे मार्क्सवादी दृष्टीने केलेले विश्लेषण,  ऐतिहासिक साधने व संशोधन या बाबींची चिकित्सा यामुळे हा ग्रंथ इतिहासाच्या विद्यार्थ्यांसाठी बायबल समजला जातो. ‘इतिहास कसा लिहावा’ याचा आदर्श त्यांनी आपल्या पुस्तकातून घालून दिला.

इतिहास लिहिणं म्हणजे सनावळ्या आणि राजे यांची माहिती नाही. इतिहास म्हणजे साधन आणि त्याच्यामुळं येणारं उत्पादन यांच्या परस्परसंबंध असतो. तो काळानुसार मांडला की तयार होणारी घटना म्हणजे इतिहास असतो असा त्यांचा दृष्टिकोन होता.

आपल्याला जर्मनी-आर्यांच्या राजांची ओळख असते. नेपोलियन-अलेक्साण्डरच्या गोष्टींपेक्षा घरातील पाटा-वरवंटा, नांगराचा फाळ कसा सुधारत गेला याचं वर्णन त्यांच्या इतिहासात आढळतं.

कोसंबी यांनी आपलं बहुतांश शिक्षण परदेशात केलं. अमेरिकेतील केंब्रिज हाय ॲण्ड लॅटिन स्कूल या शाळेचे ते विद्यार्थी होते. त्यानंतर त्यांनी नावाजलेल्या हार्वर्ड विद्यापीठात सन १९२९ मध्ये प्रवेश घेतला. पदवी परीक्षेसाठी त्यांनी गणित विषय निवडला होता. या परीक्षेत त्यांनी विशेष प्रावीण्यासह पदवी संपादन केली.

तेथे त्यांना फाय ‘बीटा काप्पा सोसायटी’चे सदस्यत्व मिळाले.

ही अभ्यासकांची जगातील सगळ्यात प्रसिद्ध आणि अमेरिकेतील सगळ्यात जुनी संस्था आहे. जगातील बोटावर मोजण्याइतक्या व्यक्तींना याचे सदस्यत्व मिळते. यातील बहुतांश लोक नोबेल विजेते किंवा मग विविध देशांचे प्रमुख असतात.

फार कमी वयात दामोदर कोसंबी यांनी हा बहुमान मिळवला होता.

अमेरिकेत त्यांच्यापुढे करियरच्या कित्येक संधी उपलब्ध होत्या. तरीही त्यानंतर ते भारतात आले. १९३० सालापासून त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठ, अलिगढ मुस्लीम विद्यापीठ आणि पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे गणिताचे प्राध्यापक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. बहुतांश वेळ ते आपल्या संशोधनात मग्न असत.

त्यासाठी त्यांनी महाराष्ट्राचा ग्रामीण भाग पिंजून काढला.

डॉ. होमी भाभांनी त्यांच्या नेतृत्वात सन १९४५ मध्ये मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्था नव्यानेच सुरू झाली होती. या संस्थेत सांख्यिकीचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची गरज होती. कोसंबी यांचा यात दांडगा अभ्यास होता. सांख्यिकीचा उपयोग फक्त प्रयोगशाळेत राहू नये. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सांख्यिकीचा वापर व्हावा असे त्यांचे मत होते.

शाळेत असताना त्यांनी बॅलिस्टिक्सचा म्हणजे रॉकेटमागच्या विज्ञानाचा एक छंद म्हणून त्यांनी अभ्यास केला होता. हि सुद्धा एक जमेची बाजू होती.

म्हणूनच डॉ. होमी भाभांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत काम करण्यासाठी दामोदर धर्मानंद कोसंबी यांना आमंत्रण दिले.

डॉ. होमी भाभांचे सहकारी म्हणून ते काम करू लागले. विशेष म्हणजे डॉ. होमी भाभा यांच्या वडलांच्या स्मरणार्थ दिल्या गेलेल्या भाभा पारितोषिकाचेही ते मानकरी ठरले. १९४७ साली त्यांना हा सन्मान मिळाला.

त्यासाठी १९४६ मध्ये कोसंबीनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत गणितासाठीच्या अध्यासनाचे अध्यक्षपद भूषवले. पुढची १६ वर्षे हा कारभार त्यांच्याकडे होता.

पण या काळात त्यांनी पुणे शहरातील आपले घर सोडले नाही. रोज डेक्कन क्वीनने ते पुणे ते मुंबई हा प्रवास करत असत. हा प्रवास त्यांच्यासोबतच्या काही लोकांच्या अजूनही स्मरणात आहे. पुण्यातील अनेक लोकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. 

कोसंबी यांना ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, जर्मन, इटालियन या युरोपियन भाषाही अवगत होत्या. त्यामुळे त्यांनी इटालियन, फ्रेंच आणि जर्मन भाषांमधूनही आपले शोधनिबंध प्रसिद्ध केले. त्यांचे बरेचसे शोधनिबंध नंतरच्या काळात प्रामुख्याने इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या जर्नलमध्ये आणि नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले.

त्यांचा संस्कृताचाही मोठा अभ्यास होता. भोजराजाचे खगोलशास्त्र, विद्याधराचा सुभाषित रत्नकोश, भर्तृहरीचा शिलालेख आणि अशा अनेक संस्कृत हस्तलिखितांचे त्यांनी स्वतः संपादन केले. ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र आणि नाणकशास्त्राचे (नाण्यांचा अभ्यास) याचे ते व्यासंगी संशोधक होते.

