गुढीपाडवा, तमाशा आणि नारायणगाव यांचं रिलेशन लय खास आहे….
तुणतुण्याची निंदा करी तिला वीणा म्हणू नये
नाही ऐकिली लावणी त्याला शहाणा म्हणू नये….!
महाराष्ट्राची ओळख म्हणजे तमाशा आणि तमाशाची पंढरी म्हणजे नारायणगाव. इथला प्रत्येक माणूस कलाकार असल्याचं मानलं जातं. दगडांच्या देशा कणखर देशा म्हणून ज्या महाराष्ट्राची ओळख सांगितली जाते त्याच महाराष्ट्राचा रांगडा खेळ म्हणून तमाशा आपल्या समोर प्रकट होतो.
सांस्कृतिक क्षेत्रातील बंड म्हणून तमाशा ही लोककला ओळखली जाते.
जर कधी तमाशा पाहिला नसेल तर परदेश जरी फिरले तरी त्याला किंमत नाही. तमाशा केवळ नटरंग आणि पिंजरा सिनेमापुरता मर्यादित राहत नाही तर त्याहून पलिकडे तमाशा, नारायणगाव आणि गुढीपाडवा यांचं रिलेशन आहे.
तमाशा म्हणजे अश्लील काहीतरी आहे, असा बऱ्याच लोकांचा समज आहे पण तमाशा या शब्दाचा ओरिजनल अर्थ पाहिला तर कळतं, की ही एक अतिशय समृध्द लोककला आहे.
तम म्हणजे अंधार आणि आशा म्हणजे प्रकाश.
अंधारातून प्रकाशाकडे नेणारी लोककला म्हणजे तमाशा.
बरीच पांढरपेशी लोक तमाशा अश्लील म्हणून नाकं मुरडतात आणि चोरून चोरून तमाशे बघतात.
शाहीर पठ्ठे बापूराव यांना तर तमाशाने जी ओळख मिळवून दिली त्याची सर इतर कोणाला आली नाही. तमाशाच्या जोरावर इंद्रपद मिळवेल अशी त्यांनी प्रतिज्ञा केली होती.
तर आपला विषय चालू होता तमाशा, नारायणगाव आणि गुढीपाडवा.
मार्च महिन्याचा एन्ड म्हणा किंवा एप्रिलचा पहिला आठवडा या काळात येतो गुढीपाडवा. हा सण मराठी मनांचा आनंदाचा सोहळा. याच काळात गावगाड्यात ग्रामदैवत असलेल्या देवांची जत्रा यात्रा भरते. पश्चिम महाराष्ट्राला गुढीपाडवा आणि जत्रा यात्रा यांचा मोठा वारसा आहे.
जसा गुढीपाडवा जवळ येऊ लागतो तशी नारायणगावमध्ये गावात तमाशा आणणाऱ्या सरपंच,कमिटी मेंबर,पंच या लोकांची सुपारी मिळवण्यासाठी गर्दी होऊ लागते. तमाशा हा फक्त मनोरंजन करण्यासाठी आणला जातो असं नाही तर त्यातून नकळतपणे समाज प्रबोधनसुद्धा केले जाते.
गुढीपाडव्याच्या काळात सगळ्यात मोठी उलाढाल ही तमाशाच्या फडाच्या माध्यमातून नारायणगावामध्ये होते. अडीच ते तीन लाख रूपये सुपारी घेणारे मातब्बर तमाशा फड याच नारायणगावामध्ये पाहायला मिळतात.
आता सुरवातीला म्हणजे तमाशाला खऱ्या अर्थाने लोकमान्यता मिळवून दिली ती म्हणजे शाहीर पठ्ठे बापूराव आणि पवळा हिवरगावकर यांनी. नंतर नारायण गावामध्ये विठाबाई नारायणगावकर यांनी जो काही या कलेला कळस चढवला तो आजच्या काळात कोणाला गाठणं जमणार नाही.
तमाशाची पंढरी म्हणून नारायणगावची ओळख पन्नास वर्षांहून अधिक जुनी आहे.
नारायणगावात सध्या काळू-बाळू, विठाबाई नारायणगावकर, दत्तोबा तांबे, अंजलीबाई नाशीककर, मंगला बनसोडे, सुरेखा पुणेकर, रघुवीर खेडकर, मालती इनामदार अशा महाराष्ट्रातील लोकप्रिय तमाशा फडांच्या ३२ राहूट्या आहेत. कोणता वग सादर केला जाणार यावर सुपारी ठरली जाते.
गुढी पाडव्यानंतर गावोगावच्या यात्रांना सुरुवात होणार आहे. या यात्रांमधे तमाशाचा फड जोरात रंगावा यासाठी गावकरी नारायणगावमधे तमाशा कलावंतांना सुपारी देण्यासाठी पोहोचतायत. इथं उभारण्यात आलेल्या राहूट्यांमधे तमाशाचे सौदे पक्के होताना दिसतायत.
पारंपरिकता जपली जाते ती याच नारायणगावाच्या तमाशा फडांमध्ये.
आजकालचे तमाशे हे बॉलिवूड स्टाईल झालेले दिसतात पण पारंपरिक तमाशाचा आनंद लुटायचा असेल तर तो फक्त नारायणगावात. गुढीपाडवा तमाशा आणि नारायण गाव यांचा इतिहास जितका समृध्द आहे तितकंच प्रेम त्यांना महाराष्ट्रभरातून मिळतं.
हे ही वाच भिडू :
- सरकारनं अश्लील म्हणून बॅन केलेल्या तमाशाला लोकमान्यता मिळवून दिली अण्णाभाऊ साठेंनीच
- महाराष्ट्राला नव्यानं तमाशाचं वेड नटरंगनंच लावलं होतं
- सरकार फक्त संस्कृती म्हणून तमाशाला मिरवते पण कोरोनामध्ये एकही मंत्री विचारायला आला नाही
- जत्रेत तमाशाचा फड रंगवणाऱ्या सुरेखा पुणेकर थेट न्यूयॉर्कला जाऊन पोहचल्या..