शिवमणीचं ड्रम वादन म्हणजे हान की बडिव न् धुरळा उडिव….
असच यु ट्युब चाळत असताना एक माणूस ड्रम वाजवत होता. डोक्याला लाल रुमाल, डोळ्यांवर काळा गॉगल, गळ्यात जाडसर चेन आणि त्याच्या हातांमध्ये गरगर करत फिरणाऱ्या स्टीक्स. म्हणजे एखादा अट्टल माणूसच हे करू शकतो की हातांमध्ये स्टीक्स फिरवून अदाकारी करून दाखवतोय सोबतच इतक्या फास्ट टेम्पोलासुद्धा तो वाजवताना मिस करत नाहीये. मग उत्सुकता वाढली म्हणून अजून त्याला सर्च केलं तर हा भिडू म्हणलं आपल्या ओळखीचा आहे.
हा पानापासून ते कानापर्यंत वाजवणारा भिडू होता शिवमणी.
आता वर म्हणलो खर की ओळखीचा आहे तर याला आपण पाहिलं होतं टिव्हीवर चेन्नई सुपर किंग्जची मॅच चालू असताना. शिवमणी हा आयपीएलमध्ये सीएसके साठी चिअर करायचा. लोकं मॅच कमी आणि या शिवमणीचं वादन जास्त पाहायचे, कारण त्याचं वादन कौशल्य अफाट आहे. पण हा शिवमणी फक्त ड्रम वादन इथपर्यंत मर्यादीत नाही त्याच्या वादन कलेचे खतरनाक किस्से आहेत, जरा डीटेलमधे जाऊन माहिती करून घेऊ.
शिवमणी यांचं नाव आहे आनंदन शिवमणी, 1959 चा त्यांचा जन्म.
वडील एस एम आनंदन हे चेन्नईमधले प्रसिद्ध ताल वादक होते. पण वडिलांची इच्छा अजिबात नव्हती की पोरानं बापाला फॉलो करावं म्हणुन त्यांनी शिवमणीला सांगितलं की कला हा भिकार धंदा असतो आज पोटभर मिळतं तर उद्या उपाशी राहावं लागतं म्हणून दुसरं काम कर.
पण पोरगं पण डेंजर होतं. वयाच्या अकराव्या वर्षापासून शिवमणी यांनी ड्रम वाजवायला सुरुवात केली होती. ड्रम, ऑक्टोपॅड, डारबुका, झेंबे, ताशा, उडूकाई, कंजिरा ही वाद्य आणि अशी जितकी तालवाद्य आहेत ती सगळी शिवमणी एकत्र वाजवतात.
एका शो मध्ये वाजवत असताना शिवमणी यांच्यावर नजर पडली ती महागायक एस पी बालासुब्रमण्यम यांची.
बालासुब्रमण्यम यांनी त्याची अदाकारी हेरली आणि त्याला मुंबईत ये म्हणून सांगितलं. पुढे वादनाचे सुरवातीचे प्रयोग कर्नाटक मधल्या मातब्बर ताल वादकांसोबत वाजवल्यावर शिवमणींचा कॉन्फिडन्स अजूनच वाढला. वाजवण्याचं वेड काय लेव्हलचं असतं ते फक्त या माणसाकडे बघून कळत, वाद्य हे म्हणजे शिवमणी यांच्यासाठी खेळणं आहे , कुठलही वाद्य द्या हा माणूस तुम्हाला मंत्रमुग्ध करून टाकतो.
एक किस्सा आहे शिवमणी यांचा की एकदा ते हॉटेलमधे जेवायला गेले.
आणि सहज म्हणून ते हॉटेलच्या किचनमध्ये शिरले आणि हॉटेलच्या मालकाला वाटलं की काहीतरी स्पेशल रेसिपी ते बनवत असणार पण बराच वेळ बाहेरच आले नाही आणि जे कस्टमर हॉटेलमधे आलेले होते त्यांच्या ऑर्डरही आल्या नव्हत्या.
म्हणून मालक किचनमध्ये गेले तर तिथ वेटर पासून ते कुक पर्यंत सगळे जण शिवमणी यांच वादन पाहत होते. तिथंच भट्टी म्हणू नका, ओरगळे, चमचे, प्लेट्स सगळं हा माणूस वाजवत होता म्हणजे काय सीन असेल तो.
पूढे हे वाजवण्याच वेड दस्तुरखुद्द झाकीर हुसेन यांना सुद्धा अवाक करून गेलं. मुंबईच्या एका शो मध्ये झाकीर हुसेन यांनी मोठ्या सन्मानाने शिवमणी यांना स्टेजवर वादन करायला बोलावलं होतं.
इथूनच रेहमानच्या नजरेत शिवमणी भरले आणि छैय्या छैय्या गाण्याच्या रिदमसाठी बोलावणं आलं. रेहमान सोबत बरीच कामं शिवमणी यांनी केली. धोनी पासून ते रेहमान पर्यंत सगळीच जनता शिवमणी यांची फॅन होती आणि अजूनही आहे.
सगळ्या वस्तू, गोष्टी यामध्ये संगीत आहे, माझ्या मनगटात असलेली जादू मला लहानपणीच कळली होती आणि तिचाच वापर करून मी आज माझी कला सादर करतो.
एका मुलाखतीत तर शिवमणी सांगतात की माझं वाद्यांवर इतकं प्रेम आणि श्रद्धा आहे की मनात आलं तर तुमच्या काळजाचे ठोके मी माझ्या ड्रमवर वाजवू शकतो……!
हे ही वाच भिडू :
- शोले पिक्चरमधल्या रहीम चाचाने ब्रिटिशांविरोधात बंड केलं अन २ वर्षाचा तुरुंगवास भोगला
- राजा हिंदुस्थानीच्या गाण्यावर बँजो वाजवून जगभर फेमस झालेले उस्ताद नुर बक्ष बलोची…..
- सुलोचना चव्हाणांना कोरस द्यायला आलेल्या प्रल्हाद शिंदेंच्या आवाजाने दिमड्या फुटल्या होत्या….
- प्रल्हाद शिंदे यांच्या कव्वालीने चढता सूरजचं मार्केट डाऊन केलं.