आजही कॉलेजच्या दूनियेसाठी दुनियादारी एक कल्ट सिनेमा आहे

प्रत्येक माणसाचं काहीना काही स्वप्न असतं. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याला खुप झगडावं लागतं. जेव्हा अनेक वर्ष मनात असलेलं स्वप्न पूर्ण होतं तेव्हा एक वेगळाच आनंद त्याला मिळतो.

असंच एक स्वप्न पाहिलं होतं दिग्दर्शक संजय जाधवने. जेव्हा ते स्वप्न साकार झालं तेव्हा त्यांना मिळालेलं समाधान हे काही औरच होतं. हे स्वप्न होतं ‘दुनियादारी’चं.

इंजिनीयरींगला शिकत असताना संजयने सुहास शिरवळकर यांची ‘दुनियादारी’ कादंबरी वाचली होती. तेव्हाच त्याच्या मनात ‘यावर सिनेमा झाला तर तो भारी होईल’, हा विचार डोक्यात आला. कालांतराने मनातला हा विचार तोच पूर्ण करेल हे संजयच्या डोक्यातही नसावं. संजयने सिनेमेटोग्राफर म्हणुन काम करायला सुरुवात केली. तो सिनेमेटोग्राफर म्हणुन स्थिरस्थावर होत होता.

तेव्हा त्याच्या मनात पुन्हा ‘दुनियादारी’ वर काहीतरी करण्याचा विचार डोकावला. 

संजय यासाठी ‘दुनियादारी’ कादंबरीचे लेखक सुहास शिरवळकर यांच्या घरी भेटायला गेला. तेव्हा त्याला कळालं की कादंबरीचे काॅपीराईट्स दुस-याने विकत घेतलेत. आणि यावर एक मालिका येतेय. हे समजल्यावर संजयचं ‘दुनियादारी’ करण्याचं स्वप्न तेव्हा बाजुला राहिलं. संजयने नंतर ‘चेकमेट’, ‘रिंगा रिंगा’ सारखे सिनेमे दिग्दर्शित केले.

हे दोन्ही सिनेमे चांगले असुनही लोकांचा प्रतिसाद इतका मिळाला नाही. ‘आपण पुढची फिल्म लोकांना आवडेल अशी बनवली पाहिजे’, असा हेतु मनात ठेऊन संजयच्या मनात पुन्हा ‘दुनियादारी’चा विषय घोळु लागला. 

यासाठी तो सुहास शिरवळकरांची भेट घेणार, तोच त्यांचं निधन झालं. यानंतरही ‘दुनियादारी’ वर सिनेमा बनवण्याची संजयची इच्छा प्रबळ झाली होती. ‘दुनियादारी’ ची सर्व टीम ठरली. सिनेमाचं शुटींग लवकरच सुरु होणार होतं. ‘दुनियादारी’ हा खासकरुन मैत्रीचा सिनेमा. सिनेमातले काही कलाकार अगदी नवीन होते. स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी हे मात्र आधीपासुन सिनेमांमध्ये अभिनय करत होते. त्यामुळे नवीन कलाकार आणि अनुभवी कलाकरांची शुटींग सुरु होण्याआधी मैत्री होणं सिनेमासाठी आवश्यक होतं. सर्व कलाकारांसाठी एक वर्कशाॅप ठेवण्याची कल्पना संजयच्या डोक्यात आली. 

अभिनेते संजय मोने यांच्या मार्गदर्शनाखाली ८ दिवसांचं वर्कशाॅप ठेवण्यात आलं.

या वर्कशाॅपमध्ये वेगवेगळे खेळ, उपक्रम यांद्वारे कलाकारांची एकमेकांना ओळख झाली. त्यांच्यातली मैत्री वाढु लागली. या वर्कशाॅपमध्ये संजय मोने यांनी सर्वांना एक अंडं दिलं. या अंड्यावर त्यांनी एका मार्कर पेनाने स्वतःची सही केली. पुढचे ८ दिवस वर्कशाॅपला येताना हे अंडं न फोडता सर्वांनी सोबत घेऊन यायचं. जर कोणाकडुन फुटलं, तर त्याला मोने जो सांगतील तो दंड भरावा लागेल. 

काही कलाकार ट्रेनने प्रवास करत होते. या प्रवासात अंडं न फोडता रोज कसं आणायचं, हि समस्या त्यांच्यासमोर निर्माण झाली. काही जणांनी तर अंडं फुटू नये म्हणुन खास वेगळा बाॅक्स वगैरे तयार केला. मोनेंचा अंडं देण्यामागचा उद्देश हा होता की, वर्कशाॅपचे तीन तास कलाकार जे काही करतील ते त्यांना बाकीच्या २१ तासांमध्ये अंड्याच्या निमित्ताने सतत आठवत राहिलं पाहिजे. 

