कट्टर फॅन असलेला दाउद एकदा मॉलमध्ये ऋषी कपूर यांना बूट गिफ्ट करत होता

अंडरवर्ल्ड आणि बॉलिवुड यांचं कनेक्शन उघडकीस आलं ते म्हणजे गुलशन कुमार यांच्या हत्येनंतर. राकेश रोशनला मिळालेली धमकी, सलमान खानचा चोरी चोरी चुपके चुपके हा सिनेमा छोटा शकिलने पडद्याआडून प्रोड्युस केला होता आणि त्यातच संजय दत्तच प्रकरण समोर आल्याने म्हणा किंवा बॉलिवुड सेलिब्रिटी लोकांच्या दुबई वाऱ्यांचा ओघ बघता बॉलिवुड आणि अंडरवर्ल्डचं कनेक्शन यावर पोलिसांनी बारीक लक्ष ठेवायला सुरवात केली. आता पोलिसांनी कॉल रेकॉर्डिंग करायला सुरुवात केली होती त्यामुळे सगळेच हवेत असलेले भाईचा पाठीवर हात असलेले लोकं कायमचे जमिनीवर आले होते, पण एक भिडू असा होता जो कोणालाच जुमानला नाही त्याचा हा किस्सा.

असंही इंडस्ट्रीत बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड कनेक्शनच्या कथा भरपूर आहेत. दुबईत बॉलिवूड कलाकारांसोबत पार्टी आणि अभिनेत्रींसोबतच्या अफेअरच्या चर्चा आजही बॉलीवूडच्या गल्लीबोळात रंगतात. असं कोणतेही मोठे नाव नाही ज्याच्याशी अंडरवर्ल्डची कथा जोडलेली नाही. पण असाच एक किस्सा जुना सुपरस्टार ऋषी कपूर यांचाही आहे.

ऋषी कपूर यांच्याबद्दलची क्रेझ सर्वांनाच माहीत असेल, पण त्यांच्या चाहत्यांच्या यादीत सर्वात मोठ्या अंडरवर्ल्ड डॉनचेही नाव आहे. हा डॉन दुसरा कोणी नसून दाऊद इब्राहिम होता. जाणून घेऊया काय आहे दाऊद आणि ऋषी कपूरची कहाणी. खरंतर दाऊदला ऋषी कपूर खूप आवडायचे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा कट्टर ऋषी कपूर फॅन होता. स्वतः ऋषी कपूर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात याबद्दल लिहिले आहे. ज्यावेळी अंडरवर्ल्ड जोमात सुरू होतं त्याच वेळी ऋषी कपूरसुद्धा जोरदार फॉर्मात होते आणि दणादण सुपरहिट सिनेमे देत होते.

दाऊद ऋषी कपूर यांचा जबऱ्या फॅन होता..

खुल्लम खुल्ला या आत्मचरित्रात चिंटूजींनी ( ऋषी कपूर यांनी) लिहिले आहे की, दोघे एकदाच भेटले होते. ही बैठक दुबईत झाली. ऋषी कपूर दाऊदला त्याच्या घरी भेटायला गेले होते. दाऊदने ऋषी कपूर यांना चहासाठी आमंत्रित केले होते. त्याला चहासाठी बोलावण्यात आले कारण दाऊदने सांगितले की तो दारू पीत नाही आणि देत नाही. दोघांमध्ये बरीच चर्चा झाली. एखाद्या बॉलिवुड स्टारला घरी बोलावून चहा पाजण म्हणजे दाऊदसुद्धा बॉलीवूडला फॉलो करायचा.

दुसरी बैठक मॉलमध्ये झाली…

एकदा ऋषी कपूर आणि नीतू कपूर दुबईतील एका मॉलमध्ये फिरत असताना दाऊदही तिथे उपस्थित होता. ते त्यांच्या 8 ते 10 अंगरक्षकांसह उपस्थित होते. ऋषी कपूर यांना पाहताच दाऊद म्हणाला, तुला जे पाहिजे ते घे. जेव्हा ऋषी कपूरने हे नाकारले तेव्हा दाऊदने सांगितले की तो त्यांचा खूप आदर करतो आणि स्वत: साठी खरेदी करू इच्छितो. इथं ऋषी कपूर यांना दाऊदची स्पॉन्सरशिप सुद्धा देण्यात आली होती पण त्यांनी ती नाकारली. स्वतः दाउद ऋषी कपूर यांना बूट घेऊन देत होता पण ऋषी कपूर यांनी ते स्वीकारले नाही.

दाऊदसोबत चार तास घालवले…

ऋषी कपूर यांनी त्यांच्या बायोग्राफीमध्ये दाऊदसोबत ४ तास घालवल्याचे सांगितले आहे. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर बोलले असल्याचे त्यांनी सांगितले. दाऊदने बॉलिवूड कलाकारांबद्दल आपले मत मांडले आणि त्याला इंडस्ट्रीतील कोणते कलाकार आवडतात हे सांगितले. यासोबतच ऋषी कपूर यांनी बायोग्राफीमध्ये असेही लिहिले आहे की, दाऊदला भारतात केलेल्या गुन्ह्यांची लाज किंवा दु:ख नाही. ऋषी कपूरने दाऊदला विचारलं की हे गुन्हेगारी जग सोडून सामान्य माणसाप्रमाणे भारतात राहायला का येत नाही ? तेव्हा दाउद म्हणाला की मला भारतात एक सामान्य माणूस म्हणून राहण्याची इच्छा आहे पण माझ्या जीवाला धोका आणि बंधनं जास्त आहे त्यामुळे भविष्यात त्याचा विचार करायला हरकत नाही.

नंतर दाउद कुठल्याही बातम्यांमध्ये दिसला नाही की सेलिब्रिटी लोकांसोबत त्याचा फोटो व्हायरल झाला नाही. नंतर याशिवाय राज कपूर यांचे निधन झाले तेव्हाही दाऊदने ऋषी कपूर यांच्या घरी शोक व्यक्त करण्यासाठी एका व्यक्तीला पाठवले होते. यावरून कळतं की दाउद ऋषी कपूरचा किती कट्टर चाहता होता.

ऋषी कपूरने डी डे सिनेमात दाऊदला भेटल्यानंतर सेम टू सेम दाऊदचा रोल केला तोही त्यावेळी पाहिलेल्या निरीक्षणातून आणि दाऊदच्या ओरिजिनल हालचाली पाहून ती व्यक्तिरेखा ऋषी कपूर यांनी अक्षरश जिवंत केली.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.