पंकज कपूर आणि नसीरुद्दीन शाह यांच्या सासूबाई इतकीच त्यांची ओळख नाही तर..

जेव्हा एखाद्या कलाकाराची पुढची पिढी अभिनय क्षेत्रात प्रसिद्ध असते, तेव्हा अभिनयाचा मिळालेला वारसा घेऊन ही पिढी पुढे जात असते. ही गोष्ट अशाच एका पिढीची.

आज हिंदी सिनेमा क्षेत्रात रत्ना पाठक शहा आणि सुप्रिया पाठक या दोन बहिणींची येथे वेगळी ओळख आहे. या दोघी कधी रणबीर कपूर सोबत आईच्या हळव्या भूमिकेत आपलं मन जिंकतात. तर कधी ‘खिचडी’ किंवा ‘साराभाई vs साराभाई’ सारख्या मालिकांमध्ये विनोदी भूमिका सुद्धा सहज करतात.

या सहज अभिनयाची शिकवण त्यांना आईकडून मिळाली आहे. त्यांची आई सुद्धा बॉलिवुड मधील प्रसिद्ध अभिनेत्री. त्या म्हणजे दिना पाठक. 

बॉलिवुड मध्ये रेखाची ‘खुबसुरत’ पिढी मागे सरून पुढे ऐश्वर्याची ‘देवदास’ पिढी स्वतःची ओळख निर्माण करत होती. या मोठ्या पिढीचा एक समान दुवा म्हणजे दिना पाठक. कधी अमोल पालेकर यांच्या ‘गोलमाल’ सिनेमात त्या खोट्या आई म्हणून झळकल्या तर कधी ‘देवदास’ मध्ये ऐश्वर्या रायच्या प्रेमळ तरीही कडक शिस्तीच्या सासूच्या रुपात समोर आल्या.

काळ बदलला तसं सिनेमा माध्यम बदलत गेलं. परंतु दिना पाठक प्रत्येक सिनेमात या हमखास दिसायच्या.

त्यांच्याकडे पाहून ‘आजी असावी तर अशी !’ अशीच भावना मनात येते. 

४ मार्च १९२२ रोजी गुजरात येथील अमरेली येथे दिना पाठक यांचा जन्म झाला. आयुष्याच्या सुरुवातीला त्यांनी गुजराती रंगभूमीवर अनेक नाटकांमधून अभिनय केला. त्यांचे वडील इंजिनियर तर मोठी बहीण शांता एका शाळेत शिकत होती. विशेष म्हणजे इंदिरा गांधी शांताच्या वर्गात शिकत होत्या. एकंदर घरातलं वातावरण सुसंस्कृत आणि सुशिक्षित होतं.

दिना पाठक यांनी सुद्धा फार कमी वयात रंगभूमीला आपलंसं केलं. 

याच काळात त्यांनी मुंबईच्या सेंट झेवियर कॉलेजमध्ये बी. ए. करण्यासाठी प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये शिकत असताना त्या गुजराती रंगभूमीवर सुद्धा काम करत होत्या. ‘भवई’ हा गुजराती रंगभूमीवरील लोकप्रिय प्रकार.

१९४० साली भवई नाटकांमधून तत्कालीन ब्रिटिश साम्राज्याविरोधात आवाज उठवला जात असे. त्यावेळी या प्रकाराला वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं श्रेय दिना पाठक यांना दिलं जातं. तसेच अनेक स्वातंत्र्य आंदोलनात सुद्धा त्यांचा सहभाग असायचा.

त्या ज्या कॉलेजमध्ये शिकत होत्या त्या झेवियर्स कॉलेजला ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी दिना पाठक यांना कॉलेजमधून काढलं. 

नाटकं करत असतानाच १९४८ साली आलेल्या ‘करियावर’ या गुजराती सिनेमातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. यानंतर त्यांनी पुन्हा नाटकांकडे मोर्चा वळवला. पुढे हिंदी सिनेमांमध्ये मात्र जवळपास २० वर्षांनी त्या आल्या.

बासू भट्टचार्य यांच्या 1966 साली आलेल्या ‘उसकी कहानी’ सिनेमातून त्यांनी बॉलिवुडमध्ये प्रवेश घेतला. अमिताभ बच्चन यांनी ज्या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं अशा ‘सात हिंदुस्तानी’ सिनेमात त्या झळकल्या. पुढे मग अनेक हिंदी सिनेमात त्यांच्या भूमिका प्रेक्षकांनी पसंत केल्या. 

केतन मेहता यांच्या ‘मीर्च मसाला’ या सिनेमात जवळपास सर्व पाठक कुटुंब पाहायला मिळतं.

या सिनेमात दिना पाठक या मुली रत्ना आणि सुप्रिया सोबत तसेच जावई नसीरुद्दीन शाह सोबत पाहायला मिळाल्या. तसेच १९८५ साली आलेली ‘इधर उधर’ ही कॉमेडी मालिका प्रचंड गाजली. यामध्ये सुद्धा दिना आणि त्यांच्या मुली पाहायला मिळाल्या.

दिनाचे पती बलदेव पाठक हे कपड्यांचे डिझायनर होते. राजेश खन्ना यांच्या अनेक सिनेमांसाठी त्यांनी कपडेपट केले. ज्या काळात राजेश खन्ना यांचा उतरता काळ सुरू झाला, त्या काळात बलदेव पाठक यांच्या दुकानावर परिणाम झाला. आणि शेवटी त्यांना दुकान बंद करावं लागलं. 

सिनेसृष्टीत यशस्वी झालेली ही अभिनेत्री खूप काळ भाड्याच्या घरात राहत होती.

आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी स्वतःसाठी घर घेतलं. आज दिना पाठक यांच्याकडून मिळालेला अभिनयाचा वारसा त्यांच्या मुली पुढे चालवत आहेत. कोणताही दिखावा न करता सुप्रिया आणि रत्ना या दर्जेदार अभिनय करून नेहमीच चांगल्या भूमिकांमध्ये पाहायला मिळतात. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.