२५० रुपयांत फोन मिळणार होता, त्याचं काय झालं माहिताय का ?

आयला, नवीन वर्षाचं काय दणका दिलाय भिडू.. भारतात अडीचशे रुपयात फोन मिळणार होता हे विसरुनच गेलेलो की. बर झालं आठवलं…

तुमची अशीच रिएक्शन असणार आहे हे आम्हाला माहित होतं. अहो काय साधा मॅटर आहे का? भारतीय जनता २५० रुपये हातात घेऊन बसलेली पण फोन आलाच नाही. त्याचं काय झालं ते शेवट पर्यन्त कळलंच नाही.

असुदे असुदे.. रडू नका. आम्ही कशाला बसलोय. सगळा पंचनामा करायचा पत्कुरा घेतलेलाच आहे तर हा अडीचशेचा फोन कशाला सोडा…

बर, जे लोकं २०१४ ला देखील मतदानाला गेले नव्हते, ज्यांना या जगात काय चालूय हे माहितच नाही त्यांच्यासाठी बेसिक गोष्ट सांगतो. भारतात चार वर्षांपूर्वी एक कंपनी जन्माला आलेली. या कंपनीनं सांगितलं की आम्ही तुम्हाला २५० रुपयात फोन देणार. तो पण साधा फोन नाही तर स्मार्टफोन. कॅमेरा, रॅम, 3G असणारा फोन.

मग काय आपलं पब्लिक नेहमीप्रमाणं भुल्लं आणि हे कांड झालं.

या कंपनीचं नाव होतं रिगींग बेल प्रायव्हेट लिमीटेड. २०१६ साली या कंपनीने सांगितलं की आम्ही फ्रिडोम २५० नावाने एक फोन लॉन्च करतोय. या फोनमध्ये १.३ गिगीहर्ड्स जा क्वाडकोअर प्रोसेसर असणार आहे, १ जीबीची रॅम आणि ८ जीबीची इंटरनल मेमरी असणार आहे. शिवाय फ्रॅन्ट आणि बॅक असे दोन दोन कॅमेरे असणार आहेत..

झालं आपलं पब्लिक खुळं झालं. पण जरा शानै लोकं खोड्या करायला लागले. हे शक्य नाही म्हणायला लागले, आत्ता कंपनीला पण सुरवातीपासून माहित होतं शहाणे लोकं शहाणपणा करणार म्हणून सुरवातीपासूनच कंपनीने डोकं लावलेलं.

तर झालेलं असं की मोदी सत्तेत आल्यानंतर काहीतरी लय भारी करुन दाखवणार अस वातावरणं होतं. त्यात डिजीटल इंडिया आणि मेक इन इंडिया हे दोन्ही प्रोजेक्ट केंद्र सरकार प्रमोट करत होतं. या दोन्ही योजनांचा फायदा घ्यायचं धोरणं कंपनीने आखलं.

त्यासाठी आपण पण मेक इन इंडिया आणि सरकारचाच भाग आहोत अस दाखवण्यात येत होतं. यासाठी जेव्हा फोन लॉन्च करायचा कार्यक्रम ठेवला तेव्हा तत्कालीन संरक्षणंत्री मनोहर पर्रिकर यांना बोलवण्यात आलं होतं. पण पर्रिकर गेले नाहीत. पुढे मुरली मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कंपनीने फ्रिडम, प्रत्येकाकडे मोबाईल, डिजीटल इंडिया,मोदींचे धोरण असाच प्रचार सुरू ठेवला.

आत्ता मुळ प्रश्नांकडे जाऊ. ही कंपनी कोणाची होती ?

मोहीत गोयल नावाचा माणूस या कंपनीचा CEO होता. याव्यतिरीक्त देखील कंपनीत मॅनेंजिग डायरेक्टर होते पण मुळपुरूष मोहित गोयलच. तर या मोहितने २५० रुपयात फोन देण्याची स्किम काढल्यानंतर लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सुरवात केली.

