मराठा समाजात आज दिसत असलेल्या शैक्षणिक जागृतीचे श्रेय गंगाधरभाऊ म्हस्के यांच…!!
भारतात संख्येने सगळ्यात जास्त असलेली एकगठ्ठी जात म्हणजे मराठा समाज. महाराष्ट्राचे इतिहासकार बी. आर. सुंथनकर यांच्या मते, सगळ्या जातीजमातीमधील युद्धात उतरणाऱ्या लोकांना मूळ कुणबी जातीशी जोडून हा गट बनवण्यात आला.
महात्मा फुल्यांनी तर कुणबी, माळी आणि धनगर हे सगळेच वेगवेगळे व्यवसाय करणारे मराठा असल्याचंही म्हटलं आहे. भालचंद्र नेमाडे आणि इतरही अभ्यासक ह्या गोष्टीला दुजोरा देतात. आता त्यांच्या अभ्यासात लै पडलं तर आपल्याला गुंगी यायची,
पण ही माणसं स्वराज्यासाठी लढली आणि त्यामुळं काळाच्या ओघात जातीतल्या काहीच निवडक लोकांकडं सत्ता आणि प्रतिष्ठा आली…
लढण्यात कर्तबगार असलेल्या ह्या समाजाला काळाची पावलं समजली नाहीत आणि स्वराज्यानंतर इंग्रज काळात त्यानं शेतीत लक्ष गुंतवलं. आजही मराठ्यांमधील ८०% लोक शेतीवर अवलंबून आहेत.
१९३१ साली झालेल्या जनगणनेत मराठा जातीत मुंबई शहरातला साक्षरता दर ११% होता. म्हणजे भिडू, दहा जणांतल्या एकालाच लिहिता वाचता येत होतं इतकी भयंकर परिस्थिती. (हा आकडापण वाढवून लिहिला असल्याचा आरोप गेल ऑमवेट यांनी केलाय, हा भाग सोडाच!)
आज परिस्थिती हळूहळू बदलत असली तरी ही स्थिती बदलायला काम करणारी लोकं मात्र लोकांच्या स्मृतीतून गायब झाली आहेत.
त्या काळात पुण्यात शिकायला येणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना आपलंसं वाटणारं नाव म्हणजे,
गंगाधर भाऊ म्हस्के..!
कॅम्प एरियात राहणाऱ्या प्रत्येकाला हे नाव परिचयाचं होतं. बलदंड शरीर, साधा वेष आणि तोंडात भलामोठा विदेशी पाईप त्यांची ओळख होती. हिराबागेच्या कॉस्मोपोलिटन क्लबमध्ये अद्याप त्यांचे तैलचित्र लावलेलं आहे.
१९ व्या शतकातल्या पुण्यात अनेक शिक्षण संस्था होत्या, पण बहुजनांना शिकवण्यासाठी फार तुरळक प्रयोग त्या काळी व्हायचे. फर्ग्युसन महाविद्यालयातून शिकणारे विद्यार्थी तर बहुसंख्य फक्त ब्राह्मणच असायचे.
टिळकांच्या हयातीत फर्गुसनमध्ये शिकणाऱ्या सर्व ब्राह्मणेतर पोरांची संख्या मिळून आधी 4% आणि नंतर वाढून 13% च्या आसपास इतकीच होती. 1880 च्या जनगणनेतही मराठा जात शैक्षणिक क्षेत्रात मागास असल्याचे सरकारच्या अहवालात दिसत होते. मात्र हि परिस्थिती बदलण्यासाठी कोणीच पुढे येत नव्हते.
म्हणूनच त्यांनी 1884 मध्ये इंग्रज अधिकारी सर डब्ल्यु. वेडरबर्न यांच्या अध्यक्षतेखाली मराठा जातीच्या शैक्षणिक प्रगतीबाबत चर्चा करण्यासाठी एका सभेचे आयोजन केले व त्यासंदर्भात समाजातील महत्त्वाच्या लोकांशी चर्चा केली.
