कधीही आमदार, खासदार न झालेले “पडळकर” विरोधकांना इतके डेंजर का वाटतात ?  

२००९ सालच्या विधानसभा निवडणुका. या निवडणुकांमध्ये खानापूर आटपाडी मतदारसंघातून सदाशिवराव पाटील विरुद्ध अनिल बाबर असा सामना रंगला होता. सदाशिवराव पाटील कॉंग्रेसचे तर अनिल बाबर राष्ट्रवादीचे बंडखोर. राष्ट्रवादीने आपली अंतर्गत ताकद पुर्णपणे अनिल बाबर यांच्या विरोधात वापरली.

निवडणुकांचा निकाल लागला तेव्हा सदाशिव पाटील यांना ७७ हजार ९६५ मते मिळाली तर अनिल बाबर यांना ७४ हजार ९७६ मते मिळाली होती. अवघ्या तीन हजार मतांनी अनिल बाबर यांचा पराभव झाला. 

या निवडणुकांमध्ये जाईंट किलर ठरला तो एक तरुण पोरगा.

या पोराने २००९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत १८ हजार मते घेतली होती. सदाशिव पाटील गांधी टोपी वापरतात. त्यांना टोपी या नावाने ओळखले जाते. तीन हजार मतांनी ते आमदार झाले.

तेव्हा जिल्ह्यात एक नवीन म्हण रुजली. 

होता गोपी म्हणून वाचली टोपी. 

पक्ष कोणताही असो. गोपीचंद पडळकर हे नेहमीच हुकमाचा एक्का राहिले आहेत.

ते निवडून येत नाहीत पण पाडू शकतात ही त्यांची प्रतिमा. आपल्या सभेमध्ये ते सत्ताधाऱ्यांचा वचपा काढतात. स्व.आर.आर. पाटील यांना विरोध करत असताना त्यांची आबांचे विरोधक संजयकाका यांची साथ घेतली.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी संजयकाकांना मदत केली. त्यावेळी आर.आर. पाटलांवर त्यांनी आपली तोफ डागली. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी संजयकाका पाटलांवर तोफ डागली. 

ही भाषा बऱ्याचदा खालच्या पातळीवरची होती हे मान्य करावच लागतं पण दूसरीकडे या परिस्थितीला वारंवार सत्तेत असणारे हेच नेते कारणीभूत आहेत हे ठामपणे आपल्या समर्थकांमध्ये रुजवण्यात गोपीचंद पडळकर शंभर टक्के यशस्वी मानले जातात. बऱ्याच तरूणांच्या विद्रोहाला, संतापाला वाट मोकळी करून देण्याची ही भाषा असते. मुळात मातब्बर नेत्याच्या विरोधा ब्र काढला जात नाही, तिथे गोपीचंद पडळकर त्यांच्याबाबत जाहीर संभामधून खालच्या भाषेत बोलल्याने तरुण सुखावतात हे सत्य. 

पडळकरांचा इतिहास सुरू होतो तो सांगली जिल्ह्यातल्या खानापूर आटपाडी या विधानसभा मतदारसंघातून.

सांगली जिल्ह्याचा उत्तर पुर्व असणारा हा भाग दूष्काळी. अनेक निवडणुका पाणी प्रश्नावरूनच पेटल्या. त्याच सोबत गाव गाड्यात असणार धनगर मराठा सत्ताकारणाची देखील पार्श्वभूमी. धनगर समाजाचं प्राबल्य असून देखील इथे धनगर समाजाचा नेता होवू शकला नाही. पडळकरांनी तारुण्याच्या काळातच हि पोकळी अचूक हेरली. 

समाजाच्या मुलांना पोटापाण्याला लावायला हवं म्हणून त्यांनी दूध संघ सुरू करण्याचा प्रयत्न करुन पाहिला पण दुर्देवाने तो अयशस्वी झाला. शेतकऱ्यांच्या पोरांना कामाला लावण्यासाठी देशमुख पाटील कसे कारणीभूत आहेत हे आक्रमक भाषेत सांगितल. त्याच काळात राज्यात मनसेच वारं होतं.

पडळकरांसारख आक्रमक नेतृत्त्व मनसेत जाणार अशा बातम्या छापून येवू लागल्या पण ते महादेव जानकरांच्या रासपमध्ये गेले तिथे ते रासपचे जिल्हाध्यक्ष झाले. जानकर यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी स्वत:ची RSP काढली त्याचे ते प्रदेशाध्यक्ष होते. 

