आले किती गेले किती संपले भरारा. PSI, STI साठी अजूनही आहे ‘तात्यांच्या ठोकळ्याचा’ दरारा 

भावा सकाळ सकाळ काय विषय काढलाय, तात्याचा ठोकळा. पोरंग IPS होवूदे नाहीतर PSI पण आयुष्यात कधीना कधी त्याने हे पुस्तक हातात नक्कीच घेतलेलं असतय. PSI, STI करणाऱ्यांच तर हे पुस्तक पहिलं प्रेम राहिलं. तस या पुस्तकाला पुस्तक म्हणणं देखील पाप असतय पाप. 

या पुस्तकाला ठोकळाच म्हणणं हे शास्त्र आहे. 

या ठोकळ्यावर पोह्यांचे डाग पडले, याच ठोकळ्यात मैत्रीणींच शेवटच लव्हलेटर लपवून ठेवलं, याच ठोकळ्याला लायब्रेरीचा तो कुबट वास राहिला, याच ठोकळ्याला शेवटचं दाभण घेवून शिवण्यात आलं. पास व्हायला वेळ लागला पण अखेरपर्यन्त ठोकळा सोबत राहिला. नापास झाला तरी हा ठोकळा घरातून बाहेर गेला नाही.

माणसं म्हणतात, स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासातून तूम्ही काहीना काही शिकताच. आम्ही शिकलो प्रेम करायला. तात्याचा ठोकळा हेच आमचं पहिलं प्रेम राहिलं. 

तात्यांचा ठोकळा म्हणजे एकनाथ तात्यांच PSI, STI, ASO मार्गदर्शक असणारं पुस्तक. २००३ साली हे पुस्तक पहिल्यांदा बाजारात विक्रीसाठी आलं. त्या दिवसांपासून आजचं सांगायचं झालं तर लाखोंच्या प्रतींसह पुस्तक २७ व्या आवृत्तीत आहे. २००८-०९ साली या पुस्तकांच्या १८ ते २० हजार प्रती खपल्या. लाखोंच्या संख्येत ठोकळा खपलाच नाही तर त्याने अधिकारी अडवले. अगदी शेताच्या बांधावर बसून पोरं अधिकारी झाले. 

ही गोष्ट आहे एकनाथ तात्यांची आणि त्यांच्या ठोकळ्याच्या निर्मीतीची.  

हे पुस्तक लिहिणारे लेखक म्हणजे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येकाचे तात्या. त्यांचं नाव एकनाथ पाटील. मूळ जन्मगाव कारवे. ता. चंदगड. जी. कोल्हापूर. आईवडील शेतकरी. चार भावंड. त्यामध्ये सगळ्यात लहान तात्या. शाळेत पहिल्यापासून चारी भावंड हुशार. सर्वांचा पहिला नंबर यायचा. त्यामुळे आईवडील अडाणी असले तरी त्यांनी मुलं शिकली पाहिजेत नोकरीला लागले पाहिजेत या ध्यासातून आम्हाला इथपर्यंत पोहचवल अस तात्या सांगतात.

१० वी पर्यंतचे शिक्षण चंदगडला पूर्ण करून कोल्हापूरला ११ वी आणि १२ पूर्ण केली. तिथेच बीएससी पर्यंतचे शिक्षण घेतले आणि पुढे कर्नाटकमधील धारवाड विद्यापीठातून प्राणिशास्र विषयात एमएससी पूर्ण केली. 

परंतु आपल्याला जगावेगळं काहीतरी करायचंय ही भावना काही शांत होत नव्हती. त्यानंतर कोल्हापूरला आलो आणि पत्रकारितेला प्रवेश घेतला. त्या काळात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू होता. त्यावेळी तरुण भारत या दैनिकात उपसंपादक म्हणून काही काळ कामही केले. आणि २००० ला क्लासवनसाठी परीक्षा दिली.

थोडक्यात अपयश आले. त्यानंतरही प्रयत्न चालू ठेवले आणि २००३ ला एसटीआय परीक्षेतून मुंबई येथे माजगावला विक्रीकर अधिकारी म्हणून नोकरी लागली. 

मात्र, आतून जे समाधान वाटायला हवे ते समाधान काही वाटत नव्हते. आपण काहीतरी वेगळं करू ही भावना शांत बसू देत नव्हती…

नोकरी लागून अवघे सात-आठ दिवस पूर्ण झाले होते. पण एका रात्री झोपच येत नव्हती. आपल्याला पुस्तक लिहायचय या बाजूने सगळा विचार केला. ते कसं होईल, चालेल का?, विध्यार्थ्यांना आवडेल का?, या सगळ्या बाजूने रात्रभर विचार केला. 

आणि सकाळी पहाटेच मुंबई सोडली आणि कोल्हापूर गाठलं. 

आपण अधिकारी होण्यासाठी ज्या ठिकाणी अभ्यास केला त्याच ठिकाणी जाऊन पुस्तक लिहायचं या विचाराने सकाळी विद्यापीठ सुरू झालेकी ग्रंथालय गाठले आणि सुरू झाली आज सर्वांच्या मनात बसलेल्या तात्यांच्या ठोकळ्याची कहाणी. 

