महिलांसाठी देखील कंडोम असतात.. अव्वा, बव्वा करू नका शहाण्यासारखं विषय समजून घ्या..

आपल्या लहानपणी एक जाहिरात लागायची, कंडोम्स ची. हि जाहिरात लागली रे लागली की, आई काहीतरी काम काढून किचनमध्ये जायची तर बाबा पेपरमध्ये डोकं खुपसायचे नाही तर चॅनल बदलण्यासाठी रिमोटचा शोध घेतला जायचा.

तर जाहिरातीत ज्या प्रकारे कंडोम्सचं महत्व कमी अन इतर रोमँटिक सीन्सचा भरणा असायचा आत्ताही तीच परिस्थिती आहे. असो…

पूर्वीच्या तुलनेत, आता लोक लग्नानंतर लगेच बाळाचा विचार करत नाहीत. प्रॉपर प्लॅनिंग करूनच आजकालचे जोडपे बाळाचा चान्स घेतात. जेंव्हा ते आर्थिकरित्या आणि मानसिकरीत्या तयार असतील. त्याचवेळेला कंडोमचा वापर महत्वाचा ठरतो आणि सुरक्षितही ठरतो. मात्र याबाबत पुरुषांनी जागरूक असायला हवं हे तितकंच महत्वाचं आहे.

आता आजचा विषय कंडोमबद्दलचाच आहे मात्र पुरुषांच्या कंडोमबद्दल नाहीये तर महिलांच्या कंडोमबद्दल आहे. होय. वाचून थोडं बुचकळ्यात पडला असाल तर क्लीअर करते…

बायकांचेही कंडोम असतात.

महिलांसाठीही कंडोम बनविल्या जाण्याची सुरुवात अलीकडेच झाल्याचं कळतंय. तसेच फिमेल कंडोम खूप सेफ मानले जातेय त्यामुळे त्याचा अलीकडच्या काळात वापरही वाढल्याचं कळतंय. एवढं खोलात जाऊन सांगायची गरज नाही मात्र पुरुषांचे कंडोम आणि त्याची रचना अर्थातच स्त्रियांच्या कंडोम पेक्षा वेगळी असते. 

मेल कंडोम आणि फिमेल कंडोममध्ये काय फरक आहे?

असो याबाबत जास्त जर माहिती नसेल तर टेंशन नॉट…आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की या दोन्ही कंडोममध्ये काय फरक आहे?

HealthBytes: 5 reasons to use a female condom | NewsBytes

पहिली गोष्ट म्हणजे, बऱ्याच लोकांना माहितीच नाहीये कि मार्केटमध्ये फिमेल कंडोम्स आलेत. आणि ज्यांना माहितीये त्यांनी कदाचित ते हसण्यावर घेतलं असणारे. पण याची जाणीव आपण ठेवली पाहिजे कि, कंडोम ही अशीच एक गोष्ट आहे जी शारीरिक संबंधांमध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या संसर्गापासून वाचवते. मग ती लाज बाळगण्यासारखी कशी काय ठरते ?

असो तर फिमेल कंडोम तयार करण्यामागे साधं अन सरळ उद्दिष्ट म्हणजे महिलांच्या योनीमार्गात कोणत्याही प्रकारचा संसर्ग पसरू नये, त्यांनाही काही संसर्ग होऊ नयेपार्टनर ला देखील संसर्ग होऊ नये म्हणूनच फिमेल कंडोम तयार करण्यात आला आहे.

दोन्ही कंडोममधील फरक काय ?

मेल कंडोम लेटेक्स, पॉलीयुरेथेन, पॉलीसोप्रीनपासून बनवलेले असते जे तुमच्या लिंगामध्ये ताठरतेवेळी कव्हर केले जाते, थोडक्यात साईझनुसार त्याचा आकार वाढला जातो. 

तेच फिमेल कंडोम पॉलीयुरेथेन किंवा नायट्रिलपासून बनवले जातात, जे स्त्रियांच्या योनीचे संरक्षण करतात आणि नको असलेली गर्भधारणा टाळता येते.  फिमेल कंडोम पुरुषांच्या कंडोमसारखे छोटे नसतात तर फिमेल कंडोमची रचना विशिष्ट पद्धतीची असते.

त्याची रचना एका थैलीसारखे असते ज्याच्या आत दोन टोके असतात. या थैलीचे एक टोक बंद असते आणि दुसरे टोक उघडे असते. या दोन्हीवर २ रिंग आहेत ज्या तुम्ही तुमच्या योनीमध्ये सहज लावू शकता. आतील रिंग योनीच्या आत टाकावी लागते.

How to Use an Internal Condom

बर कंडोमचा इतिहास काय आहे ?

