पं. नेहरूंनी मोदींना पाठवलेल्या एका पत्राने राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमाची निर्मीती झाली..
‘कधी कधी आपल्या हातून झालेल्या छोट्या छोट्या गोष्टींमधून देखील, अनपेक्षितपणे खूप मोठी गोष्ट अचूक पणे घडून जात असते’ मिनर्व्हा मुव्हीटोन चे दिग्दर्शक सोहराब मोदी मोदी यांना असाच अनुभव आला होता.
एकदा त्यांनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना १४ नोव्हेंबरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी एक पत्र पाठवले होते. या पत्रात त्यांनी मिर्झा गालिब या शायराच्या काही ओळी उद्धृत केल्या होत्या.
त्या अशा होत्या,
“तुम सलामत रहो हजारो बरस, हर बरस के दिन हो पचास बरस…..!”
पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू रसिक दिलदार व्यक्तिमत्व होते. त्यांना ह्या ओळी खूप आवडल्या. त्यांनी उलट टपाली सोहराब मोदी यांना आभाराचे पत्र पाठवलेच, शिवाय दिल्लीत आल्यानंतर भेटायला देखील बोलावले. सोहराब मोदी जेव्हा नेहरूंना भेटायला गेले त्यावेळी गप्पांचा विषय अर्थातच मिर्झा गालिब हाच होता.
मिर्झा गालिब यांच्या विषयी नेहरूंना देखील खूप आस्था होती. दोघांची आवड एक असल्यामुळे गप्पा खूप रंगल्या. गप्पांचा शेवट नेहरूंनी सोहराब मोदी यांना,
“तुम्ही मिर्झा गालिब यांच्या वर एक चित्रपटच का बनवत नाही?”
असा प्रश्न केला. साक्षात पंतप्रधानांनीच मिर्झा गालिब यांच्या वरील चित्रपटाची विचारणा आणि आग्रह केल्यानंतर अर्थातच सोहराब मोदी यांनी त्याच्यावर काम सुरू केले.
भारतीय सिनेमाच्या इतिहासात मुगल कालीन चित्रपटांच एक आगळं वेगळं स्थान आहे. एकतर अशा विषयांना हात लावण्याचे धाडस या क्षेत्रातील नामांकीत दिग्दर्शकांनी केल्याने हा सबंध इतिहास फार चांगल्या पध्दतीने रसिकांपुढे आला.
मुगलकालीन सामाजिक ,राजकीय , सांस्कृतिक वातावरण,मुगलकालीन वास्तू रचना, त्यांची सौंदर्य दृष्टी, तिथला आदब,दरारा,त्यांच्यातील क्रौर्य आणि औदार्य या सार्याचं प्रतिबिंब या सिनेमातून पडत असल्याने प्रेक्षक या कलाकृतीच्या वाटेवर डोळे लावून बसत.
प्रस्तुत चित्रपटात गालीबच्या भूमिकेत भारतभूषण होते तर त्यांच्या प्रेयसीच्या भूमिकेत सुरैय्या होती.सिनेमाचे कथानक ’आखरी मुगल बहादूर शहा जफर’ यांच्या काळातील आहे. गालीब (१७९७-१८६९) यांच उर्दू साहित्यातील स्थान फार मोठं होतं. बहादूर शहा जफर यांच्या दरबारातील ते मोठे शायर होते.
सोहराब मोदी भव्य दिव्यतेचा ध्यास असलेला कलावंत होता. या सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी ब्रिटीश कालीन राजवटीत इथल्या राजांच्या नशीबी आलेलं अदृष्य पारतंत्र्य व त्याची समाजाच्या साहित्यिक, सांस्कृतिक जीवनावर पडलेली गडद छाया फार सुंदर रितीने दाखविण्याचा प्रयत्न केला.मिनर्व्हा मुव्ही टोन या आपल्या चित्र संस्थे मार्फत सोहराब मोदी यांनी सिनेमाची निर्मिती सुरु केली.
भारत भूषण आणि मधुबाला यांना घेऊन बनवलेल्या या सिनेमा मध्ये मिर्झा गालिबच्या आयुष्याच्या संपूर्ण पोट्रेट या चित्रपटात अतिशय सुंदर रीतीने त्यात चितारले गेले होते. गालीबच्या गजल तलत आणि सुरैय्याच्या स्वरात संगीतकार गुलाम महंमद यांनी गावून घेतल्या होत्या.
“दिल ए नादान तुझे हुआ क्या है”, नुक्ताची ऐ गमे दिल उनको सुनाय्रे न बने, ये न थी हामारी किस्मत के विसाल ए यार होता’ , फिर मुझे दिदार ए तर याद आया’ या गालीबच्या गजल्स सर्वार्थाने रसिकांपर्यंत पोचल्या या सिनेमामु्ळेचं .
यात एकून १२ गाणी होती. त्यातील दोन गाणी शकीलची होती. सिनेमाचे छायाचित्रण व्ही अवधूत (प्रभात कालीन सिनेमॅटोग्राफर व शांताराम बापूंचे बंधू) यांचे होते. आज गुलाम महंमदची आठवण सांगणारे जे काही मोजकेच सिनेमे आहेत त्यात पाकीजा सोबत या सिनेमाचे देखील नाव घ्यावे लागेल.
राष्ट्रीय पुरस्काराची सुरूवात आपल्याकडे १९५४ सालापासून सुरू झाली पहिल्या वर्षी आपल्या ’श्यामची आई” चा गौरव झाला तर दुसर्या वर्षी या पुरस्कारावर मोहत उमटवली या सिनेमाने..! या सिनेमाचा खास शो पंडित नेहरू यांच्यासाठी दिल्लीत आयोजित केला गेला.
तुमने मिर्झा गालीब की रूह को जिंदा कर दिया’ असे गौरवोदगार पंडीत नेहरू यांनी काढले होते राजकीय , सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी या शो ला उपस्थिती लावली.
पंडीत नेहरूंना पाठवलेल्या शुभेच्छा पत्रातील एका शेरमुळे या चित्रपटाची निर्मिती झाली..!
ही गोष्ट इथेच थांबत नाही. पुढे ‘सुजाता’ या चित्रपटाच्या वेळी गीतकार मजरूह सुलतानपुरी यांनी गालिब च्या याच शेर चा आधार घेत एक गाणे लिहिले. जे गाणे देखील अफाट लोकप्रिय झाले. आणि आज देखील प्रत्येक वाढदिवसाच्या वेळी या गाण्याचा उल्लेख होतो. ते गाणे होते ‘तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार….!’
हे ही वाच भिडू
- जपानवरून नेहरूंनी लेडीज जॅकेट आणलं, तेच नेहरू जॅकेट झालं…आज सगळे तेच वापरतात
- महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाचं वलय भारतीय सिनेमात कसं निर्माण झालं?