या माणसामुळे महाराष्ट्र सर्वांधिक श्रीमंत झाला..
GI टॅग अर्थात जिओग्रॉफिकल इंडिकेशन म्हणजेच भौगौलिक संकेत किंवा उपदर्शन. म्हणजे काय तर एखादी वस्तू एखाद्या विशिष्ट भागातील असेल तर त्या भागातील व्यक्तिंकडेच त्याचे हक्क असावेत.
उदाहरण द्यायचं झालं तर,
कोल्हापूरी चप्पल हे उदाहरण घेवू. कोल्हापूरी चप्पल याची मालकी कोणाकडे असावी तर कोल्हापूर भागातील समुदायाकडे.
समजा एखादी अमेरीकेतील चप्पल तयार करणारी कंपनी आहे. या कंपनीने कोल्हापूरी चप्पल सारखीच चप्पल तयार केली व हे आमची डिझाईन म्हणून पेटंट केली तर पुढे कोल्हापूरमधीलच लोकच अशी चप्पल तयार करण्यावर अडचणी येवू शकतात. WTO द्वारे भारताने आणलेल्या कायद्यानुसार तो गुन्हा ठरू शकतो.
म्हणूनच ज्या भागातील एखादी गोष्ट आहे त्याच भागातील लोकांना त्याचा हक्क देणं व हे हक्क जागतिक पातळ्यांवर अबाधित असणं महत्वाचं ठरतं. यासाठी
GI अर्थात जिओग्राफिकल इंडिकेशन प्राप्त करणं गरजेचं असतं.
महाराष्ट्रात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांना GI टॅग मिळाला आहे.
पुणेरी पगडी, रत्नागिरी-सिंधुदुर्गचा कोकम, पुण्याचा आंबेमोहोर, आजऱ्याचा घनसाळ तांदूळ, कोरेगावचा वाघ्या घेवडा, नवापूरची तूरडाळ, वेंर्ग्युलाचा काजू, लासलगावचा कांदा, बीडचं सीताफळ, जालनाची मोसंबी, मराठवाड्याचा केशर आंबा, घोलवडचा चिक्कू, सोलापूरचे डाळिंब, सांगलीचा बेदाणा, जळगावची केळी, सासवड-पुरंदरचा अंजीर अशा बऱ्याच गोष्टींना GI टॅग मिळाला आहे.
आत्ता यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व टॅग एकाच व्यक्तीच्या पुढाकाराने मिळणं शक्य झालं.
त्यांच नाव ॲड. प्रा. गणेश हिंगमिरे.
गणेश हिंगमिरे हे पुण्याच्या गवळी आळीतले. घरची परस्थितीत अत्यंत गरिबीची. वयाच्या सहाव्या वर्षी ते काम करू लागले. ते काम होतं,
काकांच्या पान दुकानावर विडी सिगरेट पान विकण्याचं.
त्यांचे काका स्वातंत्रसैनिक होते. त्यामुळे त्यांचा संपर्क प्रा. ग. प्र. प्रधान, मधुकर निरफराके, रामभाऊ म्हाळगी अशा समाजातील चांगल्या व्यक्तींसोबत यायचा. त्यामुळे परिस्थिती बेताची असली तरी शिक्षणाबाबत घरातूनच पाठिंबा मिळाला. त्यांना बुधवार पेठेतील नूतन समर्थ विद्यालयात ॲडमीशन मिळालं. या शाळेत बहुतांश मुलं ही वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची असत.
गणेश हिंगमिरे या गोष्टीला आपलं सुदैव मानतात. शाळेची फी सात रुपये होती पण त्या काळात इतके पैसै देखील त्यांच्याकडे नसतं. शाळेने त्यांची फी दोन रुपये केली. शाळेच हे ऋण ते आजही मोकळेपणाने मान्य करतात. ते सांगतात त्यांच्यामुळे मी शिकू शकलो.
