जणु काही ‘दिल बेचारा’ च्या रुपातुन सुशांतचा पुनर्जन्म झाला असावा.

तो हसतो तेव्हा आपल्याही चेह-यावर आनंद झळकतो. तो रडतो तेव्हा आपणही व्याकुळ होतो. तो वेदनांनी तळमळत असतो तेव्हा आपल्याला पाहवत नाही. सिनेमा संपतो तेव्हा मनात असते एक सुन्न करणारी अव्यक्त भावना.

मला खात्री आहे जो माणुस ‘दिल बेचारा’ सिनेमा बघेन तो हिच अवस्था अनुभवेल.

सुशांत सिंग राजपुतचा शेवटचा सिनेमा ‘दिल बेचारा’ अखेर प्रदर्शित झाला. सुशांत इतके दिवस जो काहीसा धुसर झाला होता तो ‘दिल बेचारा’ पाहताना पुन्हा स्पष्ट आठवला गेला.

जणु काही ‘दिल बेचारा’ च्या रुपातुन सुशांतचा पुनर्जन्म झाला असावा.

पाहताक्षणी खुश करणारं सुशांतच्या चेह-यावरचं निखळ हास्य, अंगातली सळसळती ऊर्जा, डोळ्यातुन व्यक्त होणा-या भावना इत्यादी सुशांतच्या अभिनयाचे विविध पैलु ‘दिल बेचारा’ मध्ये पुन्हा दिसुन आले.

‘दिल बेचारा’ पाहताना, मुळात एखाद्या कलाकाराची शेवटची कलाकृती त्याच्या आयुष्याला इतकी संलग्न कशी असु शकते, हि थक्क करणारी बाब सारखी डोक्यात येत असते. सिनेमाचा शेवटचा अर्धा तास आपण सिनेमा पाहतोय हे विसरुन जातो.

या अर्ध्या तासात सुशांत स्वतःच्या आयुष्यातली घुसमट, तळमळ ओरडुन सांगतोय, असाच भास होत राहतो.

सिनेमा कसा आहे हे ज्याने त्याने ठरवावं. समीक्षकाला कोणाचीही बाजु न घेता तटस्थ राहुन स्वतःचं मत मांडायचं असतं. एक विश्वास आहे की ‘दिल बेचारा’ पाहताना प्रत्येक समीक्षक प्रेक्षक होईल. सिनेमा चांगला की वाईट हे मुद्दे त्याच्यासाठी गौण असतील. तो फक्त प्रेक्षक या नात्याने सुशांतची शेवटची अदाकारी भरलेल्या डोळ्यांनी पाहत राहिल.

सुशांतचे तुम्ही आजवरचे सिनेमे पाहिले असतील. ‘काय पो छे’ पासुन सुरुवात झालेलं त्याचं करियर आज ‘दिल बेचारा’ पर्यंत येऊन थांबलं. सुशांतच्या प्रत्येक सिनेमात त्याच्या अभिनयामध्ये भावनांचं प्रकटीकरण करणारी छटा पाहायला मिळते.

तो संवादातुन कमी तर हावभावांतुन जास्त व्यक्त होतो. ‘दिल बेचारा’ मध्ये सुशांतच्या भुमिकेचं नाव मॅनी. मॅनीचं हसणं, त्याचं दुःखी होणं, वेदनांनी असह्य होणं हे सुशांत स्वतः जगतोय, हेच वाटत राहतं. यापेक्षा एखाद्या कलाकाराच्या अभिनयाला दाद ती काय द्यावी.

मगाशी सिनेमाच्या शेवटच्या अर्ध्या तासाचा उल्लेख केला. ‘दिल बेचारा’ ज्यांनी पाहिला नाहीय, त्यांच्यासाठी कदाचित हा स्पाॅयलर असु शकेल. सिनेमात शेवटच्या अर्ध्या तासात मॅनीला शरीराच्या आत होणारं दुखणं सहन होत नाही. ‘मला मरायचं नाहीय, मला जगायचंय. मला स्वतःसाठी काहीतरी करायचंय.’ मॅनीच्या भुमिकेची घुसमट सुशांत ज्या पद्धतीने अभिव्यक्त करतो ते पाहुन सुशांत स्वतःचं मन दुःखाचा आक्रोश करुन मोकळं करत असल्याचा प्रत्यय येतो. सिनेमाचा उत्तरार्ध हा मृगजळासारखा आहे.

कधी मॅनीच्या भुमिकेत सुशांत तर कधी सुशांतच्या आतला मॅनी समोर येत राहतात.

२०१७ साली मुकेश छाब्रा आणि सुशांतची भेट झाली. ‘तुम्ही पहिला सिनेमा बनवाल तेव्हा मी त्या सिनेमाचा भाग असेन’ असं सुशांतने नकळत मुकेश छाब्राकडुन वचन घेतलं. मुकेशने सुद्धा सुशांतच्या म्हणण्याला होकार दिला.

मुकेश छाब्रा बाॅलीवूडमधला नामवंत कास्टींग डिरेक्टर. ‘गँग्स ऑफ वासेपुर’, ‘दंगल’, ‘भारत’, ‘संजु’ अशा बाॅलिवूडच्या अनेक लोकप्रिय सिनेमांसाठी मुकेशने कास्टींग डिरेक्टर म्हणुन काम केलंय. ‘दिल बेचारा’ हा दिग्दर्शक म्हणुन मुकेशचा पहिलाच सिनेमा.

सुशांत आणि मुकेशने ‘दिल बेचारा’ एकत्र पाहायचं ठरवलं होतं. आज हि गोष्ट होत नाहीय याची मुकेशला खंत आहे. दिग्दर्शकाचा पहिला सिनेमा प्रदर्शित होताना तो फार उत्सुक असतो. प्रेक्षकांकडुन कशा प्रतिक्रिया मिळतील, याचं त्याला कुतुहल असतं. आज या क्षणाला ‘दिल बेचारा’ प्रदर्शित होत असताना मुकेश मात्र शांत आहे.

पहिला सिनेमा प्रदर्शित होतोय म्हणुन आनंद साजरा करावा की पहिल्याच सिनेमाचा नायक हे जग सोडुन गेलाय याची हळहळ व्यक्त करावी, अशा संभ्रमात मुकेश आहे.

सुशांतला श्रद्धांजली म्हणुन ‘दिल बेचारा’ जास्तीतजास्त लोकांना पाहता यावा म्हणुन हाॅटस्टार या ऑनलाईन प्लॅटफाॅर्मने प्रेक्षकांकडुन कोणतंही शुल्क आकारलं नाही. ‘दिल बेचारा’ च्या शेवटी जेव्हा सुशांतचे विविध फोटो बघायला मिळतात, तेव्हा डोळे नकळत पाणावतात.

तु आत्महत्या केलीस आणि या जगातलं स्वतःचं अस्तित्व कायमचं सपवलंस. पण सुशांत, तुझ्या कलाकृतींद्वारे तु आमच्या मनात जे हक्काचं स्थान निर्माण केलं आहेस ते कोणीही मिटवु शकणार नाही.

  •  देवेंद्र जाधव

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.