लोकवर्गणीतून बाबूजींनी वीर सावरकर सिनेमा पुर्णत्वास नेला..

भारतीय सिनेसृष्टीतील महान गायक आणि संगीतकार म्हणजे सुधीर फडके उर्फ बाबूजी. आयुष्याची ५० वर्ष त्यांनी मराठी सिनेसृष्टीतील संगीताच्या जगात मुशाफिरी केली.

बाबूजींनी संगीताच्या क्षेत्रात दिलेलं योगदान विसरून चालणार नाही. संगीत आणि गायनासोबत बाबूजींनी करून ठेवलेलं आणखी एक मोठं कार्य आहे. या कार्यामुळे त्यांच्या अंगी असलेल्या जिद्द आणि चिकाटी या गुणांची एक अनोखी ओळख मिळते.

हे कार्य म्हणजे बाबूजींनी निर्मिती केलेला वीर सावरकर हा सिनेमा. 

बाबूजींचा आवाज जेव्हा केव्हा ऐकण्यात येतो तेव्हा संगीताची एक तपश्चर्या केलेला गायक गात आहे, असा भास निर्माण होतो. संगीत साधनेत इतकं अव्वल दर्जाचं कार्य त्यांनी करून ठेवलं आहे. असे फार कमी कलावंत असतात जे समाजासाठी सुद्धा योगदान देतात.

पैसा, प्रसिद्धीच्या पलिकडे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, अशी भावना कायम त्यांच्या मनात असते. सुधीर फडके हे अशाच काही कलावंतांपैकी एक.

जेव्हा गोवा मुक्ती संग्रामाच्या लढ्यात अनेक जण सहभागी झाले होते तेव्हा सुधीर फडके सुद्धा या लढ्यात हिरीरीने पुढे आले होते. 

बाबूजींनी आयुष्याच्या उत्तरार्धात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जीवनचरित्र मोठ्या पडद्यावर आणण्याचं स्वप्न पाहिलं. सावरकरांची उत्तुंग अशी जीवनगाथा लोकांसमोर यावी, हाच यामागे उद्देश होता.

एका मुलाखतीत बाबूजी म्हणाले होते,

“विनायक दामोदर सावरकर या व्यक्तिमत्त्वाने राष्ट्रासाठी जे समर्पण केलं आहे ते कायम अंधारात ठेवलं गेलं. सावरकरांचं तत्वज्ञान नव्या पिढीला माहीत असू नये याची खबरदारी काही मंडळी घेत होती. एकूणच भावी पिढीला विनायक दामोदर सावरकर यांच्या कर्तृत्वाची ओळख व्हावी, याच उद्देशाने मी या सिनेमाची निर्मिती करण्यासाठी पुढे सरसावलो.” 

या सिनेमाची निर्मिती प्रक्रिया बाबूजींना शारीरिक आणि मानसिक रित्या थकवणारी होती. सुधीर फडके यांनी वयाची पंच्याहत्तरी ओलांडली होती. त्यामुळे उतारवयातल्या शारीरीक व्याधींनी ते बेजार व्हायचे.

अशावेळेस त्यांचं देवाजवळ एकच मागणं असायचं,

“हा सिनेमा पूर्ण होईपर्यंत मला आयुष्य लाभू दे”.

अमिताभ बच्चन यांच्यासारखे अपवाद वगळता वयाची पंच्याहत्तरी वैगरे ओलांडल्यावर बहुतेक कलावंत हे कामातून निवृत्त होऊन जीवनाचा आनंद घेतात. पण हाडाच्या कलावंतांना कलेची सेवा करण्यासाठी वयाचं बंधन आड येत नाही.

बाबूजींनी सुद्धा सर्व शारीरिक दुखण्यावर मात करत वीर सावरकर पूर्ण करण्यासाठी चंग बांधला. 

सावरकरांच्या आयुष्याकडे नजर टाकल्यास वीर सावरकर सिनेमाची निर्मिती करणं हे एक शिवधनुष्य होतं. सिनेमाचा कॅनव्हास खूप मोठा होता. त्यामुळे सिनेमाचं बजेट सुद्धा वाढलं. सिनेमाच्या निर्मितीसाठी बाबूजींनी ठिकठिकाणी गाण्यांचे कार्यक्रम केले. परंतु यातून मिळणारा पैसा सिनेमासाठी अपुर होता.

बजेट अभावी सिनेमाचं शुटिंग अर्ध्यावर थांबेल की काय, अशी सर्वजण शक्यता वर्तवत होते. अखेर बाबूजींनी मायबाप प्रेक्षकांना विनंती केली.

वीर सावरकर सिनेमासाठी पैसे उभे करण्यासाठी त्यांनी लोकांना अपील केलं. ज्या माणसाच्या गाण्यांनी सर्वजण गेली कित्येक वर्ष मंत्रमुग्ध झाले होते अशा बाबूजींचं स्वप्न साकार होण्यासाठी लोकांनी मुक्तहस्ते मदत केली. 

लोकांनी केलेल्या मदतीमुळे बजेटचा प्रश्न मिटला.

सिनेमाचं शुटिंग पूर्ण झालं आणि ‘वीर सावरकर’ सिनेमा २००१ साली मोठ्या पडद्यावर झळकला. लोकांनी केलेल्या एकूण एक आर्थिक मदतीच्या मागे त्यांचं बाबुजींविषयी असलेलं प्रेम पाहायला मिळतं.

सावरकरांना मानणाऱ्या आणि न मानणाऱ्या अशा अनेक भक्तांकडून सिनेमाच्या निर्मितीदरम्यान बाबुजींवर बोचरी टीका करण्यात आली. परंतु बाबूजींनी कोणालाही उत्तर न देता सिनेमा पूर्ण करण्यावर स्वतःचं लक्ष केंद्रित केलं. ‘वीर सावरकर’ सिनेमाच्या रुपात अनेक वर्ष उराशी बाळगलेलं त्यांचं स्वप्न पूर्ण झालं.

सिनेमा पूर्ण झाल्यावर “मी आत्ता संपूर्ण समाधानी आहे. आत्ता मी परमेश्वराला सांगू शकतो, खुशाल मला ने.” अशा भावना बाबूजींनी व्यक्त केल्या.

‘वीर सावरकर’ प्रदर्शित झाल्यानंतर पुढील एक वर्षात २००२ साली वयाच्या ८३ व्या वर्षी बाबूजी काळाच्या पडद्याआड गेले. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.