मंदिरातल्या निर्माल्याचे प्रोडक्ट्स बनवून मैत्री, देशाची ‘रिसायक्लिंग हीरो’ बनलीये

पूर्वी शाळेत एक टाइमपास विषय असायचा. टाकाऊ पासून टिकाऊ गोष्टी बनवण्याचा. खरं, विषय तसा महत्वाचाच असायचा पण आपण तो टाइमपासमध्येच घ्यायचो.

रद्दी वापरुन कागदी वस्तु बनवणं, जुन्या प्लॅस्टिकच्या डब्यात झाड लाऊन त्या डब्याला रंगरंगोटी करणं, आइसक्रीमच्या कांड्या जमवून, त्यांचा पेन्सिल स्टँड बनवणं हे सगळं शाळेत सोप्पं आणि हवं हवंसं वाटायचं… पुढे करियर टिकवता टिकवता, टिकाऊ गोष्टी बनवणं मागे पडलं आणि कला-कौशल्यही मागे पडलं. असो…

पण अजून एक गोष्ट ह्या टाकाऊ गोष्टींमध्ये असायची ते म्हणजे निर्माल्य.

आता आई, त्या निर्माल्याला टाकाऊ किंवा टाकण्याची वस्तू म्हणू द्यायची नाही तो भाग वेगळा. आणि म्हणूनच, ‘निर्माल्य’ हा शब्द.

ह्या निर्माल्याचं म्हणजेच बाप्पाला वाहिलेल्या फुलांचं विसर्जन केलं जाई.

थोडक्यात म्हणजे ह्या निर्माल्याचाही, ‘उपयोग’ अॅज सच काहीच नव्हता, रादर त्यावेळी तो आपल्याला करून घेता येत नव्हता.

पण याच निर्माल्याच्या आधारावर सूरतची एक, २२ वर्षीय तरुणी मात्र हजारो रुपये छापतेय.

ह्या २२ वर्षीय तरुणीचं नाव आहे मैत्री जरिवाला.

मैत्री, केमिकल इंजिनियरिंगची स्टुडंट आहे. कॉलेजच्या फायनल इयरला असताना एका प्रोजेक्टनिमित्त मैत्रीने एकदा मंदिरात देवाला वाहिलेल्या फुलांचं आणि हारांचं निर्माल्य उचलून घरी आणलं होतं आणि त्यावर तिला काहीतरी प्रयोग करायचा होता.

हा प्रयोग करत असतानाच तिला एक भन्नाट बिझनेस आयडिया सुचली.

आता देवाला वाहिली जाणारी ही फूलं… फार फार तर सात ते आठ तासांचं त्यांचं आयुष्य… पण मैत्रीने आपल्या संकल्पनेतून त्या फुलांचा, फक्त शोभा म्हणून नाही तर अजूनही खूप प्रकारे उपयोग करून घेता येऊ शकतो हे दाखवून दिलं.

एका मुलाखतीत मैत्री सांगते, की “एका प्रोजेक्टसाठी म्हणून मी ह्या कन्सेप्टवर काम करायला सुरवात केली होती पण आज नऊ जणांना पगार देऊ शकतेय इतका हा स्टार्टअप बिझनेस मी मोठा करू शकलीये आणि मला अजूनही खूप काम करायचंय.”

ह्या प्रोजेक्टची सुरवात करताना मैत्रीला तिच्या कॉलेज मधूनही बराच सपोर्ट मिळाला होता. सुरवातीला मैत्रीने एका मंदिरापासून सुरवात केली, पण नंतर हळू हळू, जस-जसं ह्या प्रोजेक्टचं रूपांतर बिझनेसमध्ये व्हायला लागलं तस-तसं जास्त फुलांची गरज भासायला लागली.

मग मैत्रीने रीतसर परवानगी घेऊन शहरातल्या पाच मंदिरांसोबत डिल केलं..

ह्या पाच मंदिरातलं निर्माल्य आता डायरेक्ट मैत्रीच्या घरी डिलिव्हर होतं. त्यानंतर मैत्री आणि मैत्रीची टीम त्या फुलांचं व्यवस्थित सॉर्टीग करून त्यापासून वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार करते. 

वेगवेगळे प्रोडक्ट्स म्हणजे कोणते तर परफ्यूम्स, मेणबत्त्या, अगरबत्ती, साबण, होळीचे रंग आणि असे अनेक सुगंधी आणि नैसर्गिक प्रोडक्ट्स या निर्माल्याच्या फुलांपासून बनवले जातात.

आता तुम्ही म्हणाल की ह्यात विशेष असं काय? फुलांपासून हे असे प्रोडक्ट्स वर्षानूवर्ष बनवले जातायत, पण ह्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, मैत्री हे सगळे प्रोडक्ट्स फुलांपासून नाही तर त्या फुलांचं निर्माल्य झाल्यानंतर त्या निर्माल्यापासून बनवतेय आणि तरीही एक नंबर क्वालिटी देतेय.

शिवाय मैत्री सगळा बिझनेस आपल्या घरातूनच चालवते, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळे प्रोडक्ट्स सुद्धा हाताने बनवले जातात, म्हणजेच हँडमेड आहेत आणि हे प्रोडक्टस बनवण्यासाठी कोणत्याही मशिनरीचा वापर केला जात नाही.

मैत्री हा बिझनेस ऑनलाइन चालवते. ‘Begin With Flowers’ नावाचं त्यांचं पेज आपल्याला फेसबुकवर पाहायला मिळतं.

मैत्रीला २०२१ साली सरकारकडून ‘रिसायक्लिंग हीरो’ हा पुरस्कारही मिळाला होता आणि त्यामुळे काम सुरू केल्यानंतर पहिल्याच वर्षात, तिच्या कामाची तिला पोचपावतीही मिळाली.

अवघ्या २२ वर्षांची मैत्री आज महिन्याला ४० ते ५० हजार रुपये सहज कमावते आणि शिवाय अनेकांना रोजगारही उपलब्ध करून देते.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.