मित्राला कर्जातून सोडवण्यासाठी तयार केलेला सिनेमा म्हणजे डॉन

हेतू प्रामाणिक आणि चांगला असेल तर यश मिळण्याची हमखास खात्री असते. कधीकधी यशस्वी होण्यासाठी मार्गात अनेक काटेकुटे असतात. परंतु सर्व गोष्टी सहन करत माघार न घेता प्रवास चालू ठेवला तर कधी ना कधी यशाचा मार्ग हा सापडतो.

फारच अलंकारिक व्हायच्या आधी थांबलेलं बरं !

सुरुवातीला इतकी मोठी वाक्य लिहिण्याचं कारण म्हणजे हा विषय तसाच.

केवळ आपल्या मित्राला कर्जातून मुक्त करण्यासाठी दुसऱ्या मित्राने एक सिनेमा बनवला. सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा तो फ्लॉप होणार की काय, अशी सर्वांना धास्ती होती. पण अचानक या सिनेमाने लोकांच्या मनावर राज्य करून सुपरहिट बिरुद मिरवले. हा सिनेमा म्हणजे डॉन.

या सिनेमाच्या निर्मितीची कहाणी मोठी विलक्षण आहे. त्याचीच ही गोष्ट. 

एखादा सिनेमा असो, किंवा कोणतीही कलाकृती असो. त्यामागे कलाकारांची प्रचंड मेहनत असते. परंतु पडद्यामागे काम करणारी अशी असंख्य माणसं असतात ज्यांच्या अथक प्रयत्नांमुळे तो सिनेमा साकार होतो. खूपदा पडद्यामागची हीच कहाणी आपल्याला ठाऊक नसते.

‘डॉन’ सिनेमामागची ही काहीशी अज्ञात कहाणी . 

डॉन च्या निर्मितीमागची गोष्ट सुरू होते, नरिमन इराणी यांच्यापासून. नरिमन इराणी हे बॉलिवुडमधील सुप्रसिद्ध सिनेमेटोग्राफर. बॉलिवुडमध्ये इतकी वर्ष काम केल्याने एखादा सिनेमा स्वतः बनवावा म्हणून त्यांनी सुनील दत्त यांना घेऊन जिंदगी जिंदगी हा सिनेमा बनवला.

नरिमन साहेबांची इच्छा तर पूर्ण झाली परंतु ही इच्छा त्यांच्या अंगलट आली. कारण जिंदगी जिंदगी बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. आणि नरिमन साहेबांवर या सिनेमामुळे १२ लाखांचं कर्ज झालं. सध्याच्या काळात सुद्धा ही रक्कम मोठीच आहे. तर १९७८ दरम्यान या रकमेचा बोजा किती असेल, याची आपण कल्पना करू शकतो. 

अपयशाची धूळ झटकत नरिमन पुन्हा मुळ उद्योगाकडे वळले.

ते मनोज कुमार यांच्या रोटी, कपडा, और मकान या सिनेमाच्या चित्रीकरणाची जबाबदारी सांभाळत होते. त्याच दरम्यान नरिमन इराणी यांची ओळख चंद्रा बारोट यांच्याशी झाली. परदेशात पोटापाण्याचं काही भागलं नाही म्हणून चंद्रा बारोट इंग्लंडहून भारतात आले होते.

जवळपास सात वर्ष मनोज कुमार यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ते काम करत होते. सेटवर नरिमन इराणी आणि चंद्रा बारोट यांची चांगली मैत्री झाली. दोघे शूटिंग झाल्यावर एकमेकांसोबत मस्त गप्पा मारत बसायचे. 

एकदा बोलताना नरिमन यांनी चंद्रा जवळ हजार रुपयांची मागणी केली. चंद्राला नरिमन यांच्या अशा अचानक मागणीने आश्चर्य वाटले, पण कोणतीही विचारपूस न करता चंद्राने आपल्या जिवलग मित्राला पैसे दिले.

काही दिवसांनी नरिमन साहेबांनी चंद्रा कडे १० हजार रुपये मागितले. रक्कम मोठी असल्याने यावेळेस मात्र चंद्रा ने कारण विचारले. तेव्हा नरिमन साहेबांनी.. जिंदगी जिंदगी फ्लॉप होऊन डोक्यावर असलेल्या १२ लाख रुपये कर्जाची हकीगत मित्राला सांगितली. 

नरिमन इराणी यांना पगार होता ६०,००० रुपये. त्यामुळे या पगारात एवढं मोठं कर्ज फेडणं शक्य नव्हतं. मित्राच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर दूर कसा करावा, याचा चंद्रा विचार करत होते. यावर उपाय म्हणून त्यांनी एक सिनेमा बनवण्याची कल्पना नरिमन यांना दिली.

पहिला सिनेमा काढून डोक्यावर निर्माण झालेलं कर्ज फेडण्यासाठी दुसरा नवा सिनेमा बनवण्याच्या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी, नरिमन थोडे साशंक होते. परंतु त्यांनी पुन्हा एकदा रिस्क घ्यायचं ठरवलं. 

