पेप्सी, कोका-कोला खरी टक्कर दिली ती अस्सल भारतीय ब्रँड ‘गोल्ड स्पॉट’ ने…

भारतीय बाजारपेठेत अनेक कोल्ड ड्रिंक्सचे ब्रँड पाहायला मिळतात. यापैकी सर्वात लोकप्रिय ब्रँड म्हणजे पेप्सी आणि कोका कोला.

ऑक्टोंबर हिट असो की कडकडीत उन्हाळा, घरात येणारे पाहूणे असतो अन्यथा संध्याकाळच्या पार्ट्यांच नियोजन आत्ता जरी पेप्सी आणि कोका कोला हे दोन कोल्ड ड्रिंकचे ब्रँड फेमस असले तरीही या दोन ब्रँडला टक्कर देणारा एक मोठा भारतीय ब्रँड अस्तित्वात होता.

तो म्हणजे गोल्ड स्पॉट.

सध्या ‘मिरिंडा’ किंवा ‘फॅन्टा’ हे ऑरेंज सोडा कोल्ड ड्रिंक ब्रँड अस्तित्वात असले तरी यांच्या आधी पार्ले कंपनीचं ‘गोल्ड स्पॉट’ हे ऑरेंज कोल्ड ड्रिंक सगळ्यांना आवडायचं. 

‘गोल्ड स्पॉट’ विषयी अनेकांच्या आठवणी असतील. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत गोल्ड स्पॉट लोकप्रिय होण्याचं मुख्य कारण म्हणजे जाहिराती. बेलबॉटम परिधान केलेली माणसं आणि तरुण मुली या जाहिरातींमध्ये झळकायच्या.

त्यावेळी लोकांसाठी अशा जाहिराती पाहणं काहीसं वेगळं होतं. यामध्ये अनेकदा तरुण प्रेमी जोडपी बर्फात स्केटिंग करताना आणि कॅफे मध्ये गप्पा मारताना दिसायचे. ‘तो त्याच्यासाठी वेडा आहे, ती सुद्धा त्याच्यासाठी वेडी आहे, आणि अशाप्रकारे दोघेही गोल्ड स्पॉट साठी वेडे आहेत’, असा या जाहिरातींचा अर्थ असायचा.

आत्ता वाचताना कदाचित तुम्हाला हे हास्यास्पद वाटलं असेल. पण त्याकाळच्या लोकांसाठी अशा गोष्टी आकर्षक होत्या. 

पार्ले कंपनी सर्वांना माहीत असलेच. अनेक जणांची दिवसाची सुरुवात चहा आणि पार्ले- जी बिस्किटांनी होत असावी. याच पार्ले कंपनीने १९४९ साली ‘ग्लुको कोला’ नावाचं कोल्ड ड्रिंक बाजारात आणलं.

लोकांना आकर्षित करण्यासाठी ‘ग्लुको कोला’ च्या जाहिराती बनवण्यात आल्या. सुप्रसिद्ध कार्टूनिस्ट आर. के. लक्ष्मण ‘भारताचा पहिला कोला’ ही टॅग लाईन वापरून या जाहिराती बनवायचे.

परंतु एक वर्ष होतंय तोच , कोका – कोला कोल्ड ड्रिंकने भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला. त्यांनी नाव चोरल्याचा आरोप करून ग्लुको कोला विरोधात कोर्टात केस दाखल केली.

पार्ले कंपनीने ‘पार्ले कोला’ असं वेगळं नाव ठेवलं. परंतु तरीही कोका – कोला चं समाधान झालं नाही. मग वादात न पडता अखेर पार्ले कंपनीने १९५१ मध्ये ग्लुको कोला चं उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला.

पार्ले आणि कोका – कोला मध्ये रंगणाऱ्या संघर्षाची हीच सुरुवात होती. 

पार्ले कंपनीने माघार घेतली नाही. प्रश्न फक्त नावाचा असल्याने पुढील वर्षी १९५२ साली पार्ले कंपनीने ‘गोल्ड स्पॉट’ हे शीतपेय लाँच केले. गोल्ड स्पॉट शिवाय लिंबुच्या चवीवर आधारीत ‘लिम्का’ ही दोन उत्पादनं पार्लेने यशस्वी करून दाखवली. लिम्का हे तरुणाई मध्ये प्रसिद्ध असलेलं कोल्ड ड्रिंक. तर गोल्ड स्पॉट हे लहान मुलांना आवडणारं शीतपेय.