पहिला प्रश्न होता इतक्या स्वस्त:तला फोन कसा काढणार, तेव्हा कंपनीने सांगितंल आणि मार्केटिंगची युनिक आयडिया वापरली आहे त्यामुळे मार्केटिंगचे पैसे वजा करा. त्यानंतर आम्ही मोबाईलमध्येच काही इनबिल्ट APP देणार आहोत. त्याचे पैसे त्या त्या कंपनीकडून आम्हाला मिळतीलच. शिवाय आम्ही लार्ज स्केलवर काम करत आहोत.

आत्ता या मोबाईलसाठी कंपनी फंड कुठून आणणार ?

तेव्हा मोहित गोयल साहेबांनी सांगितलं की, या कंपनीचे जे इन्वेस्टर आहेत ते ॲग्री कमोडिटीचे बादशहा आहेत. ते पैसे लावणार आहेत. तिथूनच आम्ही पैसे आणणार. शिवाय मोबाईल तयार न करता ते असेंम्बल करणार. त्यासाठी नोयडा आणि हरिद्वार येथे आणि असेंम्बल करण्याचे कारखाने टाकत आहोत. शिवाय डिलीव्हरीची लिंकची जुळणी करत आहोत.

जे लोकं अभ्यास करत होते त्यांना जरा जरा या गोष्टीत दम वाटू लागला. ठरल्याप्रमाणे २५० रुपयातल्या मोबाईलचं बुकींग सुरू करण्यात आलं, आणि एका दिवसात सगळं बुक झालं. वेबसाईट गंडली इतकं बुकींग झालं. इथं कंपनीनं कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन दिला नव्हता त्यामुळं सगळ्यांनी लागलीच पैसे पे केले.

भारतातून एका क्षणात बुक झालेल्या मोबाईलचे एकूण पैसे होते १४५ कोटी…

हं, १४५ करोड रुपये. आत्ता कंपनीने तुमच्या हातात ३० जून २०१६ अखेर मोबाईल पडणार म्हणून तारीख दिली. इकडं मोबाईल बुक केलेले कार्यकर्ते तारीख पे तारीख बघत कॅलेंडर सरकवू लागले पण मोबाईल काय आला नाही. ३० जून गेल्यानंतर परत विचारणा करण्यात आली तेव्हा डिसेंबर २०१६ अखेर फोन मिळेल म्हणून सांगण्यात आलं. मध्येच नोटबंदी झाली आणि माणसांनी अडीचशेचा नाद सोडून दिला.

घोर फसवणूक झाली तरी याविरोधात म्हणाव्या तशा तक्रारी दाखल झाल्या नाहीत. २५० रुपयेसाठी १०० रुपयांच पेट्रोल जाळून पोलीस स्टेशनला जा. बरं तो बाबा कोण कुठला हे पण माहित नाही. एवढं सगळं फक्त अडीचशे साठी करायचं म्हणून माणसांनी नाद सोडून दिला आणि आपल्या सर्वसामान्य लोकांच्या विस्मृतीत कंपनी गेली.

पण काही लोकांनी पिच्छा धरलां. या पिच्छा धरणाऱ्यात १५ ते २० लाखांना डबऱ्यात गेलेली लोकं होती. आत्ता ही लोकं नेमकी कोण होती तर डिस्ट्रीबुटर. तुम्हाला जिल्हा लेव्हलचा प्रतिनिधी करतो म्हणून कंपनीने यांच्याकडून १५ ते २० लाख रुपये घेतलेले.

या माणसांनी तक्रारी दाखलं केल्या…

त्यानंतर चौकशी झाली. पहिल्यांदा कंपनीने सांगितलं की आम्हाला सरकार ५० हजार कोटी देणार हे अपेक्षित होतं पण त्यांनी हे पैसे दिले नाहीत म्हणून आम्ही गंडलो. पण सरकार असे पैसे देणार आहेत हे फोन बुकींगच्या पूर्वी कधीचं सांगण्यात आलं नव्हतं.

दूसरी गोष्ट म्हणजे त्यातही कंपनीने सांगितलं की आम्ही व्ही टेक्नॉलॉजी आणि EMINENCE टेक या दोन कंपन्यांकडून प्रोजेक्ट आऊटसोर्स केला आहे. फोन लवकरच मिळतील. चौकशीत या दोन्ही कंपन्यांनी आमचे आणि रिंगींग बेल कंपनीचे कोणतेही व्यवहार झाले नाहीत हे स्पष्ट केलं.

