चिडकेपणात स्टीव्ह वॉ पॉन्टिंगचा गुरू होता आणि हीच गोष्ट त्याला भारी ठरवते…

लहानपणापासून आतापर्यंत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅच म्हणलं की एक डीप विषय असतोय. त्यात भारत जर तिकडं दौऱ्याला गेला असेल, तर मॅच सुरू होतात पहाटेला. अलार्म न लावता, पोरं उठण्याची ही एकमेव वेळ असावी. या दरम्यान ‘किती झाले रे?’ हा प्रश्न हमखास विचारला जातो.

इतकं बेक्कार येड भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅचचं होतं, आहे आणि कायम राहील.

सध्या आपण ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन हरवत असलो, तरी कधी काळी हे कांगारू आपल्या भारतात येऊन आपला बाजार उठवायचे. त्यांच्याकडे राक्षस सेनाच तशी होती, पॉन्टिंग, वॉर्न, गिलेस्पी, मार्क वॉ, मॅक्ग्रा, ली, क्लार्क, मार्टिन, लँगर, सायमंड्स, हेडन, गिलख्रिस्ट… नावं लिहाल तितकी कमी.

पण या सगळ्या राक्षससेनाचा सरदार होता स्टीव्ह वॉ.

ऑस्ट्रेलियाचा ४० वा कॅप्टन. ब्रॅडमन ते बॉर्डर असा जबरदस्त वारसा घेऊन वॉ ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन झाला होता. त्याच्या आधीही ऑस्ट्रेलिया चिवट होतीच पण वॉनं त्यांना आणखी खडूस केलं. जिंकण्यासाठी काहीही हे त्यांच्या रक्तात भिनवलं.

बॅट्समन म्हणून बघायला गेलं, तर स्टीव्ह वॉ काय गॉड गिफ्टेड बॅट्समन नव्हता. म्हणजे सचिन किंवा विराटच्या बॅटिंगमध्ये जशी एक शान असते, तसं त्याचं नव्हतं. गेलाबाजार तो द्रविड किंवा लक्ष्मणसारखा टेक्निकली परफेक्ट बॅट्समनही नव्हता. पण तरीही गडी खोऱ्यानं रन्स करायचा.

स्टीव्ह वॉ गुडघ्यावर बसून स्वीप मारतोय हि मात्र सुंदर गोष्ट होती. त्याच्या धावांचे आकडे हे जितके स्वीप, ड्राईव्ह आणि हुक मारुन वाढले, तितकेच क्रीझवर नांगर ठोकून काढलेल्या सिंगल-डबल्समुळंही.

स्टीव्ह वॉचा राग यायचा याचं कारण म्हणजे त्याची कॅप्टन्सी.

त्यानं आधीच जिंकत असलेल्या ऑस्ट्रेलियन टीमला अजिंक्य बनवलं. २००१ मध्ये भारत दौऱ्यात मुंबई टेस्ट जिंकत त्यांनी सलग १६ टेस्ट आपल्या नावावर केल्या होत्या. ज्या जमान्यात ड्रॉ करणं ही सुद्धा मोठी गोष्ट वाटत होती, तिथं कांगारूंना फक्त जिंकणं माहीत होतं. या जिंकण्यासाठी मग ते काहीही करायला तयार असायचे. मग ते स्लेजिंग असेल किंवा रडके अपील, जिंकण्यासाठी सुट्टी नाही.

एक किस्सा तर सांगायला हवाच, १९९९ च्या वर्ल्डकपवेळी विंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना होता. मॅक्ग्राच्या बॉलिंगमुळं ऑस्ट्रेलियाला जिंकायला फक्त १११ रन्स हवे होते. ऑस्ट्रेलिया जितक्या उशिरा जिंकेल, तितका फरक विंडीजच्या रनरेटवर होणार होता आणि याचा फटका पाकिस्तान आणि न्यूझीलंडला बसणार होता, फायदा होणार होता ऑस्ट्रेलियाला.

स्टीव्ह वॉनं ७३ बॉलमध्ये नॉटआऊट १९ रन्स करत पार ४१ व्या ओव्हरमध्ये मॅचचा निकाल लावला.

खिलाडूवृत्ती नसलेल्या या इनिंगबद्दल त्याला जेव्हा विचारलं गेलं, तेव्हा त्याचं उत्तर साधं होतं, “We’re not here to win friends, mate.”

आम्ही इथं मनं जिंकायला नाही, तर चॅम्पियनशिप जिंकायला आलो आहोत, इतकं सिम्पल गणित.

ऑस्ट्रेलियन टीमच्या सुदैवानं हे गणित त्यांनी आजही कायम ठेवलंय. वॉचा वारसा चालवणाऱ्या रिकी पॉन्टिंगनं तर यावर किरकोळीत कळस केला.

स्टीव्ह वॉचा राग येण्याचं कारण जसं त्याच्या चिवटपणात होतं, तसंच तो आवडण्याचं कारणही त्यातच दडलेलं. भले ऑस्ट्रेलियन असला तरी वॉ हा भारी प्लेअर होता. त्यात त्याचं भारी असणं अगदी योग्य वेळी उठून दिसायचं.