मराठ्यांची सामाजिक परिस्थिती अशी बिकट असण्याच्या काळात आपली जबाबदारी ओळखून मराठ्यांची पोरं शिकवीत म्हणून त्यांनी राजन्ना लिंगो यांना सोबत घेऊन 1885 साली “डेक्कन मराठा असोसिएशन” ही संस्था काढली. ह्या संस्थेला बडोच्याचे महाराज सयाजीराव गायकवाड ह्यांचा मोठा हातभार होता. ह्याच संस्थेत शिकलेली पोरं पुढे देशभरातील संस्थाने आणि ब्रिटिश सेवेत मोठमोठ्या हुद्द्यांवर लागली.
त्यांचा जन्म नाशिक ओढे रंगराव गावी 1831 मध्ये झाला. त्यांचे वडील घरच्या गरिबीने पुण्यात स्थलांतरित झाले आणि हमालीचे काम करू लागले. मुलाने मात्र शिक्षणाची कास धरली आणि सुरुवातीला आपले प्राथमिक शिक्षण पुण्यातील मिशन शाळेतपूर्ण केले.
लगेच उच्च शिक्षण घेणे शक्य नव्हते म्हणून शिक्षण झाल्यावर त्यांनी छोट्यामोठ्या नोकऱ्या केल्या व पुणे कँटोन्मेंट मॅजिस्ट्रेटचे शिरस्तेदार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. हे काम करत असतानाच त्यांनी वकिलीचे शिक्षणही पूर्ण केले आणि 1876 मध्ये त्यांनी पुण्यात वकिली सुरू केली. त्याकाळात शिक्षणासाठी एवढी धडपड करून शून्यातून आपले विश्व निर्माण करणारा माणूस विरळाच म्हणावा लागेल.
महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या घडणीत त्यांचा हातभार होता. समाजाची स्थापना झाल्यापासूनच ते त्याच्याशी जोडले गेले व त्यांनी अनेक प्रसंगांमध्ये सत्यशोधक समाजाचे बिनीचे शिलेदार म्हणून जबाबदारी पार पडली.
एकदा पुण्याच्या विठ्ठल गुठड यांनी आपल्या नव्या घरात बिनाब्राह्मण गृहप्रवेश केला म्हणून जेव्हा ब्राह्मणांनी त्यांच्यावर खटला भरला तेव्हा त्यांच्या सर्व ब्राह्मण हिस्सेदारांनी त्यांना व्यवसायातून काढून टाकलं होतं.
तेव्हा गुठड यांच्याशी वळखपाळख नसताना त्यांच्या पोरांच्या शिक्षणाचा सर्व खर्च गंगाधर साहेबांनी उचलला होता. पुढं जेव्हा गुठड यांचा व्यापार पूर्वस्थितीत आला तेव्हा त्यांनी ह्या रकमेचा वापर इतर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यायला केला.
पुण्यात त्या काळी कोणत्याच बहुजन माणसाचं घर त्यांच्या तोडीचं नव्हतं असं विठ्ठल रामजी शिंदे यांनी लिहून ठेवले आहे. मोठमोठे संस्थानिक, इंग्रज अधिकारी, सगळ्या जातींचे सुधारक मंडळी आणि शिक्षणासाठी झटणाऱ्या लोकांमध्ये त्यांची छाप होती.
85 वर्षांपूर्वी शिक्षणतज्ज्ञ सीताराम तावडे त्यांच्याविषयी बोलताना म्हणाले होते,
‘मराठा समाजात आज जी शैक्षणिक जागृती दिसत आहे, त्याचे सर्व श्रेय कै.गंगारामभाऊ म्हस्के यांना आहे.’
पुढच्या काळात मराठ्यांच्या प्रबोधनासाठी देशात नावाजलेले अनेक लोक तेव्हा गंगाधर भाऊ म्हस्के ह्यांच्याच खांद्यावर उभे होते, असं म्हटलं तरी वावगं होणार नाही.राजर्षी शाहूमहाराजांचा म्हस्केंशी 1894-95 च्या दरम्यान पत्रव्यवहार होता. ज्याद्वारे महाराजांनी म्हस्केंना बहुजन समाजातील पदवीधर विद्यार्थ्यांची नावे मागितली.
