काहीही म्हणा पण ते नसते तर औरंगाबाद आजही एक मोठ्ठं खेडच असतं..! 

एखाद्या शहराच्या विकासाचं संपूर्ण श्रेय एकाच माणसाकडे कस जाऊ शकतं, असा प्रश्न तूम्हाला पडू शकतो. पण जेव्हा त्या माणसाचं नाव डॉ. रफीक झकेरिया आहे हे समजतं तेव्हा विश्वास ठेवावाच लागतो.

झकेरिया नावाचा माणूस देखील तसाच होता. 

एक अभ्यासू, विचारवंत आणि तितकाच डाऊन टू अर्थ. लोकांच्या प्रश्नांना थेट भिडायचाच पण भविष्य पहायचा मग ते मतदारसंघाचं असो किंवा जाती, धर्माच्या उन्नतीचं असो. 

डॉ. रफिक झकेरियांना नवी मुंबई वसवण्याचं श्रेय दिलं जात. आजचं जे औरंगाबाद तुम्हाला दिसतं त्याचं श्रेय देखील झकेरियांनाच दिलं जातं. अस सांगतात की त्यांनी औरंगाबादमध्ये विमानतळ आणलं. नुसतं विमानतळ आणलच नाही तर स्वत:च्या पैशातून विमानाचं तिकीट काढून औरंगाबादमध्ये विमानाने येणारे ते पहिले व्यक्ती होते. 

औरंगाबादच्या विकासाबद्दल बोलायचं झालं तर औरंगाबादमध्ये सिडको, हडको आणण्याचं श्रेय त्यांना दिलं जातं. चिकलठाणा सारखी MIDC देखील त्यांच्यामुळेच उभा राहू शकली. औरंगाबादमध्ये आज पोत्याने फाईव्ह स्टार हॉटेल्स आहेत. आयटीसी, वेलकम ग्रुप, ॲम्बेसिटर ग्रुप, ताज ग्रुप यांना औरंगाबादमध्ये पंचतारांकित हॉटेल्स सुरू करण्यासाठी प्रोत्साहन त्यांनीच दिलं. डॉ. रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमन्स त्यांच्यामुळेच उभारलं गेलं. मौलाना आझाद महाविद्यालय त्यांच्यामुळेच उभारण्यात आले.

मेडिकल कॉलेज, विमानतळ, औरंगाबाद शहराला जायकवाडी मार्फत पिण्याचे पाणी मिळण्याची योजना अशा कित्येक गोष्टीचं श्रेय एकट्या झकेरियांना देण्यात येतं.

डॉ. रफीक झकेरियांचा जन्म ५ एप्रिल १९२० चा. अत्यंत हुशार असणाऱ्या या माणसाने लंडन येथून M.A. Phd पूर्ण केली. बार ॲट लॉ पर्यन्तचं शिक्षण पूर्ण केलं. सुरवातीच्या काळात झकेरियांनी भारतीय स्वातंत्र चळवळीत सहभाग घेतला. भारतीय युवक कॉंग्रेसचे नेते, मुंबई कॉंग्रेसचे चिटणीस, अखिल भारतीय व महाराष्ट्र कॉंग्रेसचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. 

संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा १९६०-६२ या काळात ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य होते. १९६२ साली ते औरंगाबाद येथून उभारले आणि सलग तीन टर्म ते आमदार म्हणून निवडून येत गेले. औरंगाबाद शहर म्हणून उभे राहू शकले ते याच काळात. 

महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात त्यांनी महसुल, नगरविकास, आरोग्य, पर्यटन अशा विविध खात्यांचा कार्यभार पाहीला.  पुढे १९७८ ते ८४ ते राज्यसभेचे सदस्य राहिले.

मात्र फक्त राजकारणी इतक्यापूरतीच त्यांची ओळख मर्यादीत नव्हती. ते विचारवंत होते, अभ्यासक होते, लेखक संशोधक होते. शिवाय हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतिक देखील होते. 

डॉ. रफीक झकेरिया यांना मुंबई विद्यापीठातून गोल्ड मेडल मिळालं होतं. पुढे ते अलिगड विद्यापीठाचे २५ वर्ष कुलगुरू राहिले. इस्लाम, भारतीय राष्ट्रवाद या विषयांवर त्यांची पकड होती. त्यांनी लिहलेली पुस्तके आजही अभ्यासली जातात.

ए स्टडी ऑफ नेहरू, द मॅन हू डिव्हायडेट इंडिया, मोहमंद ॲण्ड कुराण, राईज ऑफ मुस्लीम इन इंडियन पॉलिटिक्स, कन्फ्लिकट बिटवीन लिरीजयस ॲण्ड पॉलिटिक्स, कम्युनल रेज इन सेक्युलर इंडिया अशी विविध पुस्तके त्यांनी लिहली. 

१९६५, १९९०,१९९६ साली त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधित्व केले. देशात मायनॉरिटीसंबधित गोपालसिंह यांनी १९६० साली अहवाल सादर केला होता. तो अहवाल मराठी मांडण्याचे काम त्यांनी केले.

इतकेच नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रप्रमुख झुल्फिकार भुट्टो यांना उत्तर देण्यासाठी लाल बहादूर शास्री यांनी त्यांनाच आखाती देशात पाठवले होते. तेव्हा त्यांनी भारताची बाजू सक्षमपणे मांडली होती. 

त्यांच्याबद्दल लिहणं म्हणजे फक्त आणि फक्त एकेका वाक्यात त्यांनी निर्माण केलेल्या संस्थांची, पुस्तकांची, कामांची यादी देणं हेच आहे. आपण एखाद्या लेखात ओळीने त्यांनी केलेल्या कामांची यादी दिली तरी ते संपत नाही. म्हणूनच खूपच निवडक गोष्टी त्यांच्याबद्दल लिहता आला. 

अशा या डॉ. रफीक झकेरियांच हे जन्मशताब्दी वर्ष महाराष्ट्र साजरा करत आहे. 

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. Onkar Santosh Hajare says

    डॉ. रफिक यांच नवी मुंबई साठी च योगदान या vrr सविस्तर लेख लिहा please

Leave A Reply

Your email address will not be published.