ज्यावेळी ऑस्ट्रेलियन टीम संकटात असेल, कुणीतरी लाऊन धरायची गरज असेल, तेव्हा हा हमखास खेळणार.

जानेवारी २००३ चा विषय, इंग्लंड विरुद्धच्या सिरीजमध्ये वॉचा फॉर्म गंडलेला. सिडनी टेस्टमध्ये वॉनं रन्स केले नसते, तर त्याच्या नावावर फुली बसेल हे स्वतः वॉलाही माहीत होतं. त्यात सिडनीचं पिच खतरनाक, कांगारुंची अवस्था झालेली ३ आऊट ५६.

हा आपला लास्ट चान्स आहे, हेच गृहीत धरुन तो खेळला आणि दिवसाच्या शेवटच्या बॉलला आपलं शतक पूर्ण केलं.

वॉची शेवटची टेस्ट मॅच तर ऑस्ट्रेलियनच काय भारतीय चाहतेही विसरू शकत नाहीत.

ऑफसाईडला एकही शॉट न खेळता सचिन तेंडुलकरनं २४१ रन्स मारले होते, ते याच टेस्टला. लक्ष्मणनंही नेहमीप्रमाणे ऑस्ट्रेलियन बॉलर्सला धुवत १७८ केले होते. भारतानं ७०५ रन्स बोर्डावर लावले. कांगारूंना लवकर रोखत चांगलं टार्गेटही दिलं, ऐतिहासिक विजय टप्प्यात आलाच होता. पण आपल्या टीमची गरज ओळखून वॉनं नांगर ठोकला, १५९ बॉल्समध्ये ८० रन्स केले. मॅच ड्रॉ केली.

आपल्या शेवटच्या टेस्ट इनिंगमध्ये त्यानं भारताच्या तोंडून विजयाचा घास हिरावून घेतला. सचिन, द्रविड आणि लक्ष्मणच्या भारी इनिंग्स पाण्यात गेल्या… स्टीव्ह वॉ मुळं.

सगळ्या करिअरमध्ये वॉचा जितका राग आला, तितकाच तो कमी झाला त्याच्या एका पुस्तकामुळं.

 क्रिकेटर्सची पुस्तकं म्हणजे वादाचे केंद्रबिंदू असतात. पण वॉनं एक फोटोंचं पुस्तक काढलं, ‘Capturing Cricket: Steve Waugh in India.’ गडी सतरा दिवस भारतात राहिला आणि ९ शहरांमध्ये फिरला. आपल्याकडच्या गल्ल्यांमधलं क्रिकेट, डोंगरांमधलं क्रिकेट ते अगदी दोन पाइपांमधल्या चिंचोळ्या जागेत खेळलं जाणारं क्रिकेट, स्टीव्ह वॉच्या कॅमेरात सगळं काही कॅप्चर झालं.

त्यानं २००४ ला सिडनीवर दिलेली ड्रॉची जखम जशी लक्षात राहील, तसंच त्याच्या कॅमेऱ्यात कैद झालेलं भारताचं क्रिकेटही. कारण त्या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब दिसतं.

वयाच्या २० व्या वर्षी स्टीव्ह वॉनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, तेव्हा त्याच्या अंगात इतकी रग होती की, त्यानं विव्ह रिचर्ड्सला बाऊन्सर्स टाकले होते. अशाच अतिउत्साहामुळं संघातली जागा गेली, रिप्लेसमेंट म्हणून कोण आलं, तर स्वतःचाच जुळा भाऊ, मार्क वॉ.

पण तरीही स्टीव्हनं कमबॅक केलं, ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व केलं. लेचापेच्या पोरांना घेऊन पुढं जाणं जितकं अवघड असतं, त्यापेक्षा एकमेकांना वरचढ ठरणाऱ्या प्लेअर्सला घेऊन पुढं जाणं, त्यांना एकत्र ठेवणं आणि त्यांच्यातल्या स्पर्धेच्या पलीकडं बघायला शिकवणं असतं… स्टीव्ह वॉची टीम म्हणजे रत्नांची खाण होती, एकापेक्षा दुसरा कार्यकर्ता वरचढ होता, पण त्यानं प्रत्येक रत्नाला पैलू पाडले जे ऑस्ट्रेलियन मुकुटात शोभून दिसले.

याच्याचमुळं भारताला लवकर सिंहासन गाठता आलं नाही, याचा राग धरावा की क्रिकेट हा खेळ भारी केला म्हणून स्टीव्ह वॉ ला मानावं, याची जुळणी तेवढी होत नाही. 

पॉन्टिंग, स्मिथ, टीम पेन यांचे जिंकण्यासाठीचे किडे बघतानाही जाणवतं, स्टीव्ह वॉनं ‘ऑस्ट्रेलियानं जिंकणं’ किती सहज करून ठेवलं होतं. या नव्या पोरांना रडीचे डाव खेळावे लागतात, तिथं चिडकेपणा करूनही जिंकणारा वॉ भारी ठरतो…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.