सातवी पास झाल्यानंतर दहावी झाली पुढे बारावी झाली. दहावी आणि बारावीचा निकाल त्यांनी पान दुकानावरच घेतला. विजयानंद थिएटरच्या बाहेर असणारे पान दुकान हेच त्यांच घर झालं होतं, इथेच राहून ते पोटपाण्यासाठी व्यवसाय करायचे, इथेच ते झोपायचे आणि इथेच ते रात्ररात्रभर जागून अभ्यास करायचे.
त्यांच्या कष्टामुळे त्यांना चांगली संगत मिळाली. मित्रांच्या जोरावर ते गरवारे कॉलेजमधून बीएस्सी झाले. पुढे आय.एल.एस. लॉ कॉलेजला वकिलीचं शिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रवेश घेतला.
इथल्या सहवासात त्यांना दोन गुरू आणि असंख्य मित्र मिळाले. देशमुख सर व आव्हाड सर व मित्रांमुळे परिस्थिती नसताना आपण लंडनला शिकायला जायचं हे स्वप्न त्यांनी पाहिलं. त्या दिशेने हालचाली सुरू केल्या. वेगवेगळे फॉर्म भरले. अशाच एके दिवशी त्यांना एलएलएम करण्याची संधी लंडनमधून चालून आली.
पैसे नसल्याने हे स्वप्न अपुर्ण राहण्याची शक्यता होती मात्र तत्कालीन सरकारने सुरू केलेली कर्ज योजना व व्यंकटेश्वरा ग्रुपचे बालाजी राव यांनी आर्थिक मदत उभा केली व ते इंग्लडला शिकण्यासाठी गेले.
इथल्या विद्यापीठात राहून अभ्यास पुर्ण करु लागले. थिसिस साठी रात्रदिवस परिश्रम घेवू लागले. कधीकधी या दुनियेत आपला टिकाव लागणार नाही म्हणून मागे फिरू वाटतं असे.
पण एक क्षण आला आणि त्यांनी दुप्पट वेगाने परिश्रम करण्यास सुरवात केली. आपला थिसिस वेळेत पुर्ण केलाच पण विद्यापीठात पहिल्या दहात ते नंबराने पास झाले.
इंग्लडमध्ये नोकरी करू लागले. त्याच काळात भारताचे राष्ट्रपती म्हणून अब्दुल कलाम स्वप्न पहात होते. बाहेरील देशातील तरुणांनी भारतासाठी योगदान द्यावं म्हणून त्यांचा पाठिंबा असे. एके ठिकाणी गणेश हिंगमिरे यांची अब्दुल कलाम यांच्यासोबत ओळख झाली.
गणेश हिंगमिरे भारतात परतले ते वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा (डब्ल्यूटीओ) करार आणि बौद्धिक संपदा कायदा (आयपी) या दोन विषयांवर सखोल अभ्यासक म्हणूनच.
इथून पुढे भारतासाठी काहीतरी करु म्हणून त्यांनी अब्दुल कलाम यांना मेल केला. अब्दुल कलाम यांनी देखील आपल्या लेटर पॅडवरती त्यांना भरघोस शुभेच्छा दिल्या. कलाम सर पुण्यात आल्यानंतर त्यांना खास गणेश हिंगमिरे यांना बोलावून घेतलं.
पुण्यात परतल्यानंतर ते पुणे विद्यापीठ, भारती विद्यापीठ, सिम्बायोसिस यांपासून ते देशभरातील आयआयटी, आयआयएमसारख्या संस्थांमध्ये बौद्धिक संपदेविषयी त्याने मार्गदर्शन करू लागले. ट्रेडमार्क, कॉपीराईट, पेटंट, जीआय हे तर त्याच्या खास आवडीचे विषय झाले.
याच कालावधीत पेटंट ऑफिसचे प्रशिक्षण सत्र पुण्यात घेण्याची संधी त्यांना मिळाली. या सत्राला कंट्रोलर जनरल आर.ए. आचार्य यांच्या हस्ते त्यांचा पुणेरी पगडी देवून सत्कार करण्यात आला. इथे त्यांना पुणेरी पगडीची GI साठी नोंदणी करण्याची कल्पना मिळाली. सर्व सोपस्कार पुर्ण करुन काही वर्षात पुणेरी पगडीला GI टॅग मिळाला.