इतक्या झपाटल्यावाणी ही लिखाण प्रक्रिया सुरू होती की अवघ्या ६८ दिवसांत २००३ ला एकनाथ पाटील (तात्या) पीएसआय मार्गदर्शन (आजचा ठोकळा) याची पहिली आवृत्ती निघाली. त्यावेळी पीएसआय पदासाठी ३५० ते ४०० जागा असायच्या. मात्र यातील तितका अंदाज नसल्याने ७०० ते ७५० प्रति काढत असू. मात्र, स्पर्धा परीक्षांत आपल्या पुस्तकाची गरज, त्यामधील अडचणी लक्षात घेऊन प्रत्येक आवृत्तीला प्रतींची संख्या वाढत गेली.

यातही पुस्तकाच्या विक्रीने वेग घेतला तो २००८/९ ला या वर्षात सुमारे १८  ते २० प्रति निघाल्या. आणि या पुस्तकाची उपयोगिता कायम असल्याने आजही त्याच्या २० हजार प्रति काढतो. आता त्याची २६ वी आवृत्ती असून लवकरच २७ वी आवृत्ती येणार आहे. हे फक्त बारकाईने प्रश्न आणि त्याचे उत्तर आपण या पुस्तकात दिल्याने होत आहे…

या पुस्तकाला ठोकळा का म्हणतात ? 

याबद्दल त्यात्या सांगतात पुण्यातील आणि मुंबईतील मुलांनी या पुस्तकाची जशी जाडी वाढत जाईल तसे याला तात्यांचा ठोकळा म्हणायला सुरवात केली. एकदा मुंबईतील नामांकित प्रकाशनाचा तात्यांना फोन आला. की, तात्यांचा ठोकळा या पुस्तकाच्या काही प्रति पाठवा. तर तात्या त्यावर त्यांना म्हणाले अहो पीएसआय मार्गदर्शक आहे ठोकळा नाही आमच्याकडे. तर, ते प्रकाशक म्हणाले अहो हे मार्गदर्शक राहुद्या तो ठोकळा पाठवा.

त्यावर तात्यांनी पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याला फोन केला आणि विचारले ही ठोकळ्याची काय भानगड आहे. त्यावर त्या मुलाने सांगितले की पीएसआय मार्गदर्शक या पुस्तकालाच आम्ही ठोकळा म्हणतो. तेव्हा तात्या हसले आणि पुन्हा त्या मुंबईच्या प्रकाशकला फोन केला आणि हकीगत सांगून पाच हजार ठोकळ्याच्या प्रति त्यांना पाठवल्या.

आणि विशेष म्हणजे ज्या दिवशी या पुस्तकाची ठोकळा म्हणून ओळख झाली तेव्हा पुस्तकावरच एकनाथ पाटील पीएसआय मार्गदर्शक (तात्यांचा ठोकळा) असे नामकरण केले. 

तेव्हा त्या पुस्तकाची एकाच दिवशी ९७ हजार प्रतींची विक्री झाली. हा या पुस्तकाचा मोठा उचांक ठरला.

२००३ ला निघालेली पहिली आवृत्ती आज २६ व्या आवृत्तीपर्यंत आली आणि पुस्तकाची आजपर्यंतची विक्री साडेसात ते आठ लाखांच्या घरात पोहचलीये. याचं पुस्तकावर ग्रामसेवकपासून कलेक्टर पर्यंत सर्व मुलांनी आपले यश प्राप्त केले आहे. आजही तोच दर्जा कायम राखल्याने पुस्तकाचा खप कसलाही कमी झालेला नाही. नपेक्षा तो वाढला आहे.

या पुस्तकाची मागणी आणि स्पर्धा परीक्षेच्या इतर पुस्तकांची निर्मितीचा व्याप पाहता त्यात्यांच्या सौभाग्यवती अपर्णा पाटील यांनी स्वतःची प्राध्यापकाची नोकरी सोडली आणि त्या तात्यांनी सुरू केलेल्या स्पर्धाविश्व प्रकाशनाच्या प्रकाशक म्हणून त्या काम करतात आणि तात्या लेखक म्हणून कार्यरत आहेत. 

तात्या सांगतात आईवडील २००८ ला वारले. गावी मोठे भाऊ आणि वहिनी आहेत. आम्हाला साडेपाच एकर शेती आहे ती बंधू सांभाळतात. माझे कुटुंब पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असे आहे. मला फिरण्याची मोठी आवड असल्याने जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी आवडीचे देश फिरतो. जग फिरण्याची इच्छा आहे. त्यामध्ये १४ देश फिरून झाले आहेत.

त्यामध्ये मलेशिया, इंडोनेशिया, हाँगकाँग, दुबई, रशिया, स्विझरलँड, मलेशिया, शिंगापूर इ देश आहेत. आज मी कलेक्टर, आयुक्त असतो परंतु काबाड कष्ट करणाऱ्या गोरगरीब शेतकऱ्यांची लाखो लेकरं आपल्या पुस्तकावर अधिकारी झाले याचे मोठे समाधान आहे. आजही माझ्या प्रकाशन संस्थेतून कसलाच वेळ मला मिळत नाही.

तरीही थोडा वेळ काढून मी मार्गदर्शन म्हणून भाषण करायला फिरतो. आणि होतंय तोपर्यंत या मुलांसाठी फिरत राहणार असेही तात्या सांगतात.

  • भिडू गणेश पोकळे 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.