तुम्ही इलेक्शनमध्ये व्यस्त होता तेव्हा झेडपीच्या मास्तरांनी ७ कोटीचा पुरस्कार जिंकला..

युनिस्को आणि लंडन येथे असणाऱ्या वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टिचर प्राईज हा पुरस्कार पहिल्यांदा एका भारतीयाला मिळाला. बरं ते भारतीय म्हणजे कोणीतरी भारतीय वंशाचे वैगेर शिक्षक नाहीत तर आपल्या सोलापूरातल्या झेडपीच्या प्राथमिक शाळेपासून सुरवात करणारे शाळा मास्तर आहेत. 

जगातल्या एकूण १२० देशांमधल्या १२ हजार शिक्षकांमधून हे शिक्षक पहिले आलेत.

शिक्षकांनो,

ही साधीसुधी गोष्ट नाही हे ध्यानात घ्या आणि मगच मास्तरांबद्दल वाचायला सुरवात करा.. 

तर या मास्तरांच नाव रणजित डिसले.

त्यांनी विकसित केलेल्या क्युआर कोडची माहिती तुम्हाला आजवर मिळालीच असेल. नसेल तर सांगतो आत्ताची जी पाठ्यपुस्तके आहेत त्यात क्युआर कोडचा वापर होतो. २०१५ पासून शाळेय पुस्तकांमध्ये हा वापर केला जावू लागला. 

रणजित डिसले सरांच मुळ गाव बार्शी तालुक्यातील साकत. २००९ साली झेडपी शिक्षक म्हणून माढा तालुक्यातील परितेवाडी येथे त्यांची नेमणुक झाली. तेव्हा या शाळेत फक्त जनावरं होती. आम्ही पोरांना जनावरं म्हणतं नाही खरीखुरी जनावरं. गायी म्हशी बांधण्यासाठी या शाळेचा उपयोग व्हायचा. साधारणं अस चित्र दिसल्यावर माणसं सुस्कारा सोडतात. कारण काहीतरी काम करायला लागेल याची काळजी मिटते. 

पण डिसले सरांनी काम सुरू केलं. पालकांना जावून भेटू लागले. कधी पालक घरात भेटायचे तर कधी शेताच्या बांधावर. कधी गुरामागं गेलेले विद्यार्थी शोधत माळरान तुडवायला लागायचं. पण दिसले सरांनी हे सगळं केलं आणि शाळेत पोरं दाखल करून घेतली. 

पोरांना शाळेत कसं आणायचं हा विचार करत असताना त्यांना मोबाईलवेड लक्षात आलं.

पाठ्यपुस्तके सोडून मोबाईलवर शिकवण्यास, समजावून सांगितल्यानंतर मुलं येतील म्हणून मोबाईल व लॅपटॉपचा वापर करण्यास सुरवात केली. 

त्याचवेळी डिसले सरांना बारकोड दिसू लागले. दुकानातून एखादी गोष्ट विकत आणली की त्यावर बारकोड, क्यूआर कोड असायचे. हीच पद्धत शाळेसाठी विकसित करायचं हे धोरणं त्यांनी ठरवलं. त्यांनी आपल्या शाळेतच क्यू आर कोड ची पद्धत विकसित केली. शाळेत सक्सेस झाल्यानंतर हे मॉडेल माढा तालुक्यात स्वीकारलं गेलं आणि त्यानंतर महाराष्ट्रात व पुढे देशभरात या मॉडेलचा गवगवा झाला. 

याच सहाय्याने मास्तरांना गावातलं वनक्षेत्र मोजायचं ठरवलं. मुलांना झाड, झाडाची सावली आणि त्याची त्रिज्या काढून झाडाचे क्षेत्र कसे मोजायचे ते सांगितलं. यात दोन तीन महिने घालवल्यानंतर गावातलं वनक्षेत्र २१ टक्के असल्याची माहिती मिळाली. 

नेमकी वृक्षतोड का होते याची प्रश्नावली तयार करण्यात आली व त्या उत्तरातून पर्याय उभे करण्यात आले. त्यातून पुढे गावाचं एन्वार्मेंट कार्ड तयार करण्यात आलं. गावात चुली किती, लाकूड किती लागले. चारचाकी, दुचाकी किती अशी सर्व माहिती गोळा करण्यात आली. झाडांची वर्गवारी ठरवण्यात आली. कोणते झाड तोडणे सर्वात चुकीचे आहे असे ते वर्गीकरण होते. 

संबधित झाडांना सेन्सार लावण्यात आले व ती झाडे तोडण्याचा प्रयत्न होवू लागल्यास मुलांच्या मोबाईलवर मॅसेज जावू लागला. हे सर्व तंत्रज्ञानाच्या मदतीने होवू लागलं. 

अराऊंड द वर्ल्ड या उपक्रमामार्फत आकुंभे गावातील झाडांना क्यू आर कोड वापरून वृक्षलागवडीखालील क्षेत्र ३३ टक्यांपर्यन्त वाढवण्यात आलं. त्यासाठी झाडांना क्यू आर कोड लावण्यात आले. 

या सर्व प्रयोगामुळे डिसले सरांच नाव देशभरातील इनोव्हेटिव्ह अशा ५० शिक्षकांमध्ये गेलं.

त्यांच्या एकूण ११ वर्षांच्या कारकिर्दीत १३ आंतराष्ट्रीय व ७ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्यांच्या नावावर १२ शैक्षणिक पेटंट आहेत. मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला यांनी हिट रिफ्रेश नावाची विशेष चित्रफीत प्रकाशित केली. त्यांनी आपल्या पुस्तकांत डिसले सरांची माहिती दिली आहे. 

डिसले सरांच्या कामामुळे त्यांची आतंराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जावू लागली. आज डिसले सरांना हा पुरस्कार मिळाला. पुरस्काराची निम्मी रक्कम आपल्यासोबत स्पर्धेत असणाऱ्या शिक्षकांसोबत त्यांनी वाटली. कारण या रकमेतून इतर देशात देखील कामे व्हावीत. 

अशा या डिसले सरांना मानाचा मुजराच घालायला हवा… 

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. vighnesh says

    tyani pustakana qr code lavun kay fayda zala ,te lavnya magcha hetu kay hota please reply

Leave A Reply

Your email address will not be published.