नरिमन आणि चंद्रा यांनी या सिनेमासाठी अमिताभ बच्चन, झीनत अमान यांना तयार केलं.

नरिमन आणि चंद्रा हे दोघे अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये काम करत असल्यामुळे या कलाकारांनी सुद्धा लगेच होकार दिला. सिनेमा तयार करायचा तर.. हातात एखादी गोष्ट पाहिजे. चंद्रा यांनी अभिनेत्री वहिदा रहमान यांच्यामार्फत सलीम खान यांच्याशी संवाद साधला.

सलीमजावेद यांच्याकडे एक कथा तीन-चार वर्षांपासून धूळ खात पडली होती. या कथेच्या सिनेमात काम करण्यास धर्मेंद्र, जितेंद्र, देवानंद या दिग्गजांनी नकार दिला होता. ही नाकारलेली कथा चंद्रांना सोपवायला सलीम खान तयार झाले.

जेव्हा त्यांच्याशी या सिनेमाच्या स्टोरी विषयी चर्चा व्हायची, तेव्हा वारंवार सलीम खान ‘ही डॉन वाली स्टोरी’ असा उल्लेख करायचे. सलीम खान यांच्या चर्चांमधून नरिमन इराणींनी सिनेमाचं नाव ‘डॉन’ असं ठरवलं.  

आधीच्या सिनेमाचं कर्ज, एक नवा सिनेमा काढून फेडण्याच्या कल्पनेची त्यावेळी इंडस्ट्रीतील अनेक जणांनी चेष्टा केली. परंतु नरिमन आणि चंद्रा यांना कोण काय बोलतंय याची फिकीर नव्हती. त्यांनी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली. परंतु या नव्या सिनेमासाठी सुद्धा आर्थिक संकट उभे राहिले. त्यावेळी चंद्रा यांच्या बहिणीने धाकट्या भावाला मदत केली.

सर्व सुरळीत सुरू होतं. परंतु अचानक प्राण सरांना अपघात झाला. आणि यानंतर डॉन च्या संपूर्ण युनिटला मोठा धक्का बसला. कारण ज्यांच्यासाठी हा सर्व डोलारा उभा केला होता त्या नरिमन इराणी यांचं निधन झालं. 

पतीच्या अकस्मात निधनामुळे नरिमन यांच्या पत्नीवर जुन्या 12 लाखांचा आणि नवीन खर्चाचा अतिरिक्त बोजा आला. परंतु ज्या हेतूने सर्वजण एकवटले होते, तो हेतू पूर्ण करण्याचा सर्वांनी चंग बांधला.

‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत चंद्रा यांनी सिनेमाचं शूटिंग पुन्हा एकदा सुरू केलं. अमिताभ सकट सिनेमातल्या सर्व प्रमुख कलाकारांनी “आम्हाला पैसे नाही दिले तरी हरकत नाही, परंतु हा सिनेमा आपण पूर्ण करू”, असा दिलासा चंद्रा यांना दिला.

‘डॉन’ च्या संगीताची जबाबदारी कल्याणजी-आनंदजी सांभाळत होते. खईके पान बनारसवाला सारखं मजेदार गाणं आणि सिनेमाच्या अनुषंगाने उत्कृष्ट संगीत त्यांनी दिलं. अशाप्रकारे अनेक अडचणींचा सामना करत ‘डॉन’ सिनेमा तयार झाला. 

१९७८ साली डॉन संपूर्ण देशात प्रदर्शित झाला.

परंतु पहिल्या आठवड्यात सिनेमाला प्रेक्षकांचा अत्यंत कमी असा प्रतिसाद होता. ‘पहिले पाढे पंचावन्न’ होऊन डॉन वर फ्लॉप चा शिक्का बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली. दुसऱ्या आठवड्यात मात्र चित्र बदललं.

सिनेमातल्या गाण्यांमुळे आणि वेगळ्या स्टोरी मुळे डॉन ची माऊथ पब्लिसिटी झाली. आणि दुसऱ्या आठवड्यापासून सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली. सुपरहिट ठरलेल्या डॉन सिनेमाने भरघोस नफा कमावला.

या कमाईतून नरिमन इराणी यांच्या पत्नीने सर्व कर्ज फेडून टाकलं.

चंद्रा बारोट यांनी केवळ मित्राला कर्जातून मुक्त करावं हा अत्यंत प्रामाणिक हेतू मनात बाळगून, डॉन सिनेमा बनवला. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे, या सगळ्यात नरिमन इराणी यांची एक्झीट झाली. परंतू त्यानंतर सुद्धा चंद्रा यांनी सिनेमाचं शूटिंग न थांबवता डॉन बनवला.

चंद्रा बारोट यांचं कौतुक करावं तितकं कमी. त्यांना कलाकारांची सुद्धा तितकीच भक्कम साथ मिळाली. जेव्हा एखादं कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी अशी चांगली माणसं सोबत असतील, तर वाटेत कितीही अडचणी आल्या तरीही ती गोष्ट साकार होतेच. ‘डॉन’ सिनेमा अशाच चांगल्या आणि निःस्वार्थी माणसांनी बनवलेला सिनेमा. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.