अखेर आपले मोहित गोयल गायब झाले.

काही दिवसांनी त्यांना राजस्थामधून अटक करण्यात आली. गोयल कुटूंब ॲग्री कमोटिडीट बादशाह असल्याचं सांगण्यात आलं होतं. ते या प्रोजेक्टवर पैसै देखील लावणार होते. प्रत्यक्षात त्यांच युपीमध्ये साधं किराणा मालाचं दुकान होतं. बर याहून हाईट म्हणजे कंपनीने जो फ्रिडोम २५० म्हणून फोन दाखवलेला तो चायनाचा फोन होता.

ॲडकॉम कंपनीच्या आयकॉन 4 या मॉडेलवर व्हाईटनर लावून फ्रिडोम २५० लिहण्यात आलं होतं. म्हणजे बघा या पठ्याने फोटोशॉपचा सुद्धा खर्च केला नाही, दहा रुपयाच्या व्हाईटनरवर काम भागवलं होतं.

बर टेलिकॉम मिनिस्ट्रीने आपल्या रुल्समध्ये या कन्फ्युग्रेशनच्या मोबाईलची मिनीमम प्राईज २३०० रुपये सांगितली होती. तरिही लोकं भुलली. मोहीतवर आणि एक केस झाली. ती कुठली तर हे सगळं उद्योग करण्यासाठी साई फ्युचर या कॉलसेंटरला काम दिलेलं. त्यांचे पण पैसे मोहितने दिले नाहीत.

शेवटी मोहीतला अटक झाली, त्यानंतर जामीन मंजूर झाला. राजस्थानमध्ये बलात्काराचं एक प्रकरण झालेलं. आरोपींकडून केसं सेटलमेंट करण्यासाठी या मोहितने लाच मागितली. त्यात तो रंगेहात सापडला. या प्रकरणात देखील त्याला अटक झाली.

पुढे काय जामीन मंजूर झाला. त्याने १४५ कोटी गोळा केले असले तरी त्याच्याविरोधात FIR खूप कमी लोकांनी केला. त्यामुळे केस म्हणावी तशी स्टॉन्ग नाहीच थोडक्यात काय भाऊंनी १४५ कोटी घेवून ठेकरं दिलाय, पैसे पचले.

हे सगळं झालं आणि आज बातमी आली की भारताला २५० रुपयांच्या मोबाईलच स्वप्न दाखवणारा मोहित गोयल काल ड्रायफ्रूट घोटाळ्यात अडकलाय.

खारीक बेदाणे काजुमेवामध्ये जास्तीतजास्त किती रुपयांचा घोटाळा होईल असं तुम्हाला वाटतंय. तर या पठ्ठ्याने फक्त २०० कोटी रुपयांना युपीच्या व्यापाऱ्यांना गंडवलंय.

मोहित गोयल पाच साथीदारांसोबत नोएडा सेक्टर 62 मध्ये ड्रायफ्रुट्स कंपनी चालवत होता. ‘दुबई ड्राय फ्रूट्स अँड स्पाईसेस हब’ असं या कंपनीचं नाव आहे. या कंपनीच्या माध्यमातून देशाच्या विविध भागातील व्यापाऱ्यांकडून तो चढ्या दराने सुकामेवा खरेदी करायचा.

सुरवातीला वेळेत पैसे देऊन त्यांचा विश्वास त्याने संपादन करायचा आणि त्यानंतर मोठमोठ्या ऑर्डर देऊन फक्त ४० टक्के रक्कम नेट बँकिंगच्या माध्यमातून ऍडव्हान्स द्यायचा आणि उरलेले पैसे चेकच्या माध्यमातून देण्याचं आश्वासन द्यायचा.

पण हे चेक बँकेत गेल्यानंतर बाऊन्स होत होते. मोहित भाऊ हे ड्रायफ्रूट्स बाजारात आणखी महाग विकून ते बक्कळ पैसा कमवत असे. अखेर त्या व्यापाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्यांनी कंप्लेंट केली. मोहीतला आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 

एकूण काय २५० रुपयांच्या मोबाईलच्या स्वप्नातून अख्खा भारत शहाणा झाला तरी हे यूपीवाले जरा अजून मागेच आहेत.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.