चेष्टा नाय, उडणारी बाईक येणाराय… शप्पथ!

सध्या जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी एक समस्या कॉमन असते ती म्हणजे ट्रॅफिकची! प्रत्येक जण कधी ना कधी ट्रॅफिकमध्ये अडकून बसतोय. आता ट्रॅफिकमध्ये कसं होतंय, आपण कुणीही असलो तरी एकदा अडकल्यावर आपला फिक्स आंबा होतोय. मॉप पैसा असलेलाही ट्रॅफिकमध्ये अडकतोय आणि स्प्लेंडरवाला कार्यकर्ताही.

आता तुम्ही म्हणाल पैसा असेल तर माणूस रस्त्यावरून का प्रवास करेल? वेळ वाचवायचाच असेल तर, विमानाने प्रवास करता येईल की. पण, शहरातल्या शहरात विमानाने प्रवास करणं शक्य नसतं. मग अश्यावेळी डोक्यात एकदातरी विचार येऊन जातो की उडणारी कार किंवा त्यातल्या त्यात बाईक असती तर कसलं भारी झालं असतं… मोकळ्या आकाशात ट्रॅफिकच्या झंझटीशिवाय उडून वेळेत पोहोचता आलं असतं.

आतापर्यंत अनेकदा उडणारी कार येणार अश्या उडत्या उडत्या गोष्टी कानावर आल्यात आणि गेल्यात पण. पण ती कार काय अजूनतरी लाँच झालीच नाहीये.

पण अमेरिकेच्या जेटपॅक एव्हिएशन कंपनीने फ्लाइंग बाईक बनवलीये.

जगातल्या या पहिल्या वहिल्या उडणाऱ्या बाईकला ‘स्पीडर’ असं नाव देण्यात आलंय. हे नाव देण्यामागचं कारण म्हणजे या बाईकचं उद्दिष्ट आणि काम. ही बाईक आयुष्याला स्पीडचा डोस देणार आहे त्यामुळे स्पीडर हे नाव परफेक्ट बसतंय.

या बाईकचे नेमके फीचर्स काय आहेत ते पाहूया.

१) स्पीड:

ही बाईक बनवलेल्या कंपनीचा असा दावा आहे की ही बाईक अर्ध्या तासात ९६ किलोमीटरचा प्रवास करु शकते. म्हणजे पुणे ते मुंबईचं  १५२ किलोमीरचं अंतर आता तासाभरात पार करता येणार आहे. शिवाय या बाईकचा टॉप स्पीड २४० किलोमीटर इतका आहे.

२) कॅपॅसिटी:

१३६ किलो इतकं या बाईकचं वजन असणारे आणि वजनाच्या दुप्पट म्हणजे २७२ किलो इतकं वजन वाहून नेण्याची क्षमता या बाईकमध्ये असेल.

३) कंट्रोल्स:

या बाईकचे कंट्रोल्स हे व्हिडीओ गेमच्या कंट्रोलसारखे असतील. विशेष म्हणजे ही बाईक रीमोटने सुद्धा ऑपरेट करता येईल. बाईकवर हँडलला जसा हॉर्न किंवा हेडलाईटचं बटन असतं तशीच बटणं या गाडीला असणार आहेत. यापैकी एक बटण गाडीच्या टेकऑफ आणि लँडींग साठी तर एक स्पीडवर नियंत्रण ठेवण्यासाठी असेल.

४) सुरक्षा:

सुरक्षेविषयी बोलायचं झालं तर, या बाईकचं जे पहिलं मॉडेल होतं त्यात ४ टर्बाईन होते. पण गाडी बनवता बनवता प्रोडक्शनच्या वेळी ४ चे ८ टर्बाईन झाले. प्रत्येक कोपऱ्याला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून २ असे चार कोपऱ्यांना ८ टर्बाईन झाले.

५) किंमत:

या बाईकची प्राथमिक किंमत तीन कोटी पंधरा लाख रुपये इतकी ठरवण्यात आलीये.

आता हे फीचर्स वाचून बाईक घ्यायची इच्छा झाली असेल पण किंमत वाचल्यावर थोडा मूड ऑफसुद्धा झाला असेलच. ही बाईक अर्थातच सध्या तरी खूपच कमी लोकांना परवडणार आहे.

सध्या या बाईकची टेस्टींग सुरू आहे.

जेटपॅक एव्हिएशन या उडणाऱ्या बाईकची चाचणी करतेय. या चाचणीनंतर यूएस फेडरल एव्हिएशन अ‌ॅडमिनिस्ट्रेशन कडून या बाईकला हिरवा कंदील मिळणंही गरजेचं आहे. यूएस फेडरल एव्हिएशन अ‌ॅडमिनिस्ट्रेशन या बाईकला हिरवा कंदील देईल अशी अपेक्षा जेटपॅक एव्हिएशन कंपनीला आहे.

ही बाईक साधारणपणे मेडिकल इमरजेंसी, लष्करी कारवाई, अग्निशमन दल या सगळ्या विभागांसाठी कामी येऊ शकते.

या बाईकचं प्री बूकिंग सुरू झालं असलं तरीही, ही बाईक प्रत्यक्षात वापरात यायला अजून २-३ वर्ष लागतील असा अंदाज आहे.

या बाईकला यूएस फेडरल एव्हिएशन अ‌ॅडमिनिस्ट्रेशन कडून हिरवा कंदील मिळाला आणि ही बाईक मार्केटमध्ये लाँच झाली तर तात्काळ सेवा पुरवण्यासाठी हिचा वापर अत्यंत फायदेशीर ठरेल हे नक्की. आणि सर्वसामान्यांना परवडणार नसली तरीही काही अंशी का होईना पण रस्त्यावरच्या गाड्या कमी झाल्यामुळं, ट्रॅफिकसुद्धा कमी होईल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.