कंडोम च्या इतिहासाबद्दल दोन धारणा आहेत. पहिली बाजू मांडणाऱ्या इतिहासकारांच्या मते कंडोम चे नाव ‘डॉक्टर कंडोम’ वरून पडलेय. डॉक्टर कंडोमने सोळाव्या शतकात किंग चार्ल्सला मेंढीच्या लेदर पासून बनवलेले कंडोम दिले होते. 

तर काही इतिहासकारांच्या मते दुसरी बाजू जराशी वेगळी आहे. काही इतिहासकारांच्या मते फ्रान्समधील एका गुहेत जवळपास १३/१५ हजार वर्षांपूर्वीच्या चित्रकलेत कंडोम सारखे दिसणारे चित्र देखील बनवले गेले होते. मात्र त्याच्या अभ्यासावरून तरी नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी किंवा इतर कोणत्या कारणासाठी कंडोम वापरला गेला याची पुष्टी झालेली नाही. कंडोमच्या इतिहासाबाबतीत इतिहासकारांमध्ये भिन्नभिन्न मते आहेत.

हे सोडलं तर, मीडिया रिपोर्टनुसार इंग्लंडमधील डूडली कॅसल इथल्या उत्खननातून मध्ययुगीन इतिहासकालीन टॉयलेटमधून काही कंडोम सापडले. उत्खननात सापडलेले कंडोम हे जनावरांच्या आतड्यांपासून बनवले गेले आणि साधारण १६४६ च्या आसपास वापरले गेले होते हे निष्पन्न झाले आहे. 

दरम्यान रबरापासून बनवल्या गेलेल्या कंडोमचा शोध १८३९ मध्ये चार्ल्स गुडियार यांनी लावला. या शोधानंतर त्यांनी १८४४ मधे पेटंट देखील घेतले. काही वर्षानंतर अनेक कंपन्यांनी कंडोम्सचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली.

महिला आणि पुरुष कंडोम कसं वापरलं जातं ? 

जसे की, पुरुषांचे कंडोम तेंव्हाच वापरले जातात जेव्हा लिंग ताठर असते. पण महिलांच्या कंडोमची खासियत म्हणजे महिला सेक्सच्या खूप आधीच कंडोम लावू शकतात. 

असंही म्हंटलं जातं की, स्त्रिया त्यांच्या योनीमध्ये तब्बल ८ तास कंडोम सलग ठेवू शकतात.

आता प्रश्न पडतो की कोणता कंडोम सुरक्षित आहे ? 

पुरुषांचे कंडोम ९८% सुरक्षित आणि महिलांचे कंडोम ९५% सुरक्षित मानले जातात.  पुरुषांचे कंडोम अगदी सहज वापरले जाऊ शकतात, परंतु पुरुषांच्या कंडोमच्या तुलनेत महिलांचे कंडोम वापरणे थोडे कठीण असल्याचं सांगण्यात येतं.

पुरुषांच्या कंडोमबद्दल बोलायचं तर हे कंडोम अर्थातच पुरुषांचे लिंग कव्हर करते. जिथून शुक्राणू देखील बाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे हे कंडोम महिलांच्या गुप्तांगांचेही संरक्षण करतात. मात्र दुसरा अभ्यास सांगतो कि, पुरुषांचे कंडोम लेटेक्सपासून बनलेले आहे, ज्यामुळे ऍलर्जीक रिएक्शनचा धोका वाढतो. 

तेच महिलांचे कंडोम तिचे गुप्तांग पूर्णपणे झाकते. हे कंडोम हायपोअलर्जिक असतो, त्यामुळे एलर्जी होत नाही. त्यामध्ये पुरुषाचे जननेंद्रिय प्रवेश केल्यावरही महिलांचा तो पार्ट पूर्णपणे सुरक्षित असतो असं सांगितलं जातं.

एक मात्र आहे की, फिमेल कंडोम पुरुषांच्या कंडोमपेक्षा महाग असतात.

पुरुषांचे कंडोम कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध आहेत. तसेच ते स्वस्तही असतात. मात्र तेच महिलांच्या कंडोमबद्दल बोललो तर ते प्रत्येक मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध नसतात. याचे कारण महिलांच्या कंडोमबाबत अद्याप सर्वांनाच माहिती झालेली नाही. शिवाय ते महागही आहेत. 

पुरुषांच्या कंडोमची खास गोष्ट म्हणजे ते अनेक आकारात येतात, तसेच त्यात अनेक प्रकारचे फ्लेवर्सही मिळतात. परंतु महिला कंडोमचा आकार समान असतो आणि आणि ते रंगीत नसतात.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.