वाढदिवसाच्या दिवशीच जिथं राहतो तोच बंगला पाडण्याची वेळ गुरुदत्तवर आली होती….

गुरुदत्त हा तसा बऱ्याच दर्दी लोकांच्या काळजाचा विषय आहे. गुरुदत्त हा भारतीय सिनेमात सगळ्यात महत्त्वाचा दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. लोकांचं मन जिंकून घेण्याची ताकद गुरुदत्तच्या सिनेमात होती आणि अजूनही आहे त्यात काही वाद नाही.

तसं तर गुरुदत्त हा कल्ट सिनेमा दिग्दर्शक म्हणून फेमस आहे, प्यासा, कागज के फूल, भरोसा, साहिब बिवी और गुलाम, चौदहवी का चांद, सीआयडी हे सिनेमे केवळ अप्रतिम आहेत. देख ली जमाने की यारी , बिछडे सभी बारी बारी आणि अशी अनेक दर्दी गाणी…..

गुरुदत्तला लोकांचं अफाट प्रेम मिळालं, त्याच्या अभिनयावर लोकांनी कौतुकाचा वर्षाव केला, डोक्यावर घेतलं पण कुठेतरी एका बाजूने जाणवत राहत की गुरुदत्त निदान स्वतःवर तरी प्रेम करायचा का ? डिप्रेशन ही घातक कीड गुरुदत्तच्या जिंदगीला लागली आणि ती त्याला घेऊनच बुडाली. 

आपल्या पर्सनल आयुष्याशी गुरुदत्त इतका नाराज होता की त्याने दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता पण सुदैवाने तो वाचला. म्हणजे सिनेमा हा भिकार धंदा आहे असं जुनेजाणते माणसं म्हणतात ते अशा बाबतीत खरं वाटू लागतं. एक वेळ तर अशी आली होती की भारताचा लाडका अभिनेता आणि दिग्दर्शक असलेल्या गुरुदत्तने आपल्या वाढदिवशी आपलं राहतं घर गहाण ठेवण्याचा पराक्रम केला होता.

असं म्हटलं जातं कि गुरुदत्त हा डिप्रेशनचा शिकार झालेला होता त्यामुळे त्याला झोप येत नसायची. झोप यावी म्हणून तो झोपेच्या गोळ्या खायला लागलेला, गोळ्यांचे अतिप्रमाणात सेवन करणे ही त्याला सवय झालेली होती. खरंतर गुरुदत्तच्या पर्सनल आयुष्यात इतके राडे झाले होते कि विचारता सोय नाही.

 गुरुदत्तचं गीता दत्त बरोबर लग्न झालं होतं पण त्याच वेळेला त्याच्या आयुष्यात वहिदा रहमान आली आणि सगळे गणित बिघडलं. वहिदा रहमानच्या येण्यामुळे या जोडप्यामध्ये भांडणे सुरू झाली. वहिदा रहमानवर गुरुदत्तचं बेफाम प्रेम होतं पण जेव्हा वहिदा रहमान सोबत सूत जुळलं नाही तेव्हा मात्र गुरुदत्त आतून कोलमडला. त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि तो भावनेच्या भरात व्यसनाच्या आहारी गेला. दुसऱ्या बाजूला बायको गीता बरोबर त्याचे भांडण सुरू होती.

एकदा गुरुदत्तच्या एका मित्राने त्याला विचारले की तुला सुसाईड का करायचंय ? तेव्हा गुरुदत्त त्याला म्हणाला, ”मी माझ्या आयुष्याशी नाराज आहे असं अजिबात नाही, मी आतल्या आत असंतुष्ट आहे. मला फक्त असा एक कोपरा हवा आहे जिथे बसून मी निवांत झोपू शकतो आणि मनातलं सगळं बाहेर काढू शकतो. हे सगळं केल्यानंतर माझं आयुष्य जगण्यालायक होईल.”

मुंबईच्या एकदम पॉश एरियामध्ये म्हणजे पाली हिलमध्ये गुरुदत्तचा बंगला होता. आता आपल्या सारख्या सामान्य लोकांसाठी बंगला म्हणजे एक भव्य दिव्य आलिशान घर पण गुरुदत्तसाठी हा बंगला वाईट होता. याचं कारण गुरुदत्तची बायको गीता हिला हा बंगला ‘भूत बंगला’ वाटायचा. गीताला वाटायचं या बंगल्यात भुतांचा रहिवास आहे, बंगल्याच्या आजूबाजूच्या झाडांवर भुतं दिसतात. हे तर काहीच नाही गीताला असंही वाटायचं की, या बंगल्यामुळं त्यांच्या वैवाहिक जीवनात वितुष्ट आलं.

साल होतं १९६३ आणि याच काळात गुरुदत्तचा बर्थडे आला होता तारीख होती नऊ जुलै. आता आपण आपला बर्थडे एकदम धुमधडाक्यात साजरा करतो, पण गुरुदत्त आपला वाढदिवस कायमचा संपवू इच्छित होता जेणेकरून तो स्वतःच्या आणि लोकांच्याही लक्षात राहणार नाही.

 याच दिवशी गुरुदत्तनं काही मजूर बोलावून आणले आणि त्यांना सांगितलं की, ‘हा बंगला पाडायचा आहे.’ मजुरांनी गुरुदत्तच्या म्हणण्याप्रमाणं काम केलं आणि बंगला पाडला. या बातमीचा मोठा गवगवा झाला की त्याने आपला राहता बंगला का पाडला ?

एके दिवशी गुरुदत्त लेखक विमल मित्र यांना घेऊन आपल्या उध्वस्त बंगल्यावर आला. विमल यांनी गुरुदत्तला विचारलं की बंगला का पाडला? गुरुदत्तनं उत्तरादाखल सांगितलं की, ”गीतामुळं..”

”कारण, घर नसण्यापेक्षा घर असण्याची तकलीफ जास्त भयंकर असते!”

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.