मराठीमध्ये दिवाळी अंक काढायची आयडिया त्यांना लंडनमध्ये सुचली….

दिवाळी सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर साहित्य क्षेत्रात आपल्याला मोठ्या हालचाली होताना दिसतात. म्हणजे लेखकांपासून ते पब्लिशिंग हाऊसपर्यंत एकच लगबग दिसून येते ती म्हणजे दिवाळी अंकांची. दिवाळीत दिवाळी अंकांचं महत्वसुद्धा तितकंच आहे जितकं सोनपापड्याचे बॉक्स, फटाके आणि नवीन कपडे सोबतच व्हाट्सअप फॉरवर्ड्स. दिवाळी अंक हा वाचक मित्रांचा साहित्य फराळ मानला जातो. नवनवीन विषय,कथा,कविता यांनी नटलेले हे अंक कधी एकदा प्रकाशित होतात याची वाट लोकं दिवाळीत बघत असतात. पण हे दिवाळी अंक नक्की सुरू कधी पासून झाले आणि कोणी सुरू केले त्याबद्दल आज जरा जाणून घेऊया.

मराठीत 1909 साली पहिला दिवाळी अंक मासिक मनोरंजनचा प्रकाशित झाला होता आणि तो प्रकाशित करणारे व्यक्ती होते का. र. मित्र अर्थात काशिनाथ रघुनाथ आजगावकर.

2 नोव्हेंबर 1871 रोजी त्यांचा जन्म झाला होता. काशिनाथ रघुनाथ आजगावकर यांना बंगाली भाषा उत्तम येत होती सोबतचं मराठी इतकीच बंगाली संस्कृतीची देखील त्यांना पुरेपूर माहिती होती. बंगाली साहित्याचे ते अनुवादकसुद्धा होते. बंगाली भाषेच्या प्रेमापोटी त्यांनी मित्र हे आडनाव लावायला सुरवात केली हेच आडनाव पुढे प्रचलित झालं आणि त्यांची मुख्य ओळख बनली.

1895 साली काशिनाथ रघुनाथ आजगावकर यांनी मासिक मनोरंजन सुरू केलं. पण मराठीत दिवाळी अंक सुरू कसा झाला याचीसुद्धा एक धमाल गोष्ट आहे. त्यांच्या एका मित्राने लंडनमध्ये ख्रिसमस मध्ये निघणाऱ्या टाइम्स लिटररीसप्लिमेंट त्यांना दाखवली. ख्रिसमसमध्ये इंग्लिश मासिकांचा ख्रिसमस स्पेशल अंक असतोच तसाच मराठीत असावा आणि बंगाली संस्कृतीतही तशी प्रथा होती म्हणून त्यांच्या डोक्यात विचार आला की आपणही मराठीमध्ये दिवाळी अंक काढायला पाहिजे.

1909 साली काशिनाथ रघुनाथ आजगावकर यांनी मासिक मनोरंजनाचा पहिला दिवाळी अंक काढला आणि एक नवी मुहूर्तमेढ रोवली. 1909 ते 1935 पर्यंत तो दिवाळी अंक नेटाने चालू ठेवला. आजगावकर यांनी कथा, कविता, कादंबऱ्या, विनोद , अध्यात्म, काव्यचर्चा, साहित्य समालोचन अशा प्रकारचा ठळक मजकूर मासिक मनोरंजनच्या पहिल्या मराठी दिवाळी अंकातून प्रकाशित करायला सुरुवात केली. राम गणेश गडकरी, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर,काशीबाई कानिटकर, केशवसुत, वा.व. पटवर्धन, गो. चिं. भाटे असे अनेक साहित्यिक त्यांच्याशी जोडले गेलेले होते.

23 जून 1920 रोजी काशिनाथ रघुनाथ आजगावकर यांचं निधन झालं पण त्यांनी दिवाळी अंकांची रोवलेली मुहूर्तमेढ आजही टिकून आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.