या वर्कशाॅपचा कलाकारांना शुटींगसाठी खुप फायदा झाला. त्यांची वर्कशाॅमधली मैत्री सीनमध्ये पुरेपुर दिसत होती. संजयच्या मनात ‘दुनियादारी’ ला थोडासा रेट्रो लूक द्यायचा होता. अभिनेत्री हर्षदा खानविलकरने सर्व कलाकारांच्या वेशभुषेची जबाबदारी स्वीकारली.

सर्व कलाकारांमध्ये जितेंद्र जोशीला त्याचा सीन जास्त चांगल्या प्रकारे समजवायला लागायचा. 

यामागचं कारण असं, जितेंद्र जोशीने सिनेमात साईनाथ हि व्यक्तीरेखा साकारली होती. साईनाथ हा थोडा विचित्र वागणारा. अगदी सिनेमातला खलनायक म्हणावा असा. त्याच्या डोळ्यात नेहमी एका प्रकारची वखवख असते. कोणत्यातरी गोष्टीची आसक्ती असते. जितु प्रत्यक्ष असा नसल्याने संजय शुटींग करताना जितुला त्याचा सीन सविस्तर सांगायचा.

एकदा कोणीतरी माणुस ‘अरे वो नितु सिंग, ॠषी पकुर का पिक्चर देखा क्या?’ असं म्हणाला. ॠषी कपुरचं नाव घेण्यात त्याने चुक केली होती. संजयच्या डोक्यात हा किस्सा होता. त्याने जितुला सांगीतला. जितुने एका सीनमध्ये त्याच्या खास अंदाजात ‘ये ॠषी पकुर’ हि हाक स्वप्नीलला मारली. आणि हे सर्वांना आवडलं. 

सिनेमात एकुण ४ गाणी. प्रत्येक गाण्याच्या मूडनुसार संजयने वेगळा संगीतकार नेमला होता. समीर सप्तीसकरने ‘जिंदगी जिंदगी’ हे खास मैत्रीवर आधारीत गाणं बनवायचं ठरललं. सचिन पाठकने शब्द लिहिले. हे ऐकल्यावर संजय जाधवचे साहाय्यक दिग्दर्शक वैभव चिंचाळकर यांना एक कल्पना आली. ‘हे गाणं मैत्रीवर आहे मग आपण सुद्धा आपल्या मित्रांकडुन हे गाणं गाऊन घेऊया’, अशी त्यांची कल्पना होती. संजयला सुद्धा पटलं.

‘जिंदगी जिंदगी’ गाण्यासाठी पॅडी कांबळे, सिद्धार्थ जाधव पासुन सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर असे एकुण ११ सेलिब्रिटी स्टुडिओत आले.

सर्वांनी हे गाणं गायलं. ‘देवा तुझ्या गाभा-याला’ गाण्यासाठी गीतकार मंदार चोळकरसह संजय जाधव ६ तास गाणं पूर्ण लिहुन होईपर्यंत त्याच्यासोबत होता. सोनु निगमने गायलेलं ‘टिक टिक वाजते डोक्यात’ हे गाणं तर खुपजणांची त्यावेळेस काॅलरट्युन असावी. 

‘दुनियादारी’ एडिट वगैरे होऊन पूर्ण झाला. सर्वांनी तो बघितला. सिनेमा पाहताच जितु जोशी बोलुन गेला,’मुलगा मेरीट मध्ये येणार हे नक्कीच. पण किती मार्कांनी येईल हे सांगता यायचं नाही.’ सिनेमाविषयी जितुचं हे भाकीत ऐकुन सर्वांनाच हायसं वाटलं.

१८ जुलैला संजयच्या वाढदिवसाला प्रिमियर झाला. १९ जुलै २०१३ ला ‘दुनियादारी’ संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. 

१९ तारखेला संजय पुण्याला जात होता. तेव्हा पनवेलजवळ त्याला जवळपास १५ फोन होऊन गेले. हे फोन महाराष्ट्रातल्या विविध भागांतुन आले होते. ‘दुनियादारी’ ला मस्त प्रतिसाद मिळतोय तसेच पुढच्या तीन दिवसांचं बुकींग हाऊसफुल्ल आहे, असं फोनवरची माणसं सांगत होती. एका माॅलजवळ संजयने गाडी थांबवली आणि त्याच्या डोळ्यातुन पाणी आलं.

‘दुनियादारी’च्या शुटींगदरम्यान संजयच्या बाबांचं निधन झालं होतं. आई आजारी होती. पण स्वतःची दुःख बाजुला सारुन संजयने ‘दुनियादारी’ पूर्ण केला. इतकी वर्ष उराशी जोपासलेलं त्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं. त्यामुळे स्वप्नपूर्तीचा आनंद आणि समाधान या दोन्ही भावना डोळ्यांतुन ओघळणा-या अश्रुंद्वारे व्यक्त होत होत्या. 

मैत्री, प्रेम, विरह, काॅलेज जीवन दाखवणारा ‘दुनियादारी’ आजही प्रत्येकाच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करुन आहे. 

  • देवेंद्र जाधव

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.