हिरो बनायला आलेल्या डॅनी डेन्जोंगपाला डायरेक्टरने वॉचमनची नोकरी कर म्हणून सांगितलेलं….

व्हीलन असल्याशिवाय हीरोला महत्व येत नाही. हिरो आणि व्हीलनची जुगलबंदी जितकी तगडी तितका सिनेमा जास्त हिट असं गणित असायचं. आता हिरो तर सगळेच असतात म्हणजे आपल्या वैयक्तिक आयुष्यात आपणच हिरो असतो, पण सिनेमॅटिक गोष्टींमध्ये व्हीलन फार महत्वाचा मानला जातो.

व्हीलन म्हणल्या वर आपल्या डोळ्यासमोर चटकन दोन तीन नावं येतात त्यात विशेषतः अमरीश पुरी, राजा मुराद, शक्ती कपूर, सदाशिव अमरापूरकर आणि डॅनी डेन्जोंगपा. ही अभिनयाची अशी फळी आहे की ज्यांनी हीरोच मार्केट खाऊन टाकल होतं. 

आजचा किस्सा आहे डॅनी डेन्जोंगपा बद्दलचा. हिरो बनायला आलेल्या डॅनी डेन्जोंगपाला दिग्दर्शकाने माझ्या बंगल्याला वॉचमन म्हणून राहा अशी ऑफर दिली होती आणि त्याचाच बदला डॅनी डेन्जोंगपाने कसा घेतला त्याबद्दलचा हा किस्सा.

२५ फेब्रुवारी १९४८ रोजी डॅनी डेन्जोंगपाचा जन्म झाला. नेपाळी, बॉलिवूड, हॉलिवूड, तमिळ, तेलगू अशा बहुविध भाषांमध्ये त्यांनी काम केलं.

कांचा चीना, बख्तावर, खुदा बक्ष, कात्या ही पात्रे डॅनी डेन्जोंगपा यांनी इतिहासात अजरामर करून ठेवली आहेत. अजूनही हे सिनेमे आणि त्यातले व्हीलन पाहिल्यावर भीती वाटते.

 सिक्कीम सारख्या छोट्या राज्यातून डॅनी डेन्जोंगपा बाहेर पडले खरे पण लवकर कामच मिळेना. सततच्या स्ट्रगल मुळे वैताग आलेला होता. हा तो काळ होता जेव्हा एफटीआयआय पास झालेले पोरं मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते आणि कामाच्या शोधात होते.

दिवसभर प्रोड्युसर आणि दिग्दर्शक लोकांचे उंबरे झिजवण्याचा शिरस्ता चालूच होता. रात्री झोपायला जागा नसल्याने रस्त्यावर सुद्धा डॅनी डेन्जोंगपा झोपले. सिक्कीम वरून मोठी स्वप्न आपल्या छोट्या डोळ्यात साठवून डॅनी डेन्जोंगपा स्ट्रगल करत होता.

डॅनी डेन्जोंगपाच खर नाव होतं  Tshering Pentso आता याचा उच्चार करणसुद्धा डेंजर काम आहे.

जया बच्चनने त्यांना डॅनी हे नाव दिलं.

एकदा डॅनी जुहुमध्ये हिंडत होते. जुहू हा असा परिसर होता जिथं धर्मेंद्र,जितेंद्र, मनोज कुमार अशा लोकांचे बंगले होते. त्याच वेळी डॅनीची नजर पडली मोहन कुमार यांच्या बंगल्यावर. डॅनी त्यांच्याविषयी बरच ऐकून होता. लागलीच तिथे ते गेले. आता इथ एक मजेशीर गोष्ट होती ती म्हणजे मोहन कुमार यांच्या बंगल्याचे सगळे गार्ड हे सिक्कीमचे होते. त्यामुळे लगेचच डॅनी यांना आतमध्ये एंट्री मिळाली.

आतमध्ये गेल्यावर मोहन कुमार यांच्याशी कामाची बोलणी सुरू झाली आणि डॅनी यांनी मोहन कुमार यांच्यापुढे मला ॲक्टर व्हायचय असा प्रस्ताव मांडला. मोहन कुमार यावर जोरजोरात हसू लागले आणि डॅनीची थट्टा उडवू लागले.

अभिनेता बनण्याऐवजी तू माझ्या बंगल्याचा गार्ड का बनत नाही असे उद्गार मोहन कुमार यांच्या तोंडून निघाले. हे डॅनीच्या जिव्हारी लागलं. आणि तत्काळ त्यांनी शपथ घेतली की,

एक दिवस असा येईल की या मोहन कुमारचा बाजूला माझा बंगला असेल.

पुढे डॅनी व्हीलनचे रोल साकारून हिरो बनले, भारतभर ओळखले जाऊ लागले आणि नंतर त्यांनी जुहुला जमीन विकत घेऊन मोहन कुमार यांच्या बंगल्याच्या बाजूला आपला बंगला बांधला. जिद्द इतकी अफाट असल्यावर साहजिकच यश मिळत असतं. डॅनी आजही बऱ्याच लोकांना आवडणारा व्हीलन म्हणुन प्रसिद्ध आहेत.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.