पार्लेची खरी स्पर्धा कोका – कोलाशी होती. त्यामुळे गोल्ड स्पॉटला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आणि तरुण वर्गाला आकर्षित करण्यासाठी त्यांनी जाहिराती बनवण्याचा निर्णय घेतला. या जाहीरातींसाठी मॉडेल म्हणून बॉलिवुड अभिनेत्री रेखाने काम केले. श्याम बेनेगल तेव्हा जाहिराती बनवण्यात माहीर होते. रेखा तेव्हा अतिशय तरुण होती. त्यांनी रेखाला घेऊन ही जाहिरात बनवली. 

याचा उचित परिणाम झाला. रेखाच्या या जाहिराती एवढ्या गाजल्या की गोल्ड स्पॉट तरुण वर्गात सुद्धा प्रसिद्ध झालं.

याच दरम्यान ‘अंजाना सफर’ सिनेमातील विश्वजित आणि रेखाच्या किसींग सीनची  जोरदार चर्चा झाली. जिथे तिथे हाच विषय असायचा. या संधीचा फायदा उठवत रेखाच्या मूळ जाहिरातीमधले फोटो तसेच ठेवण्यात आले. फक्त कॅप्शन बदललं गेलं. ‘ताजगी के पास आईये, अपनी प्यास बुझाईये. जी भर के जियो, गोल्ड स्पॉट पियो’ असं हटके कॅप्शन दिलं गेलं. याचा जास्त फायदा गोल्ड स्पॉट ला झाला. 

व्यवसाय ही अशी गोष्ट आहे, जो आर्थिक दृष्ट्या कधी वर असेल तर कधी झटकन खाली येईल हे कोणीच सांगू शकत नाही.

‘द झिंग थिंग’ असा स्वतःचा उल्लेख करणाऱ्या गोल्ड स्पॉटच्या व्यवसायाची झिंग अशीच उतरली. १९७५ ला देशात आणीबाणी लागू झाली. याचा मोठा फटका कोल्ड ड्रिंक्स ब्रँडना बसला. लोकांनी बाहेर जाणं बंद केलं, तसेच पार्टीचं आयोजन होणं कमी झालं. या गोष्टीमुळे गोल्ड स्पॉट आणि पार्ले कंपनीचं आर्थिक दृष्ट्या मोठं नुकसान झालं. या सर्व वातावरणात कोका – कोला कंपनी थोडीफार तग धरू शकली. 

रमेश चौहान हे गोल्ड स्पॉट चे मालक.

या परिस्थितीत १९८० दरम्यान रमेश चौहान यांनी अमेरिकन कोल्ड ड्रिंक कंपनी भारतात येऊ नयेत, म्हणून विरोध दर्शवला. या सर्व प्रकरणात तसेच आणीबाणीच्या काळात सरकारने लादलेल्या नियमांमुळे कोका – कोला कंपनीला भारतातून गाशा गुंडाळावा लागला. नुकसान असो वा फायदा ज्या कंपनीमुळे पार्ले कंपनीला स्वतःचं सुरुवातीचं उत्पादन बंद करावं लागलं होतं, ती कंपनी भारतातून गेल्याने पार्ले टीमला निश्चित आनंद झाला असावा. 

पार्ले आणि गोल्ड स्पॉट साठी हा आनंद जास्त वेळ टिकला नाही. १९९० साली ‘पेप्सी’ हा कोल्ड ड्रिंक ब्रँड बाजारात आला. तसेच १९९३ साली कोका – कोला भारतामध्ये नव्याने दाखल झाला. या एका मागोमाग एक निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे गोल्ड स्पॉट स्वतःचं अस्तित्व टिकवू शकला नाही. समोर असलेले दोन्ही ब्रँड दर्जेदार होते.

त्यापुढे गोल्ड स्पॉट मागे पडला. ज्या ब्रँडशी पार्ले कंपनी इतकी वर्ष स्पर्धा करत आली होती, अशा कोका – कोला कंपनीला ४० मिलियन डॉलर किंमतीने‌ पार्लेने गोल्ड स्पॉट विकला. 

जुन्या जाणत्या माणसांमध्ये गोल्ड स्पॉटची लोकप्रियता थोडीफार टिकून असली तरीही कोका – कोला ने गोल्ड स्पॉटचं उत्पादन करणं संपूर्ण बंद केलं. आणि त्या जागी ‘स्प्राईट’ आणि ‘फॅंटा’ या दोन नव्या ब्रँडची ओळख त्यांनी सर्वांना करून दिली.

एकेकाळी लोकांच्या तहानलेल्या जीवाला शांत करणारा गोल्ड स्पॉट फक्त आता आठवणीत उरला आहे. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.