दार्जिलिंगच्या चहानंतर महाराष्ट्रात प्रथमच GI मिळवण्याचा परवाना पुणेरी पगडीला मिळाला.
पुणेरी पगडीनंतर पैठणी साडी, महाबळेश्वर स्ट्रॉबेरी, नाशिकची द्राक्षे यांना GI टॅग मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यात ते यशस्वी ठरले. त्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांना एकत्र करून
रत्नागिरी-सिंधुदुर्गचा कोकम, पुण्याचा आंबेमोहोर, आजऱ्याचा घनसाळ तांदूळ,कोरेगावचा वाघ्या घेवडा, नवापूरची तूरडाळ, वेंर्ग्युलाचा काजू, लासलगावचा कांदा, बीडचं सीताफळ, जालनाची मोसंबी, मराठवाड्याचा केशर आंबा, घोलवडचा चिक्कू, सोलापूरचे डाळिंब, सांगलीचा बेदाणा, जळगावची केळी, सासवड-पुरंदरचा अंजीर
अशा एकामागून एका गोष्टींना GI टॅग मिळवून देण्यासाठी त्यांनी यशस्वी लढा दिला.
GI प्रमाणे कॉपीराईट मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करु लागले. लालबागचा राजा असो कि पुण्याचे फिरोदिया करंडक यासाठी त्यांनी कॉपीराईट मिळवून दिला.
जेव्हा संपुर्ण भारतातून ९२ ॲग्रीकल्चर रजिस्टर झाले त्यापैकी २६ ॲग्रीकल्चर रजिस्टर करण्याचा मान त्यांना देण्यात आला. आज अखेर एकूण ३१ गोष्टींना GI टॅग मिळवण्यासाठी त्यांनी अर्ज केले असून महाराष्ट्रात या गोष्टीत क्रमांक एकवर असल्याचं ते सांगतात.
निश्चितच याचे सर्व श्रेय ॲड. प्रा. गणेश हिंगमिरे यांना जाते.
आशियात सर्वांधिक ॲग्री GI मानांकन मिळवून देणारे व्यक्ती म्हणून त्यांचा गौरव करण्यात येतो.
असा हा माणूस महाराष्ट्रात आहे हे आपलं भाग्य. माणसांसाठी GI टॅग आलेच तर हा माणूस आमच्या मातीतला आहे हे सांगण्यासाठी ‘महाराष्ट्राचा गणेश हिंगमिरे’ असा GI टॅग आपल्याला घ्यायला हवा.
कारण हा माणूस खरा भूमिपूत्र आहे. त्यांच्यामुळे स्थानिकांना आपल्या वस्तूंना जागतिक पातळीवर ओळखच मिळाली नाही तर त्यांच्यामुळे व्यापार करणं सोप्प झालं.
युरोपीयन युनियन मार्फत थायलंडमध्ये महाराष्ट्रातल्या GI टॅग मिळालेल्या गोष्टी दाखवण्यात आल्या. त्यामुळे या गोष्टी देखील जागतिक पातळीवर जावून एका अर्थाने ब्रॅण्ड तयार झाल्या.
बोलभिडू मार्फत त्यांच्या कष्टांना सलाम !
प्रा. गणेश हिंगमिरे यांचा फोन नंबर : 9823733121
हे ही वाच भिडू.
- कष्टाची भाकरी : गेली ४६ वर्ष कमी पैशात पोटभर जेवण देण्याचा हा उपक्रम चालू आहे.
- बाजारात तंबू ठोकून जनतेच्या समस्या सोडवणारा आमदार पुणे जिल्ह्यात होऊन गेला.
- पुणेरी पोरांना खेळताना बघून इंग्रजांना बॅडमिंटनचा खेळ सुचला.
Motivational !
खरोखरच स्फुर्तीदायक 💐💐🙏🙏