भारताचे एडिसन “डॉ. शंकर भिसे” : २०० शोधांचे जनक अन् ४० शोधांचे पेटंट त्यांच्याकडे होते.

जगाला शून्य देण्यापासून ते जगातील अनेक शोध-संशोधनाचा पाया भारतीय शास्त्रज्ञांनी रचला आहे. जगाच्या विकासात योगदान देणारे अनेक भारतीय शास्त्रज्ञ आपल्याला ज्ञात आहेतच, पण काही असेही अज्ञात शास्त्रज्ञ आहेत ज्यांचं आपण कधी नावही ऐकले नसणार. मात्र त्यांच्या नावावर शेकडो शोधांची नोंद आहे.

असेच एक अज्ञात शास्त्रज्ञ म्हणजे डॉ. शंकर आबाजी भिसे. जे १९ व्या शतकातील एक महान संशोधक होते.

डॉ. शंकर भिसे मुद्रण यंत्र, सिंगल टाईपकास्टर विथ युनिव्हर्सल मोल्ड, रोटरी मल्टिपल टाईपकास्टर यंत्र, ऑटोमायडीन औषध व विद्युतशास्त्र यातील २०० शोधांचे जनक आहेत. शिवाय ४० शोधांचे त्यांनी पेटंट घेतले होते. मात्र आज त्यांचा आणि त्यांनी लावलेल्या या महत्वाच्या शोधांचा भारताला विसर पडला आहे.

डॉ. शंकर आबाजी भिसे यांचा जन्म २९ एप्रिल १८६७ रोजी मुंबईत एका मॅजिस्ट्रेटच्या घरात झाला. आताच्या सारखी त्याकाळी सुद्धा लोकांची इच्छा असायची की, आपलं पोरं शिकून सावरून सरकारी नोकरीला लागावी. पण पुढे जाऊन शंकर एक महान शास्त्रज्ञ होईल याची कुणी कल्पनाही केली नव्हती.

त्यांना लहानपणापासूनच विज्ञानाची प्रचंड आवड होती. वयाच्या १४ व्या वर्षीच त्यांनी घरातच कोळशापासून गॅस बनवणारे उपकरण तयार केल होत. १६ वर्षी त्यांनी संशोधन अभ्यासासाठी इंग्लड किंवा अमेरिका जाण्याचा निर्णय घेतला. त्याकाळात त्यांनी मुंबईत एक साइंटिफिक क्लब उघडला होता. २० व्या वर्षापर्यंत ते गॅजेट आणि मशीन बनवत होते, ज्यात टंपर प्रूफ बॉटल, इलेक्ट्रॉनिक सायकल कॉन्ट्रासेप्शन्स, मुंबई उपनगरीय रेल्वे प्रणालीसाठी एक स्टेशन संकेतकचा समावेश होता.

लहान असताना एकदा ते साखर आणायला किराणा दुकानात गेलेले, त्यावेळी दुकानदाराने वजनात लबाडी करून साखर कमी दिल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यांनी त्याबद्दल दुकानदाराला विचारले असता,

‘तुला माझ्या वजनाच्या काट्यावर विश्वास नसेल ऑटोमॅटिक वजन करणारे यंत्र शोधून काढ’

असे खोचकपणे उत्तर दुकानदाराने दिले. तेव्हा ठामपणे शंकररावाने त्याला म्हणाले,

‘एक ना एक दिवस तुला असे यंत्र देईनच’

याच सुमारास त्यासाठी त्यांच्याकडे संधी चालून आली. १८९० मध्ये ब्रिटिश इन्व्हेंटर्स जनरल द्वारा आयोजित एका स्पर्धेबद्दल त्यांनी ऐकले, ज्यात ऑटोमॅटिक वजन करणारे यंत्र बनवायचे होते. स्पर्धेच्या आधी एक दिवस वजन यंत्र बनवण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात आली. त्यांनी तशी डिझाइन बनवून पाठवली आणि आश्चर्य म्हणजे सगळ्या ब्रिटिश स्पर्धकांना हरवून त्यांनी स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला. तेव्हा यंत्र त्यांनी आवर्जून त्या किराणा दुकानदाराला दाखवलं. हा त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला.

