११ वेळा आमदार होवून पण “आमदारकी” डोक्यात न गेल्यानं हे शक्य झालं..

आबा गेल्या वर्षी रिटायर झाले. आबा कोण? तर १९६२ पासून महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून येणारे सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख. दोन अपवाद सोडले तर ते कधी पडले नाहीत. अगदी मोदी लाटेत देखील ते निवडून आले. १९६२ पासून ते दोन अपवाद सोडले तर कधीच सत्तेत नव्हते. पुलोद कार्यक्रमात त्यांच्याकडे मंत्रीपद होते, नंतर ९९ च्या दरम्यान शेकापने आघाडी सरकारला पाठिंबा दिल्यानंतर ते सत्तेत होते.

पन्नास वर्षाहून अधिक काळ आमदारकी. या काळात ११ वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. पण त्याहून महत्वाच म्हणजे त्यांनी हे सर्व एका पक्षातून केलं आहे. 

शेतकरी कामगार पक्ष हा एकेकाळचा राज्यातला मातब्बर पक्ष. राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष असणारा शेकाप कधीही सत्तेत येवू शकत होता. शंकरराव मोरे, नाना पाटील, सिडी देशमुख, केशवराव जेधे, माधवराव बागल, तुलशीदास जाधव अशा मातब्बर लोकांचा हा पक्ष. कधीकाळी नगर सारखा संपुर्ण जिल्हा लाल रंगाचा होता.

महाराष्ट्राच्या राजकारणात कॉंग्रेसनंतर सर्वात महत्वाचा शेकाप हा पक्ष होता. पण नंतरच्या काळात पक्षाची उतरण सुरू झाली. हळुहळु पक्ष संपल्यात जमा झाला. जयंत पाटलांमुळे रायगड आणि गणपतराव देशमुखांमुळे सांगोल्यात शेकापच अस्तित्व राहिलं. त्यातही १९६२ पासून राज्यात झालेल्या इतक्या मोठ्या राजकिय उलथापालथीत ते लाल बावटा कसा टिकून राहिला विशेष म्हणजे कॉंग्रेस आघाडीसारख्या सत्ताधारी पक्षासोबत मित्रत्वाचे संबध असून देखील ते शेकाप मधूनच निवडून येत होते याच कौतुकच वाटतं. 

गणपतराव देशमुखांचा जन्म ऑगस्ट १९२७ चा. 

या दोन मतदारसंघापुरत शेकापचं अस्तित्व राहिलं. पंढरपूर मोहोळ रस्त्यावर असणारे पेनूर हे त्यांच जन्मगाव. घरात देशमुखी. त्यामुळे देशमुखी परंपरेतच ते मोठ्ठे झाले. त्यांच मॅट्रिकच शिक्षण पंढरपुरात झालं तर त्यानंतरच शिक्षण पुण्यात झालं. पुण्यात आल्यानंतर स्वातंत्र्य चळवळीकडे त्यांचा ओढा वाढला. इथे कॉंग्रेसी विचारसणीचे स्वातंत्रसैनिक तुळशीदास जाधव त्यांच्या परिचयाचे झाले. शेकापची स्थापना झाली आणि तुळशीदास जाधव यांच्या प्रभावातून ते शेकापमध्ये आले.

पुण्यात विद्यार्थीदशेत असताना त्यांच्यावर शेकापच्या मोरे, जेधे, नाना पाटील, तुळशीदास जाधव यांचा प्रभाव पडत गेला. त्या काळात शंकरराव मोरे पुण्यात मार्क्सवादी विचारांचे अभ्यासवर्ग घेत असत. घरातून देशमुखी असणारे गणपतराव देशमुख या लोकांमुळे खऱ्या अर्थाने लोकांचे झाले. निस्वार्थीपणे काम करण्याची शिकवण या नेत्यांनी दिली आणि त्यांना पुढे ठेवूनच ते सांगोल्यातून पहिल्यांदा आमदार झाले. 

१९६२ साली गणपतराव देशमुख पहिल्यांदा आमदार झाले. 

१५ मार्च १९६२ साली त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळास सुरवात झाली. आमदारकी मधून वेळ काढून वकिलीच शिक्षण घेण्यास वेळ न मिळाल्याने त्यांच वकिलीचं शिक्षण सुटलं. आपल्या पहिल्याच आमदारकीत राज्यपालांच्या अभिभाषणावर भाषण देवून त्यांनी विरोधक असणाऱ्या यशवंतराव चव्हाणांची देखील वाह् वा मिळवली होती. 

विरोध पक्षात राहून देखील काम होवू शकतं हे गणपतराव देशमुखांनी दाखवून दिलं. त्यांनी सहकारातून विकास साधला. त्याच सोबत पाण्यासाठी वेगवेगळ्या स्किम आणण्यासाठी पुढाकार घेतला. मुंबईत असताना सरकारी पातळीवर काम करुन घेणं आणि वेळ आली तर लोकांसोबत आंदोलनात उभा राहणं. या दोन्ही ठिकाणी गेल्या ५० वर्षात गणपतराव देशमुख यांना लोकांनी हमखास पाहिलच.

कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाला मिळावे म्हणून नागनाथ आणा यांनी पाणी परिषदेच्या रूपाने एक लढा उभारला होता त्यातही गणपतरावांचा सक्रीय सहभाग होता.  टेंभू योजनेचं पाणी आपल्या भागात आणण्यासाठी त्यांनी लढा दिला. आबासाहेब दोन वेळा मंत्री होते. मंत्रीपद गेल्याच्या क्षणी त्यांनी सरकारी गाडीचा त्याग केला. आमदार म्हणून ते नेहमीच एस.टी ने प्रवास करत. आजही एस.टी. ने प्रवास करणारे आमदार म्हणून त्यांना ओळखलं जात. 

या सर्व गोष्टीमागे आहे त्यांचा साधेपणा आणि पाय जमिनीवर असण्याची कला. इतक्या वेळा आमदार झाले पण “आमदारकी” त्यांच्या डोक्यात गेली नाही म्हणूनच त्यांना सांगोला विधानसभा मतदारसंघातली लोकांनी भरघोस मतांनी निवडून दिलं.

आजही गणपतराव देशमुख घराच्या पुढे थांबणाऱ्या गाडीला हात करतात. त्याच्या मागे बसून मतदारसंघातल्या एखाद्या गावात जातात. आपली कर्तव्य बजावतात. लोकांच्या भेटीगाठी घेतात आणि मोठ्या प्रामाणिक हेतून काम करतात. गणपतराव देशमुख आत्ता रिटायर झालेत.

साहजिक वयाच्या ९४ व्या वर्षी आमदारकीच्या निवडणुका लढवणं शरिरस्वास्थाच्या हेतूने त्यांना अवघड वाटतं असावं. तरिही त्यांनीच परत उभा राहवं, लाल बावटा असा घरावर फडकत रहावां अशी लोकांची इच्छा असणार यात कोणतीच शंका नाही.

हे हि वाच भिडू. 

1 Comment
  1. Sumit says

    Aabasaheb zindabad

Leave A Reply

Your email address will not be published.