अनेकांची चरित्र लिहणाऱ्या धनंजय कीर यांचे चरित्र ठावूक आहे का..? 

महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, स्वातंत्रवीर सावरकर अशा मान्यवरांची चरित्र वाचताना एक नाव हमखास दिसते ते म्हणजे धनंजय कीर. लिहलेले ते पुस्तक धनंजय कीर यांचे नसले तरी कुठेतरी रेफरन्स म्हणून धनंजय कीर म्हणतात, असे एखादे वाक्य का होईना येतेच. 

पण तुम्हाला माहित आहे का हे धनंजय कीर कोण होते.

तुमचं आमचं जावूद्या. ते ज्या ठिकाणी काम करायचे त्या कार्यालयात काम करणाऱ्या लोकांना देखील माहित नव्हतं की चरित्रकार धनंजय कीर आणि आपल्या कार्यालयात काम करणारे अनंत विठ्ठल कीर हे एकच आहेत. 

स्वातंत्रपूर्व काळात धनंजय कीर एक मुंबई महानगरपालिकेत कामाला होते. या नोकरीत असताना अ.का. प्रियोळकर या सहकाऱ्यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. प्रियोळकर हे लेखकच होते. मात्र ते गांधीवादी आणि धनंजय कीर हे सावरकरवादी होते. त्यामुळे नित्यनियमाने चर्चा आणि हेवेदावे ठरलेले असायचे.  नोकरीत स्थैर्य मिळाल्यानंतर उत्सुकतेपोटी ते वाचन करु लागले.  

दादरच्या फ्री रिडींग रुममध्ये ते तासन् तास बसत असत. काशिनाथ धुरू हॉलमधील प्रत्येक अन् प्रत्येक ग्रंथ त्यांनी या काळात वाचून काढला होता. त्यांच्या वाचनाच्या या वेडेपणापाई लोक त्यांना वेडा जॉन्सन म्हणू लागले. 

या काळातच ते प्रखर सावरकरवादी झाले.

याच दरम्यानच्या काळात भिडे यांनी फ्री हिंदूस्थान नावाचे साप्ताहिक सुरू केले होते. या साप्ताहिकात इंग्रजी साप्ताहिकाचे प्रुफ रिडींग करण्याचे काम कीर करत होते. हे काम करता करता लेखक देखील करावे असे भिडे यांनी मत मांडले. भिडे गुरूजींच्या शब्दाला मान देवून कीर यांनी जुलै १९४५ च्या अंकात न.चिं केळकर यांच्यावर पहिला लेख लिहला. 

हा लेख अपेक्षेपेक्षा अधिक गाजला आणि किर यांची घौडदौड सुरू झाली.

त्याच नियतकालिकामधून त्यांनी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, डॉ. मुंजे यांच्यावर व्यक्तिचित्रण लिहण्यास सुरवात केली..

या घडामोडी चालू होत्याचं तोच जोआकिम अल्वा यांच्या फॉम डोव्हर टू दादर या लेखाद्वारे सावरकरांवर बोचऱ्या शब्दात टिका करण्यात आली. या लेखावर प्रतिक्रिया म्हणून सावरकरवादी असणाऱ्या धनंजय कीरांनी लाईफ फ्रॉम प्रिटोरिया टू पाकिस्तान हा लेख लिहला. हे उत्तर देखील जोरदार गाजले. 

मात्र हे सर्व करत असताना महानगरपालिकेतील नोकरी देखील कायम होती. 

त्यामुळेच धनंजय कीर हे स्वत:च्या अनंतर विठ्ठल कीर या मुळ नावाऐवजी धनंजय इतकेच नाव लावून लेखन करायचे. मात्र न्यायाधिशांनी या टोपननावाने लेख लिहण्यावर आक्षेप घेतला व त्यानंतर धनंजय कीर या नावाने ते लेखन करुन लागले. हेच नाव पुढे त्यांना कायमचे चिटकले. 

या नंतरच्या काळात ते पुर्णपणे चरित्रलेखनाकडे वळले.

वीर सावरकर यांचे चरित्र त्यांनी लिहले. त्यासाठी त्यांनी सुमारे ७०० ते ८०० पुस्तकांचा अभ्यास केला. महात्मा गांधींचे चरित्र लिहताना त्यांनी ४० हजार पानांचा मजकूर वाचून घेतला व त्यानंतरच चरित्र लिहले असे सांगितले आहे. कोणाचेही चरित्र लिहताना व्यक्तिप्रेमातून चरित्र न लिहता तटस्थपणे लिहण्यावर त्यांचा भर राहिला. त्यामुळेच चरित्राची कादंबरी होवू शकली नाही. 

धनंजय कीर यांनी चरित्र लिहण्यापूर्वी संबधित व्यक्तिबाबत या पूर्वीदेखील लिहण्यात आले होते. वेगवेगळ्या लोकांनी त्यांची चरित्र लिहली होती मात्र धनंजय कीर यांची चरित्र प्रसिद्ध होण्यामागे त्यांची वस्तुनिष्ठ मांडणी हे कारण सांगितले जाते. व्यक्तिप्रेमात न पडता किंवा स्तुतीसुमने न उधळता त्यांनी हे लेखन केले. 

एकीकडे चरित्रकार धनंजय कीर हे नाव प्रसिद्ध होत असताना मात्र महानगरपालिकेच्या त्यांच्या दैनंदिन कामात काहीही फरक पडला नाही. ते महानगरपालिकेच्या शाळा तपासणीचे काम करत असत.  त्यांना विशेष बढती देखील मिळाली नाही. त्यांची आर्थिक परिस्थिती मात्र सोसोच राहिली. 

मात्र त्या काळात आपले चरित्र धनंजय कीर यांच्याकडून लिहून घ्यावे म्हणून अनेक मातब्बरांनी त्यांच्या माहिमच्या दोन खोल्यांच्या घराचे उंबरे झिजवले होते. मात्र पैसे घेवून लिखाण करण्यास त्यांचा ठाम नकार होता. पैशाचं गणित सांगताना त्यांच्या सासरवाडीचा दाखला आजही देण्यात येतो. 

कीर यांचे सासरे हे भिकाजी तात्या कनगुटकर.

हे त्या काळाचे बिल्डरच म्हणा. त्यांच्या मुंबईत अनेक चाळी होत्या. त्यांच्या श्रीमंतीबद्दल एक किस्सा सांगितला जातो. गुहागरला जाण्यासाठी त्यांनी त्या काळात विमान केले होते. हे विमान समुद्राच्या किनारी उतरवण्यात आले होते. इतक्या श्रीमंत घराण्यातील पत्नी असून देखील सासरच्या एका पैशावर त्यांनी मोह दाखवला नाही असे हे धनंजय कीर… 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.