तेंव्हा विरोधी पक्षात असलेल्या विनोद तावडे यांच्याशी त्यांचा संपर्क आला. विट्यात तावडेंच्या हस्ते गाडीप्रदान सोहळा घेण्यात आला होता. त्यात समाजाने लोकवर्गणी काढून पडळकर यांना गाडी भेट दिल्याचे सांगण्यात आले.

2012 ला स्वाभिमानी शेतकरी संघटना फॉर्म मध्ये होती.

सदाभाऊ खोत व राजू शेट्टी सिंचन घोटाळा व दुष्काळ या विषयावर महाराष्ट्रभर फिरत होते. परिषदा घेत होते. तेंव्हा खानापूर तालुक्यात ही संघटना वाढवावी म्हणून राजू शेट्टी यांनी पडळकर यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेत या म्हणून निमंत्रण दिले होते.

निवडणुकीला “रिडालोस” सारखा प्रयत्न झाल्यास आपण सोबतच असू असे भाषण चांदोली ला स्वाभिमानी च्या राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिरात पडळकर यांनी ठोकले होते. पण पद्धतशीर पणे स्वाभिमानी जॉईन करण्याच्या विषयाला त्यांनी बगल दिली. 

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी देशमुखांना विरोध केला. पण नंतरच्या काळात देशमुखांसोबत सोयरीक करत आपल्याच भावाला त्यांनी जिल्हा परिषदेवर पाठवलं. 

या दरम्यानच्या काळात पडळकरांची तोफ ही मुलूखमैदानी तोफ झाली होती. कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या सत्तेच्या काळात सांगली जिल्ह्याला तीन मंत्रीपदे होते. एक केद्रात राज्यमंत्रीपद होतं. वर्षांनुवर्षे सत्तेत असून देखील आपण मागास आहोत  हे गृहितक लोकांपर्यन्त पडळकर ठामपणे पोहचवतं. सत्ताधाऱ्यावर राग काढण्यासाठी त्यांच्या सभा मतदारसंघाच्या बाहेर संपुर्ण जिल्ह्यात होवू लागल्या. 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपच्या संजयकाका पाटलांना साथ दिली.

संजयकाका पाटील खासदार झाले. किंग नव्हे तर किंगमेकर हे समीकरण त्यांच्या समर्थकांनी योग्य पद्धतीने लोकांपर्यन्त जिरवले. त्यानंतर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी खानापूर विटा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर उमेदवारी लढवली. पण त्यात त्यांचा पराभव झाला. सेनेचे अनिल बाबर निवडून आले. आमदारकीच्या ज्या मैदानावरून त्यांनी अनिल बाबर यांच्यावर टिका केली होती त्याच मैदानावरून त्यांनी विटा नगरपालिकेसाठी अनिल बाबर यांना पाठिंबा दिला. 

२०१९ च्या लोकसभेला त्यांनी वंचित आघाडीची वाट धरली.

वंचितचा जोर पाहता यंदा दोघांच्या भांडणात तिसऱ्याला लाभ असे वातावरण निर्माण झाले. तब्बल तीन लाखांची मते गोपीचंद पडळकरांनी आपल्या पारड्याच टाकली. त्यांनी आपल्या भाषणात भाजपच्या संजय काका पाटील यांना प्रखर विरोध केला. त्यामुळे संजयकाका पाटील यांच्या विरोधातला मोठ्ठा गट त्यांनी आपल्याकडे ओढला.

परिणामी विशाल पाटील यांचे मताधिक्य कमी झालं ही वस्तुस्थिती. पण पडळकरांच्या समर्थकांना ही वस्तुस्थिती कधीच मान्य नसते. किंगमेकर नाही तर आत्ता किंग व्हायचं या जोरावर आत्ता त्यांच राजकारण सुरू आहे. 

लोकसभेला ते वंचित आघाडीकडून उभे असताना संघाच्या वेषातले त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. तेव्हा ते आपल्या भाषणात म्हणाले होते परिवर्तन हि संसार का नियम हैं. आज पुन्हा ते भाजपची वाट धरतायत.

यावेळी देखील 007 चा दाखला देत त्यांचे समर्थक त्यांच्या निर्णयाच स्वागत करतील कारण पडळकर मुळातच विद्रोहाचा आवाज आपण आहोत हे सिद्ध केलेले नेते आहेत. 

हे ही वाच भिडू. 

1 Comment
  1. Vikram says

    007 🙂

Leave A Reply

Your email address will not be published.