सिंधु संस्कृतीची अर्थव्यवस्था, मौर्यांच्या साम्राज्याची सुरुवात, भारताची समाजरचना आणि उतरंड यावर त्यांनी ग्रंथ लिहिले.

त्यातील जातींचा अभ्यास, स्त्री व शूद्रांची स्थिती, भारत देशाचा रोमन लोकांशी होणारा व्यापार, आर्यांचा भारतभर विस्तार आणि जातीव्यवस्था, मौर्य साम्राज्याची अर्थस्थिती यांविषयी त्यांनी मूलभूत संशोधन केले. त्यापूर्वी या विषयांचा फार त्रोटक अभ्यास होई. कोसंबी यांनी पहिल्यांदा या विषयांना जगाच्या आणि देशाच्या पटलावर आणले.

जर्मनीहून भारतात पंढरीची वारी व वारकरी परंपराचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या गुंथरराव सोंथायमर यांना डॉ. डी. डी. कोसंबी यांचं मार्गदर्शन लाभलं होतं.

कोसंबींच्या घरी किंवा भांडारकर प्राच्यविद्या मंदिरातील गुंथररावांच्या घरी  दोघांचे येणेजाणे असायचे.

भारताला स्वातंत्र्य मिळल्यानंतर सरकारने त्यांना आधी इंग्लंड आणि नंतर अमेरिकेत पाठवले. त्यांची युनेस्को संस्थेचे फेलो म्हणूंन म्हणून निवड झाली. शिकागो विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. अमेरिकेतील प्रिन्स्टन आणि शिकागो विद्यापीठात सन १९४८-१९४९ मध्ये त्यांनी काम केल. जगातल्या अनेक नावाजलेल्या लोकांसोबत काम करण्याची त्यांना संधी मिळाली.

यावेळी सापेक्षतावादाच्या अभ्यासासाठी उपयुक्त अशा शाखांमध्ये त्यांचे संशोधन सुरु होते.  असल्याने त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठात आइन्स्टाइन यांच्याशीही प्रदीर्घ चर्चा केली. शिकागो विद्यापीठात भूमितीचे अभ्यागत प्राध्यापक या नात्याने प्रदिश विश्लेषणसंबंधीच्या अभ्यासक्रमात सन १९४९मध्ये त्यांनी ३६ व्याख्याने दिली.

भारतात परत आले तेव्हा जगात शीतयुद्ध सुरु झालं होतं.

या काळात त्यांनी जागतिक शांतता आणि विविध देशांच्या अणुबॉम्बप्रेमाच्या विरुद्ध मते मांडली. त्या काळात भारतात अणुऊर्जा हा पर्याय म्हणून समोर येण्यास सुरुवात झाली होती.

वर्ल्ड पीस काउन्सिल या जगातील शांततेसाठी काम करणाऱ्या संस्थेने त्यांना सदस्यत्व बहाल केले. एकीकडे त्यांचे हे काम आणि दुसरीकडे टाटा मूलभूत संशोधन संस्थेत अणुऊर्जेसाठी काम करणे या गोष्टी एकमेकांच्या विरोधात जात होत्या. भारताने सौरऊर्जा आणि पवनऊर्जा असे मार्ग वापरावे असं त्यांचं मत होतं.

या काळात त्यांनी प्रचंड संशोधनही केलं. १९५२ ते १९६२ या काळात त्यांनी चीन आणि रशियाला अनेक भेटी दिल्या. चीनच्या क्रांतीचा त्यांना जवळून अनुभव घेता आला. त्यामुळे भारतातही शेतकऱ्यांना सोबत घेऊन आधुनिकीकरण व्हावे असं त्यांना वाटत असे.

भारतात मोठ्या वर्गासाठीच सगळ्या संस्था बनल्या होत्या पण शेतकरी आणि मजुरांच्या विकासासाठी काहीच होत नाही असं त्यांचं मत बनलं.

या कारणाने त्यांचे सरकारशी संबंध खराब झाले. १९६२ साली त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत आपला राजीनामा सोपवला. त्यानंतर ते पूर्णवेळ आपल्या संशोधनाकडे वळाले. 

१९६४ मध्ये वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेमध्ये त्यांची सन्माननीय वैज्ञानिक म्हणून नेमणूक झाली. 

त्यांच्या घरी सूक्ष्म पाषाण आयुधांचा मोठा संग्रह होता. कार्ले येथील ब्राह्मी लिपीचा शोध घेण्यात त्यांची महत्व्वाची भूमिका होती.

त्यांच्या लेखनकार्याचा आढावा घेण्यासाठी, तसेच त्यांचे समग्र लेखन संकलित करण्याकरिता उपराष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापनकेली गेली होती असा उल्लेख आढळतो. पुढे त्याचे काय झाले याचा कुठेच उल्लेख सापडत नाही.

२९ जून १९६६ रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले. भारताचे जागतिक पटलावर नावाजलेलं इतिहासकार इरफान हबीब यांनी त्यांना “शेतकऱ्यांना इतिहासाच्या पानावर आणणारा पहिला माणूस” म्हणून त्यांचा गौरव केला आहे.

हे हि वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.