डॉ.रमेश जाधव यांचे विधान ह्यासंदर्भात महत्त्वाचे ठरते की,
“राज्यकारभारात समाजातील सर्व घटकांचा समावेश करून घेण्याचा शाहू छत्रपतींचा निर्धार कायम होता. ते धोरण त्यांनी आयुष्यभर अमलात आणण्याचे जीवापाड प्रयत्न केले. हेच धोरण मनात ठेवून त्यांनी पुण्यातील एक नामवंत वकील आणि ब्राह्मणेतर समाजाचे नेते गंगारामभाऊ म्हस्के यांना बहुजन समाजातील पदवीधर आणि नोकरीस पात्र अशा लोकांची नावे कळविण्यास विनंती केली.”
रानडे आणि भांडारकर यांची त्यांच्या सोबत चर्चा व्हायची. वकील म्हणून त्यांनी राज्यात प्रचंड ख्याती आणि तितकाच पैसा कमावला होता.
“मराठ्यांमध्ये एवढं इंग्रजी शिकलेले एकमेव व्यक्तिमत्त्व”
असा त्यांचा उल्लेख त्यांच्या सोबतची माणसं करतात तेव्हा हा माणूस काळाच्या किती पुढं होता, हे जाणवतं. शेती आणि इतर गावकीच्या कामात गावचे पाटील, इनामदार, देशमुख आपल्या पोरांकडे लक्ष देऊ शकत नसत अशा पोरांच्या शिक्षणाची सोय त्यांनी कसबा पेठेच्या सुशिक्षण गृहात केली होती.
नाममात्र शुल्कावर विद्यार्थी येथे राहत आणि शिक्षण घेत असत. त्यांच्या संस्थेत शिकलेल्या लोकांच्या नावांची नुसती यादी पहिली तरी महाराष्ट्राच्या प्रबोधनात आणि ब्राह्मणेतर चळवळीत त्यांच्या कार्याचे योगदान किती मोठे होते हे आपल्या सहजी लक्षात येईल.
विठ्ठल रामजी शिंदे, भास्करराव जाधव, वासुदेव लिंगाजी बिर्जे, पांडुरंग पाटील, रामचंद्र शामराव माने-पाटील, दाजीराव विचारे, कोल्हापूरच्या संस्थानाचे क्षात्रगुरू म्हसदाशिव पाटील बेनाडीकर, दत्तात्रय रामचंद्र भोसले, सीताराम तावडे या सर्व धुरीणांचे शिक्षण पूर्ण होण्यात गंगाधर भाऊ म्हस्के ह्यांनी केलेल्या मदतीचा वाटा सर्वाधिक होता.
त्यांनी त्या काळात मराठ्यांच्या पोरांना शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवण्याचा आणि बहुजन पदवीधर बनवण्याचा ट्रेंड सुरू केला. फक्त त्यांच्या हयातीत कित्येक मुलं इंग्लंडला मँचेस्टर आणि इतर विद्यापीठात जाऊन तसेच त्यांच्या शिष्यवृत्तीने पुण्यात राहून शिकू शकले.
सत्यशोधक मुकुंदराव पाटील यांनीही आपल्या लेखनात त्यांच्या कामाचं महत्त्व मांडलं आहे. त्यांच्या नंतरच्या काळात मराठा समाजात अनेक कोट्याधीश झाले, पण आपल्या समाजासाठी काही करण्याची धमक फक्त म्हस्के यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या माणसांकडेच होती.
हे ही वाच भिडू
- मराठा आरक्षण आणि निकषांचा घोळ
- स्वातंत्र्यापूर्वी दक्षिण भारताला उत्तरेशी जोडण्याचं काम मराठा रेल्वेने केलं.
- एक मराठा वीर योद्धा हिटलर व मुसोलिनीच्या सैन्याला भारी पडला होता.