माणसं स्वत:साठी घर बांधतात पण पुस्तकांसाठी घर बांधणारे डॉ. बाबासाहेब एकमेव होते. 

महाराष्ट्रात एक घर आहे. या घरात सुमारे ५०,००० हून अधिक पुस्तकं आहेत. त्यामध्ये राजकारणावर ३ हजार, कायद्यावर ५ हजार, अर्थशास्त्रावर १ हजार, तत्वज्ञानावर ६ हजार, युद्धशास्त्रावर ३ हजार, धर्मशास्त्रावर २ हजार अशी बरीच संख्या आहे. तुम्हाला या घराचं वैशिष्ट सांगायचं झालं तर एक गोष्ट विशेषकरून सांगू वाटते ती म्हणजे, 

या घरातील पुस्तकांचे ग्रॅंथालय हे त्याकाळच जगातील सर्वांधिक व्यक्तिगत पुस्तक असणारे ग्रॅंथालय होते.

हे साधं घर नसुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह आहे. काल या राजगृहावर काही माथेफिरूंनी हल्ला केला. बंगल्याच्या आवारात कुंड्या फोडून नुकसान करण्यात आलं. वाईट या गोष्टींच वाटतं की ज्या घरात ६००० हून अधिक तत्वज्ञानाची पुस्तके आहेत त्या घरावर हल्ला करण्यात आला.

यातील एक पान जरी माथेफिरूंनी वाचलं असत तर त्यांच्याकडून नक्कीच अस कृत्य झालं नसतं. 

असो राजगृह वरती करण्यात आलेल्या या भ्याड हल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी सर्व आंबेडकरी जनतेला आवाहन करत शांतता राखण्याची विनंती केली आहे. बाबासाहेबांच्या विचारांना प्रमाण मानून कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सर्वजण घेत आहेत

. 

पण या दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर “राजगृह” ही नेमकी वास्तू कशी आहे हे सांगण्याचा हा प्रयत्न. 

मुंबईत जार्ज पंचम यांच्या स्वागतासाठी गेट वे ऑफ इंडिया बांधण्यात आलं, शहाजहाने मुमताजसाठी ताजमहल बांधल्याची नोंद आहे. आपल्यासारखी माणसं राहण्यासाठी घर बांधतात पण पुस्तकांसाठी घर बांधणारा माणूस हा खऱ्या अर्थाने महामानवच असतो. डॉ. बाबासाहेब हे महामानव होते म्हणून त्यांनी आपल्या पुस्तकांसाठी घर बांधण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरवलं. 

बॅरिस्टर झाल्यानंतर देखील बाबासाहेबांची आर्थिक स्थिती तशी बेताचीच होती. १९३० सालापासून त्यांच्या प्रॅक्टिसमुळे या स्थितीत फरक पडत गेला. आर्थिक पातळ्यांवर स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यांनी मुंबईत दोन घरे बांधण्याचा मनोदय केला. त्यापैकी एक घर हे खास पुस्तकांसाठी असणार होतं तर दूसरं घर हे राहण्यासाठी असणार होतं. 

त्यासाठी दादरच्या हिंदू कॉलनीत त्यांनी दोन प्लॉट घेतले. ९९ क्रमांकाचा आणि १२९ क्रमांकाचा प्लॉट त्यांनी विकत घेतला.  १९३१ मध्ये बांधकामास सुरवात करून १९३३ साली बांधकाम पुर्ण करण्यात आलं. तर ९९ क्रमांकावर असणाऱ्या प्लॉटवर १९३२ साली बांधकाम सुरू करण्यात आलं.  ९९ क्रमांकावरील बंगल्याचं नाव त्यांनी चार मिनार ठेवलं. मात्र पुढे ९ मे १९४१ साली त्यांनी चारमिनार ही इमारत विकली. कशासाठी तर ग्रॅंथ विकत घेण्यासाठी. १२९ क्रमांकाच्या प्लॉटवर बांधण्यात आलेल्या सुरेख दुमजली इमारतीचे नाव बाबासाहेबांनी गौतम बुद्ध यांच्या राजमहालावरून “राजगृह” असे ठेवले. 

माणसं घरात पुस्तके ठेवतात. पण राजगृहची रचना पाहिली तर बाबासाहेब पुस्तकांमध्ये रहायचे हे दिसून येतं. आपलं सुरेख ग्रॅंथालय त्यांनी बांधताना न्यूयार्क ग्रॅथालयाचा अभ्यास केला होता. त्यासाठी मोठमोठे खांब आणि स्वच्छ प्रकाश येणाऱ्या खिडक्या बांधण्यात आल्या होत्या. 

अशा या राजगृहचे बांधकाम पुर्ण होताच रमाईस येथे आणलं होतं. रमाई हे घर पाहताच म्हणाल्या होत्या हे घर नाही तर एका महान विद्वानाच भव्य अस ग्रॅंथ भांडार वाटतं. 

पुढे इथेच बाबासाहेबांनी अनेक ग्रॅंथ लिहले. भारताचे संविधान तयार होण्याचं किंवा बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक लिहण्याचं राजगृह साक्षिदार राहिलं आहे. 

बाबसाहेबांनी आपल्या पुस्तकांसाठी इंग्लडच्या ठक्कर कंपनीतून ग्रॅंथालय कार्ड बनवून घेतली होती. बाबासाहेबांच्या अचूक स्मरणशक्तीमुळे ५० हजार पुस्तकांमधून त्यांनी ती अचूक सापडत असत. तासन् तास ते ही पुस्तके वाचत बसत असत. इतक्या पुस्तकांमधून ते अचूक संदर्भ सांगत असत. एका विद्वान माणसाने पुस्तकांसाठी म्हणून हे घर बांधलं होतं.

शेवटी इतकच सांगू वाटतं की या पुस्तकांमधील कोणतही एक पुस्तक आणि कोणतिही एक ओळ वाचण्याचं धैर्य माथेफिरूंनी दाखवलं असत तर असा भ्याड हल्ला करण्याचं धाडस झालं नसतं. 

हे ही वाच भिडू. 

1 Comment
  1. Timesofmarathi says

    Best News website
    marathi news

Leave A Reply

Your email address will not be published.