यानंतर या भारतीय आविष्कारकाने बॉम्बे प्रशासनाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. त्यांनी भिसेंना लंडनमध्ये जाऊन गुंतवणुकदार शोधण्यासाठी मदत केली. त्यावेळी त्यांनी संकल्प केला, ‘जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत मी घरी परत येणार नाही, खिशातील शेवटच्या पाउंड पर्यंत खर्च करेल.’ ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मुंबईतील सचिव दिनशा वाचा यांचे लेटर ऑफ इन्ट्रोडक्शन घेऊन लंडनला पोहचले. तिथे उत्तर लंडन मध्ये त्यांनी एका प्रयोगशाळेत काम करण्यास सुरुवात केली.

त्यांनी डिजिटल साईनबोर्ड, किचन गजेट, टेलिफोन, डोकेदुखी ठीक करणारे एक डिव्हाईस, ऑटोमॅटिक फ्लश होणारे टॉयलेट असे शोध लावले. यात भिसेंनी सगळ्यात महत्वाचा शोध लावला तो म्हणजे प्रिंटिंग मशीनचा.

तसा प्रिंटिंग मशीनचा शोध पूर्वीच लागला होता, पण ते फार संथ गतीने काम करायचे. जे एका मिनिटाला फक्त दीडशे अक्षरांची जुळणी करायचं. त्याच आधुनिकीकरण करून गती वाढवण्यासाठी अनेक वैज्ञानिक आणि संशोधन क्षेत्रात नाव कमावलेल्या संस्थांनी प्रयत्न केला मात्र कुणालाच त्यात यश आलं नाही. शेवटी मराठमोळ्या शंकर भिसेंनी आपले सारे लक्ष पणाला लावून आणि अथक परिश्रमातून काही वर्षातच मिनिटाला बाराशे अक्षरांची जुळणी सहजरित्या करू शकणारी प्रिंटिंग मशीन बनवून सगळ्या जगाला थक्क करून सोडले.

शंकर भिसे आपण लावलेले शोध व संशोधन क्षेत्रात केलेलं प्रत्येक कार्य ते दादाभाई निरोजीना जाऊन सांगत असत. ही प्रिंटिंग मशीन बनवली तेव्हा दादाभाई भिसेंना म्हणाले, यात अधिक पैसा लावणाऱ्या गुंतवणुकदाराची गरज आहे. तेव्हा त्यांनी आपला मित्र आणि ब्रिटन समाजवादाचा जनक हॉनरी हिंडमॅन यांच्याकडे पाठवलं.

हिंडमॅन एक प्रसिद्ध व्यापारी होता, ज्याचे प्रिंटिंग उद्योगात चांगले संबंध होते. त्यांनी भिसोटाईपसाठी १५ हजार पाउंड जुळवण्याचं वचन दिलेलं. हिंडमॅनने वचन दिल्याने त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवत भिसेंनी प्रिंटिंग क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी लिनोटाईपची एक ऑफर नाकारली. कंपनीने भिसोटाईप विकत घेण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला होता. मात्र १९०९ मध्ये हिंडमॅनला भिसेंसाठी पैसे जमवणे अशक्य झालं होतं. तेव्हाच दादाभाईचे फंड सुद्धा संपत आल होतं. शेवटी १९०८ मध्ये फंड संपल्याने नाईलाजाने भिसेंना आपलं काम सोडून मुंबई परतावे लागले. ते आपल्या संकल्पानुसार ‘शेवटचा पाउंड खर्चूनच परतले होते.’

भिसेंनी विद्युत शास्त्रातही बरच प्रयोगत्मक संशोधन केल.

त्यांनी ‘स्वयंचलित आगामी स्थानदर्शक’ यंत्र बनवलं होत, ज्यामुळे येणाऱ्या पुढच्या स्टेशनचे नाव प्रवाशांना आपोआप कळणार होते. मात्र एका भारतीयाने शोध लावला म्हणून ब्रिटिश रेल्वे कंपनीने ते यंत्र वापरण्यास नकार दिला.

सध्या सौरऊर्जेवर चालू शकतील अशा कारचा विषय चर्चेत आहे, याची मूळ कल्पनाही डॉ. शंकर आबाजी भिसे यांचीच !

जागतिक दर्जाच्या ‘हु इज हु’ या संदर्भग्रंथात ‘भारताचा एडिसन’ म्हणून भिसेंना गौरविण्यात आले. तेव्हा २३ डिसेंबर १९३० रोजी भिसेंनी आपले आदर्श असलेल्या थॉमस अल्वा एडिसन यांची त्यांच्या प्रयोगशाळेत भेट घेतली. अमेरिकेतील ‘हु इज हु’ मध्ये समावेश झालेले भिसे हे पहिलेच भारतीय.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.